30 May 2011

महिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...

बखरीमध्ये जो ऐतिहासिक कालखंड दर्शवलेला आहे त्यावर आपण गेल्या १० भागांमध्ये नजर टाकली. वि.का.राजवाडे यांनी बखरीला दिलेल्या प्रस्तावनेमध्ये आद्य महाराष्ट्रीक नेमके कोण होते ह्याबद्दल काही विश्लेषण केलेले आहे. आता ते जरा बघुया.

पुरातन काळी महाराष्ट्राच्या उत्तर कोकण भागात गुहाशय, कातकरी (कातवडी), नाग, कोळी (कोल), ठाकर, दुबळे, घेडे, वारली, मांगेले (मांगेळे), तांडेले हे लोक वस्ती करून राहत होते. नागवंशीय लोक समूहाने कोकणात वस्त्या करत होते. आर्यादी भाषा बोलणारे जे लोक उत्तरेकडून आले त्यांचा नागांशी झालेल्या शरीर संबंधातून आजचे जे 'मराठे' ते उदयास आले.

महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर दुबळे आणि घेडे या जाती आहेत. ह्या दोन्ही जाती गुजराती बोलतात आणि शेती करून जगतात. भाषेवरून ते उत्तरेकडून आल्याची सहज अनुमान काढता येते. मुख्य व्यवसाय शेती असल्याने ह्या जाती समुद्राकडे कधी सरकल्या नाहीत आणि वर रानात देखील चढल्या नाहीत. ह्याच समकाळात वारली हा सह्याद्रीच्या जंगलात आपले स्थान राखून होता. वारली हे उत्तम मराठी बोलतात आणि ते सूर्य उपासक आहेत. इतर जातींच्या मनाने वारली हा बराच प्रगत होता असे दिसते. पण तो नेमका कुठून आला हे निश्चित सांगता येत नाही. तो बहुदा उत्तरेकडून म्हणजे सध्याच्या विंध्योत्तर भागातून आला असावा असा कयास राजवाडे यांनी मांडलेला आहे. समुद्रापासून साधारण १५ मैल अंतरावर असलेल्या रानात त्याचे वास्तव्य होते.

समकाळात मांगेले हे मुळचे आंध्रप्रदेशातून आलेले लोक समुद्र किनारी वसले. गोदावरीच्या सुपीक खोऱ्यातून त्यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे वाटचाल केली आणि येताना ते स्वतःचा मासेमारीचा धंदा येथे घेऊन आले. समुद्राशी निगडीत उपजीविका असल्याने त्यांनी समुद्र किनाऱ्यापासून अर्धामैल पर्यंतच्या टापूत वस्ती केली आणि आजही ते तेवढाच टापू बाळगून आहेत. समुद्र सोडून ते कधी डोंगराकडे सरकले नाहीत. आजही उत्तर कोकणातील समुद्र किनाऱ्यावर मांगेले मासेमारीचा धंदा करतात.

वारली जेंव्हा सह्याद्रीच्या डोंगररांगात वस्त्या करून राहू लागला तेंव्हा तेथे खूप आधीपासून कातकरी (कातवडी), ठाकर आणि डोंगरकोळी लोकांच्या वस्त्या होत्या. कातकरी हा सर्वात जुना. कातकरी हा शब्द कृतीपट्टीन ह्या शब्दावरून आला असावा असे अनुमान राजवाडे मांडतात. कृती म्हणजे कातडे आणि पट्ट म्हणजे वस्त्र. हे लोक मुळचे रानटी असून त्यावेळी प्राण्यांचे कातडे पांघरून राहायचे म्हणून त्यांना हे नाव पडले असावे. कातकरी जेंव्हा जंगलात राहत होते तेंव्हा त्याहीपेक्षा निबिड अशा डोंगर कपाऱ्यात गुहाशय राहत होते. कातकरी किमान कात तरी पांघरी मात्र गुहाशयाला ती कला देखील अवगत नव्हती. ह्या दोघांत कातकरी टिकला. गुहाशयामागून रानात नाग, ठाकर, कोळी आणि मग वारली आले.

ठाकर हे वारल्यांच्या आधीपासून सह्याद्रीची राने राखून होते आणि त्यांचे अस्तित्व फक्त उत्तर भागात नाही तर सर्वत्र पसरलेले होते. ठाकर लोकांच्या थोडे खालच्या रानात कोळी लोकांची वस्ती होती. ह्यांच्या मधलेच समुद्र कोळी हे मासेमारी वर जगत आणि समुद्र किनारयाने राहत. कोळी जातीचे मूळ वंशज कोल हे होते.
कातकरी लोकांच्या मूळ अनार्य भाषेचे रूप कसे असेल ह्याबद्दल आता पत्ता लागण्याचा जरा सुद्धा संभाव राहिलेला नाही. मांगेल्यांचे आणि वारली लोकांचे तेच. राजवाडे यांनी ह्याबद्दल बराच खेद व्यक केला आहे. परंतु त्यांनी बरीच मेहनत घेऊन अंदाजे स्थळ-काल दर्शवणारा एक तक्ता तयार केला आहे. तो असा...

अतिप्राचीन लोक - गुहाशय, कातकरी (कातवडी), नाग : शकपूर्व २००० च्या पूर्वी (अंदाजे शकपूर्व ५०००)

मध्यप्राचीन लोक- ठाकर, कोळी, वारली : शक पूर्व २००० ते १०००

प्राचीन लोक -
दामनीय, महाराष्ट्रिक : शकपूर्व ९०० ते ३००

पाणिनिकालीन लोक -
मांगेले, सातवाहन, नल, मौर्य : शकपूर्व ३०० ते शकोत्तर २००

जुने मराठे -
चौलुक्य, शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकुट : शकोत्तर ३०० ते ११०० 

जुने मराठे - बिंब, यादव : शकोत्तर ११०० ते १२७०

मुसलमानी राज्य - मलिक, अमदाबादचे सुलतान : शकोत्तर १२७० ते १४६०

युरोपियन - पोर्तुगीझ :शकोत्तर १४२२ ते १६६०

अर्वाचीन मराठे - भोसले : १६६० ते १७२५

युरोपियन - इंग्रज : शकोत्तर १७२५ ते १८६९

ह्या नोंदी घेताना त्यांनी 'इसवी सन'चा वापर न करता 'शक' वापरला आहे.

अपेक्षा आहे की येथे मांडल्या गेलेल्या अल्प माहितीमुळे आपल्या ज्ञानात काहीतरी भर निश्चित पडली असेल... पुन्हा भेटू एक नवीन ऐतिहासिक विषय घेऊन...
........................................ समाप्त .......................................