24 Jan 2010

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... २. दुर्गम-दुर्ग ... !


गेल्या भागात पाहिल्याप्रमाणे जसे कुठल्याही राजाकडे मंत्रशक्ती, उत्साहशक्ती आणि प्रभुशक्ती हे बलाचे ३ प्रकार असणे आवश्यक असते तसेच कुठल्याही राजा आणि राज्याची ४ बलास्थाने असतात. कोश(खजिना), सैन्य(लश्कर), दुर्ग आणि सुह्रदय(अरिमित्र). ह्यातील प्रभुशक्ती मधल्या एका म्हणजेच 'कोश' या बलस्थानाबद्दल आपण गेल्या भागात थोड़ी माहिती घेतली. प्रभुशक्ती मधल्या 'सैन्य' या दुसऱ्या बलस्थानाचा वापर करून राजांनी कोश-संचय कसा केला हे सुद्धा पाहिले. छत्रपति शिवरायांनी शत्रुच्या मूलखातून गोळा केलेल्या धनामधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम-दुर्ग उभारले. जे बनले 'संपूर्ण राज्याचे सार'. आज आपण छत्रपति शिवरायांच्या 'दुर्गम-दुर्ग' या बलस्थानाबद्दल जाणून घेऊ. राजांनी स्वराज्याचे संपूर्ण S.W.A.T. Analysis (Strengths, Weaknesses, Opportunities, and Threats) केलेले होते असेच म्हणावे लागेल. शिवकाळात 'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग' हा विचार प्रकर्षाने जाणवतो. परकियांच्या आक्रमणापासून जर राष्ट्ररक्षण करायचे असेल तर गड-कोट, किल्ले-दुर्ग ही ठाणी अधिक मजबूत करावी लागतील हे त्यांच्या लक्ष्यात आले होते. 'सह्याद्री' हे आपले प्रमुख बलस्थान असल्याचे शिवरायांना ठावूक होतेच. स्वराज्याची स्थापनाच मुळात गड-किल्ल्यांवरुन झाली. विविध प्रकारचे दुर्ग राजांनी जिंकले, ओस पडलेले ताब्यात घेतले. अनेक नव्याने बांधले. यात अनेक गिरिदुर्ग होते, वनदुर्ग देखील होते. जलदुर्ग होते तसे भूदुर्ग देखील होते. एक गोष्ट इकडे प्रकर्षाने मांडावीशी वाटते ते म्हणजे शिवरायांनी गड आणि किल्ला यात योग्य फरक केला. 'राजव्यवहारकोश'प्रमाणे गिरिदुर्ग म्हणजे 'गड' तर भूदुर्ग म्हणजे 'किल्ला'. जो-जो दुर्ग शिवरायांच्या अधिपत्याखाली आला त्याला त्यांनी 'गड' हे नाम पुढे जोडले. उदा. पन्हाळा - पन्हाळगड, विशाळा - विशाळगड,  कोंढाणा - सिंहगड, रायरी - रायगड, तोरणा - प्रचंडगड. अशी किती तरी उदा. देता येतील.

स्वतः शिवरायांनी किल्ल्यांचे महत्त्व खालील शब्दात वर्णन केले आहे. "जैसे कुळबी शेतास माळा घालून शेत राखितो, तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत. तारवांस खीळे मारून बळकट करितात तशी राज्यास बळकटी किल्यांची आहे. किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्याची उमर गुजरून जाईल. आपणास धर्मस्थापना व राज्यसंपादन करणे होय. सर्वांस अन्न लावून, शत्रुप्रवेश न होय ते किल्ल्यांमुळे होते. सर्वांचा निर्वाह आणि दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे-जुने तीनशेसाठ किल्ले हजरतीस आहेत. एक-एक किल्ला वर्ष-वर्ष लढला, तरी तीनशेसाठ वर्षे पाहिजेत." आणि पुढच्या पन्नास वर्षात सह्याद्रीने तेच अनुभवले. असेच नाही बनले शिवराय 'जाणता राजा' ... !!! 'थोरले महाराज यांनी हे राज्य गडावरुन निर्माण केले' आणि 'गड होते म्हणुन राज्य मात्र अवरिष्ट राहिले' या आज्ञापत्रातील २ वाक्यांवरुन शिवकाळातील गडांची महती स्पष्ट होते. रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात ८ व्या प्रकरणात किल्ल्यांचे महत्त्व, त्यांची रचना व व्यवस्था यावर उहापोह केला आहे. त्यात म्हटले आहे की "गड़कोट हेच राज्य, गड़कोट म्हणजे राज्याचे मुळ, गड़कोट म्हणजे खजिना, गड़कोट म्हणजे सैन्याचे बळ, गड़कोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गड़कोट म्हणजे आपली वसतिस्थळे, गड़कोट म्हणजे सुखनिद्रागार किंवा गड़कोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण." प्रत्येक किल्ला व त्यासभोवतालचा प्रदेश हा शिवरायांच्या राज्यमालिकेतला एक घटकावयव होता. त्यांनी बहुतेक अचाट कृत्ये ह्या किल्ल्यांच्या सहाय्याने तडिस नेली. मिळवलेला बहुसंख्य कोश-संचय नविन किल्ल्यांची बांधणी व पुर्नरचना यावर खर्च झाला. अश्या दुर्गम दुर्गांचे शासन सुद्धा परम उग्र होते. राजाभिषेकानंतर श्री शिवछत्रपति महाराजांनी प्रधानमंडळ कानून जाबता यामध्ये कलम १२ गडांबद्दल लिहिले होते. ते अशाप्रकारे,"किले-कोट, ठाणे जंजिरे येथील कायदे करून दिल्हे त्याप्रमाणे हवालदार, सुभेदार, कारखानीस, सरनौबत, सबनीस, तटसरनौबत लोक यांचे जाबते करून दिल्हे त्याप्रमाणे चालऊन सावधानतेनें स्थळे रक्षावी. तगिरी-वहाली हुजुरु न व्हावी, बजमी नेमणूक तालूकादार यांजकडे दरवाजा, किल्या, हवालदार,याचा हुकुम सिके त्याचे नावाचे. कारखानीसी जाबता अलाहिदा करणें."


