6 Dec 2009

'मराठा राजा छत्रपती जाहला' ... !

मागच्या भागावारून पुढे सुरू ...


राजदरबार आणि राजनिवासस्थान पाहण्यासाठी राजदरबाराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश करते झालो. ह्या वास्तुला 'नगारखाना' असे म्हटले जाते. ही वास्तु २ मजली उंच असून पूर्वी ह्यावरती सुद्धा जाता येत असे. आता मात्र ते बंद केले आहे. गडावरील ही सर्वात उंच जागा आहे. ह्यातून प्रवेश करताना समोर जे दिसते तो आहे आपला सन्मान.. आपला अभिमान.. अष्टकोन असलेली मेघडवरी सिंहसनाच्या ठिकाणी विराजमान आहे. ह्याच ठिकाणी ६ जून १६७४ रोजी घडला राजांचा राजाभिषेक.

हा सोहळा त्याआधी बरेच दिवस सुरू होता. अनेक रिती आणि संस्कार मे महिन्यापासून ह्या ठिकाणी सुरू होत्या. अखेर ६ जून रोजी राजे चक्रवर्ती सम्राट झाले. 'मराठा राजा छत्रपती जाहला'.

राजदरबारामधून प्रवेश करते झालो की एक दगड मध्येच आहे. हा खरेतर सहज काढता आला असता मात्र तो तसाच ठेवला आहे. ह्याचे नेमके प्रयोजन कळत नाही मात्र राजे पहिल्यांदा गडावर आले (मे १६५६) तेंव्हा त्यांनी ह्या ठिकाणाहून गड न्याहाळला आणि राजधानीसाठी जागा नक्की केली असे म्हणतात. शिवाय ह्या जागेपासून इशान्य दिशेला आहे 'श्री जगदिश्वराचे मंदिर' जे वास्तुशात्राला अनुसरून आहे.

राजदरबारामध्ये उजव्या आणि डाव्या बाजूला बसण्यासाठी बरीच जागा आहे. मागच्या बाजुस जाण्यासाठी डावी कडून मार्ग आहे. मागच्या भागात गेलो की ३ भले मोठे चौथरे दिसतात. ह्यातील पहिला आहे कामकाजाचा आणि मसलतीचा. दूसरा आणि तिसरा आहे राजांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे 'निवासस्थान'.

उजव्या बाजुस आहे 'देवघर' आणि त्या पुढे आहे 'स्वयंपाकघर'. येथे मध्येच एक गुप्त खोली आहे. ८-१० पायऱ्या उतरून गेलो की एक २० x २० फुट असे तळघर आहे. हा 'खलबतखाना' किंवा मोठी तिजोरी असावी. त्या पलिकडे खालच्या बाजूला आहेत एकुण ३ 'अष्टकोनी स्तंभ'. आधी किती मजली होते ते माहीत नाही पण सध्या ते २ मजली उरले आहेत. एक तर पुर्णपणे नष्ट होत आला आहे. प्रत्येक स्तंभाकडून खाली जाणाऱ्या पायऱ्या आहेत. ज्या बाहेरच्या बाजूस म्हणजे 'गंगासागर' तलावाकड़े निघतात. ह्या तलावामध्ये राजाभिषेकाच्या वेळी सर्व महत्वाच्या नद्यांचे पाणी आणून मिसळले गेले होते. राजांच्या निवासस्थानाच्या उजव्या बाजुस त्यांचे न्हाणीघर आहे. पलीकडच्या बाजूला निघालो की एक सलग मार्गिका आहे. जिच्या उजव्या बाजूला आहे 'पालखीचा दरवाजा' आणि डावीकड़े आहे 'मेणा दरवाजा'. ह्या मर्गिकेपलिकडे आहेत ६ मोठ्या खोल्या. ह्यातील ४ एकमेकांशी जोड़लेल्या आहेत. तर इतर २ एकमेकांशी. ह्याला 'राणीवसा' असे म्हटले जाते. पण ते संयुक्तिक वाटत नाही कारण मधली मार्गिका. राजे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये पहारे आणि इतर लोकांचे राहणे हवे कशाला? शिवाय ह्यातील प्रत्येक खोलीला फ़क्त शौचकूप आहे. न्हाणीघर नाही. काही मध्ये तर ४-६ शौचकूप आहेत. मग ह्या मोठ्या खोल्या आहेत तरी कशासाठी???

आम्ही तिकडून निघालो आणि परतीच्या मार्गाला लागलो. आता जाताना मात्र आम्ही रायगड रोपवेने खाली जायचे ठरवले. एक अत्यंत आनंददायी आणि पवित्र अनुभूतिने भरलेला प्रवास संपवून आम्ही 'पाचाडचा कोट' पाहण्यासाठी निघालो. ह्याठिकाणी मासाहेबांचे २ वर्षे वास्तव्य होते. रायगडावरील हवा मानवत नाही म्हणुन राजांनी खास त्यांच्यासाठी याठिकाणी कोट बांधला होता. हा नुसता वाडा नसुन भुईकोट किल्ला आहे. त्याला २ बुरुजी दरवाजा आहे. आम्ही सगळे हा कोट पाहण्यासाठी पोचलो.

चौकोनी आकाराच्या ह्या भुईकोट किल्ल्याला चारही बाजूला चांगले १ मजली बुरुज आहेत. प्रवेश केल्या-केल्या डाव्या उजव्या बाजूला देवडया आहेत. पुढे गेल्यावर दोन्ही बाजूला जायला प्रस्तर मार्गिका आहे. समोरचा चौथरा बहुदा मुख्य सुरक्षाचौकी असावी. डाव्या बाजूला राहत्या घरांची बरीच पडकी जोते आहेत. उजव्या बाजूला गेलो की एक एकमेव भिंत उभी आहे. हि मासाहेब जिजामातांच्या राहत्या दालनाची आहे. किल्ल्यामध्ये २ विहिरी असून एक छोटा खोदीव तलावसुद्धा आहे. मागच्या बाजूला काही मोठे कोनाडे आहेत पण त्यांचे प्रयोजन कळले नाही. आम्ही तासभर हा किल्ला पाहिला आणि काही फोटो घेतले. ह्या ठिकाणाहून रायगडाचे सुंदर दर्शन घडते. बाहेर रस्त्याच्या बाजूला काही दगडी शिल्प आहेत.

आता सूर्यास्त होत आला होता. आम्हास आता परतायला हवे होते. इच्छा तर नव्हती पण पण निघावे तर लागणारच होते. मावळत्या सूर्याबरोबर रायगडाला पुन्हा एक मुजरा केला आणि आज्ञा घेउन आम्ही परतीच्या मार्गावर निघालो..
.
.
.

रायगडावरील स्थाने ... !

मागच्या भागावारून पुढे सुरू ...

.....पुतळ्या समोरून एक प्रशस्त्र रस्ता गडाच्या दुसर्‍या बाजूस जातो. ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन ओळीत एकामेकांना जोडून एकुण ४७ बांधकामे आहेत. एका बाजूला २३ तर दुसऱ्या बाजूला २४. ह्याला आत्तापर्यंत 'रायगडावरील बाजारपेठ' असे म्हटले गेले आहे. जुन्या पुस्तकांमध्ये असे म्हटले आहे की, 'घोडयावरुन उतरायला लागू नये म्हणून दुकानांची जोते उंच ठेवले गेले आहेत.' पण ते संयुक्तिक वाटत नाही. कारण राजधानीच्या गडावर हवी कशाला धान्य आणि सामान्य बाजारपेठ ??? खाली पाचाडला आहे की बाजारपेठ. त्यासाठी खास गडावर श्रम करून यायची काय गरज आहे? शिवाय गडावर येणाऱ्या माणसांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार तो वेगळाच. ही सलग असलेली ४७ बांधकामे 'नगरपेठ' म्हणता येतील. स्वराज्याचे सुभेदार, तेथील महत्त्वाचे अधिकारी, लष्करी अधिकारी, सरनौबत - सरदार, वकील, इतर राजांचे दूत आणि असे इतर विशिष्ट व्यक्तिं ज्यांचे गडावर तात्पुरते वास्तव्य असते अश्या व्यक्तिंसाठी राखीव घरे त्यावेळी बांधली गेली असावीत. प्रत्येक घर ३ भागात विभागले आहे. पायऱ्या चढून गेले की छोटी ओसरी, मग मधला बैठकीचा भाग, आणि मागे विश्रांतीची खोली. दोन्ही बाजुस १५ व्या घरानंतर पाण्याच्या निचऱ्यासाठी मोकळी जागा सोडली आहे. गडावर पडणाऱ्या पावसाचा पूर्ण अंदाज घेउनच हे बांधकाम केले असल्याने जोत्यांच्या उंचीचा संबंध घोडयावरुन खरेदी असा लावला गेला आहे. डाव्या बाजुच्या ९व्या आणि १०व्या घराच्या मधल्या भिंतीवर मात्र 'शेषनागाचे दगडी शिल्प' आहे. ह्या बाबतीत १-२ ऐतिहासिक घटना आहेत. पण नेमक प्रयोजन अजून सुद्धा कळत नाही आहे.

तिकडून पुढे गेलो आणि  'श्री जगादिश्वर मंदिरा'च्या दरवाजामधून प्रवेश करते झालो. मंदिराचे प्रांगण प्रशत्र आहे. डाव्या-उजव्या बाजूला थोडी वर सपाटी असून बसायला जागा बनवली आहे. मुख्यप्रवेशद्वार अर्थात उजव्या दिशेने आहे. दारासमोर सुबक कोरीव नंदी असून आतमध्ये एक हनुमानाची मूर्ती आहे. मंदिर आतूनसुद्धा प्रशत्र आहे. आम्ही सर्वजण काही वेळ आतमध्ये विसावलो आणि मंदिर समोरील पूर्वेकडच्या बाजूला असणाऱ्या भागाकडे निघालो. या ठिकाणी आहे 'श्री शिवछत्रपतींची समाधी'. मंदिरामधून समाधीकड़े जाताना एक पायरी उतरून आपण खाली उतरतो त्या पायरीवर लिहिले आहे. 'सेवेचे ठाई तत्पर.. हीरोजी इंदळकर..' ज्याने बांधला रायगड तो हा हीरोजी. खासा गड बघून राजे खुश झाले तेंव्हा त्यांनी हिरोजीला विचारले,''बोल तूला काय इनाम हवे?'' हीरोजी म्हणाले, ''काही नको स्वामी. मंदिरामधून तुमचा उजवा पाय बाहेर पडेल त्या पायरीवर माझे नाव लिहावे.'' ही अष्टकोनी समाधी १९२४-२५ साली बांधली गेली आहे.

१९७४ मध्ये छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा रायगडावर बसवला तेंव्हा समाधीवर जलाभिषेकाचा कार्यक्रम केला गेला. अनेक शिवप्रेमी आणि दुर्ग प्रेमींनी ३०० वेगवेगळ्या किल्ल्यांमधून पाणी आणून समाधीवर आणि सिंहासनाच्या जागी पुन्हा अभिषेक केला होता. त्याची सुद्धा गोष्ट 'दुर्गभ्रमणगाथा' मध्ये आवर्जुन वाचावी अशी आहे. आम्ही राजांच्या समाधीला मनोमन वंदन केले.

राजे म्हणजे खरेखुरे दुर्गस्वामी ...

त्यांचा जन्म दुर्गावर झाला. आयुष्यामधील ७/८ आयुष्य त्यांनी दुर्गांवर व्यतीत केले आणि अखेर त्यांची जीवनयात्रा दुर्गावरतीच समाप्त झाली. समाधी परिसर अत्यंत पवित्र आणि प्रसन्न आहे. उजव्या बाजुच्या भिंतीवर हीरोजी इंदळकर यांचा शिलालेख आहे. त्यात त्यांनी रायगडावर कोणकोणते बांधकाम राजांच्या सांगण्यावरुन केले ते लिहिले आहे. त्यासमोर प्रशत्र देवडया आहेत. आम्ही काहीवेळ तेथे विसावलो.

समाधी समोरून पायऱ्या इतरून पुढे गेलो की डाव्या बाजूला घोड़पागेच्या खुणा दिसतात. बरेच ठिकाणी राहत्या वाड्यांचे जोते दिसतात. ह्या ठिकाणी गडावरील राखीव फौज आणि राजांची खाजगीची फौज राहती असायची. अजून पुढे गेलो की ह्या भागामधील 'काळा हौद' नावाचा तलाव आहे. इतरस्त्र सपाटी असल्याने बरीच विखुरलेली बांधकामे या भागात आहेत. टोकाला गेलो की लागतो 'भवानी कडा' आणि त्याखाली असलेली गुहा. राजे ह्या ठिकाणी येउन चिंतन करायचे असे म्हटले जाते. आम्ही आता पुन्हा मागे फिरलो आणि समाधीवरुन पुन्हा नगरपेठेवरुन होळीच्या माळावर पोचलो.
.
.
.
पुढील भाग - 'मराठा राजा छत्रपती जाहला' ... !
.
.
.

5 Dec 2009

दुर्गदुर्गेश्वर रायगड ... !

प्र. के. घाणेकर यांच्या 'अथातो दुर्गजिज्ञासा' या पुस्तकातील संधर्भ वापरून २ वेळा 'दुर्गदुर्गेश्वर रायगड' पाहिल्यानंतर केलेले माझे लिखाण ... !!!

किल्ले रायगड ... स्वराज्याची दूसरी राजधानी ... अनेक आनंदाचे आणि वाईट प्रसंग ज्याने पाहिले असा मात्तबर गड ...

त्याने पाहिला भव्य राजाभिषेक सोहळा आपल्या शिवाजी राजाला छत्रपति होतानाचा ... पाहिले शंभूराजांना युवराज होताना ... मासाहेब जिजाऊँचे दू:खद निधन सुद्धा पाहिले ... शिवरायांचा दक्षिण दिग्विजय पाहिला ... रामराजांचे लग्न पाहिले ... शिवरायांच्या अकाली निधनाचा कडवट घास सुद्धा पचवला त्याने ... त्याने पाहिले शंभूराजांचे वेडे धावत येणे ... अश्या अनेक घटनांचा साक्षीदार असलेला किल्ले दुर्गदुर्गेश्वर रायगड ... !!!

