5 Nov 2010

शिवछत्रपतींचे व्यक्तिमत्व ... भाग २

ज्या दुर्मिळ पुस्तकातून मी पत्रे संकलित करून लिहितो आहे त्या पुस्तकाबद्दल आपण गेल्या भागात पहिले. काही पत्रांच्या संदर्भाने राजांबद्दल अधिक जाणून सुद्धा घेतले. ह्या भागात आपण राजांनी लिहिलेली राजकारण विषयक पत्रे बघूया...

येत्या १० नोव्हेंबर रोजी आहे ३५१ वा शिवप्रताप दिवस. शिवप्रतापदिवस म्हणजे ज्यादिवशी राजांनी प्रतापगडाच्या साक्षीने अफझलखानाला ठार मारले तो दिवस. जी जावळी घेण्यासाठी खान आला होता त्या जावळीकडे आणि तिथल्या चंद्रराव मोरेकडे राजांचे लक्ष १६५१ पासूनच होते. चंद्रराव मोरे याने जेंव्हा बीरवाडीच्या माल आणि बाजी पाटील यांची वतने बळकावली तेंव्हा त्यांनी येऊन शिवरायांपुढे गाऱ्हाणे मांडले. त्यांच्या अधिकारपणाला मान्यता देताना राजे म्हणतात,"तुम्ही अधिकारपण खाउनु अधिकारपणाची चाकरी करणे"  जेंव्हा खानाचे आक्रमण झाले तेंव्हा राजांनी त्याला पाठवलेल्या पत्राचा स्वैर मराठी अनुवाद तुम्हाला येथे वाचता येईल. पत्रात राजांनी खानाच्या सैन्याला जावळीच्या खोऱ्यात जगातल्या सर्व सुखसोयी उपभोगता येतील असे म्हटले होते. अर्थात त्यांना कश्या सुखसोई पोचवल्या गेल्या हे सर्वश्रुत आहेच!!! खानस्वारी पाठोपाठ मुघलांनी शास्ताखानाला (शाहिस्तेखानाला) दख्खन मोहिमेवर धाडले. औरंगाबादवरून निघालेल्या शाही फौजा थेट पुण्यात शिरल्या आणि सर्वत्र नासधूस करू लागल्या. ह्यात मावळामधल्या लोकांची जीवित व वित्तहानी खुप होत असे. आपल्या प्रजेबद्दल सदैव जागरुक असणाऱ्या राजांनी रोहिडखोरे मधील कारी येथील देशमूख सर्जेराव जेधे यांना २३ ऑक्टोबर १६६२ रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,"जे बांद धरून नेतील त्याचे पाप तुमचा माथा बसेल" ह्या पत्रामधून राजांची आपल्या रयतेविषयी असणारी काळजी व तळमळ दिसून येते.

१६५९ च्या शेवटाला केलेला खानवध आणि नंतर कोल्हापूरपावेतो मारलेली धडक, पन्हाळा आणि जुलै १६६० मधला बाजी-फुलाजी प्रभूंचा भीम पराक्रम, वेढ्यातून सुटून आल्यावर १६६३ मध्ये खुद्द शाहिस्तेखानाची राजांनी छाटलेली बोटे ह्या सर्वात दख्खन पेटून उठले होते. गेल्या ३-४ वर्षात दख्खनेत झालेली हानी भरून काढण्यासाठी राजांनी सुरत बेसुरत करून प्रचंड लुट प्राप्त केली. आत्मविश्वास कैक पटींनी वाढलेल्या राजांनी दख्खन मुघल सुभेदाराला पत्र पाठवले. मूळ पत्र फारसीमध्ये असले तरी त्याचा मराठी अनुवाद येथे देत आहे. स्वराज्य निर्मितीसोबत त्याचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी आक्रमकांशी युद्ध खेळण्यास जागृक राहणे याची पूर्ण जाणीव त्यांना होती. ह्या पत्रातून त्यांचा आत्मविश्वास आणि निर्धार दिसून येतो.ह्या पत्रात राजे म्हणतात,"आपल्या भुमीचे संरक्षण करणे हे माझे कर्त्तव्य आहे आणि मी आपले कर्तव्य बजावण्यास कधीही चुकणार नाही." हे संपूर्ण पत्र वाचावे असे आहे.

"आज तीन वर्षे बादशहाचे मोठे मोठे सल्लागार आणि योद्धे आमचा प्रदेश काबीज करण्यासाठी चालून येत आहेत, हे तुम्हा सर्वांस माहिती आहेच. बादशहा हुकुम फर्मावतात,'शिवाजीचा मुलुख आणि किल्ले काबीज करा.' आणि तुम्ही जवाब पाठविता 'आम्ही लवकरच काबीज करतो.'

आमच्या या दुर्गम प्रदेशात कल्पनेचा घोडा सुद्धा नाचविणे कठीण आहे, मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला? भलत्याच खोट्या बातम्या लिहून पाठवण्यात तुम्हाला लाज कशी वाटत नाही? (विजापूरचे) कल्याणी आणि बिदरचे किल्ले उघड्या मैदानात होते ते तुम्ही काबीज केले. आमचा प्रदेश अत्यंत डोंगराळ आहे. नदी-नाले उतरून जाण्यास वाट नाही. अत्यंत मजबूत असे साठ किल्ले माझे आज तयार आहेत. पैकी काही समुद्र किनाऱ्यावर आहेत. बिचारा अफझलखान जावळीवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्यूमुखी पडला. हा सर्व प्रकार तुम्ही बादशहास का कळवीत नाही? अमीर उल उमराव शाहिस्तेखान आमच्या या गगनचुंबित डोंगरात आणि पाताळात पोचणाऱ्या खोऱ्यांत तीन वर्षे सारखा खपत होता. 'शिवाजीचा पाडाव करून लवकरच त्याचा प्रदेश काबीज करतो' असे बादशहाकडे लिहून लिहून थकला. ह्या खोडसाळ वर्तनाचा परिणाम त्याला भोवला. तो परिणाम सूर्यासारखा सर्वांच्या समोर आहे.

आपल्या भूमीचे संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि तुम्ही बादशहाकडे कितीही खोट्या बातम्या लिहून पाठवल्या तरीही मी माझे कर्तव्य बजावण्यास कधीही चुकणार नाही."

 
१६६४ मध्ये आदिलशाही सरदार खवासखान याने शिवरायांवर स्वारी केली. राजे पुन्हा एकदा कोकणात उतरले आणि त्यांनी विजापूरचा प्रदेश अधिक जोमाने काबीज करायला सुरवात केली. खवासखान, बाजी घोरपडे आणि खेम सावंत या त्रिकुटाचा शिवरायांनी एकत्र न होऊ देता एकएकटे पाडून बिमोड केला शिवाय पोर्तुगीज मुलुख सुद्धा काबीज केला तेंव्हा त्यांना धाक बसून त्यांनी नजराणा देखील पाठवला. आपल्या आऊसाहेब जिजामाता यांस लिहीलेल्या पत्रात ते म्हणतात,"स्वामींचे पुण्यप्रतापें आज्ञेप्रमाणे घडून आलें."  राजांनी संपूर्ण कोकणावर ताबा मिळवत आता सिंधूदुर्गाचा पाया घातला आणि आपला आरमारी दरारा वाढवा म्हणून पहिली आरमारी मोहीम काढली. १६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. पुरंदरचा तह हा मराठा इतिहासामध्ये एक मैलाचा दगड ठरला. हा तह व्हायच्या आधी राजांनी जयसिंगला एक विस्तृत पत्र लिहिले होते. त्याबद्दल आपण पुढच्या भागात माहिती घेऊ...