१८ व्या शतकात मराठ्यांचा इतिहासावर पहिला शोध ग्रंथ लिहिणारा ग्रँट डफ म्हणतो, "किल्ल्यातून आत बाहेर कोणी केंव्हा जाणे, गस्ती फिरणे, चौक्या सांभाळणे व त्यावर देखरेख करणे, पाणी, धान्यसामुग्री व युध्दसामुग्री इत्यादी तयार ठेवणे यागोष्टीं वरती अगदी सक्तीचे सुक्ष्मनियम शिवाजीने केलेले असून प्रमुख शाखेवरील मुख्य अधिकाऱ्याची बारीक कामेसुद्धा ठरवलेली होती आणि ते नियम मोडण्यास तीळभर सुद्धा जागा नव्हती. इतके असून त्याचा ह्या बाबींचा खर्च फारच काटकसरीने बांधलेला होता." तर डग्लस म्हणतो, "शिवाजीचे वास्तव्य डोंगरी मुलुखातच होते व त्याचे सामर्थ्य डोंगरी प्रदेशाच्या भरवश्यावरच होते. तो ख़राखुरा दुर्गस्वामी होता. त्याचा जन्म दुर्गात झाला. त्याला जे वैभव प्राप्त झाले ते दुर्गांच्यामुळे आणि त्याच्या दुर्गान्ना जे सामर्थ्य प्राप्त झाले तेही त्याच्याच प्रयत्नाने झाले. त्याचे दुर्ग म्हणजे भारतातील त्याच्या शत्रूंना धाक होता. त्याच्या राष्ट्राची ती संवर्धनभूमी होती. त्याच्या विजयाचा तो पाया होता. त्याच्या वाढत्या महत्वाकांक्षेचा तो जिना होता. दुर्ग हेच त्याचे निवासस्थान व तेच त्याच्या आनंदाचे निधान होते. कित्येक दुर्ग त्याने स्वतः बांधले आणि जे आधी बांधलेले होते, त्यासर्वांना त्याने बळकटी आणली." छत्रपति शिवरायांनी कोश-संचय करून दुर्ग आणि सैन्य वाढवले. तर सैन्य आणि दुर्गांवरुन राज्य निर्माण केले. 'सह्याद्री'च्या भुगोलाचा वापर करून एक विशिष्ट युद्धपद्धती, विशिष्ट युद्धतंत्र विकसित केले. मराठ्यांची युद्धपद्धती नेमकी काय होती? त्यांची लष्करी व्यवस्था कशी होती? या संबंधाने 'सैन्य या तिसऱ्या बलस्थानाबद्दल आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत ...
.
.
संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य), शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी) आणि अथातो दुर्गजिज्ञासा (लेखक- प्र. के. घाणेकर).
.
.

22 Jan 2010

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... 1. कोशबल ... !

प्राचीन राजनीतीपर ग्रंथांमध्ये बलाचे ३ प्रकार सांगितले आहेत.
मंत्रशक्ती, उत्साहशक्ती आणि प्रभुशक्ती.

