6 Dec 2009

रायगडावरील स्थाने ... !

मागच्या भागावारून पुढे सुरू ...

.....पुतळ्या समोरून एक प्रशस्त्र रस्ता गडाच्या दुसर्‍या बाजूस जातो. ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन ओळीत एकामेकांना जोडून एकुण ४७ बांधकामे आहेत. एका बाजूला २३ तर दुसऱ्या बाजूला २४. ह्याला आत्तापर्यंत 'रायगडावरील बाजारपेठ' असे म्हटले गेले आहे. जुन्या पुस्तकांमध्ये असे म्हटले आहे की, 'घोडयावरुन उतरायला लागू नये म्हणून दुकानांची जोते उंच ठेवले गेले आहेत.' पण ते संयुक्तिक वाटत नाही. कारण राजधानीच्या गडावर हवी कशाला धान्य आणि सामान्य बाजारपेठ ??? खाली पाचाडला आहे की बाजारपेठ. त्यासाठी खास गडावर श्रम करून यायची काय गरज आहे? शिवाय गडावर येणाऱ्या माणसांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार तो वेगळाच. ही सलग असलेली ४७ बांधकामे 'नगरपेठ' म्हणता येतील. स्वराज्याचे सुभेदार, तेथील महत्त्वाचे अधिकारी, लष्करी अधिकारी, सरनौबत - सरदार, वकील, इतर राजांचे दूत आणि असे इतर विशिष्ट व्यक्तिं ज्यांचे गडावर तात्पुरते वास्तव्य असते अश्या व्यक्तिंसाठी राखीव घरे त्यावेळी बांधली गेली असावीत. प्रत्येक घर ३ भागात विभागले आहे. पायऱ्या चढून गेले की छोटी ओसरी, मग मधला बैठकीचा भाग, आणि मागे विश्रांतीची खोली. दोन्ही बाजुस १५ व्या घरानंतर पाण्याच्या निचऱ्यासाठी मोकळी जागा सोडली आहे. गडावर पडणाऱ्या पावसाचा पूर्ण अंदाज घेउनच हे बांधकाम केले असल्याने जोत्यांच्या उंचीचा संबंध घोडयावरुन खरेदी असा लावला गेला आहे. डाव्या बाजुच्या ९व्या आणि १०व्या घराच्या मधल्या भिंतीवर मात्र 'शेषनागाचे दगडी शिल्प' आहे. ह्या बाबतीत १-२ ऐतिहासिक घटना आहेत. पण नेमक प्रयोजन अजून सुद्धा कळत नाही आहे.

तिकडून पुढे गेलो आणि  'श्री जगादिश्वर मंदिरा'च्या दरवाजामधून प्रवेश करते झालो. मंदिराचे प्रांगण प्रशत्र आहे. डाव्या-उजव्या बाजूला थोडी वर सपाटी असून बसायला जागा बनवली आहे. मुख्यप्रवेशद्वार अर्थात उजव्या दिशेने आहे. दारासमोर सुबक कोरीव नंदी असून आतमध्ये एक हनुमानाची मूर्ती आहे. मंदिर आतूनसुद्धा प्रशत्र आहे. आम्ही सर्वजण काही वेळ आतमध्ये विसावलो आणि मंदिर समोरील पूर्वेकडच्या बाजूला असणाऱ्या भागाकडे निघालो. या ठिकाणी आहे 'श्री शिवछत्रपतींची समाधी'. मंदिरामधून समाधीकड़े जाताना एक पायरी उतरून आपण खाली उतरतो त्या पायरीवर लिहिले आहे. 'सेवेचे ठाई तत्पर.. हीरोजी इंदळकर..' ज्याने बांधला रायगड तो हा हीरोजी. खासा गड बघून राजे खुश झाले तेंव्हा त्यांनी हिरोजीला विचारले,''बोल तूला काय इनाम हवे?'' हीरोजी म्हणाले, ''काही नको स्वामी. मंदिरामधून तुमचा उजवा पाय बाहेर पडेल त्या पायरीवर माझे नाव लिहावे.'' ही अष्टकोनी समाधी १९२४-२५ साली बांधली गेली आहे.

