13 May 2011

महिकावतीची बखर - भाग १ : प्रस्तावना ...

महिकावतीची बखर हे इतिहासआचार्य कै. वि. का. राजवाडे यांनी लिहिलेले आणि वरदा प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले पुस्तक ३-४ वर्षापूर्वी अचानक माझ्या वाचनात आले. त्यानंतर हे पुस्तक मी अनेकदा वाचून काढले. पुस्तकाची पहिली आवृत्ती १९२४ साली तर दुसरी आवृत्ती १९९१ साली प्रकाशित झाली होती. मला मिळालेले पुस्तक २० वर्षे जुने असून ते अद्याप सुस्थितीत आहे. राजवाडे यांना ही बखर कल्याणच्या सदाशिव महादेव दिवेकर नामक व्यक्तीने वसईच्या हिरा हरी भंडारी यांच्याकडून मिळवून दिली होती. सध्या ही बखर बहुदा राजवाडे यांच्या धुळे येथील संस्थेत असावी असे वाटते. राजवाडे यांनी बखरीचा अभ्यास करून एकूण ४९ मुद्यांवर ११० पानी जी प्रस्तावना तयार केली ती खूपच महत्वाची आहे.

महिकावती म्हणजे माहीम. हे माहीम म्हणजे मुंबईचे माहीम नसून पालघर येथील केळवे-माहीम मधील माहीम आहे. उत्तर कोकणचा इतिहास सांगणारी ही बखर साधारणपणे १४व्या शतकात लिहिली गेली असून ह्या बखरीमधला इतिहास काळ शके १०६० म्हणजे ई.स. ११३८ पर्यंत मागे जातो. आत्तापर्यंत सापडलेल्या सर्व बखरींमध्ये ही अत्यंत जुनाट अशी बखर आहे.

ह्या बखरीचे एकूण ६ प्रकरणे असून त्यात विविध प्रकारची माहिती दिली आहे. ती कोणती ते आपण बघू...
१. पूर्वपरंपरा - वर्णउत्पत्ती - वर्णावर्ण - व्याख्या : हे प्रकरण शके १५०० (इ.स. १५७८) च्या आसपास भगवान दत्त नामक व्यक्तीने लिहिले.
२. राजवंशावळी : हे प्रकरण शके १३७० (इ.स. १४४८) च्या फाल्गुन महिन्यात केशवाचार्य या व्यक्तीने लिहिले.
३. निवाडे व हकीकती : हे प्रकरण शके १३७० (इ.स. १४४८) नंतर केशवाचार्य या व्यक्तीने लगेचच लिहिले आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणाचा काळ हा पहिल्या प्रकरणाच्या आधीचा आहे हे वाचकांच्या लक्ष्यात आले असेलच. असे का तो प्रश्न पुढे दूर होईल. शिवाय शके आणि इसवी सन यातील ७८ वर्षांचा फरकही लक्ष्यात आला असेलच. आता पुढचे प्रकरण बघुया..

४. श्रीचिंतामणीकौस्तुभपुराण : हे प्रकरण शके १५०० (इ.स. १५७८) च्या आसपास भगवान दत्त नामक व्यक्तीने लिहिले.
५. पाठाराज्ञातीवंशावळी :  हे प्रकरण शके १४६० (इ.स. १५३८) मध्ये लिहिले गेले.. कर्ता मात्र अनामक आहे.
६. वंशावळी : हे प्रकरण शके १४०० (इ.स.१४७८) मध्ये लिहिले गेले आहे असे ह्या प्रकरणाचा अनामक कर्ता सांगतो.

पहिल्या ३ प्रकरणाप्रमाणे येथेही सहाव्या प्रकरणाचा काळ हा पाचव्या आणि पाचव्याचा काळ चौथ्या प्रकरणाआधीचा आहे. असे का हे आपण आता बघुया.