मंत्रशक्ती म्हणजे राजा आणि त्याचे प्रधानमंडळ यांचे राजनैतिक नैपुण्य आणि परिस्थिति - काळानुरूप निर्णय घेण्याची शक्ती. उत्साहशक्ती म्हणजे राजा, प्रधानमंडळ आणि त्यांचे सैन्य हे किती पराक्रमी आहेत, त्यांच्या अंगीभूत शौर्य किती आहे, ह्यावर अवलंबून असलेली शक्ती. तर प्रभुशक्ती म्हणजे राजाची आणि राज्याची कोश (खजिना) आणि सैन्य (लश्कर) यांची ताकद. 'सैन्य पोटावर चालतात' हे जसे खरे तसेच सैन्य असल्याशिवाय कोशाची वाढ कशी होणार? तेंव्हा कोश आणि सैन्य एकमेकास पूरक असतील तरच राजाचे सामर्थ्य शाबूत राहते. महाभारतात म्हटले आहे की,"कोशबल अनुकूल असेल तरच राजाला सैन्य बाळगता येते. सैन्य पदरी असेल तरच राजा धर्माचे रक्षण करू शकतो. आणि धर्मरक्षण झाले तरच प्रजेचे संरक्षण होते." (येथील धर्माची व्याख्या जाणकार वाचकांच्या लक्ष्यात आली असेलच. आज काल 'धर्म'व्याख्या बरीच बदलली आहे याकारणे लिहिले आहे)

छत्रपति शिवरायांकडे यापैकी मंत्रशक्ती आणि उत्साहशक्ती उपलब्ध होती हे सांगणे न लगे. तिसरे बलस्थान जे प्रभुशक्ती (कोश आणि सैन्य) ते राजांनी क्रमाक्रमाने मंत्रशक्ती आणि उत्साहशक्ती वापरून वाढवले. S.W.A.T. अनालिसीस (Strengths, Weaknesses, Opportunities, and Threats) वर आपण जो अभ्यास आत्ता करतोय ना; तो ह्या जाणत्या राजाने ३५० वर्षांपूर्वीच आपल्या समोर मांडलाय की... कधी विचार केलाय ह्या दृष्टीने शिवचरित्राचा??? Strengths म्हणजे त्यांची बलस्थाने अगदीच मोजके होती. सोबत होती ती मंत्रशक्ती आणि थोड़ीफार उत्साहशक्ती, मोठ्या प्रमाणावर जवळ होते ते म्हणजे Weaknesses. थोडक्यात कमी सैन्य, रीता असलेला खजिना. आसपास Opportunities खुप होत्या मात्र. त्यावर तर त्यांनी स्वतःचे Strengths वापरले आणि स्वराज्य उभे केले. त्यांच्या भोवती सर्वत्र Threats होतेच की. उजवीकडे किंवा वर सरकले की मुघल. खाली सरकले की आदिलशाही. पश्चिमेला सिद्दी अणि थोडं खाली पोर्तुगीझ. शिवरायांच्या वेळच्या मर्यादा लक्षात घेता कोश-संचय ही एक प्रचंड कठीण बाब होती. उत्पन्नाची साधने सर्व बाजूंनी मर्यादित असताना स्वराष्ट्र रक्षण आणि प्रजारक्षण करणे हे किती कर्मकठीण काम आहे हे लगेच समजुन येतेच. पण येथे त्यांने मंत्रशक्ती वापरून 'आर्थिक व्यवस्थापन' केले आहे. एक महत्वाची बाब या ठिकाणी लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे प्रजेला अंतर्गत आणि बाह्य शत्रुंपासून कुठलेही नुकसान होऊ नये म्हणुन राजांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी मोठ्याप्रमाणावर आवश्यक असलेले कोशबल सुद्धा न्यायमार्गाने उभे केले. राजांनी संपूर्ण कोश-संचय हा न्यायमार्गाने केलेला आहे. आता आपण बघुया त्यावेळी त्यांच्याकडे उत्पन्नाची कुठली-कुठली साधने उपलब्ध होती...