मी रायगडावर किती वेळा गेलो आहे आठवत नाही. देवळामध्ये आपण किती वेळा जातो हे थोडीच मोजतो नाही का. रात्रभर प्रवास करून आम्ही पहाटे ५ च्या आसपास पाचाडला पोचलो. इतक्या लवकर पाचाडचा कोट पाहणे शक्य नव्हते त्यामुळे थेट मासाहेब जिजामातांच्या समाधीपाशी पोचलो. उजाड़ता-उजाड़ता दर्शन घेतले आणि रायगडाच्या 'चित्त दरवाजा'कड़े निघालो. पूर्व क्षितिजावर लालसर कडा दिसू लागली तसे 'टकमक टोक' दिसू लागले. ते पहातच चित्तदरवाजा पासून आम्ही रायगड चढायला सुरवात केली. रायगडा संबंधित खूप इतिहास जडलेला आहे पण तो सर्व इकडे मांडणे शक्य नाही. मात्र रायगड चढ़ताना भौगोलिक आणि लष्करीदृष्टया त्याचे स्थान लक्ष्यात येते. चित्तदरवाजावरुन वर चढून गेलो की लगेच लागतो तो 'खूबलढा बुरुज'. आता इकडून वाट चढायची थांबते आणि कड्याखालून डाव्या बाजूने पुढे जात राहते. पहिल्या चढावर लागलेला दम इकडे २ क्षण थांबून घालवावा. आता वाट डावीकड़े वळत पुढे जात राहते. पुढच्या चढाच्या पायऱ्या सुरु व्हायच्या आधी उजव्या हाताला झाडाखाली एक पाण्याचा झरा आहे. थोड़े पुढे सरकले की ज्या पायऱ्या सुरु होतात त्या गडावरच्या होळीच्या माळापर्यंत संपत नाहीत. पायऱ्या चढत अजून थोड़े वर सरकलो की आपल्याला वरच्या बाजूला २ महाकाय बुरुज दिसू लागतात. त्या २ बुरुजांमध्ये लपलेला गडाचा दरवाजा मात्र अगदी शेवटपर्यंत कुठूनसुद्धा दिसत नाही अशी गोमुखी प्रवेशरचना केलेली आहे. रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात किल्ल्यांच्या रचनेवर लिहिल आहे, "दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून, पुढे बुरुज देउन. येतिजाती मार्ग बुरुजांचे आहारी पडोन दरवाजे बांधावे."

कधी उजवीकड़े तर कधी डावीकड़े वळणाऱ्या पायऱ्या चढत-चढत आपण महादरवाजाच्या अगदी खालच्या टप्यामध्ये पोचतो. गडाचे 'श्रीगोंदे टोक' ते 'टक-मक टोक' अशी पूर्ण तटबंदी आणि त्या मधोमध २ तगडया बुरुजांच्या मागे लपलेला 'महादरवाजा' असे दृश्य आपल्याला दिसत असते. आता कधी एकदा आपण स्वतःला त्या दृश्यामध्ये विलीन करतोय असे आपल्याला वाटत राहते.

शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांचे वैशिष्ट्य ...



शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांचे एक वैशिष्ट्य मुख्य प्रवेशद्वाराशी येणारी वाट. ती नेहमी डोंगर उजवीकड़े ठेवून वर चढ़ते. कारण द्वाराशी होणारी हातघाईची लढाई ढाल-तलवार व फारतर धनुष्य-बाण याने होत असे; त्यात जास्त प्रमाणात उजवे असलेल्या लोकांच्या डाव्या हातात ढाल असे व उजव्या हातात फ़क्त तलवार घेउन उजव्या बाजूने होणारा मारा टाळण्यासाठी अधिक प्रयास करावा लागे. म्हणजेच वाट नियोजनपूर्व आखली तर शत्रूला अधिक त्रासदायक ठरू शकते. पुढे दोन बुरुजांच्या कवेने चिंचोळ्या वाटेने आत गेले की दरवाजा समोर येत असे. ह्या ठिकाणी लढाईला फार जागा नसे व शत्रुवर वरुन चारही बाजूने तूटून पड़ता येत असे. जरी कोणी यातूनही आत शिरलाच, तरी पुढचा मार्ग सुकर नसे कारण महादरवाज्यातून आत शिरले की वाट ९० ते १८० अंशात डावीकड़े वळत असते. तिथून वाचून पुढे जाणे अगदीच अशक्य. शिवाय किल्ल्याचे १/३ चढण चढणे बाकी असते ते वेगळेच. हूश्श्श् करत आपण अखेर २ बुरुजांमध्ये पोचतो आणि समोरचा महादरवाजा बघून थक्क होतो. दरवाजा भले नक्षिदार नसेल पण आहे जबरदस्त भक्कम. बांधकाम बघून असे वाटते की आत्ताच काही दिवसांपूर्वी बनवलेला आहे की काय. अगदी बरोबर दरवाजामध्ये थंड वाऱ्याचे झुळुक येत राहतात. शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रायगड़, प्रतापगड़, राजगड़ यांचे महादरवाजे किल्ल्यांच्या एकुण उंचीच्या २/३ उंचीवर आहेत. दरवाजा पडला तरी पुढच्या चढाईवर किल्ला लढवायला पुरेशी जागा उपलब्ध होई. सिंहगड़, पन्हाळा या त्या आधीच्या किल्ल्यांमध्ये तशी रचना नाही.

हे दुर्गबांधणीचे शास्त्र बघत महादरवाजामधून प्रवेश केला की उजव्या बाजूला देवडया दिसतात. देवडया म्हणजे द्वाररक्षकांना बसण्यासाठी कायम स्वरूपी बांधलेली जागा. पुढे गेलो की पुढची वाट ९० ते १८० अंशात डावीकड़े वळते. अजून थोड़े पुढे गेलो की लगेच डावीकड़े महादरवाजाच्या वर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. तिकडून खालचे अप्रतिम दृश्य दिसते. आता पुन्हा मागे खाली येउन पुढची वाट धरली की पुन्हा वळणा-वळणाचा चढता रस्ता लागतो. वाट पुढे जाउन परत उजवीकड़े आणि परत डावीकड़े वळते. त्या मध्ये पुन्हा बुरुज आहेत. त्याच्यावरचे बांधकाम पडले असले तरी त्याच्या पायावरुन सहज अंदाज बांधता येतो. येथून पुढे काही अंतर वाट सपाट आहे आणि मग तिसरा आणि शेवटचा चढ. तो पार करताना अक्षरश: दम निघतो. महत् प्रयासाने महादरवाजा जिंकल्यानंतर शत्रूला चढताना अधिक बिकट व्हावे अशी ही बांधणी आहे. ह्या चढत्या मार्गावरुन महादरवाजाचे सुंदर दृश्य दिसते. सर्व पायऱ्या चढून गेलो की लागतो 'हत्ती तलाव' आणि त्यामागे जे दिसते ते मन मुग्ध करणारे असते. 'गंगासागर जलाशयाच्या पार्श्वभूमीवर असलेली राजवाडयाची प्रशत्र भिंत आणि अष्टकोनी स्तंभ'. ते पाहत पायर्‍यांच्या शेवटाला गेले की लागतो 'होळीचा माळ' आणि त्यावर असलेला 'छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा'. छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा रायगडावर १९७४ साली राजाभिषेकाची ३०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येथे बसवला गेला. खर तर तो बसवायचा होता सिंहासनाच्या जागीच, पण पूरातत्वखात्याचे काही नियम आडवे आणले गेले. (ह्या राजाभिषेकाला सिंहासनाधिष्टित पुतळा 'मेघडवरी'मध्ये बसवला गेला आहे. ) आप्पा उर्फ़ गो. नी. दांडेकरांच्या 'दुर्गभ्रमणगाथा' पुस्तकामध्ये त्याबद्दल मस्त माहिती दिली आहे.

आज दुर्दैव असे की ऊन-वारा-पावसामध्ये हा पुतळा उघड्यावर आहे. या भारतभूमीला ४०० वर्षांनंतर सिंहासन देणारा हा छत्रपति आज स्वता:च्या राजधानीमध्ये छत्राशिवाय गेली ३५ वर्षे बसला आहे. हा आपला करंटेपणा की उदासीनता ??
.
.

.
पुढील भाग - रायगड दर्शन ... !
.
.
.

2 Dec 2009

दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार ... राजगडाची संजीवनी माची ... !

भाग २ वरुन पुढे चालू ...

संजीवनी माची -

राजसदनावरुन पुढे जाउन उजव्या बाजूच्या वाटेने बालेकिल्ल्याच्या कड्याखालून संजीवनी माचीकड़े निघलो. सुवेळा माची आणि संजीवनी माचीमधली तटबंदी लागली. त्यातले प्रवेशद्वार पार करून पुढे निघालो. आता वाट एकदम दाट झाडीमधून जाते आणि बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या बाजुस निघते. संजीवनी माचीची रुंदी अतिशय कमी असून लांबी प्रचंड आहे. माची एकुण ३ टप्यात विभागली आहे. मध्ये-मध्ये बांधकामाचे अवशेष दिसतात तर उजव्या आणि डाव्या बाजूला उतारावर अनेक ठिकाणी जसे आणि जितके जमेल तितके पाणी जमवण्यासाठी टाक खोदलेली आढळतात. आता पुढे गेलो की एक बुरुज लागतो आणि त्या पुढे जायला उजव्या कोपऱ्यामधून दरवाजा आहे. गंमत म्हणजे ह्या बुरुजाच्या मागे लागुन एक खोली आहे. म्हणजे वरुन उघडी पण चारही बाजूने बंद अशी. आता नेमक प्रयोजन माहीत नाही पण बहुदा पाण्याचे टाके असावे. तोपची (तोफा डागणारे) तोफा डागल्यानंतर त्यात उड्या घेत असतील म्हणुन बुरुजाच्या इतके जवळ ते बांधले गेले असावे. असो.. आम्ही उजव्या हाताच्या दरवाजाने पुढे निघालो. माचीची पूर्ण उतरती तटबंदी आता आपल्या दोन्ही बाजुस असते. उजवीकडच्या जंग्यामध्ये लक्ष्यपूर्वक बघावे. (जंग्या - शत्रुवर नजर ठेवता यावी, तसेच निशाणा साधता यावा म्हणुन तटबंदीमध्ये असलेली भोके) एका जंग्यामधून खाली थेट दिसतो पुढच्या टप्याचा चोरदरवाजा. म्हणजेच पुढचा भाग जर शत्रुने ताब्यात घेतला तरी बारकूश्या चोरदरवाजा मधून शिरणाऱ्या शत्रुचे जास्तीत-जास्त सैनिक टिपता यावेत अशी दुर्गरचना येथे आहे.

आम्ही आता अजून पुढे निघालो. दोन्ही बाजूला उतरती तटबंदी होती. काही वेळातच दुसऱ्या टप्याच्या बुरुजापाशी पोचलो. ह्याला 'व्याघ्रमुख' म्हणतात. येथे सुद्धा पहिल्या टप्यासारखीच दुर्गरचना. फरक इतकाच की तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या टप्यामध्ये जाणारा दरवाजा हा डाव्या बाजूने आहे. ह्या दरवाजापासून लगेच पुढे डाव्या बाजूला आहे संजीवनी माचीचा 'आळू दरवाजा'. इंग्रजी 'S' आकाराप्रमाणे वक्राकार असणाऱ्या तटबंदीमुळे आळू दरवाज्याचा बाहेरचा दरवाजा आतून दिसत नाही तर बाहेरून आतला दरवाजा सुद्धा दिसत नाही. सकाळपासून दुर्गबांधणी मधले एक-एक अविष्कार पाहून आम्ही पुरते भारावलो होतो. आमच्या कडून भन्नाट रे ... सहीच.. मानला रे... अश्या कॉमेंट्स येत होत्या. पण आम्हाला ठाउक कुठे होते की ह्यापुढे अजून जबरदस्त अशी दुर्गरचना आपल्याला बघायला मिळणार आहे.


'दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार' -


संजीवनी माचीच्या तिसऱ्या टप्यामध्ये आहे 'दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार'. दोन्ही बाजुस असलेली दुहेरी तटबंदी, त्यामधून विस्मयजनकरित्या खाली उतरणारे दोन्ही बाजुस ३-३ असे एकुण ६ दुहेरी बुरुज आणि टोकाला असणारा चिलखती बुरुज. असे अद्वितीय बांधकाम ना कधी कोणी केले.. ना कोणी करू शकेल.. मागे कधी तरी (बहुदा १९८७ मध्ये) स्वित्झरलैंड येथील जागतिक किल्ले प्रदर्शनामध्ये राजगडाला 'जगातील सर्वोत्कृष्ट डोंगरी किल्ला' तर जिब्राल्टरनंतर 'दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट किल्ला' असे पारितोषिक मिळाले होते. मूळात गडाचा हा भाग तसा शत्रूला चढून यायला सर्वात सोपा म्हणुनच या ठिकाणची दुर्गबांधणी अतिशय चपखलपणे केली गेली आहे. दुहेरी तटबंदीमधली आतली तटबंदी मीटरभर जाड आहे. मध्ये एक माणूस उभा आत जाइल इतकी किंवा त्यापेक्षा थोडी मोठी जागा सोडली की बाहेरची तटबंदी आहे. बाहेरची तटबंदी सुद्धा मीटरभर जाड आहे. तिसऱ्या टप्यामधली ही दुहेरी तटबंदी शेवटपर्यंत इंग्रजी 'S' आकाराप्रमाणे वक्राकार आहे. ह्यात टप्याटप्यावर खाली उतरणारे दुहेरी बुरुज आहेत. म्हणजे दुहेरी तटबंदीवर एक बुरुज आणि त्याखालच्या दरवाजा मधून तीव्र उताराच्या २०-२५ पायऱ्या उतरून गेल की खालचा बुरुज.

खालच्या बुरुजामध्ये उतरणाऱ्या पायर्‍यांसाठी दरवाजामधून प्रवेश केला की डाव्या-उजव्या बाजूला बघावे. दुहेरी तटबंदी मधल्या वक्राकर मोकळ्या जागेमध्ये येथून प्रवेश करता येतो. इतकी वर्ष साफ-सफाई न झाल्यामुळे आता आतमध्ये रान माजले आहे. खालच्या बुरुजामध्ये उतरणाऱ्या पायऱ्या अक्षरशः सरळसोट खाली उतरतात. आता झाडी वाढल्यामुळे आत अंधार असतो त्यामुळे आत घुसायचे तर टॉर्च घेउन जावे. आम्ही थोडा उजेड बघून अश्याच एका बुरुजामध्ये खालपर्यंत उतरलो. उतरताना लक्ष्यात आले की पायऱ्या सरळ रेषेत नाही आहेत. त्यासुद्धा वक्राकर. जेंव्हा पूर्ण खाली उतरून गेलो तेंव्हा खालच्या बुरुजाकड़े बाहेर निघणारा दरवाजा दिसला. तो जेमतेम फुट-दिडफुट उंचीचा होता. म्हणजे बाहेर निघायचे तर पूर्णपणे झोपून घसपटत-घसपटत जावे लागत होते. हूश्श्श... एकदाचे तिकडून बाहेर पडलो आणि खालच्या बुरुजावर निघालो. आता आम्ही दुहेरी तटबंदीच्या सुद्धा बाहेर होतो. कसली भन्नाट दुर्गरचना आहे ही.

