24 Mar 2009

भाग ८ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !
संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.


३३) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये चिपळूण येथील अधिकार्‍यांना लिहिलेले पत्र ...सैन्यासंबंधी निरनिराळ्या तजविजींवर शिवरायांचे बारकाईने लक्ष्य असे, त्याचप्रमाणे आपल्या सैन्याकडून रयतेला यत्किंचितहि उपसर्ग होऊ नये म्हणून ते किती दक्ष असत हे त्यांनी ९ मे १६७४ रोजी आपल्या चिपळूण येथील अधिकार्‍यांना लिहिलेल्या पत्रावरुन स्पष्ट होते.


त्यात राजे म्हणतात,"मोघल मुलकात आले त्याहूनहि अधिक तुम्ही. रयतेस काडीचाहि आजार द्यावयाची गरज नाही."


पत्रात राजांनी आपल्या छावणीमध्ये कुठकुठल्या बाबतीत बारकाईने लक्ष्य द्यावे हे सुद्धा सांगितले आहे.*****************************************************************************************************************************************************************

भाग ७ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

३२) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६६२ मध्ये रोहिडखोरे मधील कारी येथील देशमूख सर्जेराव जेधे यांना लिहिलेले पत्र ...

१६६१ पासून मुघल सरदार शाहिस्तेखान पुण्यात येउन बसला होता. स्वराज्यावर सारखे हल्ले करत होता. ह्यात मावळामधल्या लोकांची जीवित व वित्तहानी खुप होत असे. आपल्या प्रजेबद्दल सदैव जागरुक असणाऱ्या राजांनी रोहिडखोरे मधील कारी येथील देशमूख सर्जेराव जेधे यांना २३ ऑक्टोबर १६६२ रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,"जे बांद धरून नेतील त्याचे पाप तुमचा माथा बसेल" ह्या पत्रामधून राजांची आपल्या रयतेविषयी असणारी काळजी व तळमळ दिसून येते.


*****************************************************************************************************************************************************************

भाग ६ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.


३१) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये बाजीप्रभु देशपांडे यांना लिहिलेले पत्र ...


हिरडस मावळामध्ये जासलोगड़ नावाचा ओस पडलेला एक किल्ला होता. 'त्याचे नाव मोहनगड असे ठेवून तो किल्ला वसवावा' अशी आज्ञा शिवरायांनी बाजीप्रभु देशपांडे यांना आपल्या १३ मे १६५९ रोजी लिहिलेल्या पत्रात केली आहे.


राजे म्हणतात की,"पिलाजी भोसले यांना २५ माणसे देउन गडाची जबाबदारी द्यावी. त्यांना गडावर बांधकाम करून द्यावे. गडाचे बांधकाम मजबूत असावे व ते एका पावसाळ्यात मोडकळीस येऊ नये." पत्रात अखेर राजे म्हणतात की,"लिहिल्याप्रमाणे किल्ला मजबूत करुनच खाली उतरणे. साहेबांचा (शिवरायांचा) तुमच्यावर पूर्ण भरोसा आहे."
*****************************************************************************************************************************************************************

16 Mar 2009

भाग ५ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

४ थ्या भागापासून आपण अजून जास्त महत्वाच्या पत्रांकड़े वळालेलो आहोत.


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.३०) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७९ मध्ये औरंगजेबाला लिहिलेले पत्र ...

औरंगजेब बादशहाने ३ एप्रिल १६७९ रोजी समस्त देशातील हिंदूंपासून 'जिझिया कर' वसूल करण्याचे जाहिर फर्मान काढले. हिंदूंना मुलगा झाला म्हणजे १० रुपये आणि मुलगी झाली म्हणजे ५ रुपये असा कर सुद्धा त्याने लावला. या फर्मानाला उत्तर म्हणून शिवरायांनी औरंगजेबाला फारसी मध्ये पत्र पाठवून "अग्नि तृणाने झांकितात याचे आश्चर्य वाटते" ह्या तीव्र शब्दात निषेध केला. त्या पत्राच्या मराठी अनुवादित पत्रामधील काही महत्वाचा भाग खालील प्रमाणे.