हिंदवी स्वराज्याच्या कोश-संचयाचे प्रमुख साधन होते ते शेतकऱ्याकडून वसूल करण्यात येणारा जमीन महसूल उर्फ़ शेतसारा. शिवरायांचे 'शेती विषयक धोरण' हा अभ्यासाचा मोठा विषय आहे. शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर अन्याय तर होऊ नयेच, तर त्यास योग्य त्या सवलती मिळाव्यात आणि राज्याचे उत्पन्न वाढावे असे विचार त्यांनी एका पत्रातून व्यक्त केले आहेत. जमिन महसूलीची पद्धत, तगाई देणे, कर्जमुक्त करणे याबाबत सविस्तर विवेचन सदर पत्रामध्ये राजांनी केले आहे. सदर पत्र येथे वाचू शकता. पत्रामध्ये राजे म्हणतात,"येक भाजीच्या देठासहि मन नको." संपूर्ण न्याय मार्गाने शेतसारा वसूलीची चोख पद्धत राबवून जहागीरदार, मिरासदार आणि वतनदारांवर पूर्ण लगाम ठेवत संपूर्ण उत्पन्न सरकारी खजिन्यात जमा केले जायचे. शेतकरी प्रजा आणि शासन यांमध्ये कोणीही मध्यस्त असणार नाहीत याची त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली होती. बरीच वतन त्यांनी अनामत केली आणि जी उरली त्यांना 'देशाधिकाऱ्याच्या आज्ञेत वागावें' असे स्पष्ट बंद होते. देशाधिकाऱ्याला 'कानून जाबता' लागू होताच. शिवरायांच्या वेळी सुद्धा सारा काही कमी नव्हता. उत्पन्नाच्या २/५ तक्षिमा इतका होता. तक्षिमा म्हणजे विभाग. २/५ म्हणजे ४० टक्के इतका सारा भरावा लागायचा. तरी सुद्धा ही मांडणी लोकांनी खुशीने मान्य केली होती. ह्याचे कारण होते पक्षपातरहित निर्दोष अंमलबजावणी. ह्या साऱ्याने स्वराज्याचा खजिना मोठ्या प्रमाणावर समृद्ध होत होता. त्यांनी प्रजेवर जादाकर कधीच लादले नाहीत. राजाभिषेकप्रसंगी झालेला खर्च सुद्धा त्यांनी वतनदारांवर 'सिंहासन पट्टी' बसवून वसूल केला. त्यासाठी त्यांनी जनतेला वेठीस धरले नाही.


शेतसाऱ्या बरोबरच व्यापार-उदीम हे उत्पन्नाचे अजून एक महत्वाचे माध्यम होते. शिवरायांनी आपला राज्यात व्यापार वाढीसाठी अनेक उपाय योजना केल्या होत्या. व्यापार वाढीसाठी राज्यात शांतता - सुव्यवस्था महत्वाची असते. तसेच सुरवातीला कमी कर घेउन व्यापाराला प्रोत्साहन देणे सुद्धा गरजेचे असते. छत्रपति शिवरायांचे 'व्यापार विषयक धोरण' हा सुद्धा अभ्यासाचा मोठा विषय आहे. कोकण भागावर पूर्ण नियंत्रण मिळवल्यावर राजांनी मिठाचा मोठा व्यापार सुरू केला होता. या संदर्भात छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७१ मध्ये कूड़ाळचा सुभेदार नरहरी आनंदराव यांना लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. त्यात राजे म्हणतात,"बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे." पोर्तुगीजांच्या ताब्यातील बारदेश प्रदेशात व्यापारी मीठ स्वस्त विकत असल्याकारणाने स्वराज्यामध्ये मीठ व्यापार मंदावला होता. येथील मीठ व्यापाराला उत्तेजन मिळावे म्हणुन राजांनी नरहरी आनंदराव यांना सदर पत्र लिहिले. या वरुन लक्षात येते की राजांचे व्यापारावर किती बारीक लक्ष असे. मिठाने भरलेली मराठा जहाजे व्यापारासाठी मस्कतपर्यंत जात असत. छत्रपति शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये प्रभावळीच्या सुभेदारास लिहिलेले अजून एक पत्र उपलब्ध आहे. पत्रात राजे म्हणतात,"दाभोळास नारळ कमनिर्खे विकते हा अंमल कैसा आहे" पुढे राजे म्हणतात,"आम्ही ठरवून दिलेल्या दरातच नारळाची विक्री व्हावी." दाभोळ येथे नारळ अतिशय स्वस्त विकत असल्या कारणाने, त्याचा परिणाम आजूबाजुच्या कोकण परिसरात नारळाच्या व्यापारावर होऊ लागला, तेंव्हा राजांनी प्रभावळीच्या सुभेदारास सदर पत्र लिहिले होते. स्वराज्यामधल्या बारीक़ व्यापारावर सुद्धा राजांचे किती बारकाईने लक्ष्य होते हे या पत्रावरुन लक्ष्यात येते. ज्याप्रमाणे स्वतःच्या राज्याच्या व्यापाराला प्रोत्साहन देणे आवश्यक असते तसेच इतर राज्यातील व्यापाराला देखील उत्तेजन देऊन आपल्या राज्यात आणावे लागते. शत्रुपक्षाकडील व्यापारयाच्या नावेस व मालास 'तसनस' न करता ते बंदरात न्यावे आणि वरिष्ट अधिकारी यांनी त्यासंबंधी न्याय-निवाडा करावा असे स्पष्ट आदेश तेथील अधिकाऱ्याला होते.  कोश-संचयाच्या दृष्टीने त्यांनी कोकण किनाऱ्यावरील व्यापार आणि बाहेरील मालावरील आयात कर यावर विशेष भर दिला होता.