भन्नाट दुर्गरचना -


'शत्रुने जर हल्ला करून खालचा बुरुज जिंकला तरी आत घुसताना शत्रूला झोपून घसपटत-घसपटत आत यावे लागणार. त्यात ते काय शस्त्र चालवणार आणि काय लढणार. अगदी आत आलेच तरी लगेच पुढे वक्राकर आणि सरळसोट वर चढणाऱ्या पायऱ्या. बरे तिकडून सुद्धा शत्रु पुढे आलाच तर दुहेरी तटबंदीमधल्या आतल्या तटबंदीचा दरवाजा बंद करून घेतला की शत्रु सैन्याला पर्याय राहतो तो फ़क्त उजवीकड़े किंवा डावीकड़े जाण्याचा म्हणजेच दुहेरी तटबंदीमधल्या मोकळ्या वक्राकर जागेमध्ये शिरायचा. आता ह्यात शिरणे म्हणजे जिवंत सुटणे नाही. कारण एकतर वर चढून येणे शक्य नाही आणि वरुन आपण गरम तेल, पाणी, बाण, भाले अश्या कशाने सुद्धा शत्रूला लक्ष्य करू शकतो. ह्या संपूर्ण मालिकेतून शत्रूला विजय मिळणे शक्य नाही. मिळेल तर तो मृत्युच.

आम्ही पुन्हा पायऱ्याचढून आतमध्ये आलो आणि शेवटच्या बुरुजाकड़े निघालो. अध्ये-मध्ये काही पाण्याच्या टाक्या आहेत. अखेर पूर्ण माचीबघून आम्ही टोकाला चिलखती बुरुजाकड़े पोचलो. ६ वाजत आले होते. डाव्या बाजूस अथांग येसाजी कंक जलाशय होता. तर उजव्या हाताला दुरवर तोरणा उभा होता. त्यास मनातच म्हटले... 'उदया येतोय रे तुझ्याकड़े'. काहीवेळ तिकडेच बसलो. मागे दूरवर बालेकिल्ला आणि पद्मावती माची दिसत होती. आज राजगड बघून आम्ही भरून पावलो होतो. खरच प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी राजगडला यावे आणि असे भरभरून बघावे...

राजगडाचे फोटो येथे बघू शकता
.
.

राजगड - बालेकिल्ला आणि सुवेळा माची ... !

भाग १ वरुन पुढे चालू ...

प्रवेशद्वारावरुन पुढे गेलो की परत २ वाटा लागतात. उजवीकडची वाट वर चढत बालेकिल्ल्याकड़े जाते. तर डावीकडची वाट गुंजवणे दरवाज्यावरुन पुढे सुवेळा माचीकड़े जाते. आम्ही आमचा मोर्चा आधी गुंजवणे दरवाज्याकड़े वळवला. येथील बरेच बांधकाम पडले आहे तर काही ढासळत्या अवस्थेत आहे. त्यामुळे उतरताना काळजी घ्यावी लागते. पायऱ्या उतरुन खाली गेलो की दरवाजा आहे. दरवाजावरच्या बुरुजावर जाण्यासाठी डाव्या बाजूने वाट आहे. पण शक्यतो जाऊ नये कारण बांधकाम ढासळत्या अवस्थेत आहे. आम्ही दरवाज्यामधून पुढे गेलो. ह्या वाटेने कोणीच खाली उतरत नाही किंवा चढून येत नाही कारण पुढची वाट मोडली आहे. पण काही वर्षांपूर्वीपर्यंत ही वाट वापरत होती हे आप्पा उर्फ़ गो.नी. दांडेकरांच्या 'दुर्ग भ्रमणगाथा' ह्या पुस्तकातून कळते. जमेल तितके पुढे जाउन आम्ही परत आलो. पायऱ्या चढून मागे आलो आणि बालेकिल्ल्याकड़े निघालो. ५ मिं. मध्ये बालेकिल्ल्याच्या पायर्‍यांखाली होतो.



राजगडचा बालेकिल्ला -

 
इकडे आल्यावर कळले की राजगडचा बालेकिल्ला का अभेद्य आहे ते. आधी पूर्ण उभ्या चढाच्या आणि मग उजवीकड़े वळून वर महादरवाजापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या अप्रतिमरित्या खोद्ल्या आहेत. त्या चढायला सोप्या नाहीत. हाताला आधार म्हणुन काही ठिकाणी लोखंडी शिगा रोवल्या आहेत. अखेर पायऱ्या चढून दरवाज्यापाशी पोचलो. उजव्या-डाव्या बाजूला २ भक्कम बुरुज आहेत. राजगडचा बालेकिल्ला हा अखंड प्रस्तर असून पूर्व बाजुस योग्य ठिकाणी उतार शोधून मार्ग बनवला गेला आहे. काय म्हणावे ह्या दुर्गबांधणीला... निव्वळ अप्रतिम ... !!! महादरवाजासमोर देवीचे मंदिर असून हल्लीच त्या मंदिराचे नुतनीकरण झाले आहे. असे म्हणतात की महादरवाजाच्या डाव्या बाजुच्या कोनाडयामध्ये 'अफझलखानाचे डोके पुरले' गेले आहे. खरे की खोटे ते नाही माहीत. आता पुढे रस्ता उजवीकड़े वर चढतो आणि बालेकिल्ल्याच्या माथ्यावर जातो. इकडे उजव्या हाताने गेलो तर 'ब्रम्हर्षीचे मंदिर' आहे. त्याशेजारी अतिशय स्वच्छ अशी पाण्याची २-३ टाकं आहेत. राजगडाचे मुळ नाव 'मुरुमदेवाचा डोंगर'. खरंतर ब्रम्हदेव ... बरुमदेव (गावठी भाषेत) ... आणि मग मुरुमदेव असे नाव अपभ्रंशित होत गेले असावे.


राजगड हे नाव ठेवल शिवाजीराजांनी. बालेकिल्ल्यावर ब्रम्हर्षीचे मंदिर आणि त्याची पत्नी पद्मावती हिचे खाली माचीवर मंदिर हे संयुक्तिक वाटते. आम्ही आता उजव्या हाताने बालेकिल्ल्याला फेरी मारायला सुरवात केली. ब्रम्हर्षीच्या मंदिरासमोर कड्याला लागून जमीनीखाली एक खोली आहे. टाक आहे की गुहा ते काही आम्हाला कळले नाही. तिकडून दक्षिणेकड़े पुढे गेलो की उतार लागतो आणि मग शेवटी आहे बुरुज. त्यावरुन पद्मावती माचीचे सुंदर दृश्य दिसते. ह्या बुरुजाच्या डाव्या कोपऱ्यातून बाहेर पड़ायला एक चोर दरवाजा आहे. ती वाट बहुदा खालपर्यंत जाते पण तितकी स्पष्ट नसल्याने आम्ही फार पुढे सरकलो नाही. आता आम्ही डावीकड़े सरकलो आणि बालेकिल्ल्याच्या पश्चिम टोकाला पोचलो. आता समोर दूरवर पसरली होती संजीवनी माची आणि त्या मागे दिसत होता प्रचंड 'जेसाजी कंक जलाशय'. ह्या बुरुजापासून बालेकिल्ल्याच्या माथ्यावर यायला पुन्हा थोड़े वर चढावे लागते. ह्या मार्गावर आपल्याला दारूकोठार आणि अजून काही पाण्याची टाकं लागतात. एकडून वर चढून आलो की वाड्याचे बांधकाम आहे. हा गडाचा सर्वोच्च बिंदू. ह्याठिकाणी सुद्धा राहते वाड्यांचे जोते असून उजव्या कोपऱ्यामध्ये भिंती असलेले बांधकाम शिल्लक आहे. उत्तरेकडच्या भागात तटबंदीच्या काही कमानी शिल्लक असून तेथून सुवेळा माची आणि डूब्याचे सुंदर दृश्य दिसते. एव्हाना १० वाजत आले होते. आल्या वाटेने आम्ही बालेकिल्ला उतरलो आणि सुवेळा माचीकड़े निघालो. इकडे मध्ये एक मारुतीची मूर्ति आहे. आता आपण पोचतो सुवेळा माचीच्या सपाटीवर.

सुवेळा माची - 'संताजी शिळीमकर' यांचा वीरगळ ...

सुवेळा माचीच्या सपाटीवर सुद्धा काही वाड्यांचे जोते असून ही स्वराज्याच्या लष्करी अधिकार्‍यांची घरे होती. तर प्रशासकीय अधिकार्‍यांची घरे पद्मावती माचीवर होती. पुढे निघालो तशी वाट निमुळती होत गेली आणि मग समोर जी टेकडी उभी असते तिला 'डूबा' म्हणतात. इकडे उजव्या बाजूला खाली 'काळकाईचा बुरुज' आहे. आम्ही त्या बाजुस न जाता पुढे निघालो. डूब्याला वळसा घालून 'झुंझार बुरुजा'पाशी पोचलो. अप्रतिम बांधणीचा हा बुरुज सुवेळा माचीला २ भागांमध्ये विभागतो. बुरुजाच्या उजव्या बाजूने माचीच्या दुसऱ्या टप्यामध्ये जाण्यासाठी वाट आहे. म्हणजेच माचीचा टोकाचा भाग पडला तरी हा दरवाजा बंद करून झुंझार बुरुजावरुन शत्रुशी परत २ हात करता येतील अशी दुर्गरचना येथे केली आहे. थोड पुढे उजव्या हाताला तटबंदीमध्ये एक गणेशमूर्ति आहे. ह्या जागी आधी 'संताजी शिळीमकर' यांचा वीरगळ होता असे म्हणतात. गडाच्या ह्या किल्लेदाराने मुघल फौजेवर असा काही मारा केला होता की मुघल फौजेची दाणादण उडालेली बघून खुद्द औरंगजेब हतबल झाला होता. त्या लढाईमध्ये एक तोफगोळा वर्मी लागुन संताजींचे निधन झाले. ज्या प्रस्तरावर झुंझार बुरुज बांधला आहे त्यास 'हत्ती प्रस्तर' असे म्हटले जाते कारण समोरून पाहिल्यास त्याचा आकार हत्ती सारखा दिसतो. ह्याच ठिकाणी आहे राजगडावरील नैसर्गिक नेढ़ (आरपार दगडामध्ये पडलेले भोक) उर्फ़ 'वाघाचा डोळा'. आम्ही तिकडे चढणार त्याआधी आमच्या सोबत असलेला वाघ्या तिकडे जाउन पोचला सुद्धा. ह्याठिकाणी कड्याच्या बाजूला मधाची पोळी आहेत त्यामुळे जास्त आरडा-ओरडा करू नये.

काही वेळ एकडे थांबून आम्ही माचीच्या टोकाला गेलो. माचीचा हा भाग दुहेरी तटबंदी आणि शेवटी चिलखती बुरुज असलेला आहे. भक्कम तटबंदीच्या बुरुजावरुन सभोवताली पाहिले. उजव्या हाताला दुरवर 'बाजी पासलकर जलाशय' दिसतो. आता आम्ही परत फिरलो आणि आमचा मोर्चा काळकाई बुरुजाकड़े वळवला. ह्याठिकाणी उतरताना काही पाण्याची टाक आणि त्या शेजारी मुर्त्या लागतात. अगदी टोकाला बुरुज आहे आणि तिकडून खालचे गर्द रान दिसते. उजव्या बाजूला जरा मान वळवून पाहिले तर संजीवनी माचीची लांबी लक्ष्यात येते. आता आम्ही उजवीकडे सरकत संजीवनी माचीकडे जाण्याचा प्रयत्न केला पण मातीचा आणि गवताचा घसारा इतका होता की प्रयत्न सोडून आम्ही पुन्हा आल्या मार्गी मंदिरामध्ये पोचलो.


राजगडाचे फोटो येथे बघू शकता
.
.
.
पुढील भाग -  दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार ... राजगडाची संजीवनी माची ... !
.
.
.

राजगड - गडांचा राजा आणि राजांचा गड ... !

'अथातो दुर्गजिज्ञासा' हे प्र. के. घाणेकर यांचे पूस्तक वाचल्यानंतर आम्ही राजगड बघायला गेलो होतो. पुस्तकातील संधर्भ वापरून राजगड पाहिल्यानंतर केलेले माझे लिखाण ... !!!


राजगड म्हणजे 'स्वराज्याची पाहिली राजधानी'. खुद्द मासाहेब जिजामाता, शिवाजीराजे आणि त्यांचे कुटुंब यांचे गडावर कायम वास्तव्य. त्यामुळे लश्करीदृष्टया तो अभेद्य असावा अश्या पद्धतीने त्याची बांधणी केली गेली आहे. गडाच्या तिन्ही माच्या स्वतंत्रपणे लढवता येतील अशी तटबंदी प्रत्येक २ माच्यांच्या मध्ये आहे. प्रत्येक माचीला स्वतंत्र मुख्य दरवाजा आहे. पद्मावती माचीला 'पाली दरवाजा', जो राजगडचा राजमार्ग देखील आहे. संजीवनी माचीला 'अळू दरवाजा' तर सुवेळा माचीला 'गुंजवणे दरवाजा', जो सध्या बंद स्थितिमध्ये आहे. शिवाय प्रत्येक माचीला स्वतंत्र चोर दरवाजे आहेत. पद्मावती माचीच्या चोर दरवाजामधून तर आम्ही गडावर चढून आलो होतो. संजीवनी माची आणि सुवेळा माचीकड़े आम्ही उदया जाणार होतो. आम्ही आता पद्मावती माची बघायला निघालो. पद्मावती माचीचा विस्तार हा इतर दोन्ही माच्यांच्या मानाने कमी लांबीचा पण जास्त रुंद आहे.
 