वरील लिखाण नीट वाचल्यास हे स्पष्ट होते की प्रकरण २ व ३ ही सर्वात आधी लिहिली गेली. ती केशवाचार्याने लिहिली. ह्यात माहिम प्रांतामधील सर्व कुळांची वंशपद्धती आली आहे. प्रकरण २ व ३ नंतर थेट ६ वे प्रकरण लिहिले गेले. ह्यात फक्त प्रकरण २ आणि ३ मध्ये राहून गेलेल्या कोळंबा-शिळंबा कुळांची वंशपद्धती आली आहे. त्यानंतर प्रकरण ५ वे लिहिले गेले. ह्यात महिकावती प्रांतात पाठारे प्रभू कसे आले त्याची हकीकत आहे. प्रकरण ५ व ६ यांचा कर्ता मात्र अनामक आहे. ह्यानंतर सुमारे ५० वर्षांनी भगवान दत्त नामक व्यक्तीच्या हाती ही ४ प्रकरणे गेली. त्याने  प्रकरण २ व ३ वरती प्रकरण १ आणि ५ व ६ वरती प्रकरण ४ अशी स्वतंत्र प्रकरणे चढवली. अश्याप्रकारे प्रकरण १-२-३ आणि प्रकरण ४-५-६ अश्या दोन स्वतंत्र बखरी तयार झाल्या. पुढे अजून कोणा एका दुसऱ्या अनामिकाच्या हाती ही सर्व प्रकरणे इ.स. १६०० च्या आसपास पडली त्याने ती एकत्र करून सबंध ग्रंथ तयार केला. थोडक्यात इ.स. १४४८ ते इ.स. १६०० अशी १५० वर्षे ह्या बखरीत लिखाणाची भर पडत गेली.

मुळात केशवाचार्याने हे लिखाण का केले आणि कोणाच्या सांगण्यावरून केले ते आपण आता बघुया...

शके १३७० (इ.स. १४४८) मध्ये मालाड (मुंबई) येथील देसला उर्फ देसाई नायकोराव याने केशवाचार्याला वंशपद्धतीचे कर्म करावयास सांगितले. बखरीतील पान ५३ वर केशवाचार्य लिखाणाचे कारण सांगतो.

"सर्व कोंकणप्रांत म्लेच्छानी आक्रमण करून, येथून तेथून चोहीकडे सर्वत्र म्लेच्छावर्णा खाली पृथ्वी बुडून गेली. वर्णावर्ण वोळख नाहीशी झाली स्वकुळाची वास्तपुस्त कोणाच्या गावी हि राहिली नाही. क्षत्रियांनी राज्याभिमान सांडिला, शस्त्रे सोडिली व केवळ कृषिधर्म स्वीकारुन कित्येक निव्वळ कुणबी बनले, कित्येकांनी कारकूनवृत्ती आदरिली, कांहिक सेवावृत्ति अंगीकारून निभ्रांत शुद्र ठरले, शाणी कित्येक नष्ट होऊन नामशेष हि राहिले नाहीत. बहुत आचारहीन झाले. गोत्र, प्रवर, कुळस्वामी, कुळगुरु ह्यांची बहुतेकांस आठवण हि राहिली नाही. अशी ह्या तीन शें वर्षात भ्रष्टता माजली व महाराष्ट्रधर्म अज्जी बुडाला. अश्या संकटसमयी श्रीदेवी कुळस्वामिणी, मालाडचा देसला जो नायकोराव त्याच्या स्वप्नात येऊन, सांगती झाली की, नायकोरावा, उठ, महाराष्ट्रधर्म रक्षिण्याकरीता अठरा पगड जातीचा मेळावा कर आणि केळव्यापासून मुंबईपर्यंतच्या सर्व गावचे, सर्व जातींचे व सर्व गोत्रांचे खलक जमवून, त्यांस केशवाचार्याच्या मुखे महाराष्ट्रधर्म सांगीव"

'ह्यानंतर मालाडच्या नायकोरावाने केशवचार्याच्या संमतीने मालाड उर्फ म्हालजापूर येथील जोगेश्वरीच्या देवळापुढे विस्त्रीर्ण मंडप रचून, तीन हजार साहा शें पंचावन्न लोक (३६५५) जमा केले. त्यात नायक (नाईक), देसाई, पुरोहित, कुळगुरु, आचार्य, उपाध्ये, जोशी व इतर मुख्य मुख्य वृतीवंत पाच शें एकवीस (५२१) होते. ब्राह्मणांनी लक्ष्मीसूतांनी भगवती दुर्गादेवीचे स्तवन केले व श्रीदेवी आद्यशक्ति जगदंबिका महाराष्ट्रधर्म रक्षिका जी जगन्माता दुर्गादेवी ती तुम्हा सर्वांवर सुप्रसन्न असो असा आशीर्वाद दिला. नंतर केशवचार्याने सर्व शिष्टांची संमती घेऊन जमलेल्या सर्व लोकांस प्रस्तुत लिहिली जाणारी वंशपद्धती राजा बिंबापासून (इ.स. ११३८) अद्ययावत कथन केली व महाराष्ट्धर्माचे निरुपण केले. त्या वंशपद्धतीच्या व महाराष्ट्रधर्मकथनाच्या सासष्ट (६६) नकला करून, साक्ष-शिक्यानिशी त्या नकला त्या-त्या कुळास, वंशास व जातीस प्रमाणपूर्वक दिल्या. कुळांनी, वंशांनी व जातींनी त्या शिरी वंदन करून ठेविल्या.'

