29 Mar 2010

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ५. युद्धतंत्र (भाग २) ... !

मागील भागावरुन पुढे सुरू ...

आधीच्या भागात आपण 'कावा' या शब्दाचा खरा अर्थ पहिला. आता आपण बघुया हे काव्याचे तंत्र किती योग्य होते. प्राचीन भारतीय राजनीतीमध्ये युद्धाचे ३ प्रकार नमूद केलेले आहेत. १. प्रकाशयुद्ध, २. कूटयुद्ध आणि ३.तूष्णीयुद्ध. यामध्ये तूष्णीयुद्ध हे निषिद्ध मानलेले आहे. तर प्रकाशयुद्ध म्हणजे उभय पक्ष काळ-वेळ ठरवून जेंव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात ते. प्रकाशयुद्ध हे 'धर्मिष्ट' असल्याचे स्पष्ट असले तरी कूटयुद्ध सुद्धा 'अधर्मिष्ट' नसते.


जेंव्हा कुठल्याही एका पक्षास प्रकाशयुद्ध करणे शक्य नसते तेंव्हा कूटयुद्ध करावे असे कौटील्य सांगतो. जसे... शत्रूचे सैन्य आपल्यापेक्षा संखेने वरिष्ठ असेल पण युद्धक्षेत्र आपल्याला अनुकूल असेल तर कूटयुद्ध करावे. शत्रु सैन्य नदी पार करत किंवा डोंगर उतरत-चढत असेल तरी त्यावर हल्ला करावा. कौटील्य सांगतो की, 'गिरीदुर्ग, वनदुर्ग, कंटककिर्ण अरण्य, पाणथळ जागा, गिरीशिखरे, उंचसखल भूभाग हे प्रकाशयुद्धाने हाती लागत नाहीत. ह्यासाठी कूटयुद्ध करावे. पुढे तो म्हणतो,'वादळी वारा सुटला असताना, वातावरण धुक्याने भरलेल असताना शत्रू स्थळावर आक्रमण करावे, रात्रीच्या वेळी देखील हल्ले करावेत.' छत्रपति शिवरायांनी याच कूटयुद्धनीतीचा पुरेपुर वापर करत शत्रूला पराजीत केले. आपण त्याला आज 'गनिमी कावा' म्हणतो इतकेच. संख्येने सदैव कमी असलेल्या मराठा सैन्याला विजय प्राप्त व्हावे म्हणुन त्यांनी लढाईची रणक्षेत्रे अनुकूल निवडली. शत्रु जर आपल्या प्रतिकूल रणक्षेत्रामध्ये असेल तर स्वतः शत्रूला अनुकूल न होता शत्रूला आपल्या अनुकूल रणक्षेत्रामध्ये खेचून आणणे यात त्यांचे कौशल्य होते. (उदा. अफझलखान प्रकरण. वाई येथे बसलेल्या खानास राजांनी हरप्रयत्ने जावळीच्या जंगलात खेचून आणलेच.) अनुकूल रणक्षेत्र निवडताना शिवरायांनी एक पथ्य नियमितपणे पाळले ते म्हणजे लढाई स्वराज्याच्या भूमीत शक्यतो होऊ द्यायची नाही. (अपवाद - पुरंदरचे युद्ध.) कारण उभय पक्षात लढाई झाली की विजय कोणाचाही होवो नुकसान हे सामान्य जनतेचे होते. पिके जाळली जाणे, घरे लुटणे असले प्रकार सर्रास होत असत. कधीही भरून येणार नाही अशी हानी होत असे.

कूटयुद्धामध्ये वापरले जाणारे अजून एक प्रभावी तंत्र म्हणजे 'बेरीरगिरी' - म्हणजे फिरती लढाई. लढाई करता-करता एका जागी न थांबता रणक्षेत्र थोड्या अंतराने बदलणे आणि शत्रूला पांगवणे. त्यानंतर चहुबाजूने हल्ले करून हैराण करणे. (उदा. जालना, खानदेश येथील हल्ले १६७९) दुसरे अजून एक तंत्र म्हणजे रात्री चालकरून शत्रू जवळ पोचणे आणि भल्या पहाटे शत्रुवर हल्लाबोल करणे. हे तंत्र तर मराठ्यांनी कैक वेळा वापरले. तानाजी मालुसरे यांनी घेतलेला सिंहगड(१६७०), कोंडाजी फर्जंद यांनी घेतलेला पन्हाळा(१६७३), प्रतापराव - आनंदराव यांचे बहलोलखानाबरोबरचे उमराणीचे युद्ध, मोरोपंत - प्रतापराव यांचे मुघलांविरूद्धचे साल्हेरचे युद्ध अशी अनेक उदाहरणे आहेत. गनिमी काव्यामध्ये सर्वात महत्वाचे असतात त्या 'लष्कराच्या गतिमान हालचाली' आणि 'शत्रुवर अनपेक्षित आक्रमण.' शिवरायांनी लालमहालामध्ये शाहिस्तेखानावर केलेल्या हल्याने संपूर्ण भारत अचंभीत झाला. विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,'पापणी लवण्यास जेवढा अवधी लागत नाही, खालचा श्वास वर येण्यास जितके क्षण लागतात तेवढ्या कालावधीत एखाद्या भुजंगाने झडप घालावी तदवत शिवाजीने शास्ताखानावर हल्ला केला.'

