मागच्या भागावारून पुढे सुरू ...
राजदरबार आणि राजनिवासस्थान पाहण्यासाठी राजदरबाराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश करते झालो. ह्या वास्तुला 'नगारखाना' असे म्हटले जाते. ही वास्तु २ मजली उंच असून पूर्वी ह्यावरती सुद्धा जाता येत असे. आता मात्र ते बंद केले आहे. गडावरील ही सर्वात उंच जागा आहे. ह्यातून प्रवेश करताना समोर जे दिसते तो आहे आपला सन्मान.. आपला अभिमान.. अष्टकोन असलेली मेघडवरी सिंहसनाच्या ठिकाणी विराजमान आहे. ह्याच ठिकाणी ६ जून १६७४ रोजी घडला राजांचा राजाभिषेक.
हा सोहळा त्याआधी बरेच दिवस सुरू होता. अनेक रिती आणि संस्कार मे महिन्यापासून ह्या ठिकाणी सुरू होत्या. अखेर ६ जून रोजी राजे चक्रवर्ती सम्राट झाले. 'मराठा राजा छत्रपती जाहला'.
राजदरबारामधून प्रवेश करते झालो की एक दगड मध्येच आहे. हा खरेतर सहज काढता आला असता मात्र तो तसाच ठेवला आहे. ह्याचे नेमके प्रयोजन कळत नाही मात्र राजे पहिल्यांदा गडावर आले (मे १६५६) तेंव्हा त्यांनी ह्या ठिकाणाहून गड न्याहाळला आणि राजधानीसाठी जागा नक्की केली असे म्हणतात. शिवाय ह्या जागेपासून इशान्य दिशेला आहे 'श्री जगदिश्वराचे मंदिर' जे वास्तुशात्राला अनुसरून आहे.
राजदरबारामध्ये उजव्या आणि डाव्या बाजूला बसण्यासाठी बरीच जागा आहे. मागच्या बाजुस जाण्यासाठी डावी कडून मार्ग आहे. मागच्या भागात गेलो की ३ भले मोठे चौथरे दिसतात. ह्यातील पहिला आहे कामकाजाचा आणि मसलतीचा. दूसरा आणि तिसरा आहे राजांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे 'निवासस्थान'.
उजव्या बाजुस आहे 'देवघर' आणि त्या पुढे आहे 'स्वयंपाकघर'. येथे मध्येच एक गुप्त खोली आहे. ८-१० पायऱ्या उतरून गेलो की एक २० x २० फुट असे तळघर आहे. हा 'खलबतखाना' किंवा मोठी तिजोरी असावी. त्या पलिकडे खालच्या बाजूला आहेत एकुण ३ 'अष्टकोनी स्तंभ'. आधी किती मजली होते ते माहीत नाही पण सध्या ते २ मजली उरले आहेत. एक तर पुर्णपणे नष्ट होत आला आहे. प्रत्येक स्तंभाकडून खाली जाणाऱ्या पायऱ्या आहेत. ज्या बाहेरच्या बाजूस म्हणजे 'गंगासागर' तलावाकड़े निघतात. ह्या तलावामध्ये राजाभिषेकाच्या वेळी सर्व महत्वाच्या नद्यांचे पाणी आणून मिसळले गेले होते. राजांच्या निवासस्थानाच्या उजव्या बाजुस त्यांचे न्हाणीघर आहे. पलीकडच्या बाजूला निघालो की एक सलग मार्गिका आहे. जिच्या उजव्या बाजूला आहे 'पालखीचा दरवाजा' आणि डावीकड़े आहे 'मेणा दरवाजा'. ह्या मर्गिकेपलिकडे आहेत ६ मोठ्या खोल्या. ह्यातील ४ एकमेकांशी जोड़लेल्या आहेत. तर इतर २ एकमेकांशी. ह्याला 'राणीवसा' असे म्हटले जाते. पण ते संयुक्तिक वाटत नाही कारण मधली मार्गिका. राजे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये पहारे आणि इतर लोकांचे राहणे हवे कशाला? शिवाय ह्यातील प्रत्येक खोलीला फ़क्त शौचकूप आहे. न्हाणीघर नाही. काही मध्ये तर ४-६ शौचकूप आहेत. मग ह्या मोठ्या खोल्या आहेत तरी कशासाठी???