पद्मावती माची -

माची ३ छोट्या टप्यात उतरत असली तरी गडावरील जास्तीतजास्त सपाटी ह्याच माचीवर आहे. सर्वात खालच्या टप्यामध्ये पद्मावती तलाव आणि चोर दरवाजा आहे. मधल्या टप्यामध्ये विश्रामगृह, शंकर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. शिवाय देवळासमोर एक तोफ आणि एक समाधी आहे (ही समाधी राजांची थोरली पत्नी 'महाराणी सईबाई' यांची आहे असे म्हटले जाते. ५ सप्टेंबर १६५९ रोजी त्यांचा राजगडावर किंवा पायथ्याला मृत्यू झाला होता.) देवळासमोरच्या मोकळ्या जागेमध्ये एक स्तंभ आहे. विश्रामगृहापासून डावीकडे म्हणजेच माचीच्या पूर्व भागात गेल्यास अधिक सपाटी आहे. टोकाला तटबंदी असून एक भक्कम बुरुज आहे. येथून पूर्वेला सुवेळामाचीचे तर पश्चिमेला गुंजवणे गावापासून येणाऱ्या वाटेचे सुंदर दर्शन होते. माचीवर सर्वात वरच्या टप्प्यामध्ये राजसदन, राजदरबार, सदर, दारूकोठार, पाण्याचा एक तलाव अशी बांधकामे आहेत. ज्याठिकाणी आता सदर आहे त्याखाली काही वर्षांपूर्वी एक गुप्त खोली सापडली. आधी ते पाण्याचे टाके असावे असे वाटले होते पण तो खलबतखाना निघाला. ७-८ अति महत्वाच्या व्यक्ति आत बसून खलबत करू शकतील इतका तो मोठा आहे. त्या मागे असलेल्या राजसदनामध्ये राजांचे २५-२६ वर्ष वास्तव्य होते.


(१६४६ - १६७१-७२) काय नाही पाहिले राजगडाने ह्या २५-२६ वर्षांमध्ये...


त्याने पाहिले १६४८ मध्ये शहाजी राजांच्या अटकेची आणि मग सुटकेची बातमी, १२ मावळची व्यवस्था लावताना राजांनी घेतलेले परिश्रम, १६५५ मध्ये जावळी संदर्भामधील बोलणी आणि आरमाराची केलेली सुरवात सुद्धा राजगडाने अनुभवली. १६५९ ला अफझलखान आक्रमण करून आला तेंव्हाची काळजी आणि त्याचवेळी महाराणी सईबाई यांचे निधन राजगडाला सुद्धा वेदना देउन गेले. १६६१ राजे पन्हाळ गडावर अडकले असताना मासाहेबांच्या जिवाची घालमेल पाहिली. शाहिस्तेखानाला झालेली शास्त आणि सूरत लुटी सारख्या आनंदी बातम्या राजगडाने ऐकल्या तर त्या मागोमाग लगेच शहाजीराजांच्या अपघाती निधनाची दु:खद बातमी सुद्धा ऐकली. १६६५ मध्ये पुरंदरचा तह करण्यासाठी आणि त्यानंतर आग्रा येथे जाण्यासाठी राजे येथूनच निघाले. सुटून आले ते सुद्धा राजगडावरच. राजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा जन्म १६७० मध्ये राजगडावरचं झाला(???). १६७१ मध्ये मात्र स्वराज्याचा वाढता विस्तार आणि राजगड परिसरात शत्रूचा वाढता धोका पाहून राजांनी १६७१ मध्ये राजधानी 'रायगड' येथे हलवण्याचा निर्णय घेतला.

स्वराज्याने बाळसे धरल्यापासून ते वाढेपर्यंत राजगडाने काय-काय नाही पाहिले. अनेक बरे- वाइट प्रसंग. म्हणुन तर तो 'गडांचा राजा आणि राजांचा गड' आहे.

राजसदनावरुन पुढे गेलो की वाट जराशी वर चढते. इथे उजव्या हाताला ढालकाठीचे निशाण आहे. अजून पुढे गेलो की २ वाट लागतात. उजव्या बाजूची वाट बालेकिल्ल्याच्या कड्याखालून संजीवनी माचीकड़े निघते. तर डावीकडची वाट बालेकिल्ला आणि पुढे जाउन सुवेळा माचीकड़े जाते. सकाळी बालेकिल्ला आणि सुवेळा माची बघायचा प्लान असल्याने आम्ही डाव्याबाजूने निघालो. जसे बालेकिल्ल्याच्या कड्याखाली आलो तशी लगेच पद्मावती माची आणि सुवेळा माची यांच्यामध्ये असलेली आडवी तटबंदी लागली. येथील प्रवेशद्वार मात्र पडले आहे. उजव्या हाताला एक झाड़ आहे त्या पासून वर ७०-८० फूट प्रस्तरारोहण करत गेले की एक गुहा आहे. आम्ही मात्र तिकडे काही चढलो नाही...


राजगडाचे फोटो येथे बघू शकता
.
.
.
पुढील भाग - राजगडचा बालेकिल्ला आणि सुवेळा माची ... !
.
.
.

21 Oct 2009

छत्रपति शिवराय - इंग्रजी मधून ... !

छत्रपति शिवराय आणि मराठा इतिहासावर मराठी भाषेमधून बरीच उत्तम पुस्तके उपलब्ध आहेत. पण त्याचा वाचक वर्ग मराठी भाषेपुरता सिमीत आहे. संपूर्ण भारतात तसेच इतर देशात त्यांच्याबद्दल विविध भाषांमध्ये अधिक माहिती पोचावी म्हणुन तसे फारसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत.

'सेतु माधवराव पगडी' यांनी 'छत्रपति शिवाजी महाराज' या इंग्रजी भाषेतून लिहिलेल्या पुस्तकातून त्यांनी ह्या जाणत्या राजाचे चरित्र अतिशय उत्तमरित्या शब्दबद्ध केले आहे. ह्या पुस्तकावर आधारीत एक छोटेखानी लिखाण मी मागे संकलित केले होते. शिवजन्मापासून त्यांच्या महानिर्वाणापर्यंत एकुण ३३ मुद्यांवर सदर लिखाण आधारित आहे. ते लिखाण येथे वाचू शकता.




आज आपल्या प्रत्येकाच्या कार्यालयात अनेक बिगर मराठी सहकारी असतात. शिवरायांबद्दल इंग्रजी भाषेमधील सदर लिखाण त्यांना वाचायला दिल्यास शिवचरित्र त्यांना अधिक चांगल्या रितीने उमजू शकेल.

17 Sept 2009

छत्रपति शिवराय - जीवन रहस्य - भाग ३ ... !

हिंदूंचा नवा अध्याय शिवरायांपासून सुरू होतो. हिंदू राजांनी विश्वास ठेवावा आणि परकियांनी दगे द्यावेत हा इतिहास बदलून शिवरायांनी दगे द्यावेत आणि शत्रूला थक्क करावे हा नविन इतिहास सुरू झाला. राजे धार्मिक होते पण धर्मभोळे नव्हते. साहसी होते पण आततायी नव्हते. त्यांची राहणी वैभव संपन्न होती पण उधळी नव्हती. राज्याचे सिंहासन ३२ मणाचे बनवणारा राजा सूती वस्त्रात, लाकडी पलंगावर झोपत असे. चित्र, शिल्प आणि संगीत ह्यांना आश्रय देणे यासाठी ना त्यांच्याकड़े वेळ होता ना पैसा. त्यांना मोठ्या मोठ्या ईमारती बांधण्याची फुरसत देखील नव्हती. दुष्काळात लाखो लोक अन्न-अन्न करीत मरत असताना २० कोट रुपये खर्चुन ताजमहाल बांधण्यात त्यांना रस नव्हता किंवा त्यांच्या मनाचा तो कल देखील नव्हता. अकबराने हिंदूंना औदार्याने वागवले, तर राजांनी मुसलमानांना औदार्याने वागवले. त्यांच्याकडून आक्रमणाची भिती होती तरीही. हिंदूंकडून अशी भीती कधीच नव्हती. राजांनी सर्वांना समान वागवले ते भोवतालच्या मुस्लिम राज्यांच्या भीतीने नव्हे तर स्वयंभू औदार्य म्हणुन.



ते कुशल सेनानी होते, युद्धतज्ञ होते. या खेरीज ते मुलकी कारभाराचे तज्ञ होते. प्रजेच्या ईहलौकिक कल्याणाची जबाबदारी आपली आहे, हे त्यांना पुरेपुर माहीत होते. प्रजेवर निरर्थक कर त्यांनी कधी लादले नाहीत. (सिंहासनपट्टी हा जादा कर सुद्धा त्यांनी वतनदारांवर लावला.) 'मी शत्रूंना दगा दिला, पण मित्रांना दगा दिल्याचे एक तरी उदहारण दाखवा' असे जाहिर आव्हान त्यांनी दिले होते. त्या आव्हानाला आजतागायत उत्तर आलेले नाही. कौल देऊन गावे बसवणे, बीघे-चावर जमीन मोजणे, जमीन लागवडीखाली आणणे, बी-बियाणे - नांगर-बैल यासाठी कर्ज देणे, शेतसारा निश्चित करणे असे विधायक उपक्रमही त्यांनी केले. त्यांच्या काळात उत्पन्नाच्या ४० टक्के कर होता. आजही हा कर लहान नाही. तरी सुद्धा लोकांनी २/५ ही वाटणी आनंदाने स्विकारली. कारण कर दिल्यावर पक्षपात न होता संपूर्ण संरक्षण आणि न्याय याचे आश्वासन मिळायचे. 'पक्षपातरहित निर्दोष अंमलबजावणी' हे त्यांच्या राजवटीचे एक गमक आहे. कारण त्यांनी हक्क वतनदारांकडे न ठेवता स्वतःकडे घेतले.



भाषा सुधारण्यासाठी 'राज्यव्यवहार कोश', पंचांग सुधारण्यासाठी 'करण-कौस्तुभ', धर्मात शुद्ध करून घेणे हे सुद्धा त्यांनी केले. स्त्रीची अब्रू निर्धोक केली. त्यासाठी स्वतःचा निष्ठावान सरदार सखोजी गायकवाड ह्याचे हातपाय तोडण्यास कमी केले नाही. फौजेला शिस्त लवली. गावातून काही फुकट घेऊ नये असा दंडक केला. आपल्या फौजेतल्या ३०० लोकांकडून एका गावाला उपसर्ग झाल्याचे कळताच त्यांचे हात तोडले. कारण बळकटपणे तलवारी हातात घेणारे हात ह्यापेक्षा शासनामागे उभा राहणारा जनतेचा हात त्यांना जास्त महत्वाचा होता. 'मुलकी सत्ता ही लश्करी सत्तेपेक्षा श्रेष्ठ असली पाहिजे' हे सांगणारा आणि त्यावर वाटचाल करणारा असा माणूस भारताच्या इतिहासात एकमेव आहे. म्हणुनच तर समर्थ त्यांना 'शिवकल्याण राजा' म्हणतात.

स्त्रियांचे व गुलामांचे आठवडी विक्री बाजार त्यांनी बंद करवले. तर विरोधकांच्या धर्मग्रंथांचा व पूजास्थानांचा त्यांनी सदैव आदर केला. अतिशय संयमी आदर्श गृहस्थजीवन ते जगले. निर्दोष व सुखी राज्यकारभार केला. स्वतः शुन्यातून राज्य निर्मिती करून हे 'श्रींचे राज्य' आहे अशीच त्यांची वागणूक राहिली. म्हणुन तर ते श्रीमंत योगी झाले.
त्यांच्या नेतृत्वाचा अभ्यास म्हणजे आपला आत्मविश्वास जागा करणाऱ्या एका युगप्रवर्तक नेत्याचा अभ्यास असतो.

.... वंदे शिवराय .... !!!
.
.

15 Sept 2009

छत्रपति शिवराय - जीवन रहस्य - भाग २ ... !


भारतीय राजांमध्ये ते एक असे एकमेव निराळे राजे आहेत, ज्यांनी सदैव संभाव्य परीणामांचा विचार केला. युद्धाच्या योजना आखताना भूगोलाचा विचार केला. त्यासाठी त्यांनी कोकणपट्टी आणि वरघाटचे नकाशे बनवून घेतले होते. त्यांचे 'हेरखाते आणि भौगोलिक नियोजन' हा त्यांच्या युद्ध नेतृत्वाचा महत्वाचा पैलू आहे. १६४८ मध्ये फत्तेखानाला पराभूत केल्यानंतरही सिंहगड आदिलशाहीला परत करणे ह्या मागे कुशल नियोजन आहे. १६४८ मध्ये शहाजी राजांची सुटका झाल्यावर छोट्याश्या स्वराज्याला खानस्वारी पेलवणार नाही हे त्यांना लगेच उमगले होते. जावळी जिंकल्याशिवाय 'अफझलखान' या प्रश्नाला उत्तर नाही हे त्यांना १६४९-५० लाच उमगले होते. ती संधी राजांना १६५६ ला मिळाली. जावळी मागोमाग त्यांनी पुन्हा सिंहगड काबीज केला आणि आदिलशाहीला उघडउघड आव्हान दिले. १६५९ च्या खानस्वारीपर्यंत जो वेळ राजांना जावळीत मिळाला, त्यावेळात जावळीच्या दुर्गम खोऱ्यात प्रत्येक माणूस - 'हे राज्य टिकले पाहिजे' या त्वेषाने पेटून उठला असला पाहिजे.



खानवधात एक प्रश्न नेहमी विचारला जातो ते म्हणजे दगा कोणी दिला ??? राजांनी की खानाने ??? समजा खान सुरक्षित परतला असता तर पुढच्या भेटीत शिष्टाचार म्हणुन राजांना खानभेटीस त्याच्या गोटात जाणे भाग पडले असते. प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला ... नव्हे आणलेला खान परत जिवंत जाणे शक्य नव्हते. ती व्यवस्था शिवरायांनी करून ठेवली होती. खानवधापाठोपाठ त्याच्या फौजेवर बांदल - शिळीमकर यांनी हल्ला चढवणे, वाई तळावर नेताजी पालकरने विध्वंस करणे, मोरोपंतांनी पारघाटावर हल्ला करणे आणि पूर्ण ताकदीनिशी शक्य तितक्या लवकर कोल्हापुर प्रांती धडक मारणे एवढा व्यापक दृष्टिकोन आणि नेमके नियोजन ह्यामागे आहे. अनापेक्षित घाव घालून जग थक्क करता येते पण त्या थक्क अवस्थेतून बाहेर येईस्तोवर शिवराय काही स्थिर कामे करत असतात. ते विजयोस्तव साजरे करत बसत नाहीत. खानवधा पाठोपाठ कोल्हापुर - पन्हाळा जिंकणे, कुडाळ मारून विजापुर प्रांती धडक मारणे आणि पुढच्या १८ दिवसात १२०००च्या फौजेचा पराभव करून लूट मारणे व ती फौजा दुप्पट करण्यात वापरणे, आणि ह्या सर्वातून आदिलशाही सावरेपर्यंत जास्तीत जास्त प्रदेश जिंकणे, हे सैनिकी कौशल्य ... !!!