राजे म्हणतात,"आम्ही इकडे आल्यावर पादशाई खजिना रिकामा जाहला आणि सारे द्रव्य खर्च जाहले." पुढे म्हणतात "पादशहाचे घरी दरिद्राचा वास जाहला की काय"*****************************************************************************************************************************************************************

भाग ४ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

गेल्या ३ भागात आपण विविध प्रकारची २८ पत्रे पाहिली. ४ थ्या भागापासून आपण अजून जास्त महत्वाच्या पत्रांकड़े वळणार आहोत.


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

२९) छत्रपति शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचे सेनापती मालोजी घोरपडे यांना लिहिलेले पत्र ...

राजाभिषेकानंतर छत्रपति शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखली. गोवळकोंडयाच्या कुतुबशाही बरोबर सख्य करून विजापुरच्या आदिलशाहीचा नाश करायचा हे या मोहिमे मागचे सूत्र होते. १६७६-१६७७ ह्या २ वर्षात आदिलशाही बरीच खिळखिळी करण्यात राजे यशस्वी देखील झाले. या दरम्यान बहलोलखान पठाण याने अल्पवयीन आदिलशहाला ओलीस ठेवून आणि आदिलशाहीचा वजीर खवासखान याचा खून पाडून आदिलशाही स्वतःच्या ताब्यात घेतली. हे कळल्यावर राजांनी गोवळकोंडा येथून आदिलशाहीचे सेनापती मालोजी घोरपडे यांना खालील पत्र मार्च १६७७ मध्ये लिहिले आहे.


ह्यात राजे म्हणतात,"विजापुर पठाणाचे हातात गेले. आता आदिलशाही कैची? तुम्ही उगाच तिकडे आपली आदिलशाही आहे म्हणुन गुंतून राहिले आहां" पुढे राजे म्हणतात,"तुम्ही मराठे लोग आपले आहां. तुमचे गोमटे व्हावे म्हणुन पष्टच तुम्हास लिहिले आहे." हे संपूर्ण पत्र वाचावे असे आहे.

ह्या पत्रास उत्तर म्हणुन मालोजी स्वराज्यात दाखल झाले. पुढे १६८५ मध्ये छत्रपति संभाजी महाराज यांच्या काळात सैन्याचे सरनौबत देखील झाले. संताजी - धनाजी मधल्या संताजी घोरपड़े यांचे ते वडिल.
*****************************************************************************************************************************************************************

14 Mar 2009

भाग ३ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !आत्तापर्यंत गेल्या २ भागात आपण विविध प्रकारची पत्रे पाहिली. या भागात छत्रपति शिवरायांनी लिहिलेल्या काही राजकीय पत्रांवरुन त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेण्याचा पर्यंत आपण करणार आहोत.


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.२१) इंग्लंडच्या राजाने १६ जानेवारी १६६८ रोजी शिवाजी महाराजांना पत्र लिहून ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारासाठी परवानगी दयावी म्हणुन विनंती केली. उत्तरादाखल २ ऑगस्ट १६६८ रोजी महाराजांनी जे पत्र आपल्या वकिलामार्फ़त इंग्लंडच्या राजाला पाठवले त्यात त्यांचा मुत्सद्दीपणा आणि जागरूकता दिसून येते. राजे म्हणतात,"दगाबाजी केलियास दोस्ती राहणार नाही आणि कंपनिस ताकीद करावी की व्यापाराशिवाय दुसरे कामात शिरू नये."*****************************************************************************************************************************************************************

