12 Aug 2010

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार : भाग १

"आरमार म्हणजे स्वतंत्र येक राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे... तसेच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र... याकरीता आरमार अवश्यमेव करावे." अशी भूमिका मांडणाऱ्या व त्यावर वाटचाल करणाऱ्या श्री शिवछत्रपति महाराजांची दूरदृष्टि थक्क करून सोडते. इंग्रजी इतिहासकारांनी लिहून ठेवल आहे 'बरे झाले हा शिवाजी डोंगरी मूलखात जन्मला.. जर हा सागरकिनारी जन्मता तर आमच काही खरे नव्हते.'

मध्ययुगात आरमार आणि सागरी व्यापार यांची खंडीत झालेली परंपरा सुरु केली ती शिवरायांनी. १६५७च्या आसपास कल्याणमधील दुर्गाडी येथे पहिला जहाज बांधणीचा प्रयत्न त्यांनी केला तेंव्हा कोकणच्या संपूर्ण किनारपट्टीवर इंग्रज, पोर्तुगीझ, सिद्दी, काही प्रमाणात मुघल आणि आदिलशाहाचे वर्चस्व होते. परकीयांचा कावा शिवरायांनी त्वरीत ओळखला होता. एका पत्रात ते म्हणतात,"सावकारांमध्ये फिरंगी (पोर्तुगीझ), इंग्रज, फरांसीस (फ्रेंच), डिंगमारांदी (डच?) टोपीकर हेहि सावकारी करितात. ते वरकड सावकारांसारखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्यक प्रत्यक राज्याच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होतात्से हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाहीं यैसें काय घडो पाहाते?" हिच दूरदृष्टी इतर सत्तांनी दाखवली असती तर इतिहास आज वेगळा असता.. खुद्द मराठ्यांच्या उत्तराधिकाऱ्यान्ना हे कितपत उमगले माहीत नाही. नाहीतर त्यांनीच मराठ्यांचे आरमार उध्वस्त केले नसते.


कोकणात शिरून स्थावर व्हायची संधी राजे शोधत होते. ती संधी त्यांना १६५६ च्या जानेवारीमध्ये मिळाली. औरंगजेब बादशहा व्हायला दिल्लीला रवाना होत होता. तिकडे विजापुरला अली आदिलशाह मरण पावला होता. योग्य संधीचे सोने करत राजांनी जावळी मारली. मोरेचा पाठलाग करत थेट कोकणात उतरून रायरी काबीज केली. राजांसाठी कोकणद्वार खुले झाले. उत्तरकोकणचा आदिलशाही भूभाग विजापुरपासून जावळीमुळे विभागला गेला. आता राजे १६५७ मध्ये उत्तर कोकणात उतरले आणि त्यांनी कल्याण, भिवंडी आणि माहुली परिसर जिंकून घेतला. याशिवाय सुधागड़, सरसगड़, तळागड़, सुरगड़ हे किल्ले सुद्धा मराठ्यान्नी सहज जिंकून घेतले. या भागाची जमीनीकड्ची बाजू आधीपासूनच मराठ्यांच्या ताब्यात होती. आता गरज होती ती तिची पश्चिम म्हणजे सागरीबाजू संभाळण्याची. सिद्दीवर अंमल आणायचा असेल तर त्याच्या इतकेच बलवान आरमार हवे हे ओळखायला राजांना वेळ लागला नाही. तशी तयारी १६५७ पासून दुर्गाड़ी येथे सुरू झाली.  विविध प्रकारच्या युद्धनौका बांधायला निष्णात तंत्रज्ञ आणि तसेच कुशल कारागीर लागणार म्हणून राजांनी पोर्तुगीझांकडे मदत मागितली. ते आधी तयार झाले मात्र नंतर हेच आरमार आपल्या अंगावर शेकेल ह्या भीतीने त्यांनी मदत करायला नकार दिला. पण म्हणून राजे थोडीच स्वस्थ बसणार होते. त्यांनी जहाज बांधणीचा उद्योग सुरूच ठेवला. राज्याचे एक नवे अंग सजू लागले.


१६५९ पासून आरमाराचे काम अजून जोरात सुरु झाले. कोकण किनाऱ्यावर असलेले किल्ले ताब्यात घेणे आणि ते दुरुस्त करणे, नव्याने काही किल्ले बांधणे असे उपक्रम त्यांनी सुरु केले होते. जस-जशी मराठ्यांची आरमारी ताकद वाढू लागली तसे त्यांचे शत्रू अधिक हालचाली करू लागले. मराठ्यांना सिद्दीला पाण्यात मात देणे सोपे नव्हते कारण त्याच्यापाशी प्रबळ आरमार होते शिवाय तो म्हणेल तेंव्हा मुघल किंवा विजापूर त्याला मदत करील असत. अगदीच जीवावर आले तर तो मुंबईला माझगाव येथे इंग्रजांच्या आश्रयाला जाई. विशेष करून पावसाळ्यात त्याचे संपूर्ण आरमार मुंबई येथे सुरक्षितरित्या नांगरलेले असे.