"स्थायी यश मिळणाऱ्या मोहिमेचा आरंभ म्हणुन अनपेक्षित धक्याला अर्थ असतो पण तो धक्का देऊन थक्क करणे आणि भानावर येण्यापूर्वी स्थिर विजय मिळवणे हा राजकीय वास्तववाद म्हणजे छत्रपति शिवराय ... "

शाहिस्ते खान प्रकरण असो नाहीतर सूरत लूट, शत्रूला प्रत्येक ठिकाणी नवनवीन पद्धतीने थक्क करून त्यांनी आपले कौशल्य पणाला लावले आहे.

२२ हजाराची फौज घेउन आलेला खान, त्यामागोमाग ३२००० फौज घेउन आलेला सिद्दी जोहर, ६०००० च्या आसपास फौज घेउन उतरलेला शाहिस्तेखान ह्या सगळ्यात मराठी राज्य चिरडले गेले होते. पुढे मिर्झाराजा सुद्धा लाखभर फौज घेउन दख्खनेत उतरला. एवढे प्रचंड ओझे राज्यावर असताना , १ तप यातना भोगून, जाळपोळ, नासधूस, नुकसान सहन करूनही जनतेची निष्ठा तसूभर देखील कमी का झाली नाही ??? या लोकांना राजांनी असे काय दिले होते ??? बाजीप्रभु असो नाहीतर शिवा काशिद ... तानाजी असो नाहीतर मुरारबाजी ... ह्या सर्वात एक विलक्षण साम्य आहे. माणसे लढताना मरतात ही लढाई मधली नित्याची बाब आहे. पण जाणीवपूर्वक आपण मरणार याची खात्री असताना, केवळ मरण्यासाठीच लढतात ही अभुपुर्व गोष्ट आहे. ह्या माणसांना मरण्याची प्रेरणा कुठून मिळते ???


अनेक साहसी लढाया आणि पराक्रम ह्याचा अंत पुरंदरच्या तहात झाला. १६ वर्षे खपून जे मिळवले ते एका क्षणात तहात गेले. या तहावरुन समजुन आले की ज्यांच्याविरुद्ध राजे लढत होते ते किती बलाढ्य होते. पुरंदरच्या तहात पूर्ण पराभव होता आणि आपली पुढची लढण्याची किमान शक्ती शाबूत ठेवून राजांनी हा तह पूर्णपणे मान्य देखील केला. या पराभवाचा परिणाम नेताजी पालकर वर झाला आणि त्याने स्वराज्याची साथ सोडली. १६५९ ते १६६५ या काळात जे कणखरपणे लढले ते प्रचंड कसोटयांमधून बाहेर पडले. राजे आग्र्यामध्ये असताना देखील त्यांनी कारभार चोख ठेवला. राजा अटकेत असताना देखील फौजा बंड करत नाहीत आणि जनतेचा विश्वास कमी होत नाही हे महत्वाचे आहे.


आग्र्याहून सुटून आल्यावर शिवरायांनी स्वतः औरंगजेबाला पत्र लिहून तह मोडणार नसल्याचे कळवले होते. १६६७ ते १६६९ ह्या वर्षात उठावाची जोरदार तयारी केली गेली पण गेलेला एकही किल्ला घेण्याचा पर्यंत केला गेला नाही. मात्र १६७० च्या सुरुवातीपासून अवघ्या ५ महिन्यात सर्व किल्ले मराठ्यान्नी जिंकून घेतले. हे अजून एक थक्क काम. १६७१-७१ ह्या काळात तर खानदेश - बागलाण - बुरहाणपुर - जालना - व्हराड ह्या सर्व मोघल भागात छापे घालून लूट मिळवणे आणि अस्थिरता निर्माण करणे हे काम जोमाने सुरू होते. या सर्व घडामोडीसोबत १६५७ पासून आरमाराची उभारणी करून समुद्रावर छापे घालण्याचे तंत्र विकसित करणे, व्यापारी नौका उभारणे, नविन किल्ले उभारणे आणि हाती आलेले किल्ले दुरुस्त करणे असे चौरस उपक्रम सुरू होतेच.
.
.
.
क्रमश: .....

14 Sept 2009

छत्रपति शिवराय - जीवन रहस्य - भाग १ ... !

छत्रपति शिवरायांच्या कार्याचा अभ्यास करताना अनेक इतिहासकारांनी त्यांचे व्यक्तिमत्व वेगवेगळ्या दृष्टीकोनातून मांडले आहे. 'नरहर कुरुंदकर' हे असेच एक प्रभावी लेखक. त्यांनी लिहिलेल्या 'छत्रपति शिवाजी महाराज - जीवन रहस्य' या पुस्तकात त्यांनी असेच काही वेचक आणि वेधक विचार मांडले आहेत. इतिहासाच्या वाचकांना 'नरहर कुरुंदकर' माहीत असले तरी सामान्य वाचकांना मात्र ते 'श्रीमान योगी'च्या प्रस्तावानेतून माहीत आहेतचं. रणजीत देसाई यांना लिहिलेल्या विस्तृत पत्रातून त्यांनी शिवरायांचे व्यक्तिमत्व मांडण्याचा यशस्वीपर्यंत केलेला आहे. या ब्लॉगपोस्ट मधील माझे लिखाण हे 'छत्रपति शिवाजी महाराज - जीवन रहस्य' या पुस्तकावर आधारित आहे.


समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते आणि अश्या नाट्यमय घटनांमुळे खरे कर्तुत्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो. महाराजांच्या जीवनात अश्या घटना ५-६ पेक्षा अधिक नाहीत. पहिली अद्भुत घटना १६५९ मध्ये अफझलखानवध ही आहे. तर शेवटची १६६६ ला आग्र्याहून सुटका ही आहे. ह्या ७ वर्षात पन्हाळा - बाजीप्रभु, शाहिस्तेखान प्रकरण, सूरतलूट ह्या घटना आहेत. म्हणजे एकुण ५० वर्षाच्या जीवनात पाहिल्या नाट्यमय घटनेपूर्वी २९ वर्षांचा नाट्यशून्य काळ आणि शेवटच्या नाट्यमय घटनेनंतर १४ वर्षांचा कालखंड...!!! ह्या अश्या ५-६ घटनांवर आपल्या कर्त्या पुरुषाचे चरित्र कसे पूर्ण होइल ??? छत्रपतींचे कार्य आणि चरित्र समजुन घेताना ह्या नाट्यमय रोमांचकारी घटनांचा मोह आपण टाळला पाहिले.


शिवरायांच्या नेत्रुत्वाचा विचार जेंव्हा जेंव्हा पडतो तेंव्हा २ प्रश्न समोर येतात ...

१. खुद्द औरंगजेब आपली राजधानी सोडून दक्षिणेत का उतरला ???

२. १६९२ नंतर आपण ही लढाई पूर्णपणे जिंकू शकत नाही, हे माहीत असुनही पुढची १५ वर्षे लढत का राहिला ???

त्याच्यासारख्या कसलेल्या युद्धनितीतज्ञ आणि मुत्सद्दी अश्या बादशहाला महाराष्ट्रातल्या पश्चिमेकडील एका कोपऱ्यातल्या डोंगराळ भागात वसलेले छोटेसे राज्य बूडवण्यात अपयश का आले ??? औरंगजेबाने केलेल्या तयारीवरुन हे स्पष्ट दिसते की त्याने ही लढाई साधी - सोपी नक्कीच समजली नव्हती. लाखोच्या फौजा जातीने घेउन उतरणे यावरुनच ते स्पष्ट समजते. लाखोने मुघल फौजा सीमेवर उभ्या असताना अवघ्या ५० व्या वर्षी छत्रपतींना मृत्यू आला. पण तरीही राजधानी पासून दूर राहून, दरवर्षाला कोट्यावधी खर्च करून आणि उत्तर भारतात अव्यवस्था निर्माण होउन देखील औरंगजेब अखेरपर्यंत लढत राहिला. त्याने अनेक लढाया जिंकल्या पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता. मराठ्यांना अपुऱ्या साधन-सामुग्रीवर मोघलांचा पराभव करणे शक्य नव्हते. तरीही सर्व प्रतिकूल परिस्थितिमध्ये मराठे लढत राहिले. छत्रपति संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली ९ वर्षे आणि त्यांच्या वधानंतर १९ वर्षे जनता लढत राहिली.


पृथ्वीराज चौहान, राणा प्रताप, रामराजा ह्यांनी सुद्धा परकियांविरुद्ध प्रखर लढा दिला. पण जिकडे जनता लढते तिकडे फौजा निकामी होतात. भारताच्या इतिहासात १२०० वर्षांनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी जनता अखंड २७ वर्षे लढली. हयात धर्माभिमान नव्हे तर आपण लढू शकतो हा आत्मविश्वास जास्त महत्वाचा आहे. छापे घालण्याचे नवे तंत्र निर्माण करणे, विरतेच्या खोट्या कल्पनेच्या आहारी जाउन 'लढून मरणे' यापेक्षा - टिकणे, गरज असल्यास पळणे, मग पळवणे, थकवणे आणि अखेर नाश करणे हे जास्त महत्वाचे. यासोबत प्रजेच्या इहलौकिक गरजा सांभाळणे आलेच. यानंतर धर्माभिमान महत्वाचा. एखादे राज्य टिकवण्यासाठी जनतेने इतका दीर्घकाळ लढा द्यावा, ही घटनाच हिंदुस्तानच्या इतिहासात सर्वात जास्त रोमांचक आहे... नवखी आहे...


शिवछत्रपतींच्या कार्यपद्धतीचा विचार अधिक तपशीलवारपणे समजुन घेणे महत्वाचे आहे. 'शिवाजी म्हणजे युद्ध नव्हे, तर नव्या व्यवस्थेचा आग्रह ... त्या व्यवस्थेच्या रक्षणासाठी युद्ध हे साधन.' सन १६४५ ते १६४९ ही ४ वर्षे बारा मावळची व्यवस्था लावण्याचे काम अखंड सुरू होते. वतनदारांचा बंदोबस्त करणे आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करणे ही सर्वात महत्वाची कामे ह्या काळात केली गेली. सामान्य असणाऱ्या मोरोपंत पिंगळे, तानाजी मालुसरे आणि प्रतापराव गुजर अश्या व्यक्तिंमधून असामान्य कर्तुत्ववान प्रधान, सेनापति, सुभेदार निर्माण करणे हा महाराजांचा आणखी एक पैलू.


शिवरायांचे व्यवस्थापन आणि संघटन कौशल्याचे वैशिष्ट्य ह्यात आहे की, जेंव्हा त्यांना माघार घ्यावी लागली, अपयश आले किंवा ताब्यातला प्रदेश होरपळून निघाला; तरीसुद्धा लोकांचा त्यांच्यावरील विश्वास तसूभरही कमी झाला नाही. एखादा चुकार माणूस वगळता त्यांच्या फौजेने कधी बंद पुकारले नाही. १६४९ मध्ये सुद्धा सर्वच अनिश्चित असताना लोक त्यांच्या बाजूने उभे राहिले असे लोकांना त्यांनी दिले तरी काय होते ??? त्यांचे वैशिष्ट्य यात आहे की, ते जेंव्हा-जेंव्हा जिंकत तेंव्हा-तेंव्हा नवा प्रदेश पूर्णपणे ताब्यात घेत आणि जेंव्हा पड़ती घेत तेंव्हा नव्याने जिंकलेल्या प्रदेशाचा काही भाग सोडून देत असत. म्हणजेच पुढच्या वेळी लढण्याची शक्ती त्यांनी सुरक्षित ठेवलेली असते. जन्मभर त्यांनी ह्याच पद्धतीने कारभार पाहिला. त्यांचे चौरस नियोजन आणि युद्ध आखणीला राज्य विस्तारात रूपांतरित करण्याचे श्रेय अप्रतिम आहे.
.
.
.
क्रमश: .....

13 Sept 2009

कविराज भूषण - भाग २१ ... सिवाजी नरिंन्द ते ... !

दूरजन दार भजि भजि बेसम्हार चढी, उत्तर पहार डरि सिवाजी नरिंन्द ते ।


भूषन भनत बिन भूषन बसन साधे, भूखन पियासन है नाहन को निंन्दते ।

बालक अयाने बाट बीचही बिलाने कुम्हिलाने, मुख कोमल अमल अरविंन्द ते ।

द्दगजल कज्जल कलित बढ्यो कढ्यो मानो, दूजा सोत तरनि तनूजा को कलिन्द ते ॥

... कविराज भूषण


भाषांतर :

भूषण म्हणतो, त्या नरवीर शिवरायांच्या भीतीने शत्रु स्त्रिया आपली वस्त्रे, भूषणे टाकून उपाशी तापाशी नवर्‍यांच्या निंदा करीत अनिवारपणे धावून उत्तरे कडील पहाडांवर, पर्वतांवर चढू लागल्या आहेत. अज्ञान बालकांची निर्मल कमलांप्रमाणे असलेली कोमल मुखे कोमेजुन गेली.मूले वाट चुकून भलतीकडेच निघून गेली. त्यामुळे त्यांच्या मातांच्या काजळ घातलेल्या डोळ्यातून अश्रूंचा जो प्रवाह सुरु झा तो कालिंद पर्वतापासून निघालेल्या यमुनेचाच दूसरा ओघ आहे की काय असे वाटायला लागले आहे.


*************************************************************************************

गेल्या २१ भागांमध्ये 'कविराज भूषण' यांची काव्ये व त्याची भाषांतरे मला विनासायास उपलब्ध करून दिल्याबद्दल माझा मित्र 'ओंकार' यास अनेक अनेक धन्यवाद ... !
.
.
.

11 Sept 2009

कविराज भूषण - भाग २० ... सौ सौ चूहे खाय के बिलारी बैठी तप के ... !

