प्राचीन राजनीतीपर ग्रंथांमध्ये बलाचे ३ प्रकार सांगितले आहेत.
मंत्रशक्ती, उत्साहशक्ती आणि प्रभुशक्ती.
मंत्रशक्ती म्हणजे राजा आणि त्याचे प्रधानमंडळ यांचे राजनैतिक नैपुण्य आणि परिस्थिति - काळानुरूप निर्णय घेण्याची शक्ती. उत्साहशक्ती म्हणजे राजा, प्रधानमंडळ आणि त्यांचे सैन्य हे किती पराक्रमी आहेत, त्यांच्या अंगीभूत शौर्य किती आहे, ह्यावर अवलंबून असलेली शक्ती. तर प्रभुशक्ती म्हणजे राजाची आणि राज्याची कोश (खजिना) आणि सैन्य (लश्कर) यांची ताकद. 'सैन्य पोटावर चालतात' हे जसे खरे तसेच सैन्य असल्याशिवाय कोशाची वाढ कशी होणार? तेंव्हा कोश आणि सैन्य एकमेकास पूरक असतील तरच राजाचे सामर्थ्य शाबूत राहते. महाभारतात म्हटले आहे की,"कोशबल अनुकूल असेल तरच राजाला सैन्य बाळगता येते. सैन्य पदरी असेल तरच राजा धर्माचे रक्षण करू शकतो. आणि धर्मरक्षण झाले तरच प्रजेचे संरक्षण होते." (येथील धर्माची व्याख्या जाणकार वाचकांच्या लक्ष्यात आली असेलच. आज काल 'धर्म'व्याख्या बरीच बदलली आहे याकारणे लिहिले आहे)

हिंदवी स्वराज्याच्या कोश-संचयाचे प्रमुख साधन होते ते शेतकऱ्याकडून वसूल करण्यात येणारा जमीन महसूल उर्फ़ शेतसारा. शिवरायांचे 'शेती विषयक धोरण' हा अभ्यासाचा मोठा विषय आहे. शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर अन्याय तर होऊ नयेच, तर त्यास योग्य त्या सवलती मिळाव्यात आणि राज्याचे उत्पन्न वाढावे असे विचार त्यांनी एका पत्रातून व्यक्त केले आहेत. जमिन महसूलीची पद्धत, तगाई देणे, कर्जमुक्त करणे याबाबत सविस्तर विवेचन सदर पत्रामध्ये राजांनी केले आहे. सदर पत्र येथे वाचू शकता. पत्रामध्ये राजे म्हणतात,"येक भाजीच्या देठासहि मन नको." संपूर्ण न्याय मार्गाने शेतसारा वसूलीची चोख पद्धत राबवून जहागीरदार, मिरासदार आणि वतनदारांवर पूर्ण लगाम ठेवत संपूर्ण उत्पन्न सरकारी खजिन्यात जमा केले जायचे. शेतकरी प्रजा आणि शासन यांमध्ये कोणीही मध्यस्त असणार नाहीत याची त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली होती. बरीच वतन त्यांनी अनामत केली आणि जी उरली त्यांना 'देशाधिकाऱ्याच्या आज्ञेत वागावें' असे स्पष्ट बंद होते. देशाधिकाऱ्याला 'कानून जाबता' लागू होताच. शिवरायांच्या वेळी सुद्धा सारा काही कमी नव्हता. उत्पन्नाच्या २/५ तक्षिमा इतका होता. तक्षिमा म्हणजे विभाग. २/५ म्हणजे ४० टक्के इतका सारा भरावा लागायचा. तरी सुद्धा ही मांडणी लोकांनी खुशीने मान्य केली होती. ह्याचे कारण होते पक्षपातरहित निर्दोष अंमलबजावणी. ह्या साऱ्याने स्वराज्याचा खजिना मोठ्या प्रमाणावर समृद्ध होत होता. त्यांनी प्रजेवर जादाकर कधीच लादले नाहीत. राजाभिषेकप्रसंगी झालेला खर्च सुद्धा त्यांनी वतनदारांवर 'सिंहासन पट्टी' बसवून वसूल केला. त्यासाठी त्यांनी जनतेला वेठीस धरले नाही.

याशिवाय काही अनियमित उत्पन्न सुद्धा होते. जसे इतर राजांकडून, त्यांच्या वकीलांकडून येणारे भेटवस्तू, नजराणे आणि पेशकश. शेती आणि व्यापार ही कोश-संचयाची प्रमुख साधने होतीच पण त्या शिवाय अजून एक महत्वाचे साधन होते ते म्हणजे 'विक्रमार्जीत धन'. शत्रुकडून वसूल केलेली खंडणी आणि युद्धखर्चाची रक्कम म्हणजे विक्रमार्जीत धन. स्वराज्याच्या चहुबाजुस पसरलेल्या शत्रुंवर राजांनी वेळोवेळी मोहिमा काढून अश्याप्रकारे धन प्राप्त केले होते. या मोहिमेचे उद्दिष्ट हे शत्रुचा प्रदेश जिंकणे नसून फ़क्त रिता झालेला खजिना भरून काढणे इतकेच होते. खजिना लुटून शत्रुस दुर्बल करणे आणि स्वतः बलवान होणे यासाठी अश्या मोहिमा शिवरायांनी वेळोवेळी यशस्वी केल्या. यांमध्ये १६५६ ला उघडलेली कल्याण-भिवंडीची मोहीम, १६६० मधील आदिलशाही वरील स्वारया, १६६४, १६७० मधील सूरत येथील स्वारी, मुघलांच्या बूर्ह़ाणपुर - खानदेश या भागात उघडलेल्या १६७५, १६७७ आणि १६७९ मधील स्वाऱ्या, करंज्यामधली (१६७२), अथणी (१६७५), श्रीरंगपट्टण (१६७७), हुबळी (१६७७) आणि जालना (१६७९) या व अश्या अनेक यशस्वी स्वाऱ्या शामील आहेत. या सर्व मोहिमा कोशवृद्धिचे एक महत्वाचे साधन होते. मात्र या सर्व मोहिमेत शत्रुपक्षाच्या राज्यातील सामान्य जनतेसही तोशीस लावू नये असे स्पष्ट आदेश मराठा सैन्यास होते. प्रभुशक्तिची म्हणजेच कोश (खजिना) आणि सैन्य (लष्कर) यांची ताकद शिवरायांनी क्रमाक्रमाने नियोजन रित्या वाढवली. शत्रुच्या मूलखातून गोळा केलेल्या धनामधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम-दुर्ग उभारले. जे बनले 'संपूर्ण राज्याचे सार'. त्याबद्दल आपण पुढील भागात जाणून घेऊ...
.
.
संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य) आणि शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)
.
.
महाराजांची कार्यपद्धती आणि SWAT याचा ताळमेळ सुरेख साधला आहेस. एकूणच लेख अगदी माहितीपूर्ण.. नेहमीप्रमाणेच !!
ReplyDeleteहोय हेरंब ... ह्या दृष्टीने शिवचरित्राकडे अजून आपण पाहिलेले नाही. जेंव्हा बघू तेंव्हा एक नवे विश्व आपल्याला गवसेल. :) प्रत्येक समस्येशी लढण्याची ताकद हे चरित्र आपल्याला अनंत काळपर्यंत प्रेरणा देइल यात काही शंका नाही...
ReplyDelete