१६६० ते १६६४ या काळात सुवर्णदुर्ग , विजयदुर्ग, रत्नदुर्ग आणि सर्वात मात्तबर असा 'शिवलंका सिंधुदुर्ग' असे जलदुर्ग बांधले गेले किंवा त्यांची पुर्नबांधणी केली गेली. (सिंधू नदी जिथे सागराला मिळते त्याला 'सिंधू सागर' असे नाव होते. म्हणून राजांनी ह्या जलदुर्गाला 'सिंधुदुर्ग' असे नाव ठेविले. आज मात्र त्याचे नाव अरबी समुद्र असे झालेले आहे. आपल्याला ह्याचे काहीच सोयर-सुतक नाही!!!) कुलाबा आणि खांदेरी हे जलदुर्ग राजांनी १६७८-७९ नंतर बांधले. मराठा आरमार ह्या जलदुर्गांच्या ताकदीवर समुद्रात फिरे. शत्रूस जेरीस आणे आणि गरज पडल्यास माघार घेत जलदुर्गांच्या आश्रयाला येई. पश्चिम किनारपट्टीच्या सुरक्षेबरोबर राजांनी सागरी व्यापार सुरु केला. त्यासाठी मीठ वाहून नेणारी जहाजे बांधली. मुघलांशी राजकारण करून थेट मस्कतपर्यंत व्यापार सुरु केला. आता आरमार आणि व्यापार एकमेकांच्या जोडीने वाढू लागले. सुरक्षा असेल तर व्यापार वाढतो आणि व्यापारातून झालेल्या फायद्यामधून अधिक प्रबळ आरमार उभे करता येते. आधी कोकणच्या किनारपट्टीवर फेऱ्या मारणारे हे आरमार १६६५ मध्ये मालवण बंदरातून निघून बसनूर (सध्या कर्नाटक) येथे पोचले. पोर्तुगीझांशी झालेल्या तहामुळे आरमार गोव्याहून जाताना त्यांनी काहीच आडकाठी केली नाही. ही मोहीम भलतीच यशस्वी झाली. आदिलशहाची प्रचंड लुट मराठ्यांनी मारलीच त्याशिवाय आरमाराचा दबदबा सर्वत्र बसवण्यात त्यांना यश आले होते. खुद्द शिवरायांनी या सागरी मोहिमेचे नेतृत्व केले होते. १६६५ पर्यंत संपूर्ण कोकण मराठ्यांच्या ताब्यात आलेले होते. आदिलशहाची सत्ता उखडली गेली होती. नाही म्हणायला जंजिर्याच्या जोरावर दंडा-राजापुरी सिद्दी धरून होता. मुंबईमध्ये इंग्रज (इस्ट इंडिया कंपनी) अजून स्वतःचे बस्तान बसवत होते आणि गोव्याला पोर्तुगीझ आपली राजधानी राखून होते. शिवाय ठाणे - वसई भाग त्यांच्या ताब्यात होताच.



१६६६ नंतर राजे मोठ्या प्रमाणात मुघलांशी लढण्यात व्यस्त होते. त्यांनी सिद्दीला जंजिरापुरते सीमित केले होते. सिद्दी मात्र कधी इंग्रज तर कधी पोर्तुगीझ यांची मदत घेऊन मराठ्यांना हानी पोचवायच्या मागे होता. त्याला सर्वात जास्त मदत करण्यात इंग्रजांना आनंद होत असे. अखेर राजांनी जंजिरेकर सिद्दी आणि मुंबईमधले इंग्रज यांच्या बरोबरमध्ये असणाऱ्या खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचे काम सुरु केले. खुद्द शिवराय या बेटाची पाहणी करण्याकरता २००० फौज घेऊन इकडे आले होते. अर्थात सिद्दी आणि इंग्रज असे दोघांचेही धाबे दणाणले आणि त्यांनी ह्याला विरोध करत खांदेरीवर हल्ला चढवला. अर्थात तो परतवला गेला आणि मराठ्यांनी किल्ला बांधून पुर्ण केला. खांदेरीची संपूर्ण कहाणीच मोठी रोमांचकारी आहे.. त्यावर वेगळ्या सविस्तर पोस्ट लिहेन. कुलाबा किल्ला बांधण्याचा आदेश तर शिवाजी महाराजांनी मृत्युच्या अवघे १२ दिवस आधी दिलेला आहे. हे दोन्ही किल्ले पुढे मराठा आरमाराच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे ठरले.

मराठा आरमाराकडे कुठल्या-कुठल्या बोटी होत्या, शिवरायांची आरमारी धोरणे काय होती, सागरी व्यापारी धोरणे काय होती, आरमारा संदर्भात झालेले काही पत्र व्यवहार आपण पुढच्या भागात पाहणार आहोत...

18 comments:

  1. मस्त झालाय लेख.

