16 May 2011

महिकावतीची बखर - भाग ४ : बिंब घराण्याची ठाणे - कोकणची राजवट ...

शके १०६२ (इ.स. ११४०) मध्ये प्रताप आणि मही बिंब वाळुकेश्वर येथे असताना अपरादित्य शिलाहाराने वसई खाडीच्या उत्तरेकडील भागावर पुन्हा स्वारी केली आणि प्रताप बिंबाने जिंकून घेतलेला भाग पुन्हा स्वतःकडे घेतला. बिंबाचे खुद्द राजधानीचे गाव केळवे-माहीम आणि सोपारा वगैरे प्रदेश शिलाहाराने जिंकून प्रताप बिंबला ठाणे-साष्टी बेटात कोंडून टाकले. केळवे-माहीम हातचे गेल्यामुळे प्रताप बिंबाने वांदरयाच्या दक्षिणेस एक नवे माहीम निर्माण केले आणि त्याला आपली राजधानी नेमले. हेच ते मुंबईचे माहीम जंक्शन. ह्या स्थानाचे नाव मुळच्या केळवे-माहीम मधील माहीम वरून पडले हे देखील ह्या बखरीत स्पष्ट होते. प्रताप बिंबाचा पुत्र मही बिंब शांत बसणाऱ्या पैकी नव्हता. त्याने ठाण्या पलीकडे जाऊन शिलाहारांच्या कल्याण प्रांतावर हल्ला चढवला आणि ते हस्तगत केले. अशाप्रकारे साष्टी बेटांमाधून शिलाहारांची इ.स. ११४१ च्या आसपास हकालपट्टी झाली मात्र शूर्पारक उर्फ नालासोपाराच्या उत्तरेकडे पुढची सव्वाशे वर्षे त्यांनी राज्य उपभोगिले.

शके १०६९ (इ.स. ११४७) मध्ये प्रताप बिंब माहीम (मुंबई) येथे वारला. त्याच्या मागून त्याचा पुत्र
मही बिंब गादीवर आला. त्याने शके १०६९ ते ११३४ (म्हणजे इ.स. ११४७ ते १२१२) अशी तब्बल ६५ वर्षे सुखाने राज्यकारभार केला. ह्या दरम्यान शके १११० (इ.स. ११८८) मध्ये चेउल येथील भोज राजा दक्षिणेवरून ठाण्यावर चालून आला. उरण - पनवेल काबीज करत तो खाडी पलीकडे कळव्याला येऊन पोचला. मही बिंबला ह्याची खबर लागली होतीच. त्याने सेनापती केशवराव आणि हंबीरराव यांना ८ हजार फौज देऊन ठाण्याला रवाना केले होते. कळव्याला ह्या २ फौजेमध्ये तुंबळ युद्ध झाले. ह्यात खुद्द भोज राजा प्राणास मुकला. कच न खाता भोजाच्या मुख्य प्रधानाने दुसरा हल्ला चढवला मात्र त्याला सेनापती केशवरावाने यमसदनी धाडले. तरी सुद्धा न डगमगता भोजाचा एक पाळक पुत्र तिसरा हल्ला करावयास सज्ज झाला. त्यास हंबीररावाणे ठार मारले. आता मात्र भोजाचे उरले सुरले सैन्य पळत सुटले. मही बिंबाच्या फौजेचा मोठा विजय झाला. बिंबाने खुश होऊन अनेक वृत्या आणि पदव्या यांचे दान केले. सेनापती केशवरावाला त्याने गळ्यातील पदक देऊन चौधरीपणा अर्पण केला. देवनारच्या एका पाईकाला (शिपायाला) ठाकूर पद दिले. उत्तनच्या १२ शिपायांना राउत पद मिळाले.

ह्यानंतरच्या काही काळात मही बिंबाने शिलाहारांच्या ताब्यात असलेला सोपारा ते केळवे-माहीम आणि पुढे संजाण - नवसारी (महाराष्ट्र उत्तर सीमा) असा प्रदेश पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. मात्र तो नेमका कधी घेतला हे बखर स्पष्ट करीत नाही. आता मुंबई, ठाणे - साष्टी - कल्याण आणि सोपारा ते नवसारी अश्या विस्तृत प्रदेशावर त्याचे राज्य पसरलेले होते.


