20 Sept 2010

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार : भाग २

गेल्या भागात आपण मराठा आरमाराचा जन्म कसा झाला आणि मराठ्यांनी आरमाराच्या साथीने काय-काय पराक्रम केले ते अगदी थोडक्यात पहिले. अर्थात विस्तृतपणे ते पुढे येईलच. आज आपण बघणार आहोत मराठा आरमाराकडे कुठल्या-कुठल्या बोटी होत्या, शिवरायांची आरमारी धोरणे काय होती.

मराठ्यांनी स्वतःची जशी जमिनीवरची युद्धपद्धती ठरवली होती तशी आता समुद्रावरची युद्धपद्धती ते ठरवत होते. सुरवातीची पद्धत अतिशय सोपी होती. खोल समुद्रात संचार न करता जलदुर्गांच्या संरक्षणाखाली राहून, किनाऱ्या-किनाऱ्याने शत्रूला हुलकावणी देऊ शकतील अश्या बोटी बनवण्याच्या मागे ते लागले होते. तेंव्हा 'वाऱ्यावीण प्रयोजन नाही' अश्या 'फरगात' (फ्रीगेट्स) न बनवता 'गुराबे' आणि 'गलबते' बनवायची तयारी जोमाने सुरु झाली होती. ह्यासोबत तरांडे, तारू, शिबाड, मचवा, पगार, वाघोर, तिरकटी आणि पाल असे नौकांचे प्रकार आज्ञापत्रात आढळतात. गुराब हे १५० ते ३०० टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होणारे असे जहाज असते. ह्यावर २-३ डोलकाठ्या असतात. एकावेळी १५०-२०० सैनिक आणि खलाशी ह्यातून प्रवास करू शकतात. तर गलबत हे आकाराने अजून लहान असते. ७०-८० टन क्षमता असलेले हे जहाज फारतर १०० सैनिक वाहून नेत असे. मात्र जलद हालचालीच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त असे जहाज होते.

मराठ्यांची नवी जहाजे खाडीमधून आता खुल्या समुद्रात संचार करू लागली होती. गनीम समोर आल्यावर काय करावे कसे वागावे ह्याबाबत स्पष्ट निर्देश आरमाराला दिले गेले होते. भर समुद्रात गनीम समोर आला तर एकत्र येऊन कस्त करून त्याच्याशी झुंजायचे, मात्र वाऱ्याची दिशा आपल्या विरुद्ध दिशेने असल्यास, गलबत योग्य चालवता येत नसल्यास गानिमाशी गाठ न घालिता जवळच्या जलदुर्गाच्या आश्रयाला यावे. राजे म्हणतात,"तरांडीयास आणि लोकांस सर्वथा दगा होऊ देऊ नये. आपण राखून गनीम घ्यावा." बरेचदा चकवा म्हणून शत्रू तहाचे निशाण दाखवतो आणि हरलो असे दाखवतो तेंव्हा लगेचच उडी घालून त्याच्या नजीक जाऊ नये, किंवा गनिमाला सुद्धा जवळ बोलावू नये, असे प्रशिक्षण आरमारास दिलेले होते. काही दगाफटका व्हायची शक्यता दिसल्यास कसलीही तमा न बाळगता तोफांच्या माराखाली तरांडे फोडून टाकावे आणि सालाबत पदवी असे स्पष्ट आदेश सरखेलांना होते.


वर्षाचे ८ महिने आरमार खुल्या समुद्रात असले तरी पावसाळ्याचे ४ महिने मात्र ते योग्य ठिकाणी छावणी करून सुरक्षित करून ठेवावे लागे. याबाबत आज्ञापत्र सांगते की, समुद्राला उधाण येण्याच्या १०-१५ दिवस आधीच आरमाराची छावणी योग्य ठिकाणी करणे आवश्यक असते. खुल्या उथळ समुद्रात किंवा कुठल्याही जलदुर्गाच्या खाली ते उघड्यावर नांगरून ठेवता येत नाही. छावणी सुद्धा दरवर्षी वेगवेगळ्याकिल्ल्यांच्या सानिध्यात बंदरात करावी म्हणजे दरवर्षी त्याच बंदराच्या आसपासच्या गावांना तोशीस पडत नाही. जिथे गनीम सहज सहजी पोचू शकत नाही अश्या ठिकाणी छावणी असावी असे आज्ञापत्र सांगते. आरमाराच्या सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट ताकीद होती की खाडी किनारी दिवस-रात्र गस्त घालून आरमार सुरक्षित राहील याची चाकरी करावी. खुद्द त्या भागाच्या सुभेदारांना २ महिन्याकरता संपूर्ण कुटुंब-कबिला घेऊन आरमाराची व्यवस्था बघण्याकरता आसपास जाऊन राहावे लागे इतके चोख आणि कडक नियम या बाबतीत राजांनी बनवले होते.


जस-जसे आरमार सजू लागले तशी त्याची व्यापारी धोरणे सुद्धा निश्चित केली गेली होती. सागरी व्यापारातून मिळणारे सर्व उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा केले जाई. आरमारात काम करणाऱ्या प्रत्येकाला महिना पगार मिळायचा. कोणालाही सागरी उत्पन्नातून हिस्सा घेण्याची मुभा नव्हती. सर्व सुभ्यांना स्पष्ट ताकीद होती की विविध बंदरामध्ये येणाऱ्या जहाजांना कुठलीही तोशीश लावता कामा नये. त्यांना योग्य ती सुरक्षा देणे हे आरमाराचे काम होते. जर बंदरेच नाही राहिली तर व्यापार कुठून होणार आणि कुठून मिळणार जकात हे साधे तत्व होते. मिळणाऱ्या जकातीवर आणि अधिक व्यापारावर आरमार सजवीत जावे असे राजांचे धोरण होते. फक्त बंदरातच नाही तर दर्यामध्ये देखील उगाच कोणा व्यापारावर उपद्रव करू नये अशी स्पष्ट ताकीद सर्वांना होती. जर चुकून शत्रू पक्षाकडील व्यापाराचे जहाज कुठल्याही बंदरात आले तरी ते लुटू नये, सुभेदारांनी जाऊन त्याची परीक्षा करावी आणि योग्य ते समाधान करावे, त्यांना अधिकाधिक आपल्या कडील जिन्नस विकावे आणि योग्य जकात वसूल करावी असे कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.


शून्यातून राज्याचे एक नये अंग सजू लागले होते. आत्ता पायांत फक्त पायदळ आणि घौडदळ असलेल्या मराठा फौजेकडे आता आरमार सुद्धा तयार झाले होते. त्याच्या जोरावर ते आता टोपीकरांना आणि सिद्दीला आव्हान देण्यास सज्ज झाले होते. मराठा आरमाराने कुठ-कुठल्या लढाया लढल्या, दैदिप्यमान यश कसे संपादित केले ते पाहूया पुढच्या भागात...