भाग १ वरुन पुढे चालू ...
प्रवेशद्वारावरुन पुढे गेलो की परत २ वाटा लागतात. उजवीकडची वाट वर चढत बालेकिल्ल्याकड़े जाते. तर डावीकडची वाट गुंजवणे दरवाज्यावरुन पुढे सुवेळा माचीकड़े जाते. आम्ही आमचा मोर्चा आधी गुंजवणे दरवाज्याकड़े वळवला. येथील बरेच बांधकाम पडले आहे तर काही ढासळत्या अवस्थेत आहे. त्यामुळे उतरताना काळजी घ्यावी लागते. पायऱ्या उतरुन खाली गेलो की दरवाजा आहे. दरवाजावरच्या बुरुजावर जाण्यासाठी डाव्या बाजूने वाट आहे. पण शक्यतो जाऊ नये कारण बांधकाम ढासळत्या अवस्थेत आहे. आम्ही दरवाज्यामधून पुढे गेलो. ह्या वाटेने कोणीच खाली उतरत नाही किंवा चढून येत नाही कारण पुढची वाट मोडली आहे. पण काही वर्षांपूर्वीपर्यंत ही वाट वापरत होती हे आप्पा उर्फ़ गो.नी. दांडेकरांच्या 'दुर्ग भ्रमणगाथा' ह्या पुस्तकातून कळते. जमेल तितके पुढे जाउन आम्ही परत आलो. पायऱ्या चढून मागे आलो आणि बालेकिल्ल्याकड़े निघालो. ५ मिं. मध्ये बालेकिल्ल्याच्या पायर्यांखाली होतो.
राजगडचा बालेकिल्ला -
इकडे आल्यावर कळले की राजगडचा बालेकिल्ला का अभेद्य आहे ते. आधी पूर्ण उभ्या चढाच्या आणि मग उजवीकड़े वळून वर महादरवाजापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या अप्रतिमरित्या खोद्ल्या आहेत. त्या चढायला सोप्या नाहीत. हाताला आधार म्हणुन काही ठिकाणी लोखंडी शिगा रोवल्या आहेत. अखेर पायऱ्या चढून दरवाज्यापाशी पोचलो. उजव्या-डाव्या बाजूला २ भक्कम बुरुज आहेत. राजगडचा बालेकिल्ला हा अखंड प्रस्तर असून पूर्व बाजुस योग्य ठिकाणी उतार शोधून मार्ग बनवला गेला आहे. काय म्हणावे ह्या दुर्गबांधणीला... निव्वळ अप्रतिम ... !!! महादरवाजासमोर देवीचे मंदिर असून हल्लीच त्या मंदिराचे नुतनीकरण झाले आहे. असे म्हणतात की महादरवाजाच्या डाव्या बाजुच्या कोनाडयामध्ये 'अफझलखानाचे डोके पुरले' गेले आहे. खरे की खोटे ते नाही माहीत. आता पुढे रस्ता उजवीकड़े वर चढतो आणि बालेकिल्ल्याच्या माथ्यावर जातो. इकडे उजव्या हाताने गेलो तर 'ब्रम्हर्षीचे मंदिर' आहे. त्याशेजारी अतिशय स्वच्छ अशी पाण्याची २-३ टाकं आहेत. राजगडाचे मुळ नाव 'मुरुमदेवाचा डोंगर'. खरंतर ब्रम्हदेव ... बरुमदेव (गावठी भाषेत) ... आणि मग मुरुमदेव असे नाव अपभ्रंशित होत गेले असावे.
राजगड हे नाव ठेवल शिवाजीराजांनी. बालेकिल्ल्यावर ब्रम्हर्षीचे मंदिर आणि त्याची पत्नी पद्मावती हिचे खाली माचीवर मंदिर हे संयुक्तिक वाटते. आम्ही आता उजव्या हाताने बालेकिल्ल्याला फेरी मारायला सुरवात केली. ब्रम्हर्षीच्या मंदिरासमोर कड्याला लागून जमीनीखाली एक खोली आहे. टाक आहे की गुहा ते काही आम्हाला कळले नाही. तिकडून दक्षिणेकड़े पुढे गेलो की उतार लागतो आणि मग शेवटी आहे बुरुज. त्यावरुन पद्मावती माचीचे सुंदर दृश्य दिसते. ह्या बुरुजाच्या डाव्या कोपऱ्यातून बाहेर पड़ायला एक चोर दरवाजा आहे. ती वाट बहुदा खालपर्यंत जाते पण तितकी स्पष्ट नसल्याने आम्ही फार पुढे सरकलो नाही. आता आम्ही डावीकड़े सरकलो आणि बालेकिल्ल्याच्या पश्चिम टोकाला पोचलो. आता समोर दूरवर पसरली होती संजीवनी माची आणि त्या मागे दिसत होता प्रचंड 'जेसाजी कंक जलाशय'. ह्या बुरुजापासून बालेकिल्ल्याच्या माथ्यावर यायला पुन्हा थोड़े वर चढावे लागते. ह्या मार्गावर आपल्याला दारूकोठार आणि अजून काही पाण्याची टाकं लागतात. एकडून वर चढून आलो की वाड्याचे बांधकाम आहे. हा गडाचा सर्वोच्च बिंदू. ह्याठिकाणी सुद्धा राहते वाड्यांचे जोते असून उजव्या कोपऱ्यामध्ये भिंती असलेले बांधकाम शिल्लक आहे. उत्तरेकडच्या भागात तटबंदीच्या काही कमानी शिल्लक असून तेथून सुवेळा माची आणि डूब्याचे सुंदर दृश्य दिसते. एव्हाना १० वाजत आले होते. आल्या वाटेने आम्ही बालेकिल्ला उतरलो आणि सुवेळा माचीकड़े निघालो. इकडे मध्ये एक मारुतीची मूर्ति आहे. आता आपण पोचतो सुवेळा माचीच्या सपाटीवर.