मही बिंबला अनेक बायका होत्या पण त्याला बहुदा एकही पुत्र नव्हता. त्याच्या उतार वयात त्याने
कामाई नावाच्या स्त्री बरोबर लग्न केले आणि अखेर तिच्याकडून त्याला पुत्र झाला. त्याचे नाव केशवदेव ठेवले. शके ११३४ (इ.स. १२१२) मध्ये जेंव्हा मही बिंब वारला तेंव्हा हा केशवदेव अवघ्या ५ वर्षांचा होता. तेंव्हा अर्थातच राज्याचा कारभार कामाई देवीवर येऊन पडला. वयाने तरुण आणि रूपाने सुंदर असणाऱ्या कामाईवर राज्याच्या प्रधानाची वाकडी नाराज एव्हाना वळली होती. हे समजून आल्यावर राणी कामाईने तिच्या विश्वासातला माहिमचा एक सरदार हरदोपूर यास ह्यासंबंधी कळविले. हरदोपूराने विश्वासाचे राउत एकत्र केले आणि रात्रीच प्रधानाच्या महालात घुसून त्याचा शिरच्छेद केला. त्यानंतर काही काळाने हरदोपूरने केशवदेव बिंबाचा राज्यारोहण समारंभ घडवून आणला. अशा तर्हेने बिंब घराण्याचा तिसरा राजा राज्य करू लागला. केशवदेव बिंबाने राजा झाल्यावर अनेकांना इनामे दिली आणि ऐश्वर्याने राज्य केले असे बखर म्हणते. याचाच अर्थ त्याचा आजा प्रताप बिंब याने घेतलेल्या मेहनतीचे फळच तो चाखत होता असे म्हणावयास हरकत नाही. देशोधडीला लागलेला प्रांत गेल्या ८० वर्षात शेती, व्यापार-उदीम यांची भरभराट होऊन पुन्हा एकदा स्थिरस्थावर झाला होता.

वयात आलेल्या केशवदेवाने
राजपितामह अशी पदवी धारण केली आणि त्याच्या बडेजावीचे पोवाडे त्याचा भाट संस्थानिकांच्या आणि मांडलिकांच्या राजधान्यासमोरून गाऊ लागला. चेउल येथील भोज घराण्याचा बिंब घराण्यावर राग होता. ३० वर्षांपूर्वी  झालेला पराभव अजूनही भोजांच्या जिव्हारी लागलेला होताच. त्यांनी पुन्हा एकदा युद्धाचा पवित्रा घेतला आणि ठाण्यावर चालून आले. केशवदेवास ही बातमी कळतच त्याने सर्व देसाई एकत्र केले. बिंबाचे सैन्य पुन्हा एकदा खाडी उतरून कळव्याला भोजाचा मुकाबला करायला सज्ज झाले.

बखर म्हणते,
'परदळ देखता केशवदेवाने देसायांना हांकारा दिला. देसाय देसाय देश मिळाला. सिंद्याचा जमाव थोर झाला. नगाऱ्या घाव घातला. कर्णे, बांके, शिंगे, दफ, काहाळा, विराणी वाजली. पाईकापाईक झाली. कळव्या युद्धा थोर झाले.'

युद्धामध्ये देवनार येथील
विनायक म्हातरे (म्हात्रे) याने बाण मारून राजा भोजाच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला. तुंबळ युद्धात भोज पुन्हा एकदा अपयशी झाला. इतक्यात म्हसगडचा संस्थानिक जसवंतराव भोजाच्या मदतीला धावून आला. पुन्हा एकदा लढाई माजली. ह्यावेळी बिंबाच्या फौजेमधल्या सिंद्यानी पराक्रम दाखवला आणि जसवंतरावास जिवंत पकडला. युद्धानंतर झालेल्या तहात केशवदेवाने जसवंतरावास जीवदान देऊन सोडून दिले आणि भोजासमोर मैत्रीचा हात पुढे केला. ही घटना शके ११४६ (इ.स. १२३४)च्या आसपास घडली. तेंव्हा केशवदेव अवघ्या १७ वर्षांचा होता.