२२) आग्रा येथून सुटून आल्यावर १९ नोव. १६६७ रोजी शिवरायांनी पोर्तुगीजांविरुद्ध बारदेश येथे स्वारी केली. त्या भागातले काही वतनदार राजांना शरण आले तर काही पोर्तुगीजांकड़े पळून गेले. डिचोली येथील काही देसाई जे राजांना शरण आले होते त्यांना खालील कौलनाम्याने राजांनी वतन विषयक आश्वासन दिले. त्यात "देसाई मलसणवे यास त्याच्या हरामखोरी बद्दल योग्य ते शासन मिळेल" असे स्पष्ट लिहिले आहे.*****************************************************************************************************************************************************************

२३) मुकुंद कान्हो देशपांडे याच्या कामामध्ये बाबाजी राम देशपांडे अडथळे आणत असे. हे कळल्यावर राजांनी त्याला २७ डिसेंबर १६६८ रोजी खरमरीत पत्र लिहिले. राजे म्हणतात,"नवे खलेल सर्वथा न करणे ....... ते काही चालणार नाही."*****************************************************************************************************************************************************************

२४) "आदिलशाही प्रदेशावर स्वाऱ्या करा व आपल्या हक्काची अंमलबजावणी करून घ्या, आम्ही तुम्हास अवश्य पाठिंबा देऊ" असे आश्वासन शिवाजी महाराजांनी दत्ताजी केशवजी पिसाळ या आपल्या वाई येथील देशमुखास दिले आहे. २३ जुलै १६६९ रोजी लिहीलेल्या या पत्राने केशवजी शत्रुविरुद्ध अधिक उद्युक्त झाला आणि स्वराज्याच्या विस्तारास राजांच्या या धोरणाचा चांगलाच उपयोग झाला.
*****************************************************************************************************************************************************************

२५) चेउल सुभ्यामधले वतनदार, देशमुख आणि देशपांडे त्या भागाच्या सुभेदारीचे काम नीट चालू देत नसत. "उत्तम सुभेदार पाठवला असतानाही तुम्ही त्याच्याशी नसते वाद घालता आणि सुभेदारीचे काम होऊ देत नाही हे चालणार नाही. तुम्ही त्या सुभेदाराचा निर्णय मान्य करा व तसे न केल्यास तुम्हाला शासन होइल. काही मुलाहिजा होणार नाही" असे राजांनी १५ नोवेंबर १६७१ रोजी लिहिलेल्या पत्रात रोखठोकपणे म्हटले आहे.
*****************************************************************************************************************************************************************२६) शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी १८ जानेवारी १६७५ रोजी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले.


त्यात ते म्हणतात,"ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?" पुढे राजे म्हणतात,"या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे."
*****************************************************************************************************************************************************************

२७) शिवाजी महाराजांना न कळवता हवालदार शामजी आवजी याने सूर्याजी दूँदुसकर याच्या घरी मोकलदार बसवले. तेंव्हा राजांनी शामजी आवजी याला १ जून १६७५ रोजी "ज्याचा चाकर तोच येथे चाकराचा धनी आहे" असे ताकिद देणारे पत्र पाठवले.*****************************************************************************************************************************************************************


२८) सासवड जवळ असलेल्या सुपे खुर्द गावची पाटिलकी निळकंठराव, काटकर व धनगर यांच्याकडे होती. असे असताना सुद्धा त्या भागाचे सुभेदार राघो बल्लाळ यांनी रामोजी व खंडोजी जगताप यांच्या सांगण्यावरुन धनगराची माणसे कैदेत टाकली आणि सांगून सुद्धा सोडली नाहीत. "हा कोण इंसाफ? तुम्हास हा अन्याय कोणी करावयास सांगितला होता?" असा जाब शिवरायांनी राघो बल्लाळ याच्याकडे ६ मार्च १६७६ च्या पत्रात मागितला आहे.*****************************************************************************************************************************************************************

भाग २ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

या लेखात छत्रपति शिवरायांनी लिहिलेल्या काही पत्रांवरुन त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेण्याचा पर्यंत आपण करणार आहोत.