सुवेळा माची - 'संताजी शिळीमकर' यांचा वीरगळ ...
सुवेळा माचीच्या सपाटीवर सुद्धा काही वाड्यांचे जोते असून ही स्वराज्याच्या लष्करी अधिकार्यांची घरे होती. तर प्रशासकीय अधिकार्यांची घरे पद्मावती माचीवर होती. पुढे निघालो तशी वाट निमुळती होत गेली आणि मग समोर जी टेकडी उभी असते तिला 'डूबा' म्हणतात. इकडे उजव्या बाजूला खाली 'काळकाईचा बुरुज' आहे. आम्ही त्या बाजुस न जाता पुढे निघालो. डूब्याला वळसा घालून 'झुंझार बुरुजा'पाशी पोचलो. अप्रतिम बांधणीचा हा बुरुज सुवेळा माचीला २ भागांमध्ये विभागतो. बुरुजाच्या उजव्या बाजूने माचीच्या दुसऱ्या टप्यामध्ये जाण्यासाठी वाट आहे. म्हणजेच माचीचा टोकाचा भाग पडला तरी हा दरवाजा बंद करून झुंझार बुरुजावरुन शत्रुशी परत २ हात करता येतील अशी दुर्गरचना येथे केली आहे. थोड पुढे उजव्या हाताला तटबंदीमध्ये एक गणेशमूर्ति आहे. ह्या जागी आधी 'संताजी शिळीमकर' यांचा वीरगळ होता असे म्हणतात. गडाच्या ह्या किल्लेदाराने मुघल फौजेवर असा काही मारा केला होता की मुघल फौजेची दाणादण उडालेली बघून खुद्द औरंगजेब हतबल झाला होता. त्या लढाईमध्ये एक तोफगोळा वर्मी लागुन संताजींचे निधन झाले. ज्या प्रस्तरावर झुंझार बुरुज बांधला आहे त्यास 'हत्ती प्रस्तर' असे म्हटले जाते कारण समोरून पाहिल्यास त्याचा आकार हत्ती सारखा दिसतो. ह्याच ठिकाणी आहे राजगडावरील नैसर्गिक नेढ़ (आरपार दगडामध्ये पडलेले भोक) उर्फ़ 'वाघाचा डोळा'. आम्ही तिकडे चढणार त्याआधी आमच्या सोबत असलेला वाघ्या तिकडे जाउन पोचला सुद्धा. ह्याठिकाणी कड्याच्या बाजूला मधाची पोळी आहेत त्यामुळे जास्त आरडा-ओरडा करू नये.
काही वेळ एकडे थांबून आम्ही माचीच्या टोकाला गेलो. माचीचा हा भाग दुहेरी तटबंदी आणि शेवटी चिलखती बुरुज असलेला आहे. भक्कम तटबंदीच्या बुरुजावरुन सभोवताली पाहिले. उजव्या हाताला दुरवर 'बाजी पासलकर जलाशय' दिसतो. आता आम्ही परत फिरलो आणि आमचा मोर्चा काळकाई बुरुजाकड़े वळवला. ह्याठिकाणी उतरताना काही पाण्याची टाक आणि त्या शेजारी मुर्त्या लागतात. अगदी टोकाला बुरुज आहे आणि तिकडून खालचे गर्द रान दिसते. उजव्या बाजूला जरा मान वळवून पाहिले तर संजीवनी माचीची लांबी लक्ष्यात येते. आता आम्ही उजवीकडे सरकत संजीवनी माचीकडे जाण्याचा प्रयत्न केला पण मातीचा आणि गवताचा घसारा इतका होता की प्रयत्न सोडून आम्ही पुन्हा आल्या मार्गी मंदिरामध्ये पोचलो.
राजगडाचे फोटो येथे बघू शकता
.
.
.
पुढील भाग - दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार ... राजगडाची संजीवनी माची ... !
.
.
.
No comments:
Post a Comment