उत्तरकोकणात हे सर्व सुरू असताना घाटावर मात्र चालुक्यांचे राज्य संपुष्टात येऊन देवगिरीच्या यादवांचे राज्य आलेले होते. बिंब, भोज यासारखे राजे स्वतंत्र होते की ते ह्या सम्राटांचे मांडलिक होते हे बखरीत कुठेच नीटसे स्पष्ट होत नाही. बिंब मुळचे जिथले होते तिथे ते चौलुक्यांचे उर्फ सोळंकी राजांचे मांडलिक होते पण कोकणात ते स्वतंत्र होते का ते समजत नाही. चौलुक्य आणि चालुक्य हे सुद्धा एकमेकांचे शत्रू होते. आता चालुक्यांच्या जागी यादव येऊन बसले होते. बिंब चौलुक्यांच्या बाजूला तर जसवंतराव आता यादवांच्या बाजूला जाऊन बसला होता. अशातच एक छोटीशी घटना घडली ज्याने कोकणात पुन्हा युद्धाचे वातावरण तापू लागले.


झाले असे की, भोजराजाने कोकणातून केशवदेव बिंबासाठी एक आंब्याची फर्मास पाठवली होती ती ह्या जसवंतरावाने मधल्यामध्ये हडप केली. केशवदेवाने जसवंतरावाकडे निरोप पाठवला की,
'तुमच्या सारख्या भल्या लोकांनी चोऱ्या कराव्या हे युक्त नव्हे.' ह्यावर जसवंतरावाने उलट निरोप धाडला. 'मगदूर असेल तर आमच्या गडाला येऊन, किल्ल्याकुलुपे फोडून आंबे परत घेऊन जावे.' हे ऐकून केशवदेव बिंब पुन्हा एकदा युद्धास उद्युक्त झाला. गेल्यावेळी ह्या जसवंतरावला जिवंत सोडावयास नको होते असे त्याला नक्कीच वाटून गेले असेल. केशवदेवाने पुन्हा एकदा सूर्यवंशी, सोमवंशी आणि शेषवंशी देसायांना एकत्र केले आणि तो भैसेदुर्गवर चालून गेला. हा वेढा तब्बल १२ वर्षे सुरू होता. बखरकार म्हणतो,'चिंचाचे चिंचवणी खाऊन त्याच्या चिंचोऱ्या ज्या पडल्या, त्या रुजून, त्यांचे वृक्ष होऊन, त्यांच्या चिंचा केशवदेवाच्या सैनिकांनी खादल्या.' शेवटी आन्धेरीचा (अंधेरी) कोणी म्हातरा (म्हात्रे) तिथे कामाला होता त्याने भेद केला आणि किल्ला एकदाचा केशवदेवाच्या हाती आला. पुन्हा एकदा जसवंतराव केशवदेवाच्या हाती सापडला. केशवदेवाने त्यास ठार केले की नाही हे बखरीत स्पष्ट नाही पण जिवंत सोडले असेल असे प्रसंगावरून वाटत नाही. कारण बखरीत पुढे कुठेच ह्या जसवंतरावचा उल्लेख येत नाही. लढाई जिंकली म्हणून केशवदेवाने सर्व सरदारांना यथायोग्य इनामे दिली. ही लढाई अंदाजे शके ११५४ (इ.स. १२३२) मध्ये झाली. ह्यानंतर अवघ्या ५ वर्षात केशवदेव अचानक वारला. मरतेवेळी तो अवघ्या ३० वर्षाचा होता आणि त्यास कोणीच पुत्र-संतान नव्हते. अखेर सर्व देसायांनी मिळून मुख्यप्रधान जनार्दन यास गादीवर बसवायचा निर्णय घेतला.

क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग ५ : नागरशा आणि बिंबदेव यादवाचे आगमन ...

1 comment:

  1. पण आत्ताची परिस्थिति पूर्ण पणे उलट आहे, "महिम" सांगितले की सगळे मुंबईतिल महिम का ? म्हणून विचारतात ? मग ते नाही हो पालघर,केलवे येथे ही एक महिम आहे. असे सांगावे लागते.

    ReplyDelete