याशिवाय काही अनियमित उत्पन्न सुद्धा होते. जसे इतर राजांकडून, त्यांच्या वकीलांकडून येणारे भेटवस्तू, नजराणे आणि पेशकश. शेती आणि व्यापार ही कोश-संचयाची प्रमुख साधने होतीच पण त्या शिवाय अजून एक महत्वाचे साधन होते ते म्हणजे 'विक्रमार्जीत धन'. शत्रुकडून वसूल केलेली खंडणी आणि युद्धखर्चाची रक्कम म्हणजे विक्रमार्जीत धन. स्वराज्याच्या चहुबाजुस पसरलेल्या शत्रुंवर राजांनी वेळोवेळी मोहिमा काढून अश्याप्रकारे धन प्राप्त केले होते. या मोहिमेचे उद्दिष्ट हे शत्रुचा प्रदेश जिंकणे नसून फ़क्त रिता झालेला खजिना भरून काढणे इतकेच होते. खजिना लुटून शत्रुस दुर्बल करणे आणि स्वतः बलवान होणे यासाठी अश्या मोहिमा शिवरायांनी वेळोवेळी यशस्वी केल्या. यांमध्ये १६५६ ला उघडलेली कल्याण-भिवंडीची मोहीम, १६६० मधील आदिलशाही वरील स्वारया, १६६४, १६७० मधील सूरत येथील स्वारी, मुघलांच्या बूर्ह़ाणपुर - खानदेश या भागात उघडलेल्या १६७५, १६७७ आणि १६७९ मधील स्वाऱ्या, करंज्यामधली (१६७२), अथणी (१६७५), श्रीरंगपट्टण (१६७७), हुबळी (१६७७) आणि जालना (१६७९) या व अश्या अनेक यशस्वी स्वाऱ्या शामील आहेत. या सर्व मोहिमा कोशवृद्धिचे एक महत्वाचे साधन होते. मात्र या सर्व मोहिमेत शत्रुपक्षाच्या राज्यातील सामान्य जनतेसही तोशीस लावू नये असे स्पष्ट आदेश मराठा सैन्यास होते. प्रभुशक्तिची म्हणजेच कोश (खजिना) आणि सैन्य (लष्कर) यांची ताकद शिवरायांनी क्रमाक्रमाने नियोजन रित्या वाढवली. शत्रुच्या मूलखातून गोळा केलेल्या धनामधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम-दुर्ग उभारले. जे बनले 'संपूर्ण राज्याचे सार'. त्याबद्दल आपण पुढील भागात जाणून घेऊ...
.
.
संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य) आणि शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)
.
.

21 Jan 2010

छत्रपति शिवरायांचे जाहीरनामे - 'कानून जाबता' ... !

ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी, शके १५९६ या दिवशी 'महाराजांनी शिरी छत्र धरले. राजे चक्रवर्ती सम्राट झाले. मराठा राजा छत्रपती जाहला ही गोष्ट सामान्य नाही जाहली.' राजाभिषेकानंतर ३ दिवसात म्हणजे 'ज्येष्ठ वद्य प्रतिपदेस' श्री शिवछत्रपति महाराजांनी ३ जाहीरनामे प्रसिद्द केले. तर चौथा जाहिरनामा राजाभिषेकानंतर १५ दिवसात म्हणजे 'ज्येष्ठ वद्य त्रयोदशीस' घोषीत झाला. हे सर्व जाहीरनामे 'कानून जाबता' म्हणुन ओळखले जातात. थोडक्यात राजाभिषेकानंतर २ आठवडयामध्ये राज्यव्यवहार पद्धती कशी असेल ते छत्रपति शिवरायांनी पूर्णपणे स्पष्ट केले होते. अर्थात आधी सुद्धा हीच राज्यव्यवहार पद्धत अमलात असली पाहिजे; राजाभिषेक हे जाहीर करायला एक निमित्त ठरले असावे.

  •  जाहीर झालेले ४ कानून जाबते खालीलप्रमाणे -
१) जाबता चिटणीसी लिहीण्याचा - एकूण कलमे १२
२) जाबता लष्कर सरनौबत - एकूण कलमे ८
३) जाबता कारखानीशी आणि सबनीशी लिहीण्याचा - एकूण कलमे २२ (कारखानीशी १४ आणि सबनीशी ८ कलमे)
४) प्रधानमंडळ - एकूण कलमे २०