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.११) जावळीचे महत्त्व राजांना १६५१ पासूनच उमगले होते. चंद्रराव मोरे याने जेंव्हा बिरवाडीचे बाजी पाटील आणि माल पाटील यांची वतने बळकावली तेंव्हा त्यांनी शिवरायांपुढे गार्‍हाणे मांडले. राजांनी त्यांच्या पाटीलकीच्या अधिकारपणाची मान्यता देणारे पत्र पाठवताना म्हटले आहे की, "तुम्ही अधिकारपण खाउनु अधिकारपणाची चाकरी करणे"


*****************************************************************************************************************************************************************


१२) स्वराज्याच्या कार्यात शहाजीराजांच्या काळापासून मोलाची भूमिका निभावणारे कान्होजी जेधे १६६० मध्ये काहीश्या कारणाने आजारी पडले. त्यांनी जिविताची आशा सोडली. आपले देशमुखीचे वतन राजांनी आपल्यानंतर आपल्या मुलांकडे न चालवले तर त्यांचे कसे होइल ह्या चिंतेने त्यांनी राजांना पत्र लिहिले. त्यास उत्तर देताना राजे म्हणतात, "तरी आता नवे लिहीणे काय लागले" ह्या पत्रात कान्होजी जेधेंवरचा राजांचा आदरभाव व प्रेम दिसून येते.

*****************************************************************************************************************************************************************

१३) पंताजी पंडित हा स्वराज्याशी एकनिष्ठ असणारा राजांच्या विश्वासाचा माणूस. रायाजी देशमुख याने आपल्या साथीदारांसोबत ह्या पंताजी वर हल्ला करून त्याची बेअदबी केली. हे राजांना समजताच त्यांनी "खोडी काढणार्‍यांनी पंताजी पंडिताची क्षमा मागावी नाहीतर कैदेत पडून राजगडावर धोंडे वाहण्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल" अशी तंबी राजांनी दिली.*****************************************************************************************************************************************************************


14) निळोपंत मुजुमदार हे स्वराज्याच्या वतनाचे आणि महसुलीचे काम बघत. हे काम कोणा दुसऱ्याकड़े सोपवून 'राजांनी मला स्वारीवर पाठवावे' अशी विनंती त्यांनी राजांना केली. तेंव्हा त्यांना लिहिलेल्या पत्रात राजे म्हणतात "एकाने सिद्ध संरक्षण करावे एकाने साध्य करावे. दोन्ही कामे साहेब बराबरीनें मानिताती."
*****************************************************************************************************************************************************************

१५) प्रभावली सुभ्यामधल्या बापूजी नलावडे याने सप्टेंबर १६७१ मध्ये काही कारणाने एका ब्राह्मणावर तलवारीने वार केला आणि नंतर स्वतः पोटात सुरा खूपसून आत्महत्या केली. सुभ्यामध्ये काहीजण सबनिसाला सुद्धा अश्या धमक्या देत आहेत असे समजल्यावर राजांनी तेथले सुभेदार तुकोराम यांना पत्र लिहिले. "लोकांस असे बेबंद होऊ देऊ नका." आपल्या प्रजेबाबत राजे किती जागरूक होते ते ह्या पत्रामधून समजून येते.
*****************************************************************************************************************************************************************


१६) पदाजि यशवंतराव शिवतरकर याने बेसंगपणाची वर्तवणुक केल्यामुळे राजांनी त्याचे 'डोळे काढून गडावर कैदेत टाकले.' ही घटना १६७१ मध्ये घडली. यावेळी यशवंतराव याच्या मुलाला गुंजण-मावळचे देशमुख हैबतराव शिळीमकर यांनी आश्रय दिला. आपल्या हातून आगळिक झाल्याबद्दल राजे आपल्याला सुद्धा शासन करतील या भीतीने हैबतराव परागंदा झाला. तेंव्हा राजांनी त्याला पुढील आश्वासन पत्र पाठवले.*****************************************************************************************************************************************************************