हात तसबीह लिए प्रात उठै बंदगी को,

आपही कपट रूप कपटसु जपके ।

आगरे में जाय दारा चौक में चुनाय लीन्हो,

छत्रहूँ छिनायो मानो मरे बूढे बाप के ।

कीन्हो है सगोत घात सो मै नाही कहौ फेरि,

पील पै तोरायो चार चुगुल के गप के ।

भूषन भनत छर छन्दी मतिमंद महा,

सौ सौ चूहे खाय के बिलारी बैठी तप के ॥


... कविराज भूषण



भाषांतर :

भूषण म्हणतो, हे औरंगजेब ! तुम्ही रोज सकाळीच उठून हातात स्मरणी घेउन ईश्वर प्राथना करता, पण हे सर्व ढोंग आहे, तुम्ही प्रत्यक्ष कपट रूपच आहात. कारण आग्र्यास जाउन आपल्या सख्या भावास - दारास तुम्ही चौकात जिवंत चिणले; जिवंत व वृद्ध बापास मृत समजुन त्याचे राजछत्र हिसकावून घेतले (व स्वतः राज्य करू लागला) ; मी आता अधिक सांगत नाही. आपल्याच गोत्रजांना चहाडखोर दुतांच्या नुसत्या चहाडयांवरुन हत्तीच्या पायाखाली तुडवून मारविले. तुम्ही मोठे धूर्त आहात ; धर्म शील आहोत असे दाखवता पण तुमच हे कपट शेकडो उंदीर खाऊन तपश्चर्या करणार्‍या मांजरा सारखेच आहे.

"वरील दोन छंदात कवीने औरंगजेबाचा ढोंगी स्वभाव व त्याची भयंकर कृत्ये वर्णन केलेली आहेत. भूषणाने जे छंद औरंगजेबाचे अभय घेऊन मग त्यास ऐकविले अशी आख्यायिका आहे."

10 Sept 2009

कविराज भूषण - भाग १९ ... एते काम कीन्हे तेऊ पातसाही पाई है ... !

किबले की ठौर बाप बादसाह साहजहाँ,

ताको कैद कियो मानो मक्के आगि लाई है ।

बडो भाई दारा वाको पकरि कै कैद कियो,

मेहरहू नाहि माँ को जायो सगो भाई है ।

बडो भाई दारा वाको पकरि कै कैद कियो,

मेहरहू नाहि माँ को जायो सगो भाई है ।

बंधु तो मुरादबक्स बादि चूक करिबे को,

बीच ले कुरान खुदा की कसम खाई है ।

भूषन सुकवि कहै सुनो नवरंगजेब,

एते काम कीन्हे तेऊ पातसाही पाई है ॥


... कविराज भूषण


भाषांतर :

भूषण म्हणतो :- औरंगजेब ! ऐक. तू तुझ्या तीर्थासमान पूज्य असलेल्या आपल्या बापास शहाजनास कैद केले, हे तुमचे कृत्य परमपवित्र अशा मक्केस आग लावण्याइतकेच अनुचित आहे. एकाच आईच्या पोटी जन्मलेला, त्यातून वडिल बंधू जो दारा, त्यालाही पकडून कैदेत घातले. (यावरून मला वाटते) तुझ्या अंतःकरणात दयेचा लवलेश नाही; दुसरा भाऊ मुरादबक्ष याशी कपटाचरण न केल्याबद्दल कुराण घेऊन खुदाची खोटीच शप्पत घेतली. अशी ही कृत्ये केली म्हणून तर तुला बादशाही (राज्य) मिळाली आहे.

31 Aug 2009

कविराज भूषण - भाग १८ ... चढत तुरंग चतुरंग साजि सिवराज ... !

चढत तुरंग चतुरंग साजि सिवराज ।

चढत प्रतापदिन दिन अति अंग मै ॥

भूषन चढत मरहट्टन के चित्त चाव ।

खग्ग खुलि चढत है अरिन के अंग मै ॥

भोसिलाके हाथ गढ कोट है चढत अरि ।

जोट है चढत एक मेरू गिरिसृंग मै ॥

तुरकान गन व्योमयान है चढत बिनु ।

मान है चढत बदरंग अवरंग मै ॥


... कविराज भूषण


भाषांतर :

चतुरंग सैन्य सज्ज करून शिवराज घोड्यावर स्वार होतांच त्यांचा प्रताप दिवसेंदिवस (समरांगणात) वाढतो आहे. भूषण म्हणतो, (इकडे) मराठ्यांच्या मनात उत्साह वाढू लागतो, (तो तिकडे) उपसलेल्या तरवारी शत्रूच्या छातीत घुसत आहेत. भोसल्यांच्या हाती (एका मागून एक) किल्ले येऊ लागले (वाढू लागले) तर तिकडे शत्रूंच्या टोळ्या एकत्र होऊन मेरूपर्वताच्या शिखरावर चढू लागल्या. तुर्कांचे समुदाय (युद्धात मरण मिळाल्यामुळे) विमानात बसून आकाशमार्गे जात आहेत (तो इकडे) अवमान झाल्यामुळे अवरंगजेब निस्तेज होत आहे.

30 Aug 2009

कविराज भूषण - भाग १७ - महीपर कीरति श्री सिवराज बगारी ... !

छाय रही जितही तितही अतिहि छबि छीरधि रंग करारी ।

भूषन सुद्ध सुधान के सौधनि सोधति सी धरि ओप उज्जारी ।

योंतम तोमहि चाबिकै चंद चहूं दिसी चाँदनि चारू पसारी ।

ज्यों अफजल्लहि मारि महीपर, कीरति श्री सिवराज बगारी ॥

... कविराज भूषण

भाषांतर :

ज्या प्रमाणे क्षीर समुद्रात जिकडे दृष्टी फेकावी तिकडे शुभ्रच शुभ्र छबि पसरलेली दिसते किंवा चंद्राने अंधकारास ग्रासून शुभ्र चांदणे पसरावे व त्या प्रकाशात शुभ्र चुने गच्ची प्रासादांची जशी सुंदर शोभा दिसावी त्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी अफजलखानास मारून पृथ्वीवर आपली उज्वल कीर्ति पसरवली.

29 Aug 2009

कविराज भूषण - भाग १६ - आग्र्याहून सुटका ... !

चारि चारिचौकी जहाँ चकत्ताकी चहूं और, साँज अरु भोर लगी रही जिय लेवा की ।

कँधे धरी कांवर, चल्यो जब चाँवसे, एकलिए एक जात जात चले देवा की ।

भेंस को उतारी डार्‍यो डम्बर निवारी डार्‍यो, धर्यों भेंस और जब चल्यो साथ मेवा की ।

पौन हो की पंछी हो कि गुटखान कि गौन हो, देखो कौन भाँति गयो करामात सेवा की ॥

... कविराज भूषण


भाषांतर :

चारी बाजूला या चुग़ताई वंशाच्या म्हणजेच औरंगजेबाच्या प्राणघातक चौक्या दिवसरात्र लागलेल्या आहेत. कावड खांद्यावर घेऊन एक एक जण मोठ्या डौलाने, अत्यंत आरामात देवाकडे निघालेले आहेत. अशा वेळी त्यांनी (शिवाजी महाराजांनी ) आपला वेष उतरवला, अवडंबर (जे आजारपणाचे अवडंबर माजवलं होतं ते) टाळलं, वेष बदलला आणि मेवा मिठाईच्या त्या पेटार्‍याबरोबर ते निघाले आणि पळून गेले. शिवाजी महाराजांची ही करामत बघून ( आग्र्याचे ) लोक थक्क झाले. त्यांना कळेना की ते (शिवाजी महाराज ) वार्‍याच्या झुळकीसारखे गेले की पक्ष्यासारखे उडून गेले की गुटखा खाऊन एकदम गुप्त झाले. शिवरायांच्या या करामतीला काय म्हणावे हे कोणांस कळेनासे झाले !

27 Aug 2009

कविराज भूषण - भाग १५ - इते गुन एक सिवा सरजामै ... !

सुन्दरता गुरुता प्रभुता भनि भूषन होत है आदर जामै ।

सज्जनता औ दयालुता दीनता कोमलता झलकै परजामै ।

दान कृपानहु को करीबो करीबो अभै दीनन को बर जामै ।

साहन सो रन टेक विवेक इते गुन एक सिवा सरजामै ॥

... कविराज भूषण


भाषांतर :

भूषण म्हणतो सौंदर्य, गुरुत्व व प्रभुत्व हे गुण यांच्या ठिकाणी वसत असल्यामुळे आदरास पात्र झालेले आहेत; तसेच यांच्या ठिकाणी प्रजेविषयी सौजन्य, दयालुता, कोमलता दिसून येते; शत्रुंना तरवारीचेच दान व दीनांना अभय वर देण्याचे त्यांच्या अंगी सामर्थ्य आहे. बादशहांशी पण लावून युद्ध करणे आणि कोणतेही कार्य विचारपूर्वक करणे हे इतके गुण एका सर्जा (सिंहासमान शूर अशा) शिवरायांच्या ठिकाणी आहेत.

25 Aug 2009

कविराज भूषण - भाग १४ - हिन्दुपति सेवाने ... !

मन कवी भूषन को सिव की भगति जीत्यो

सिव की भगति जीत्यो साधु जन सेवाने ।

साधु जन जीते या कठिन कलिकाल

कलिकाल महाबीर महाराज महिमेवाने ॥

जगत मै जीते महाबीर महाराजन

ते महाराज बावन हू पातसाह लेवाने ।

पातसाह बावनौ दिली के पातसाह

दिल्लीपति पातसाहै जीत्यो हिन्दुपति सेवाने ॥

... कविराज भूषण


भाषांतर :

कवी भूषणाच्या मनात शिवभक्तिने ,शिव भक्तिस साधूजनांच्या सेवेने, साधूजनास कलिकालाने,कलिकालास शूर आणि कीर्तिवान राजांनी आणि या शूर आणि कीर्तिवान राजास बावन्न बादशहास जिंकणार्‍या (औरंगजेबाने) आणि त्या बावन्न बादशहाच्या बादशहास म्हणजे दिल्ली पति औरंगजेबास "हिन्दू पति" शिवरायांनी जिंकले.
या छंदात कवि भूषणाने शिवाजी महाराजांना "हिन्दूपति" अशी उपमा दिलेली आहे. यावरूनच पुढील काळात मराठी साम्राज्याला हिंदुपतपातशाही म्हणण्याचा प्रघात पडलेला असावा.

3 Aug 2009

कविराज भूषण - भाग १३ - इते गुन एक सिवा सरजामै ... !

सुन्दरता गुरुता प्रभुता भनि भूषन होत है आदर जामै ।

सज्जनता औ दयालुता दीनता कोमलता झलकै परजामै ।

दान कृपानहु को करीबो करीबो अभै दीनन को बर जामै ।

साहन सो रन टेक विवेक इते गुन एक सिवा सरजामै ॥

... कविराज भूषण


भाषांतर :

भूषण म्हणतो सौंदर्य, गुरुत्व व प्रभुत्व हे गुण यांच्या ठिकाणी वसत असल्यामुळे आदरास पात्र झालेले आहेत; तसेच यांच्या ठिकाणी प्रजेविषयी सौजन्य, दयालुता, कोमलता दिसून येते; शत्रुंना तरवारीचेच दान व दीनांना अभय वर देण्याचे त्यांच्या अंगी सामर्थ्य आहे. बादशहांशी पण लावून युद्ध करणे आणि कोणतेही कार्य विचारपूर्वक करणे हे इतके गुण एका सर्जा (सिंहासमान शूर अशा) शिवरायांच्या ठिकाणी आहेत.


नोंद : माझ्या ब्लॉगवरील 'कविराज भूषण' यांची सर्व काव्ये व भाषांतरे या लिखाणाचे पूर्ण श्रेय माझा मित्र 'ओंकार' याचे आहे.

10 Jul 2009

कविराज भूषण - भाग १२ - सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं ... !

साजि चतुरंग बीर रंग में तुरंग चढी ।


सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं ।


भूषन भनत नाद बिहद नगारन कें ।


नदी नद मद गैबरन के रलत हैं ।


ऐल फैल खैल भैल खलक में गैल गैल ।


गजन की ठैल पैल सैल उसलत हैं ।


तारा सो तरनि धूरि धारा में लगत जिमि ।


थारा पर पारा पारावार यों हलत हैं ॥



... कविराज भूषण

भाषांतर :

{शिवराय सैन्यासह युद्धास निघाल्यावेळचा देखावा कवी भूषणांनी वर्णिलेला आहे}
सिंहासम शूर शिवराय चतुरंग सैन्य तयार करून विरोचित उत्साहाने घोड्यावर बसून युद्ध जिंकण्याकरीता निघालेले आहेत, नगार्‍याचा भयंकर ध्वनि होऊ लागलेला आहे, उन्मत्त हत्तींच्या गंडस्थलातून निघणारा मद नदी नाल्यांच्या प्रवाहात मिसळत आहे, सैन्याच्या खळबळीने देशभर गल्लोगल्लीत कोल्हाळ माजून राहिला आहे, हत्तिंच्या एकमेकांवर रेलण्यामूळे डोंगर उलथून पडतात की काय असे वाटत आहे. सैन्याच्या खळबळीने व हत्तींच्या परस्पर रेटारेटीने उडत असलेल्या धुळीने आकाश इतके भरून गेले आहे की एवढा मोठा प्रचंड सूर्य, पण एखाद्या लहानशा तार्‍याप्रमाणे दिसू लागलेला आहे. समुद्र तर ताटात धावणार्‍या पार्‍याप्रमाणे सारखा आंदोलन पावत आहे.

9 Jul 2009

कविराज भूषण - भाग ११ - माहादानी सिवाजी खुमान ... !



साहि तनै सरजा कि कीरती सों ।

चारों और चाँदनी वितान छिति छोर छाइयतु है ।

भूषन भनत ऐसो भूप भौंसिला है ।

जाको द्वार भिच्छुकन सो सदाई भाइयतु है ।

माहादानी सिवाजी खुमान या जहान ।

पर दान के प्रमान जाके यों गनाइयतु है ।

रजत की हौस किए हेम पाइयतु जासो ।

हयन की हौस किए हाथी पाइयतु है ॥


... कविराज भूषण


भाषांतर :

शहाजी पुत्र शिवरायांच्या कीर्तिरूप चांदणीचा मंडप पृथ्वीच्या चहूंकडील टोकापर्यंत पसरला आहे. भूषण म्हणतो, हे भोसलेराज असे आहेत की, भिक्षुकांना नेहमी त्यांच्या द्वाराशी पडून रहावेसे वाटते. या भूतलावर शिवाजी महाराज महान महान दाता असून त्यांच्या दानाचे प्रमाण यावरूनही समजून येते ; की रूप्याची इच्छा केली असता सोने मिळते व घोड्याची इच्छा केली असता महाराजांकडून हत्ती मिळतो.या छंदावरून शिवाजी महाराजांनी दानाप्रीत्यर्थ कविराज भूषणास हत्ती भेट दिलेला असावा असा तर्क करावयास जागा आहे.