१९७४ मध्ये छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा रायगडावर बसवला तेंव्हा समाधीवर जलाभिषेकाचा कार्यक्रम केला गेला. अनेक शिवप्रेमी आणि दुर्ग प्रेमींनी ३०० वेगवेगळ्या किल्ल्यांमधून पाणी आणून समाधीवर आणि सिंहासनाच्या जागी पुन्हा अभिषेक केला होता. त्याची सुद्धा गोष्ट 'दुर्गभ्रमणगाथा' मध्ये आवर्जुन वाचावी अशी आहे. आम्ही राजांच्या समाधीला मनोमन वंदन केले.

राजे म्हणजे खरेखुरे दुर्गस्वामी ...

त्यांचा जन्म दुर्गावर झाला. आयुष्यामधील ७/८ आयुष्य त्यांनी दुर्गांवर व्यतीत केले आणि अखेर त्यांची जीवनयात्रा दुर्गावरतीच समाप्त झाली. समाधी परिसर अत्यंत पवित्र आणि प्रसन्न आहे. उजव्या बाजुच्या भिंतीवर हीरोजी इंदळकर यांचा शिलालेख आहे. त्यात त्यांनी रायगडावर कोणकोणते बांधकाम राजांच्या सांगण्यावरुन केले ते लिहिले आहे. त्यासमोर प्रशत्र देवडया आहेत. आम्ही काहीवेळ तेथे विसावलो.

समाधी समोरून पायऱ्या इतरून पुढे गेलो की डाव्या बाजूला घोड़पागेच्या खुणा दिसतात. बरेच ठिकाणी राहत्या वाड्यांचे जोते दिसतात. ह्या ठिकाणी गडावरील राखीव फौज आणि राजांची खाजगीची फौज राहती असायची. अजून पुढे गेलो की ह्या भागामधील 'काळा हौद' नावाचा तलाव आहे. इतरस्त्र सपाटी असल्याने बरीच विखुरलेली बांधकामे या भागात आहेत. टोकाला गेलो की लागतो 'भवानी कडा' आणि त्याखाली असलेली गुहा. राजे ह्या ठिकाणी येउन चिंतन करायचे असे म्हटले जाते. आम्ही आता पुन्हा मागे फिरलो आणि समाधीवरुन पुन्हा नगरपेठेवरुन होळीच्या माळावर पोचलो.
.
.
.
पुढील भाग - 'मराठा राजा छत्रपती जाहला' ... !
.
.
.

1 comment:

  1. रायगड ट्रेक करण्या साथी चित दरावाज्या च्या थोड़े पुढे एक छोटीशी पाउल वाट आहे तिथून थोड़े वर चढून गेल्यानंतर आपल्याला रायगदाचा नाणे दरवाजा लागतो.. हेच जर का आपण पायर्यांच्या रस्त्याने गेलो तर आपली वाट ही हिरकणी बुरुजच्याखालून जाते जो अतिशय साधा रास्ता आहे... या नाणे दरवाजाच्या पुढल्या वाटेवरून पुढे जाट असताना पेशवाई चा अस्तास येथे रहायला आलेल्या सिद्दी च्या वड्याचे भग्नावशेष देखिल पहावयास मिळतात... येथून अतिशय बिकट वाट आहे रायगड वर जाण्यासाठी अतिशय अरुंद... जी आपल्याला बाजारपेठे जवलील पायर्यांच्या रस्त्या वर आणून सोडते... असा हा साडेतीन तासाचा ट्रेक चा अतिशय रोमांचक रास्ता आहे.. अपना पुढे कधी रायगड दर्शनाला गेलात तर या वाटेने जरुर जा..!!! फ़क्त एक विनंती आहे की रायगड चा ट्रेक हा दुपारी सुरु करावा कारण रात्री पर्यंत आपण गडा वर पोहोचतो..व ट्रेक ची वाट थोड़ी धोकादायक आहे म्हणून...
    पुढच्या पोस्ट साठी शुभेत्चा ..!!!
    -निनाद गायकवाड

    ReplyDelete