आपण 'प्रधानमंडळ' ह्या जाबत्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. छत्रपति शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांची कार्ये व जबाबदाऱ्या थोडक्यात खालीलप्रमाणे होते -
१) मोरोपंत पिंगळे (पंतप्रधान / पेशवा) : सर्व राजकार्य, राजपत्रावर शिक्का, ताब्यात असलेल्या प्रदेशचे रक्षण व व्यवस्था, युद्ध.
२) रामचंद्र निळकंठ (अमात्य / मुजुमदार) : जमाखर्च, दप्तरदार व फडणीस यांवर देखरेख, खात्याशी संबंधित असलेल्या कागदांवर शिक्का, युद्ध.
३) अण्णाजी दत्तो (सचिव / सुरनीस) : राजकार्यविषयक सर्व जबाबदारी, युद्ध.
४) रामचंद्र त्रिंबक (सुमंत / डबीर) : परराज्यविषयक कार्याचा विचार, युद्ध.
५) हंबीरराव मोहिते (सेनापती / सरनौबत) : सैन्यविषयक जबाबदारी, युद्ध.
६) दत्ताजी त्रिंबक (मंत्री / वाकनीस) : अंतर्गत राजकारणाचा विचार, हेर खाते, युद्ध.
७) रघुनाथराव (पंडितराव) : धर्मा-धर्म विचार.
८) रावजी निराजी (न्यायाधीश) : तंटे, न्याय-निवाडा.
 
 
कानून जाबता : प्रधान मंडळ

क्षत्रिय कुलावतंस राजा शिवछत्रपति
राजाभिषेक शके १, आनंदनाम संवत्सरे,
ज्येष्ठ वद्य त्रयोदशी, भोमवासर-

१. मुख्य प्रधान यांणी सर्व राजकार्य करावे; राजपत्रावरी शिक्का करावा; सेना घेउन युद्धप्रसंग स्वारी करावी, तालुका ताबिनात स्वाधीन होइल त्यास रक्षून बंदोबस्त करून आज्ञेत वर्तावें व सर्व सरदार, सेना यांजबरोबर जावें आणि सर्वसंमत चालावें.
येणेप्रमाणे कलम १.

२. अमात्य यांणी सर्व राज्यांतील जमाखर्च चौकशी करून दप्तरदार, फडणीस यांचे स्वाधीन असावें; लिहिनें चौकशीनें आकारावें; फडणीशी, चिटणीशी पत्रांवर चिन्ह संमत करावे; युद्धप्रसंग करावें. तालुका जतन करून आज्ञेतं चालावें.
येणेप्रमाणे कलम १.

३. सचिव यांणी राजपत्र शोध करून अधिक-उणे मजकूर शुद्ध करावी. युद्धप्रसंग करून तालुका स्वाधीन होइल तो रक्षून आज्ञेतं वर्तावें. राजपत्रावर चिन्ह संमत करावें.
येणेप्रमाणे कलम १.

४. मंत्री यांणी सर्व मंत्रविचार राजकारण यांतील सावधतेनें आमंत्रण, निमंत्रण, वाकनिशी यांचे स्वाधीन. तालुका जतन करून युद्धादि प्रसंग करावें. राजपत्रावर संमत चिन्ह करावें.
येणेप्रमाणे कलम १.

५. सेनापती यांणी सैन्य रक्षण करून युद्धप्रसंग स्वारी करावी. तालुका स्वाधीन होइल तो रक्षून हिशोब रुजू करून आज्ञेतं वर्तावें व फौजेचे लोकांचे बोलणे बोलावें. सर्व फौजेचे सरदार यांणी त्याजबरोबर चालावें.
येणेप्रमाणे कलम १.

६. पंडितराव यांणी सर्व धर्माधिकार, धर्म, अधर्म पाहून विचिक्षा करावीं. शिश्टांचे सत्कार करावे. आचार, व्यवहार, प्रायश्चितपत्र होतील त्यावर संमत चिन्ह करावें. दान-प्रसंग, शांती अनुष्ठान तत्काळी करावें.
येणेप्रमाणे कलम १.

७. न्यायाधीश यांणी सर्व राज्यातील न्याय-अन्याय मनास आणून बहुत धर्में करून न्याय करावें. न्यायाची निवडपत्रे यांजवर संमत चिन्ह करावें.
येणेप्रमाणे कलम १.

८. सुमंत यांणी परराज्यातील विचार करावा. ज्यांचे वकील येतील त्यांचे सत्कार करावें. राजपत्रावर संमत चिन्ह करावें.
येणेप्रमाणे कलम १.

९. चिटणीस यांणी सर्व राज्यातील राजपत्रे ल्याहावीं. राजकारण-पत्रें, उत्तरें ल्याहावीं. सनदी , दान पत्रें वगैरे महालीं, हुकुमी यांचा जाबता, फडणीशी, चिटणीशी अलाहिदा त्याप्रमाणें ल्याहावें. हातरोखा, नाजुक पत्रें, यांजवर मोर्तब अथवा ख़ास दस्तक. मात्र वरकड़चा दाखला, चिन्ह नाहीं, चिटणीसांनीच करावें.

येणेप्रमाणे कलम १.

१०. फौजेचे सबनीस, बक्शी यांणी सर्व फौजेची हाजरी चौकसी करावी. यादी करून समजावावें. रोज्मरा वाटणें, सत्कार करावा. युद्धादि प्रसंग करावा.
येणेप्रमाणे कलम १.