ज्या महाराष्ट्रधर्माचा उच्चार १७व्या शतकात समर्थ रामदासस्वामींनी आणि १९ व्या शतकात महादेव गोविंद रानडे यांनी केला तो मुळात प्रथम १५व्या शतकात केशवचार्याने केला होता.

त्या ६६ नकलांपैकी आज एकही बखरप्रत उपलब्ध नाही. राजवाडे यांना मिळालेली प्रत ही देखील मूळ बखरीची नक्कल आहे. नक्कल करताना १५० वर्षे भर पडत राहिलेल्या ह्या बखरीमध्ये काही त्रुटी निर्माण झालेल्या आहेत. पण म्हणून ह्या बखरीचे महत्व कमी होत नाही. अजून काही नक्कल केलेल्या प्रती किंवा मूळ प्रती सापडल्या तर सध्या उपलब्ध असलेल्या प्रतीमधल्या त्रुटी सुद्धा कदाचीत भरून निघतील आणि उत्तर कोकणचा आणि महाराष्ट्रधर्माचा जुना वैभवशाली इतिहास नव्याने आपल्यासमोर मांडला जाईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग २ - बखरीतील जुनी नावे ...

6 comments:

  1. मस्तच झाली आहे सुरवात ,आणी महत्वाचे म्हणजे माझा एक स्वार्थ पण सध्या झाला."२-३ वेळा वाचुनाही बरीचशी बखर माझ्या समजे पलीकडे होती पण आता सोप्या भाषेत वाचायला मिळणार "

    ReplyDelete
  2. रोहन, बखर वाचून सहज समजण्यासारख्या भाषेत आहे का? कुठे मिळेल? वाचायला आवडेल. अर्थात तू इथे सोप्या भाषेत देतो आहेस म्हणजे डायरेक्ट गाईडच मिळणार, मग टेक्स्टबुकची गरज नाही ;)

    ReplyDelete
  3. गौरी.. बखर गद्य आणि पद्य अशी मिश्र आहे. गद्य भाग सोपा आहे. पद्य भाग थोडा क्लिष्ट वाटतो. १४-१६व्या शतकातील मराठी लिखाणाचा थोडा अभ्यास त्यासाठी हवाच. पण राजवाडे यांनी पुस्तकात जे ४९ मुद्दे मांडले आहेत त्यावरून ती बरीच सहज समजते.

    मला कालच कळले आहे की ह्या पुस्तकाची बहुदा तिसरी आवृत्ती निघाली आहे. जमल्यास आवर्जून घेऊन वाच.

    अनूजा... तुला मागे ही बखर मी दिली होती. त्या अनुषंगाने हे लिखाण समजताना तुला सोपे पडेल.. त्यात तू खुद्द महिकावतीची म्हटल्यावर तुला जास्त इंटरेस्ट असणारच... :)

    ReplyDelete
  4. हो ते तर आहेच म्हणा राहत्या नगरीचा इतिहास वाचायला मिलातोय याहून चांगले भाग्य कुठले.
    आणी बखारेची एक प्रत माझ्या कड़े आहे,इथे पोस्ट वाचून घरी जाऊन बखर वाचते त्या समजतेय आता.

    ReplyDelete
  5. बखरीची प्रत नव्हे तर पुस्तकाची प्रत असे म्हण... :) बखरीची प्रत असती तर काय... :) पण खरच.. कुठेतरी ह्या प्रती आजही धूळ खात पडलेल्या असतीलही... :(

    ReplyDelete
  6. shivaji maharajanchi kamgiri tar sarvannach mahit aahe pan shivaji maharajanchya sardarani ani mavalyanni ji kamgiri keli aahe jar tyachi kahi mahiti milalyas krupaya karun hbongarde@gmail.com var namud karavi hi vinanti

    ReplyDelete