7 Jul 2009

कविराज भूषण - भाग १० - भूषन भनत भाग्यो ... !

कुंभ कन्न असुर अवतारी अवरंगजेब कीन्ही ।

कत्ल मथुरा दोहाई फेरि रब की ।

खोदि डारे देवी देव सहर महल्ला बाँके ।

लाखन तुरूक कीन्हे छूटि गई तब की ।

भूषन भनत भाग्यो कासीपति विश्वनाथ ।

और कौन गिनती में भूली गति भब की ।

चारो वर्ण धर्म छोडि कलमा निवाज पढि ।

सिवाजी न हो तो सुनति होत सब की ॥


... कविराज भूषण

भाषांतर :

भूषण म्हणतो, कुंभकर्ण राक्षसाचा अवतार जो औरंगजेब - त्याने मथुरेची कत्तल करून सर्व शहरात "रब"ची द्वाही फिरवली (मुसलमानी चालविली). शहरातील गल्लोगल्लीतून असलेल्या उत्तम उत्तम देवता खोदून खणून काढल्या. लाखो हिंदुंना बळाने मुसलमान केले, इतकेच काय, प्रत्यक्ष काशी विश्वनाथ भयभीत होउन पळाले, महादेवाची अशी त्रेधा उडाली तेथे इतरांची काय कथा ? अशा भयाण वेळी जर शिवराय नसते तर चारही वर्णांना आपापले धर्म सोडून नमाज पढावा लागला असता व सर्व हिंदुंची सुंता झाली असती.

4 Jul 2009

कविराज भूषण - भाग ९ - गर सिवाजी न होते तो ... !

देवल गिराविते, फिराविते निसान अली ।
ऐसे डूबे रावराने, सबी गए लबकी ।
गौर गणपती आप, औरनको देत ताप ।
आपनी ही बार सब, मारी गये दबकी ।
पीरा पैगंबर, दिगंबर दिखाई देत ।
सिद्ध की सिद्धाई गई, रही बात रब की ।
कासी की कला गई, मथुरा मस्जिद भई ।
गर सिवाजी न होते तो, सुन्नत होती सबकी ॥



... कविराज भूषण



भाषांतर :


यवनांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला तेव्हा राव - राणे (राजे महाराजे) भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. इतके ते निर्बल व निस्तेज झाले. थोडेसे पुजा विधान चुकले तर भक्तांनाच ताप देणार्या देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून लपून बसण्याची वेळ आली. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून 'रब'ची चर्चा सुरू झाली. जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. काशी कळाहीन झाली, मथुरेला मशीद उभी राहीली, अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर सर्व हिन्दुंची सुन्ता झाली असती.

3 Jul 2009

कविराज भूषण - भाग ८ - नरसिंह सिवा है ... !

एक कहे कल्पद्रुम है, इमि पूरत है सबकी चितचाहे ।

एक कहे अवतार मनोज, की यो तनमे अति सुंदरता है ।

भुषण एक कहे महि इंदु यो, राजविराजत बाढयौ महा है ।

एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह सिवा है ॥


... कविराज भुषण


भाषांतर :

यास कोणी कल्पवृक्ष म्हणतात, कारण हा सर्वांचे मनोरथ पूर्ण करतो.हा सौंदर्यसंपन्न असल्याने कोणी याला मदनाचा अवतार म्हणतात. भूषण याला पृथ्वीवरचा चंद्र म्हणतो, कारण याचे राज्य कलेकलेने वाढत आहे. कोणी याच्या युद्धातील पराक्रमामुळे यास सिंह म्हणतात तर कोणी प्रत्यक्ष नृसिंह भगवानच समजतात. कारण ज्याप्रमाणे नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडले तद्वतच शिवरायांनी आपल्या वाघनखांनी अफजलखानाची आतडी बाहेर काढली.

1 Jul 2009

कविराज भूषण - भाग ७ - सिवा नरेस भ्रकुटी चढाई है ... !

प्रेतिनी पिसाच रु निसाचर निसाचरि हू, मिलि मिलि आपुसमे गावत बधाई है ।
भैरों भूत प्रेत भूरी भूधर भयंकर से, जुत्थ जुत्थ जोगिनी जमाती जुरि आई है ।
किलकि किलकि कै कुतूहल करति काली, डिमडिम डमरू दिगंबर बजाई हैं ।
सिवा पूंछै सिव सों "समाजु आजु कहॉ चली", काहू पै सिवा नरेस भ्रकुटी चढाई है ॥


... कवीराज भूषण.


भाषांतर :

(या छंदात भूषण कवीने काल्पनिक शिव - पार्वती संवाद वर्णिलेला आहे)प्रेते, पिशाच्चे, राक्षस, राक्षसी जमून आपापसात आनंदाने गात आहेत. पर्वताप्रमाणे धिप्पाड शरीरे धारण करणारे भैरव, तसेच भूते, प्रेते यांच्या झुंडीच्या झुंडी जमू लागलेल्या आहेत, कालीदेवता किल किल शब्द करून जमलेल्या समाजाचे कौतुक करीत आहे, आणि महादेव आनंदाने डमरू वाजवत आहे. हा शिवगणाचा आनंद पाहून पार्वतीने महादेवास विचारले,"महाराजा, आज आपली मंडळी कुठे निघाली आहेत? "महादेव म्हणाले,"आज, शिवराज कोणा शत्रुवर कृद्ध झालेले आहेत."

16 Jun 2009

कविराज भूषण - भाग ६ - शाइस्तेखान... !


दच्छिन को दाबि करि बैठो है । सईस्तखान पूना मॉंहि दूना करि जोर करवार को ॥
हिन्दुवान खम्भ गढपति दलथम्भ । भनि भूषन भरैया कियो सुजस अपार को ॥
मनसबदार चौकीदारन गंजाय महलनमें ।मचाय महाभारत के भार को ॥
तो सो को सिवाजी जे हि दो सौ आदमी सों ।जीत्यो जंग सरदार सौ हजार असवार को ॥

... कवीराज भूषण.

भाषांतर :

शाइस्तेखान दक्षिण हस्तगत करून पुण्यात ठाणे देऊन बसला. या वेळी हिंदूंचा आधारस्तंभ व किल्लेदारांच्या एका सेनानायकाच्या तरवारीस जोर चढला अन् त्याने अपार सुकिर्ती मिळवली. (ती अशी मिळवली की)मोठमोठ्या मनसबदारास व चौकिदारास जखमी करून त्याने महालांत शिरून महाभारत माजवण्यास (युद्ध करण्यास) सुरुवात केली !भूषण म्हणतो, कि हे शिवराया, तुझ्या शिवाय दुसरा पराक्रमी कोण आहे ? ज्याने फक्त दोनशे माणसांनिशी लाख स्वार असणार्‍या सरदाराबरोबरचे युद्ध जिंकले.

14 Jun 2009

कविराज भूषण - भाग ५ - जै जयंति ... !

जै जयंति जै आदि सकति जै कालि कपर्दिनी ... ।
जै मधुकैटभ - छलनि देवि जै महिषविमर्दिनि ... ।
जै चमुंड जै चंड मुंड भंडासूर खंडिनि ... ।
जै सुरक्त जै रक्तबीज बिड्डाल - विहंडिनि ... ।
जै जै निसुंभ सुंभद्दलनि भनि भूषन जै जै भननि ... ।
सरजा समत्थ सिवराज कहॅं देहि बिजय जै जग-जननि ... ।

... कवीराज भूषण.

भाषांतर :

हे आदिशक्ति ! हे कालिके ! हे कपर्दिनि (गौरी) ! हे मधुकैटभ महिषासूरमर्दिनि देवी ! हे चामुंड देवी ! हे भंडासूर्खंडिनी ! हे बिडाल विध्वंसिनी ! हे शुंभ-निशुंभ - निर्दालिनी देवी ! तुझा जयजयकार असो ! भूषण म्हणतो हे जगज्जननी ! सिंहासमान शूर अशा शिवरायास विजय देत जा.

11 Jun 2009

कविराज भूषण - भाग ४ - काल तुरकानको ... काल तुरकानको ... !

पैज प्रतिपाल भर भुमीको हमाल,चहु चक्कको अमाल भयो दंडक जहानको ... !
साहीन की साल भयो, ज्वार को जवाल भयो,हर को कृपाल भयो, हर के विधानको ... !
वीर रस ख्याल सिवराज भू-अपाल तेरो,हाथके बिसाल भयो भूषण बखानको ... !
तेज तरवार भयो, दख्खनकी ढाल भयो,हिंदुकी दिवार भयो, काल तुरकानको ... !

काल तुरकानको ... काल तुरकानको ... काल तुरकानको ... काल तुरकानको ... !

... कवीराज भूषण.

भाषांतर :

शिवराज भूपाल - प्रतिज्ञा पूर्णत्वास पोचवणारा, भूमीभार शिरावर घेणारा, चहूं दिशांच्या राज्यांवर अम्मल गाजवणारा, जगतास शासन करणारा, तसेच बादशहास शल्ल्याप्रमाणे जाचणारा, (प्रजेची) पीडा हरण करणारा आणि नरमुण्डमाला अर्पण करण्याच्या विधीने महादेवावरही कृपा करणारा असा झाला. भूषण म्हणतो तूझी तरवार दख्खनला ढालीप्रमाणे व हिंदूंना भिंतीप्रमाणे रक्षण करणारी झाली असून तुर्कांन्ना (ईस्लामला) मात्र प्रत्यक्ष काळ झाली आहे. वीररस प्रिय अशा शिवरायाच्या विशाल भुजांचे (ज्या स्वत: शक्ती संपन्न असून इतरांनाही शक्ती देणार्‍या आहेत) कोण वर्णन करू शकेल ?

9 Jun 2009

कविराज भूषण - भाग ३ - कुंद कहा, पयवृंद कहा ... !


कुंद कहा, पयवृंद कहा, अरूचंद कहा सरजा जस आगे ?
भूषण भानु कृसानु कहाब खुमन प्रताप महीतल पागे ?
राम कहा, द्विजराम कहा, बलराम कहा रन मै अनुरागे ?
बाज कहा मृगराज कहा अतिसाहस मे सिवराजके आगे ?

... कवीराज भूषण.

भाषांतर :

कुंद, दुध व चंद्र यांची शुभ्रता शिवरायांच्या यशासमोर काय आहे ? (१), पृथ्वीवर पसरलेल्या शिवरायांच्या प्रखर प्रतापापुढे सुर्य व अग्नी यांच्या तेजाचा काय पाड ? (२), समरप्रियतेमध्ये दाशरथी राम, परशूराम व बलराम हे देखिल शिवरायांच्या मागेच होत.(३) आणि धाडस पाहिले असता बाज (बहिरी ससाणा - पक्ष्यांवर झेप घेणारा) व सिंह हे शिवरायांच्यापुढे तुच्छ होत. (४)

8 Jun 2009

कविराज भूषण - भाग २ - सिवराज देखीये ... !

सक्र जिमि सैल पर । अर्क तम-फैल पर । बिघन की रैल पर । लंबोदर देखीये ... !

राम दसकंध पर । भीम जरासंध पर । भूषण ज्यो सिंधु पर । कुंभज विसेखिये ... !

हर ज्यो अनंग पर । गरुड ज्यो भूज़ंग पर । कौरवके अंग पर । पारथ ज्यो पेखिये ... !

बाज ज्यो विहंग पर । सिंह ज्यो मतंग पर । म्लेंच्छ चतुरंग पर । सिवराज देखीये ... !

सिवराज देखीये ... सिवराज देखीये ... सिवराज देखीये ... सिवराज देखीये ... !

... कवीराज भूषण.

भाषांतर :

ज्या प्रमाणे ईंद्र पर्वताचा, सुर्य अंध:काराचा व विग्नहर्ता गणराज विघ्नसमुदायाचा नाश करतो, (१)किंवा ज्या प्रमाणे रामाने रावणाचा व भीमाने जरासंधाचा नाश केला, अगस्त्ति ऋषींनी समुद्राचा घोट घेतला, (२)महादेवाने मदनास जाळून भस्म केले, अर्जुनाने कौरवांचा नि:पात केला, (३)किंवा सर्प गरुडास, पक्षी बहिरी ससाण्यास व हत्ती सिंहास बघुन भयभीत होतात, तद्वत इस्लामी चतुरंग सैन्य शिवरायांच्या पराक्रमासमोर भयभीत होते. (४)

5 Jun 2009

कविराज भूषण - भाग १ - शेर शिवराज है ... !


कवि भूषण यांचा जन्म १६१६ साली तिकमपूर नावाचे कानपूर जिल्ह्यात एक गाव आहे, तेथे झाला. चित्रकूट राजा ऋदयराम सोळंकी यांच्याकडे कविराज गेले असताना, राजाच्या गर्वीष्ठ दानदर्पास झुगारून त्यांनी स्वतःच्या कवितेचे व अस्मितेचे जतन आणि संरक्षण केले. शिवरायांचा चरित्रचंद्र पाहून प्रभावित झालेले कविराज उत्तरेहून दक्षिणेकडील सह्याद्रीचे काटे सराटे तुडवीत येऊन महाराजांना भेटले. त्यांनी शिवराजभूषण नावाचा एक अलंकार शास्त्रावरील ग्रंथ लिहिलेला असून त्यात शिवरायांच्या निरनिराळ्या पराक्रमांचे काव्यमय वर्णन अलंकारीक पद्धतीने अविश्कारीत केलेले आहे. शिवाबावनी हा ग्रंथ त्याच पुस्तकातील एक भाग आहे असे समजतात. हिंदी साहित्यात चंद्रकृत पृथ्वीराज रासा या ग्रंथाच्या तोडीची मान्यता शिवराजभूषणास आहे.भूषण फारच वृद्ध होऊन वयाच्या १०२ व्या वर्षी वारले. शिवरायांनंतर ते छत्रसाल बुंदेला यांना जावून भेटले होते.

नोंद : माझ्या ब्लॉगवर कविराज भूषण यांची सर्व काव्ये व भाषांतरे लिहून काढ़ण्याचे पूर्ण श्रेय माझा मित्र ओंकार याचे आहे.
************************************************************************************

इंद्र जिमि जृंभपर ! बाडव सुअंभपर ! रावण सदंभपर ! रघुकुल राज है ... !
पौन वारिवाह पर ! संभु रतिनाह पर ! ज्यो सहसवाह पर !राम द्विज राज है ... !
दावा दृमदंड पर ! चिता मृगझुंड पर ! भूषण वितुंड पर ! जैसे मृगराज है ... !
तेज तमंअंस पर ! कन्न्ह जिमि कंस पर ! त्यों म्लेंच्छ बंस पर ! शेर शिवराज है ... !

