22 Feb 2009

महाराष्ट्रातील किल्ले ... गतवैभवाचे मानकरी ... आजचे भग्नावशेष ... !

(संदर्भ ग्रंथ - 'सह्याद्री' - स. आ. जोगळेकर.)


"वस्तूतः दिल्ली व आग्रा येथील किल्ले हे राजवाडे आहेत. छावणीतल्या जनानखान्या भोवती रेशमी कनाती लावतात तशी ह्यांच्या भोवती देखणी तटबंदी आहे म्हणून त्यांना किल्ले म्हणायचे. त्यांची तटबंदी सूंदर लालसर दगडाची आहे. त्यांच्या कंगोऱ्याला किंवा महाद्वारावरील नक्षीलाही धक्का लागलेला नाही. कसा लागणार? त्या राजांची धर्मातीत व दुबळी स्वामीनिष्ठ प्रजा त्याभोवती छातीचा कोट करून उभी होती. ह्या किल्ल्यांच्या अंतर्भागात संगमरवरी महालांच्या रांगा आहेत. त्यांचे सौंदर्य अद्वितीय आहे. 'पृथ्वीवरील स्वर्ग तो हाच' असे त्यांचे वर्णन करण्यात आलेले आहे आणि असे काही ऐकले की उत्तर हिंदूस्तानातील लोक नि:श्वास सोडतात, तल्लीनतेने डोळे किलकिले करतात. त्यांच्या लक्ष्यातही येत नाही की हा स्वर्ग आपल्याच पुर्वजांच्या मुडद्यावर उभा आहे, या किल्ल्यांच्या अद्वितीय वैभवाचे अस्तित्व हे आपल्या नामुष्कीचे प्रतिक आहे. या महालांत पाउल टाकले की भासतात अत्तरांच्या फवाऱ्याचे सुगंध, मद्याच्या प्रवाहाचे दर्प आणि नर्तकींच्या नुपूरांचे झंकार. अधूनमधून कारस्थानाची कुबट घाणही प्रत्ययास येते. या किल्ल्यांनी प्रत्यक्षपणे मर्दुमकी कधी पाहिलेली नाही. येथे शस्त्राची चमक दिसली ति फ़क्त खुनी खंजीरांची, मसलती घडल्या त्या फ़क्त हिंदूंच्या नि:पाताच्या. या शाहीवैभवाला मोगलांच्या मर्दुमकीची प्रतिके मानता येणार नाही. शोभीवंत पण निरुपयोगी सोन्यारूप्याच्या तोफांप्रमाणेच यांचे ही फ़क्त कौतुक करायचे.
आग्र्याच्या किल्ल्यात कोणाची मर्दुमकी प्रकट झाली असेल तर ती श्री शिवछत्रपति महाराजांची. धन्य त्यांची की मोगल साम्राज्य वैभवाच्या कळसावर व सामर्थ्याच्या शिखरावर असताना आणि स्वतः एकाकी असताना त्यांनी शहेनशहाचा जाहीर निषेध केला. धन्य त्यांची की हे वैभव पाहून स्वदेशी परत आल्यावर त्यांनी मोगलांचे अनुकरण करून रंगमहल उठवले नाहीत, तर त्यांच्या प्रतिकारासाठी, त्यांच्याच मूलखातून गोळा केलेल्या लूटी मधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम दुर्ग उभारले."आपल्या रक्षणासाठी झगडलेल्या या किल्ल्यांची आजची अवस्था ढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, नामशेष इमारती, ओहोरलेली टाकी अशी असली तरी ती स्वदेश - स्वधर्म - स्वराज्य यांच्या रक्षणातून निर्माण झालेली आहे. दुर्ग - गड़ - किल्ले यांचा उपयोग मुख्यत: लढण्यासाठी असतो हेच विसरुन गेलेल्या सुंदर किल्ल्यांपेक्षा मला माझ्या महाराष्ट्रामधले ढासळलेले उध्वस्त गड्किल्ले भारुन टाकतात. त्यांचाच मला अभिमान वाटतो.

1 comment:

  1. खर आहे.सौंदर्याच प्रतिक म्हणून ताजमहाल अन लाल किल्ला आजही उत्तम अवस्थेत आहेत मात्र राजांची राजधानी रायगड मात्र झीजतोय.
    उद्याच्या पिढीला विलासी लाल किल्ला दाखवायला मिळाल पण महाराजांचे गड? ते काय फक्त फोटोत दाखवायचे?

    ReplyDelete