कूटनितीच्या प्राचीन युद्धतंत्राचे पालन करत छत्रपति शिवरायांनी विजयाची एक मोहोर दख्खनेवर उमटवली. एका नव्या साम्राज्याचा पाया निर्माण केला. पण ह्या सर्वांसोबत चोख लष्करी व्यवस्था, दुर्गमदुर्ग बांधणी आणि कोशबल यांची योग्य सांगड घातली. शिवरायांचे राज्यकारभार विषयक नेमके धोरण काय होते??? ते आपण येत्या भागात जाणून घेऊ...
.
.
संदर्भ - शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)

28 Mar 2010

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ४. युद्धतंत्र ... !

मागील भागावरुन पुढे सुरू ...मराठ्यांचे युद्धतंत्राचे ब्रीद होते - 'मति कुंठित करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळाई.' याला दिले गेलेले नाव म्हणजे 'गनिमी कावा'. पण गनिमी कावा म्हणजे नेमके काय??? हे नाव कोणी ठेवले? कसे पडले? म्लेच्छांसाठी गनिम म्हणजे मराठे. तर कावा म्हणजे कपटाने केलेला हल्ला. थोडक्यात शत्रुने आपल्या लढाईच्या पद्धतीला दिलेले हे नाव इतकी ढोबळ माहिती आपल्या सर्वांना असते. पण मराठ्यांचे युद्ध तंत्र इतकेच होते का??? ह्याच तंत्रावर त्यांनी साल्हेरी पराक्रम गाजवला??? दक्षिण दिग्विजय फत्ते केला? पुढे दिल्लीवर कब्जा मिळवला??? उत्तर अर्थात 'नाही' हेच आहे. मराठ्यांचे स्वतःचे असे एक विकसीत तंत्र होते. त्याबद्दल आपण थोड़ी माहिती घेउया पण त्याआधी 'गनिमी कावा' या शब्दाबद्दल थोड़े अधिक जाणून घेउया.

कावा म्हणजे कपट, हुलकावणी असे त्याचे सरळ अर्थ असले तरी त्याचा अजून एक अर्थ आहे तो म्हणजे 'घोड्याची रग जिरवण्यासाठी त्यास वेगाने घ्यावयास लावलेले फेरे'. अधिक स्पष्टपणे सांगायचे तर घोड़ा वेगाने वाटेल तसा वळवणे, फिरवणे आणि मंडल, फेर किंवा घिरटी घेत वेगाने पुढे नेणे. आता ह्या मधून काव्याबद्दल अधिक योग्य माहिती हातात येते. मराठ्यांचे घोड़े हे अश्या प्रकारच्या तंत्रात तरबेज केलेले होते. वेग कमी करून घोड़ा हवा त्या दिशेला वळवणे कोणालाही जमेल पण वेग कमी न करता घोड़ा हव्या त्या दिशेला वळवणे हे कठीण काम असते. कारण वेग मंदावून मोहरा बदलल्यास शत्रूला आपली पुढची चाल सहज समजू शकते तेंव्हा घोडेस्वार कोणत्या दिशेला वळणार आहे ह्याचा अंदाज शत्रूला बांधू न देता मोहरा बदलणे अतिशय महत्वाचे असते. अश्या प्रकारची अनपेक्षित वळणे वेग मंद न करता घेत काव्याच्या ह्या तंत्रात तरबेज असलेले मराठे घोड़े आणि घोडेस्वार शत्रूला बरोबर चुकवीत असत. आणि काव्याच्या लढाईमध्ये शत्रूची दिशाभूल हे प्रमुख उद्दिष्ट मराठा सैनिक साध्य करत असत. सर्वच बाबतीत वरचढ असलेल्या शत्रुपक्षाला पराजीत करण्यासाठी मराठ्यांनी हे युद्ध तंत्र वापरात आणले होते. अश्या वेगवान हल्यांमुळे शत्रुपक्षात मुसंडी मारत मराठा फ़ौज घुसे आणि शत्रु फळीमध्ये खिंडार पाडून लगेच परत फिरत असे. गोंधळलेल्या शत्रूच्या पिछाडीवर दुसरी तुकडी हल्ला करत असे आणि शत्रुला मागे फिरून मोहरा बदलवण्यास भाग पाडत असे. आता शत्रुच्या डाव्या-उजव्या बाजूवर हल्ले केले जात आणि शत्रूची पूर्ण फळी विस्कळीत केली जाई. याला 'Pincer Movement' असे म्हणतात.

मराठा पायदळ सुद्धा अश्याच तंत्राचा वापर करून शत्रूला हैराण करून सोडे आणि गुढगे टेकण्यास भाग पाडे. शत्रू बेसावध असताना अचानक हल्ला करणे आणि आपली सैन्यसंख्या कमी असून देखील ती जास्त आहे असे भासवणे असे विशिष्ट तंत्र वापरून शिवरायांनी सुरवातीच्या काळात शत्रुवर विजय प्राप्त केले. ह्या सर्वात 'वेग' हा मूलभूत महामंत्र आणि सोबत असते अखंड सावधानता.

पण गनिमी काव्याचे हे युद्ध खरच किती योग्य आहे??? प्राचीन भारतीय राजनीतीमध्ये कुठ-कुठली युद्धतंत्रे सांगितली गेली आहेत??? छत्रपति शिवरायांनी हे तंत्र वापरताना काय-काय विचार केला असेल??? ह्या सर्वांबद्दल आपण पुढच्या भागत थोड़ी माहिती घेऊ...
.
.
संदर्भ - शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)