१७) राजाभिषेकाच्या वेळी राजांनी बाळाजी आवजी यांना अष्टप्रधानामध्ये एक पद देऊ केले होते. पण अत्यंत नम्रपणे त्याला नकार देताना 'राजांनी मला वंशपरंपरेने चिटणिशी द्यावी' अशी त्यांनी विनंती केली. राजाभिषेकानंतर ३ ऱ्या दिवशी म्हणजेच ९ जून १६७४ रोजी राजांनी खालील सनदेद्वारे ती विनंती मान्य केली आहे.*****************************************************************************************************************************************************************


१८) बकाजी भोसले यांनी इमाने इतबारे बजावलेल्या कामगिरी बद्दल खुश होउन शिवरायांनी सप्टेंबर १६७५ मध्ये मौजे-खामगाव येथील स्वतःची पाटिलकी त्याला दिली.*****************************************************************************************************************************************************************

१९) चिंचवड येथील देवांना लागणारे मीठ काहिही पैसे न घेता देण्याचा परीपाठ होता. १६७६ मध्ये पुढे सुद्धा ते तसेच फुकट मिळावे म्हणून चिंचवडकर देवांनी राजांकडे सनदेची मागणी केली. तेंव्हा राजांनी "या उपरि फुकट मीठ कोणापासून घ्यावयाची गरज नाही" असे म्हणून सरकारातून मीठ देण्यात यावे असे पत्र सुभेदारला पाठवले.


*****************************************************************************************************************************************************************

२०) मावळ तालुक्याचा अधिकारी कोनेर रुद्र याने गोविंदराव सीतोळे याचे पाटीलकीचे वतन रणपिसावाडीमधल्या कुणबी याला जून १६७९ मध्ये मधल्यामध्येच दिले. या अन्यायाबद्दल गोविंदराव याने महाराजांकडे तक्रार केली. तेंव्हा राजांनी कोनेर रुद्र ला तंबी देणारे पुढील पत्र पाठवले. "तरी नसते कथले करावयास तुज गरज काये"
*****************************************************************************************************************************************************************

भाग १ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

या लेखात छत्रपति शिवरायांनी लिहिलेल्या काही पत्रांवरुन त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेण्याचा पर्यंत आपण करणार आहोत.

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.


१) शके १५५७ म्हणजेच इ. स. १६४५ च्या एप्रिल महिन्यात वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली. रोहिड खोरे आणि वेळवंड खोरे येथील देशपांडे - कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे राजांसोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर आदिलशहाच्या शिरवळ येथल्या सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले. या पत्रामुळे दादाजी चिंतेत असल्याचे कळताच राजांनी त्यांना खालील पत्र पाठवले. 'हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे' या आशयाचे पत्र पाठवले. आपण सुरु केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनूसार आहे, ही धारणा त्यांनी ह्या पत्रामधून व्यक्त करून त्यांचे मनोबल वाढवले आहे.


*****************************************************************************************************************************************************************


२) स्त्रियांशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांविरुद्ध शिवरायांचे धोरण अतिशय कडक होते. ह्या बाबतीत ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. 'बदअमलाबद्दल कड़क शासन' ते करत असत. जानेवारी १६४६ मध्ये त्यांनी रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ़ भिकाजी गुजर याला एका स्त्री सोबत गैरवर्तनासाठी चौरंग करण्याची शिक्षा दिली होती. (चौरंग करण्याची शिक्षा म्हणजे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडणे, पण त्यानंतर माणूस रक्तस्त्राव होउन दगावू नये ह्यासाठी जखमा गरम तुपात बूडवल्या जात.) आणि त्याचाच कुळातील सोनजी गुजर ह्याला २८ जानेवारी १६४६ च्या पत्रानुसार राजांनी पाटिलकी मान्य केली आहे.*****************************************************************************************************************************************************************