    राजांना गोव्यामध्ये जास्त काही करता आल नाही ना ?
    त्यावेळी सागरी व्यापारा साठी पोर्तुगीजांनी पण मदत केली होती काय?

    ReplyDelete
  2. सचिन ...

    पोर्तुगीझांनी व्यापारात कितपतर सहयोग दिला होता हे मला पोर्तुगीझ - मराठा संबंध या पिसुर्लेकरांच्या पुस्तकातून बघून सांगावे लागेल... त्याबाबत माझ्याकडे अधिक माहिती सध्यातरी नाही..

    इतकेच म्हणीन की पोर्तुगीझ मराठ्यांची ताकद ओळखून होते आणि त्यांची आरमारी ताकद वाढू नये म्हणून सिद्दीला लपून मदत करत होते. १६६५ मध्ये आणि १६८३ मध्ये त्यांनी मराठ्यांशी तह केलेला होता.

    ReplyDelete
  3. सेनापती...

    अप्रतिम लेख झाला आहे.

    जलदुर्गांच जे बांधकाम झाल, या बांधकामासंदर्भात विस्तृत माहिती कुठे मिळु शकेल काय???

    ReplyDelete
  4. धन्यवाद.. सुभेदार...

    नक्की मिळेल माहिती..

    तू 'प्र. के. घाणेकरांचे 'जलदुर्गांच्या सहवासात' हे पुस्तक वाच.

    ReplyDelete
  5. वाह वाह... पुढच्या पोस्टची वाट पाहतो आहे.

    ReplyDelete
  6. छान आहे माहीती मला आवड्ली

    ReplyDelete
  7. roahn, very well studied and well read info !

    will read out all and mail back to you.

    but then in MARATHI

    ReplyDelete
  8. छान आहे माहीती मला आवड्ली

    अप्रतिम लेख झाला आहे
    वाह वाह... पुढच्या पोस्टची वाट पाहतो आहे.

    ReplyDelete
  9. उत्तम लेख..!! बरीच माहिती सारांशरूपाने मिळाली, त्याबद्दल धन्यवाद..!!
    त्याचबरोबर बहिर्जी नाइकांचे योगदान व इतर रंजक माहिती करता 'दर्यावर्ता' हे पुस्तक उत्तम आहे..

    ReplyDelete
  10. chanach ahe. shivaji maharaj ya vishayvar SHIVABA TE SHIVARAY ha karyakaram mi karat ahe tya anushanghane shod ghetana hi mahiti vachli dhanyawad. avaroh@gmail.com

    ReplyDelete
  11. किती हा अभ्यास! :) खूप वर्षांनी मी असं काही ऐतिहासिक वाचतेय! खूप छान.

    ReplyDelete
  12. राजांची दूरदृष्टी, त्यांची जलदुर्गांवरील पकड़ आणि त्यांच्या आरमाराचा दबदबा यावर या अप्रतिम, अभ्यासपूर्ण लेखाद्वारे प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद!! इतिहासाच्या साक्षीने मधील आपले सर्वच लेख आपल्या आश्चर्यकारक प्रतिभे ची शिवप्रभुंवरील भक्तीची आणि इतिहासाच्या प्रचंड आवडीची साक्ष देतात.

    ReplyDelete
  13. राजांची दूरदृष्टी, त्यांची जलदुर्गांवरील पकड़ आणि त्यांच्या आरमाराचा दबदबा यावर या अप्रतिम, अभ्यासपूर्ण लेखाद्वारे प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद!! इतिहासाच्या साक्षीने मधील आपले सर्वच लेख आपल्या आश्चर्यकारक प्रतिभे ची शिवप्रभुंवरील भक्तीची आणि इतिहासाच्या प्रचंड आवडीची साक्ष देतात.वाह वाह... पुढच्या पोस्टची वाट पाहतो आहे

    ReplyDelete
  14. सर्वांना धन्यवाद... सुट्टीवर गेलो की लिखाणाला खिल बसते. अश्या प्रकारच्या लिखाणाला आवश्यक असणारी बैठक सहज सहजी जमून येत नाही. पण पुढचे लिखाण उद्यापर्यंत टाकतो.. :)

    ReplyDelete
  15. Ashok J. Bhatkar,Akola

    shri shivagi maharaj was the great brave maratha man of India.He was very good man and his natury is very kind.

    ReplyDelete
  16. Pudhachya post chi chaatak pakshyapramane waat pahat aahot aamhi sarv.

    Bye the way, mitraa. Suggestion denyachi aamchi paatrata mulich nahi, tari pan gustakhi karto. Aapan shivrayanbadhal Dinwisesh lihitoch aahot pan shivshake nusaar lihinyaas jamale tar, te hi mention karaave .... Shivshake cha kaahich abhyaas nahi aani kuthe waachnaas milatahi nahi.

    ReplyDelete
  17. Sir me hi mahiti fb var share karu ka? with ur name

    ReplyDelete
  18. atishay durmil mahiti dilyabaddal_/\_
    sir mi tumchya blog varil mahiti fb var aplya navasahit share karu ka?

    ReplyDelete