29 Mar 2010

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ५. युद्धतंत्र (भाग २) ... !

मागील भागावरुन पुढे सुरू ...

आधीच्या भागात आपण 'कावा' या शब्दाचा खरा अर्थ पहिला. आता आपण बघुया हे काव्याचे तंत्र किती योग्य होते. प्राचीन भारतीय राजनीतीमध्ये युद्धाचे ३ प्रकार नमूद केलेले आहेत. १. प्रकाशयुद्ध, २. कूटयुद्ध आणि ३.तूष्णीयुद्ध. यामध्ये तूष्णीयुद्ध हे निषिद्ध मानलेले आहे. तर प्रकाशयुद्ध म्हणजे उभय पक्ष काळ-वेळ ठरवून जेंव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात ते. प्रकाशयुद्ध हे 'धर्मिष्ट' असल्याचे स्पष्ट असले तरी कूटयुद्ध सुद्धा 'अधर्मिष्ट' नसते.


जेंव्हा कुठल्याही एका पक्षास प्रकाशयुद्ध करणे शक्य नसते तेंव्हा कूटयुद्ध करावे असे कौटील्य सांगतो. जसे... शत्रूचे सैन्य आपल्यापेक्षा संखेने वरिष्ठ असेल पण युद्धक्षेत्र आपल्याला अनुकूल असेल तर कूटयुद्ध करावे. शत्रु सैन्य नदी पार करत किंवा डोंगर उतरत-चढत असेल तरी त्यावर हल्ला करावा. कौटील्य सांगतो की, 'गिरीदुर्ग, वनदुर्ग, कंटककिर्ण अरण्य, पाणथळ जागा, गिरीशिखरे, उंचसखल भूभाग हे प्रकाशयुद्धाने हाती लागत नाहीत. ह्यासाठी कूटयुद्ध करावे. पुढे तो म्हणतो,'वादळी वारा सुटला असताना, वातावरण धुक्याने भरलेल असताना शत्रू स्थळावर आक्रमण करावे, रात्रीच्या वेळी देखील हल्ले करावेत.' छत्रपति शिवरायांनी याच कूटयुद्धनीतीचा पुरेपुर वापर करत शत्रूला पराजीत केले. आपण त्याला आज 'गनिमी कावा' म्हणतो इतकेच. संख्येने सदैव कमी असलेल्या मराठा सैन्याला विजय प्राप्त व्हावे म्हणुन त्यांनी लढाईची रणक्षेत्रे अनुकूल निवडली. शत्रु जर आपल्या प्रतिकूल रणक्षेत्रामध्ये असेल तर स्वतः शत्रूला अनुकूल न होता शत्रूला आपल्या अनुकूल रणक्षेत्रामध्ये खेचून आणणे यात त्यांचे कौशल्य होते. (उदा. अफझलखान प्रकरण. वाई येथे बसलेल्या खानास राजांनी हरप्रयत्ने जावळीच्या जंगलात खेचून आणलेच.) अनुकूल रणक्षेत्र निवडताना शिवरायांनी एक पथ्य नियमितपणे पाळले ते म्हणजे लढाई स्वराज्याच्या भूमीत शक्यतो होऊ द्यायची नाही. (अपवाद - पुरंदरचे युद्ध.) कारण उभय पक्षात लढाई झाली की विजय कोणाचाही होवो नुकसान हे सामान्य जनतेचे होते. पिके जाळली जाणे, घरे लुटणे असले प्रकार सर्रास होत असत. कधीही भरून येणार नाही अशी हानी होत असे.