३) शिवरायांनी स्वराज्य उभे करताना मावळातला एक एक माणूस जोडण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. 'मी शत्रूंना दगे दिले, मित्रांना दगे दिल्याचे दाखवा' असे आवाहन त्यांनी केले होते. त्याला आजपर्यंत उत्तर आले नाही. पुरंदरचे किल्लेदार सरनाईक महादजी यांचे निधन झाल्यावर त्यांचे पुत्र निळकंठराव यांना पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात,"जो पर्यंत तुम्ही आम्हासी इमाने वर्ताल, तो पर्यंत आम्हीहि तुम्हासी इमाने वर्तोन. तुम्हापासून इमानांत अंतर पडिलियां आमचा हि इमान नाही."*****************************************************************************************************************************************************************

४) शिवरायांनी स्वराज्य उभे करताना मावळातला एक एक माणूस जोडण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती याचे अजून एक उदाहरण. गुंजण-मावळचे देशमुख हैबतराव शिळीमकर हे स्वराज्याच्या कार्यात सामिल होते. आदिलशहाच्या काही वतनदारांनी 'शिवाजी तुझे वतन बुडवेल' आदि गोष्टी सांगून हैबतरावास महाराजांपासून फोडण्याचा पर्यंत केला. हे कळताच राजांनी हैबतरावास विश्वास देणारे पुढील पत्र पाठवले. त्यात ते म्हणतात,"तुम्हास साहेब घरिच्या लेकरासारिखे जाणिती."*****************************************************************************************************************************************************************

५) शिवराय १६७४ मध्ये छत्रपति होण्याआधी विजयनगरचे साम्राज्य हे दक्षिण भारतातले शेवटचे हिन्दू साम्राज्य होते. ते १५ व्या शतकात लयास गेल्यानंतर दक्षिणेमध्ये आदिलशाही, कुतुबशाही यांचे राज्य होते. विजयनगरच्या हिंदू साम्राज्याचा वंशज तिरुमलराय यांना शिवरायांनी १५ एप्रिल १६५७ च्या पुढील रोप्यपटाद्वारे काही जमीन निर्वाहासाठी इनाम म्हणून दिली.

*****************************************************************************************************************************************************************

६) महाराजांनी आळंदीच्या 'ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या व्यवस्थेसाठी' पुढील प्रमाणे इमानपत्र दिले होते.


*****************************************************************************************************************************************************************
७) शिवाजी महाराजांनी अफझलखानवध प्रसंगी प्रतापगडावर भवानी देवीची स्थापना केली होती. या 'देवतेच्या नैवेद्याची व्यवस्था' त्यांनी पुढील प्रमाणे केली होती.
*****************************************************************************************************************************************************************

८) दक्षिण दिग्विजयला जाण्याआधी शिवाजी महाराजांनी रांगणा किल्ल्यापासून ४ की.मी. वर असणाऱ्या पाटगावच्या मौनीबाबांचे दर्शन घेतले असावे. राजे दक्षिण दिग्विजय वरुन परत आल्यावर मौनीबाबांचा शिष्य तुरुतगिरी राजांना येउन भेटला. तेंव्हा राजांनी पाटगावच्या मठाला सालीना १००० माणसांचा शिधा देत असल्याचे पत्र आपल्या तेथील अधिकाऱ्याला लिहिले. 'पाटगाव मौनीबाबा यांच्या खर्चात लक्ष्य न घालणे' असे ते ३ मे १६७८ च्या आपल्या या पत्रात म्हणतात.


*****************************************************************************************************************************************************************
९) १६७८ च्या विजयदशमीला शिवरायांनी समर्थ रामदास यांच्या चाफळ येथील मठाला सनद दिलेली आहे. त्यात '३३ गावे, ४१९ बिघे जमीन, १ कुरण व १२१ खंडी धान्य' यांचा समावेश आहे.
*****************************************************************************************************************************************************************

१०) आग्र्याहून सुखरूप सुटून राजगडी परत येताना राजांनी ९ वर्षाच्या शंभूराजांना कृष्णाजी विश्वासराव यांच्याकड़े ठेवले होते. ते शंभूराजांना राजगडी परत घेउन आल्यावर राजांनी त्यांना १ लाख रुपये इनाम दिले.*****************************************************************************************************************************************************************