आम्ही तिकडून निघालो आणि परतीच्या मार्गाला लागलो. आता जाताना मात्र आम्ही रायगड रोपवेने खाली जायचे ठरवले. एक अत्यंत आनंददायी आणि पवित्र अनुभूतिने भरलेला प्रवास संपवून आम्ही 'पाचाडचा कोट' पाहण्यासाठी निघालो. ह्याठिकाणी मासाहेबांचे २ वर्षे वास्तव्य होते. रायगडावरील हवा मानवत नाही म्हणुन राजांनी खास त्यांच्यासाठी याठिकाणी कोट बांधला होता. हा नुसता वाडा नसुन भुईकोट किल्ला आहे. त्याला २ बुरुजी दरवाजा आहे. आम्ही सगळे हा कोट पाहण्यासाठी पोचलो.
चौकोनी आकाराच्या ह्या भुईकोट किल्ल्याला चारही बाजूला चांगले १ मजली बुरुज आहेत. प्रवेश केल्या-केल्या डाव्या उजव्या बाजूला देवडया आहेत. पुढे गेल्यावर दोन्ही बाजूला जायला प्रस्तर मार्गिका आहे. समोरचा चौथरा बहुदा मुख्य सुरक्षाचौकी असावी. डाव्या बाजूला राहत्या घरांची बरीच पडकी जोते आहेत. उजव्या बाजूला गेलो की एक एकमेव भिंत उभी आहे. हि मासाहेब जिजामातांच्या राहत्या दालनाची आहे. किल्ल्यामध्ये २ विहिरी असून एक छोटा खोदीव तलावसुद्धा आहे. मागच्या बाजूला काही मोठे कोनाडे आहेत पण त्यांचे प्रयोजन कळले नाही. आम्ही तासभर हा किल्ला पाहिला आणि काही फोटो घेतले. ह्या ठिकाणाहून रायगडाचे सुंदर दर्शन घडते. बाहेर रस्त्याच्या बाजूला काही दगडी शिल्प आहेत.
आता सूर्यास्त होत आला होता. आम्हास आता परतायला हवे होते. इच्छा तर नव्हती पण पण निघावे तर लागणारच होते. मावळत्या सूर्याबरोबर रायगडाला पुन्हा एक मुजरा केला आणि आज्ञा घेउन आम्ही परतीच्या मार्गावर निघालो..
.
.
.
वर सांगितल्या प्रमाने नागारखान्याचा लगेच नंतर आपल्याला एक दगड पहावयास मिलतो.. वास्तविक ही जगा पूर्णपणे सपाट आहे परन्तु याच सपाट जागेवर असा दगड पाहून आपल्याला आश्चर्य वाटने स्वाभाविक आहे .. वास्तविक गडाची आधिपासुनची म्हणजेच बांधकाम करण्या आधी पसुंची सगळ्यात उंच जगा म्हणजे हा दगड होय... तसेच महाराज जेव्हा या गडावर प्रथम आले तेव्हा येथे ते अवार्जुन आले होते... माझ्या माहिती प्रमाने गडास पूजन देखिल त्यानी येथेच केले होते म्हणून त्याची आठवण म्हणून ( की शुभशकुन ? ) त्यानी हा दगड तसाच ठेवला... या दगडाचा फोटो माझ्या ऑरकुट अकाउंट वर सुद्धा मी अपलोड केला आहे.
ReplyDelete-निनाद गायकवाड
मित्रा, धन्यवाद! माझ्याकडे दुसरे शब्द नाहीत. तू ह्या ब्लॉगवर नियमितपणे लेखन करावं आणि आम्हा शिवभक्तांना ते वाचायला मिळावं.
ReplyDeleteतुला माझ्या ब्लॉगवर टॅगलय..बघ जाऊन
ReplyDelete