११. सेनाधुरंधर यांणी बिनी करावी. आघाडीस जावें, उतरावें. फडफर्मास जमा करावीं. लुट करणें मना करणें. चोकसी-ताकीद यांजकडे, पुढे असोन सेना रक्षण करावी.
येणेप्रमाणे कलम १.

१२. किले-कोट, ठाणे जंजिरे येथील कायदे करून दिल्हे त्याप्रमाणे हवालदार, सुभेदार, कारखानीस, सरनौबत, सबनीस, तटसरनौबत लोक यांचे जाबते करून दिल्हे त्याप्रमाणे चालऊन सावधानतेनें स्थळे रक्षावी. तगिरी-वहाली हुजुरु न व्हावी, बजमी नेमणूक तालूकादार यांजकडे दरवाजा, किल्या, हवालदार,याचा हुकुम सिके त्याचे नावाचे. कारखानीसी जाबता अलाहिदा करणें.
येणेप्रमाणे कलम १.
१३. अष्टप्रधान यांजकडे देहे तालुके व स्वारीस जाणें त्यास मुतालिक करून दिलें. त्यांणी सेवा व्यापार चालवावा. हुजुर रहावें.
येणेप्रमाणे कलम १.


१४. सुभे, मामले, तालुकादार यांस ज्याच्याकडे जें नेमलें त्यांणी जाबतेप्रमाणें चालवावे. हुजुरचे दरखदार, चिटणीस, फडणीस, मुजुमदार यांचे इतल्याने चालून हिशोब गुजरावें.
येणेप्रमाणे कलम १.

१५. बारा महालांचे अधिकारी यांणी आपलाले काम दुरुस्त राखुनु हिसेब आकारून दप्तरांत गुजरावें.
येणेप्रमाणे कलम १.

१६. दरुणी महालांचे काम दिवाण नेमून दिल्हे यांणी सर्व पाहून करावें. चिटणीस, फडणीस यांणी आपलाले दरखाचे कागदपत्र ल्याहावें. त्यावर निशान, चिन्ह दिवाणानी करून वाडयास समजाउन मोर्तब साक्ष करावें.
येणेप्रमाणे कलम १.


१७. पोतनीस यांणी पोत जमाखर्च लिहिणे करावें. नजर पेश कशी जमा करावी. पोतदार यांनी पारख करावी.

येणेप्रमाणे कलम १.

१८. अष्टप्रधान यांजकडे देहे तालुके व स्वारीस जावयास दखरदार सर्व हुजुरचे जावे. त्याचे दाखल्यानी व्यवहार करावा. स्वारीस जाणें त्यास मुतालिक करून दिल्हे त्यांणी सेवा-व्यापार चालवावा. हुजुर रहावें.
येणेप्रमाणे कलम १.

१९. आबदारखाना चिटणीस याजकडे सराफखानासुधा अधिकार सांगितला. मजालसी, अत्तर-गुलाब, व हार-तुरे व फळफळावळ खुशवाई खरी जमाखर्च यांणी करून हिशेब दप्तरी गुजरावा.

येणेप्रमाणे कलम १.

२०. पागा जुमलेदार यांणी कैद करून दिल्ही त्याप्रमाणें चालून सेनापती व प्रधान यांच्या समागमें कामकाजें करावीं.
येणेप्रमाणे कलम १.
 येकूण कलमें वीस मोर्तब.


आपण बघू शकतो की पहिली ८ कलमे अष्टप्रधान यांच्या कामाबद्दल निगडित आहेत. ८ पैकी ६ प्रधानांना युद्ध - युद्धादि प्रसंगाला गरजेनुसार जाणे हे त्याच्या पदाच्या जबाबदारीमध्ये समाविष्ट होते. त्यातून फ़क्त पंडितराव आणि न्यायाधीश यांना वगळण्यात आले होते. ९ वे कलम पूर्णपणे 'चिटणीशी'बद्दल आहे. चिटणीस म्हणजे आजचा 'कैबिनेट सेक्रेटरी'. हे महत्वाचे पद राजाभिषेकानंतर 'बाळाजी आवजी' यांच्याकडे सोपवले गेले होते. फौजेचे इतर अधिकारी आणि बारा  महालाचे अधिकारी यांनी करावयाची कामे सुद्धा पूर्णपणे स्पष्ट केली गेली होती हे सुद्धा इतर कलमांवरुन समजते.

यात १२ वे कलम सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. 'हुजुरात' म्हणजे खुद्द छत्रपति शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत येणारया खात्याचे उल्लेख ह्यात केले गेले आहेत. किले-कोट, ठाणे आणि जंजिरे याबद्दल अगदी सक्तीचे सुक्ष्मनियम त्यांनी बनवले होते. ते नियम मोडण्यास तीळभर सुद्धा जागा नव्हती. इतके असून त्याचा ह्या बाबींचा खर्च फारच काटकसरीने बांधलेला होता.