कूटयुद्धामध्ये वापरले जाणारे अजून एक प्रभावी तंत्र म्हणजे 'बेरीरगिरी' - म्हणजे फिरती लढाई. लढाई करता-करता एका जागी न थांबता रणक्षेत्र थोड्या अंतराने बदलणे आणि शत्रूला पांगवणे. त्यानंतर चहुबाजूने हल्ले करून हैराण करणे. (उदा. जालना, खानदेश येथील हल्ले १६७९) दुसरे अजून एक तंत्र म्हणजे रात्री चालकरून शत्रू जवळ पोचणे आणि भल्या पहाटे शत्रुवर हल्लाबोल करणे. हे तंत्र तर मराठ्यांनी कैक वेळा वापरले. तानाजी मालुसरे यांनी घेतलेला सिंहगड(१६७०), कोंडाजी फर्जंद यांनी घेतलेला पन्हाळा(१६७३), प्रतापराव - आनंदराव यांचे बहलोलखानाबरोबरचे उमराणीचे युद्ध, मोरोपंत - प्रतापराव यांचे मुघलांविरूद्धचे साल्हेरचे युद्ध अशी अनेक उदाहरणे आहेत. गनिमी काव्यामध्ये सर्वात महत्वाचे असतात त्या 'लष्कराच्या गतिमान हालचाली' आणि 'शत्रुवर अनपेक्षित आक्रमण.' शिवरायांनी लालमहालामध्ये शाहिस्तेखानावर केलेल्या हल्याने संपूर्ण भारत अचंभीत झाला. विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,'पापणी लवण्यास जेवढा अवधी लागत नाही, खालचा श्वास वर येण्यास जितके क्षण लागतात तेवढ्या कालावधीत एखाद्या भुजंगाने झडप घालावी तदवत शिवाजीने शास्ताखानावर हल्ला केला.'

कूटनितीच्या प्राचीन युद्धतंत्राचे पालन करत छत्रपति शिवरायांनी विजयाची एक मोहोर दख्खनेवर उमटवली. एका नव्या साम्राज्याचा पाया निर्माण केला. पण ह्या सर्वांसोबत चोख लष्करी व्यवस्था, दुर्गमदुर्ग बांधणी आणि कोशबल यांची योग्य सांगड घातली. शिवरायांचे राज्यकारभार विषयक नेमके धोरण काय होते??? ते आपण येत्या भागात जाणून घेऊ...
.
.
संदर्भ - शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)

9 comments:

  1. अमूल्य माहितीबद्दल धन्यवाद!!!!

    ReplyDelete
  2. रोहणा, नेहमीप्रमाणेच सुंदर माहिती !!

    ReplyDelete
  3. Rohan, is that Kavi 'Nusnaati' or 'Mulla Nusrati'?

    ReplyDelete
  4. धन्यवाद हेरंब आणि मनमौजी... !

    निखिल... हवतर तसेही म्हणू शकतो... :)

    ReplyDelete
  5. फार छान माहिती !!!

    ReplyDelete
  6. आपली कमेन्ट वाचली ! पोस्ट आवडल्या बद्दल धन्यवाद ! आपल्या बरोबर माझे भारतीय इतिहासा बद्दल चे.. खासकरून शिव चरित्रा बद्दल चे ज्ञान वाटुन घेण्यात मला अतिशय आनंद होइल ! मला आपल्या शिवजी महाराजन बद्दल चा उपक्रम आवडला ! आपले २-३ ब्लॉग आपण खास शिव्चारित्रसठी बनवले आहेत हे बघून आनंद झाला ! नुसता १ ब्लॉग चलावने सोपे नाही . त्यात आपण तर ३-४ ब्लॉग चालवत आहात.. त्या बद्दल कौतुक ! मी देखिल आपल्या ब्लॉग वर सतत नजर ठेवून असतो.. मागे मी आपल्या " मराठी इतिहासाची दैनन्दिनी " मध्ये भरपूर अधिक माहितीपर कमेंट्स दिल्या होत्या ! एकुणच छान प्रयत्न ! wish u All The Best !
    निनाद गायकवाड ( N v G !) ...!!!

    ReplyDelete
  7. धन्यवाद बिनरी आणि मनीषा... :)

    ReplyDelete
  8. निनाद... सविस्तर प्रतिक्रियेसाठी आभार... ९ मे रोजी येणार आहेस ना??? तेंव्हा भेट होइलच... :)

    ReplyDelete