शेर शिवराज है ... शेर शिवराज है ... शेर शिवराज है ... शेर शिवराज है ... !

... कवीराज भूषण.

भाषांतर :

जृंभासुरास जसा इंद्र, समुद्रास वडवानल, (१) गर्विष्ठ रावणास रामचंद्र, (२) मेघास वायु, मदनास शिव, (३) सहस्त्रार्जुनास परशूराम, (४) वृक्षास दावाग्नी, हरिण कळपावर चित्ता , (५) हत्तिस सिंह , (६), अंध:कारास प्रकाष, कंसास श्रीकृष्ण ,(७) त्याप्रमाणे म्लेंच्छकुळावर सिंहासमान शूर शिवराज होय. (८)

19 May 2009

भाग २४ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.
(पत्ररूप व्यक्तिदर्शन ह्या मालिकेमधले हे शेवटचे पत्र)
४९) छत्रपति शिवाजी महाराजांनी एप्रिल १६६५ मध्ये मुघल सेनापती मिर्झाराजा जयसिंह याला लिहिलेले अत्यंत महत्त्वाचे असे पत्र ...

१६६० ते १६६४ पर्यंत अफझलखानाचा वध, पन्हाळ्याहून सुटका, शाहिस्तेखानावर लालमहालात हल्ला, मराठा आरमार उभे करून आणि अखेर सूरत बेसूरत करून शिवरायांनी मुघलांना त्राही-त्राही करून सोडले होते. आता औरंगजेबाने त्याचा सर्वात ताकदवर सेनापती मिर्झाराजा जयसिंह याला दख्खन मोहिमेवर पाठवले. त्याच्या सोबत होता दिलेरखान. शिवाजीराजांनी ह्यावेळी मिर्झाराजा जयसिंह याला लिहीलेले पत्र प्रसिद्ध आहे. या पत्रामधून तत्कालीन परिस्थितीचे आणि शिवरायांच्या मन:स्थितीचे यथार्थ चित्रण झाले आहे. हे पूर्ण पत्र वाचावे असेच आहे.

पत्रामध्ये राजे म्हणतात,"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे."
स्वराज्य निर्मितीसोबत त्याचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी आक्रमकांशी युद्ध खेळण्यास जागृक राहणे याची पूर्ण जाणीव त्यांना होती. ह्या पत्रातून त्यांचा आत्मविश्वास आणि निर्धार दिसून येतो.

*****************************************************************************************************************************************************************

16 May 2009

भाग २३ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४८) छत्रपति शिवाजी महाराजांनी जाने-फेब. १६८० मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांना लिहिलेले चौथे आणि अंतिम अत्यंत महत्त्वाचे असे पत्र ...

१६७९ च्या शेवट-शेवटला मुघल फौजेने दिलेरखानच्या नेतृत्वाखाली उरल्या-सुरल्या विजापुरला वेढा टाकला होता. विजापुरचा मसूदखान याने विजापुर रक्षावे अशी गळ शिवाजीराजांना घातली तेंव्हा महाराजांनी फौजे सकट जालना - बागलाण - खानदेश अश्या मुघली प्रदेशात स्वारी व लुटालुट चालवली. ह्यामुळे दिलेरखानास विजापूरचा वेढा उठवून स्वतःच्या प्रदेशाच्या रक्षणासाठी येण्यास भाग कसे पडले याचे विवेचन राजांनी पुढील पत्रात केले आहे.

पत्रात राजे म्हणतात,"विजापूरचे अरिष्ट दूर करून विजापूर रक्षिले." खालील पत्रामधून राजांचे रणकौशल्य आणि 'बेरीरगिरी' उर्फ़ फिरत्या लढाईमधली निपुणता लक्ष्यात येते.

*****************************************************************************************************************************************************************

13 May 2009

भाग २२ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४७) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७८-७९ मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांना लिहिलेले तिसरे अत्यंत महत्त्वाचे असे पत्र ...

छत्रपति शिवाजी महाराजांनी व्यंकोजी भोसले यांस "गृहकलह बरा नव्हे" असे उपदेशात्मक पत्र लिहून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ते शिवाजी महाराजांना येउन भेटले देखील. पण शिवाजीराजे आपले संपूर्ण राज्यचं हिसकावून घेतील या भीतीने त्यांनी रात्रीच छावणीमधून पळ काढला. आता मात्र शिवाजीराजांनी सर्वत्र मोर्चे बांधले आणि व्यंकोजीची पूर्ण जहागीर ताब्यात घेतली. तंजावर तेवढे मुद्दामून जिंकायचे बाकी सोडले.

'दक्षिण दिग्विजय मोहिम' आटोपून राजे परत रायगडी आले तेंव्हा त्यांना रघुनाथपंत यांसकडून कळले की, ह्या सर्वाने व्यंकोजी भोसले खचून गेले होते आणि त्यांनी वैराग्य धरायच्या गोष्टी सुरु केल्या होत्या. हे कळाल्यावर राजांनी त्यांस पुन्हा पत्र पाठवले.

पत्रात राजे म्हणतात,"कार्य प्रयोजनाचे दिवस हे आहेती" शहाजी राजांचे आणि स्वतःचे (शिवरायांचे) उदाहरण डोळ्यासमोर ठेवून काही पुरुषार्थ आणि कीर्ति मिळवावी असा कळकळीचा सल्ला छत्रपति शिवाजी महाराजांनी व्यंकोजी भोसले यांस ह्या पत्रात दिला आहे.



*****************************************************************************************************************************************************************

11 May 2009

भाग २१ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४६) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७७ मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांना लिहिलेले दुसरे अत्यंत महत्त्वाचे असे पत्र ...

"माहाराजाचे पोटी जाहालियाचे सार्थक केले ऐसे होईल" या आशयाचे पत्र त्यांना शिवाजी राजांनी लिहून सुद्धा व्यंकोजीवर काही परिणाम झाला नाही. व्यंकोजी उलट महाराजांशी फटकून वागला आणि एवढेच नव्हे तर त्याने मराठ्यांच्या फौजेवरच हल्ला केला. अर्थात तो फसला आणि त्यात त्याचा पूर्ण पराभव झाला.

छत्रपति शिवाजी महाराजांनी त्यांस पुन्हा उपदेशात्मक पत्र लिहून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. ह्या पत्रात राजे म्हणतात,"गृहकलह बरा नव्हे." पुढे ते म्हणतात,"ऐकाल तर बरे. तुम्हीच सुखी पावाल. नाईकाल तरी तुम्हीच कष्टी व्हाल. आमचे काय चालते." ह्या नंतर मात्र व्यंकोजी भोसले शिवाजी महाराजांना येउन भेटले.



*****************************************************************************************************************************************************************

9 May 2009

भाग २० - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४५) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७६ मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांना लिहिलेले अत्यंत महत्त्वाचे असे पत्र ...


राजाभिषेकानंतर छत्रपति शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखली. गोवळकोंडयाच्या कुतुबशाही बरोबर सख्य करून विजापुरच्या आदिलशाहीचा नाश करायचा हे या मोहिमे मागचे सूत्र होते. १६७६-१६७७ ह्या २ वर्षात आदिलशाही बरीच खिळखिळी करण्यात राजे यशस्वी देखील झाले. याशिवाय तंजावर येथे त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले राज्य करत होते. त्यांनी स्वराज्य विस्ताराच्या कार्यात आपल्या सोबत यावे असे शिवरायांना वाटत होते.


छत्रपति शिवरायांनी १६७६ मध्ये "माहाराजाचे पोटी जाहालियाचे सार्थक केले ऐसे होईल" या आशयाचे पत्र लिहून त्यांना काही सल्ले दिले. पत्रात राजे म्हणतात,"आपला वाटा तुजजवळ मागावा त्या कामाचा हा कागद नव्हे."


'दक्षिणेमध्ये खवासखानाचा भाऊ नासरखानावर हल्ला करून जिंजी ताब्यात घ्यावी, बहलोलखानाचा हस्तक शेरखान याला मारून त्याचा मुलुख जिंकावा, असे राजकारणी सल्ले राजांनी व्यंकोजीला या पत्रात दिले आहेत.'


शहाजीराजांचा पूत्र म्हणुन राजांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये राज्य कसे निर्माण केले आणि मग १६७३ नंतर पन्हाळा, फोंडा आणि सातारा घेउन दक्षिणेकड़े कूच केले आणि विजापुरला कसे पराभूत केले ह्याचे सविस्तार वर्णन यापत्रात त्यांनी लिहिले आहे.




*****************************************************************************************************************************************************************


7 May 2009

भाग १९ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.



४४) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७० मध्ये आंबेजोगाईचे दासोपंत यांना लिहिलेले पत्र ...


मुघल सैन्य नेहमीच मठ आणि इतर धार्मिक स्थळाला नुकसान पोचवत असत. स्वराज्याची फौज मात्र त्याला अपवाद होती. जेंव्हा दासोपंत यांनी राजांना पत्र लिहून 'आम्हास फौजेचा उपद्रव होऊ नये' असे कळवले तेंव्हा राजांनी त्यांस पत्र पाठवले.

पत्रात राजे म्हणतात,"आपले गाव आहेति तिकडे आमचे लोक येणार नाहीत."



*****************************************************************************************************************************************************************

4 May 2009

भाग १८ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४३) छत्रपति शिवाजी महाराजांनी २ सप्टेम्बर १६६० रोजी देशमुख कान्होजी जेधें नाईक लिहिलेले पत्र ...


शहाजीराजांच्या काळापासून स्वराज्यकार्यात हातभार लावणारे देशमुख कान्होजी जेधें नाईक काही कारणाने आजारी पडले. त्यांनी स्वतःच्या जिविताची आशा सोडली. आपले देशमुखीचे वतन महाराजांनी आपल्या मुलांकड़े न चालवले तर त्यांचे कसे होईल ही चिंता त्यांना होती. तशी चिंता त्यांनी राजांना पत्र लिहून कळवली.

पत्रास उत्तर देताना राजे म्हणतात,"तरी आता नवे लिहिणे काय लागले. पहिलेच पासून तुम्हा आम्हात घरोबा आहे." ह्यापत्रात शिवरायांना कान्होजींबद्दल किती आस्था आणि प्रेम होते ते दिसून येते.



*****************************************************************************************************************************************************************

3 May 2009

भाग १७ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४२) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये पूणे परगण्यामधले देशमुख बापाजी आणि विठोजी सितोळे यांना लिहिलेले पत्र ...
पूणे परगण्यामधले देशमुख बापाजी आणि विठोजी सितोळे यांनी मुघलांच्या धामधूमीमुळे कर भरण्यास असमर्थ आहोत, त्यात काही सूट मिळावी असे शिवरायांना पत्र लिहून कळवले. उत्तरादाखल लिहीलेल्या पत्रात त्यांची विनंती मान्य करताना राजे म्हणतात," दस्त माफीक ईनामति खडनीचा वसूल घेतील."



*****************************************************************************************************************************************************************

26 Apr 2009

भाग १६ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४१) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७१ मध्ये कूड़ाळचा सुभेदार नरहरी आनंदराव यांना लिहिलेले पत्र ...

पोर्तुगीजांच्या ताब्यातील बारदेश प्रदेशात व्यापारी मीठ स्वस्त विकत असल्या कारणाने स्वराज्यामध्ये मीठ व्यापार मंदावला होता. येथील मीठ व्यापाराला उत्तेजन मिळावे म्हणुन राजांनी कूड़ाळ येथील सुभेदार नरहरी आनंदराव यांना पत्र लिहिले. पत्रामध्ये राजे म्हणतात," बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे."

मिठाचा व्यापार स्वराज्यामध्ये महत्वाचा व्यापार होता आणि त्यावर राजांचे बारीक लक्ष असे.

*****************************************************************************************************************************************************************

15 Apr 2009

भाग १५ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४०) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७६ मध्ये प्रभावळीचा सुभेदार रामाजी अनंत यांस लिहिलेले पत्र ...

शिवरायांचे शेती विषयक धोरण हा अभ्यासाचा मोठा विषय आहे. शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर अन्याय तर होऊ नयेच, तर त्यास योग्य त्या सवलती मिळाव्यात आणि राज्याचे उत्पन्न वाढावे असे विचार ह्या पत्रात व्यक्त करण्यात आले आहेत.

याशिवाय जमिन महसूलीची पद्धत, तगाई देणे, कर्जमुक्त करणे याबाबत सविस्तर विवेचन सदर पत्रामध्ये राजांनी केले आहे. ५ सप्टेम्बर १६७६ रोजी लिहिलेल्या ह्या पत्रामध्ये राजे म्हणतात,"येक भाजीच्या देठासहि मन नको."

(गेल्या काहीवर्षांपासून शेतकर्‍याच्या झालेल्या अवस्थेबद्दल बोलताना, हे पत्र प्रत्येक मामलेदार कचेरीमध्ये लावले पाहिले अशी सूचन बाबासाहेब पुरंदरे यांनी मध्ये एका कार्यक्रमात केली होती.)



*****************************************************************************************************************************************************************

13 Apr 2009

भाग १४ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

३९) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये प्रभावळीच्या सुभेदारास लिहिलेले पत्र ...

दाभोळ येथे नारळ अतिशय स्वस्त विकत असल्या कारणाने, त्याचा परिणाम आजूबाजुच्या कोकण परिसरात नारळाच्या व्यापारावर होऊ लागला, तेंव्हा राजांनी प्रभावळीच्या सुभेदारास पत्र लिहिले.

पत्रात राजे म्हणतात,"दाभोळास नारळ कमनिर्खे विकते हा अंमल कैसा आहे" पुढे राजे म्हणतात,"आम्ही ठरवून दिलेल्या दरातच नारळाची विक्री व्हावी." स्वराज्यामधल्या बारीक़ व्यापारावर सुद्धा राजांचे किती बारकाईने लक्ष्य होते हे या पत्रावरुन लक्ष्यात येते.


*****************************************************************************************************************************************************************

11 Apr 2009

भाग १३ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

३८) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७७ मध्ये सामान्य जनतेला उद्देशून लिहिलेले पत्र ...

छत्रपति शिवरायांनी २८ जानेवारी १६७७ रोजी सामान्य रयतेस उद्देशून पत्र लिहिले. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या आचारधर्माचे पालन करावे, सर्वांनी एकदिल होउन शत्रुचा पराभव करावा असे आवाहन त्यांनी ह्या पत्रात केले आहे. राजे म्हणतात,"सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा."



*****************************************************************************************************************************************************************