त्यांची राज्यपद्धती अशी होती की संपूर्ण राज्यकारभार अष्टप्रधान मंडळावर सोपवून तो चोख चालेल याची पूर्ण काळजी घेतली गेली होती. राज्यकारभारात प्रत्यक्ष ढवळा-ढवळ न करता राज्यकारभाराविषयी दैनंदिन माहिती मिळत जावी यासाठी त्यांनी आपल्या विश्वासातील माणसे जागोजागी स्वतंत्रपणे नेमली होती. जेणेकरून प्रत्येक खात्यावर त्या खात्याच्या प्रमुखाबरोबरच त्यांचे सुद्धा अप्रत्यक्ष आणि पूर्ण नियंत्रण राहील.

पुढच्या काही भागांमध्ये आपण छत्रपति शिवरायांच्या इतर पैलूंवर नजर टाकणार आहोत. त्यांनी कोष उर्फ़ खजिना, दुर्ग-किल्ले, सैन्यछावण्या यांबद्दल कशी व्यवस्था लवली होती ते बघणार आहोत. रिसोर्स मॅनेजमेंट काय असते हे त्यांनीच ३५० वर्षांपूर्वी दाखवून दिले आहे. शिवचरित्र वाचावे... अनुभवावे... शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातून काहीतरी शिकावे आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करता आला तर पहावा ...
.
.
संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य) आणि शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)
.
.

20 Jan 2010

शिवराज्यातले 'बारा महाल' आणि 'अठरा कारखाने' ... !

छत्रपति शिवरायांच्या काळात राज्य शासनाच्या महत्वाच्या कामासाठी विविध विभाग पाडण्यात आले होते. यात 'कारखाने' आणि 'महाल' असे २ प्रमुख भाग होते. कारखाने म्हणजे 'कार्यस्थाने' तर महाल म्हणजे 'विविध भांडारे'. सभासद बखरीत एकुण बारा महाल आणि अठरा कारखाने यांचे उल्लेख आले आहेत. ह्यात बरीच खाती समाविष्ट नाहीत. अर्थात जी अधिक महत्वाची ती स्वतंत्रपणे नोंदली गेली असतील.

बारा महाल आणि अठरा कारखाने खालीलप्रमाणे ... (कंसातील नावे 'राजव्यवहारकोश' यामधून घेतली आहेत)

  • बारा महाल
१) पोते (कोशागार)

२) थट्टी (गोशाळा)

३) शेरी (आरामशाळा)

४) वहिली (रथशाळा)

५) कोठी (धान्यागार)

६) सौदागीर

७) टकसाल (मुद्राशाळा)

८) दरुनी (अंत:पुर)

९) पागा (अश्वशाळा)

१०) ईमारत (शिल्पशाळा)

११) पालखी (शिबिका)

१२) छबिना (रात्रिरक्षणं)

  • अठरा कारखाने
१) खजिना (कोशागारं खजाना स्यात)

२) जव्हाहिरखाना (रत्नशाळा)

३) अंबरखाना (धान्यशाळा)

४) आबदारखाना (जलस्थानम)

५) नगारखाना (आनकस्तु नगारास्यात)

६) तालीमखाना (बलशिक्षा तु तालीमं)

७) जामदारखाना (वनसागर)

८) जिरातेखाना (शस्त्रागार)

९) मुदबखखाना (पाकालयम)

१०) शरबतखाना (पानकादिस्थानम)

११) शिकारखाना (पक्षिशाळा)

१२) दारूखाना (अग्न्यस्त्र संग्रह)

१३) शहतखाना (आरोग्यगृह)

१४) पीलखाना (हत्तीगृह)

१५) फरासखाना (अस्तरणागार)

१६) उश्टरखाना (उंटशाळा)

१७) तोपखाना (यंत्रशाळा)

१८) दप्तरखाना (लेखनशाळा)
 
बारा महाल आणि अठरा कारखाने यांच्या मधल्या प्रत्येकावर एक अधिकारी नेमलेला होता आणि त्याने 'खाजगीच्या इतल्यात' म्हणजे 'Under Information' राहावे असे स्पष्ट नियम होते. महत्वाचे म्हणजे जर आपण कंसातील म्हणजे राज्यव्यवहारकोशामधील नावे नीट वाचली तर आपल्या लक्ष्यात येइल की ती संस्कृत व मराठी मध्ये आहेत. थोडक्यात शिवरायांनी फारसी नावे असलेल्या ह्या सर्व खात्यांना राजाभिषेका नंतर संस्कृत व मराठी नावे दिली होती.
.
.
संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य) आणि शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)
.
.