31 Dec 2010

ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो ?

पण सध्या ह्या ओळींचा दुरुपयोग करून शिवाजी महाराज ब्राह्मण विरोधी होते असा आरडा ओरडा केला जातोय. जर ते ब्राह्मण विरोधी असते तर त्यांनी त्यांच्या अष्टप्रधानात आणि कार्यात ब्राह्मणांना स्थान दिले असते का? स्वतः:ची वाक्ये राजांच्या तोंडात कोंबून ब्रिगेडी लोक अप्रत्यक्षपणे नव्हे तर आता थेट प्रत्यक्षपणे राजांचा अपमान करीत आहेत... जे लोक राजांबरोबर फक्त राजकारणात नाही तर युद्धात देखील खांद्याला खांदा लावून लढले त्यांच्याविरुद्ध हा मुर्खासारखा अपप्रचार सुरू केला आहे. हे थेट राजांच्या राज्यकार्याचा आणि युद्धनितीचा अपमानच आहे. ह्याचा निषेध करावा तितका कमीच.

'शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण?' हे पुस्तक जेंव्हा माझ्या वाचनात आले तेंव्हा त्यावरील मुखपृष्ठ (शिवाजीराजे कृष्णाजी भास्करला मारताना) आणि 'ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो' या खालील ओळींनी विचारचक्र सुरू केले. राजांनी हे एका पत्रात लिहिले आहे खरे पण ते कृष्णाजी भास्करला नव्हे. कुठल्याही एका जातीची मक्तेदारी समाजावर नसून हे श्रींचे राज्य अशी धारणा राजांची होती. हे वाक्य राजांनी ज्या पत्रात वापरले आहे ते संपूर्ण पत्र मी येथे देत आहे. ह्यावरून समजून येईल की चुकीचे वाक्य चुकीच्या ठिकाणी वापरून लोकांची कशी दिशाभूल केली जात आहे...

शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी १८ जानेवारी १६७५ रोजी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात,"ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?"


********************************************************************************

मशहुरुल हजरत राजश्री जिवाजी विनायक सुभेदार व कारकून सुभे मामले प्रभावळी प्रती राजश्री शिवाजी राजे दंडवत. सुहुरसन खमस सबैर व अलफ. दौलतखान व दरिया सारंग यांसी ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत पेशवे यांणी वराता सुभे मजकुरावरी दिधल्या. त्यांस तुम्ही काही पावविले नाही म्हणोन कळो आले. त्यावरून अजब वाटले की ऐसे नादान थोडे असतील! तुम्हास समजले असेल की याला ऐवज कोठेतरी देवविला पाहिजे. तो न पावविता ऐवज खजाना रसद पाठीविलीया माजरा होईल म्हणत असाल. तरी पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी केली आहे. त्याची मदत व्हावी. पाणी फाटी आदि करून सामान पावावे. या कामास आरमार बेगीने पावावे. ते होत नाही तर पद्मदुर्ग हबशी फौजा चौफेर जेर करीत असतील. आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून पाडाल. एवढी हरामखोरी तुम्ही कराल आणि रसद पाठवून मजरा करू म्हणाल. त्यावरी साहेब (शिवाजी राजे) रीझतील की काय? ही गोष्ट घडायची तरी होय, न काळे की हबशियांनी काही देऊन आपले चाकर तुम्हास केले असतील! त्याकरिता ऐसी बुद्धी केली असेल! तरी ऐश्या चाकरास ठिकेठिक केली पाहिजेत. ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो? या उपरी त्याला ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत देविला असे तो देवितील. तो खजाना रसद पाविलीयाहून अधिक तेणेप्रमाणे आदा करणे की जे तुमची फिर्याद न करीत व त्यांचे पोटास पावून आरमार घेऊन पद्मदुर्गाच्या मदतीस राहात ते करणे. या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे.

रवाना छ २ जिल्काद.

********************************************************************************
तर हे १८ जानेवारी १६७५ रोजी लिहिलेले पत्र १६ वर्षे आधी घडलेल्या 'कृष्णाजी भास्कर' बरोबर जोडून अपप्रचार आणि गैरसमज पसरविला जात आहे... हे आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणार आहोत का???

30 Dec 2010

सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा...

सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा...

होय दोस्तांनो... हे खुद्द आपल्या महाराजांनी म्हटले आहे... छत्रपति शिवरायांनी २८ जानेवारी १६७७ रोजी सामान्य रयतेस उद्देशून लिहिलेले पत्र समाजातील प्रत्येक व्यक्तीला आजही लागू पडते. आपापल्या आचारधर्माचे पालन करावे, सर्वांनी एकदिल होउन शत्रुचा पराभव करावा असे आवाहन त्यांनी ह्या पत्रात केले आहे. सध्या सर्वत्र जे सुरू आहे ते बघता आपण त्यांची आज्ञा आजही पाळणार आहोत का?




*******************************************************************************

स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३ नल नाम संवत्सरे माघ शुद्ध ५ क्षत्रिय कुलावत्वंस श्री राजा शिवाजी छत्रपती स्वामी यांणी समस्त ब्राह्मण वेदपाठी व ग्रहस्थान व क्षत्रिय मंडळी तथा प्रभू ग्रह्स्थान व वैश्यजाती व शुद्रादी लोकान तथा जमेदार व वतनदार व रयेत वगैरे सर्व जाती हिंदू महाराष्ट्रान तथा महालांनी (सुभा) व देश व तालुके व प्रांतानिहाय वगैरे यास आज्ञा केली ऐसीजे.

हिंदू जातीत अनादी परंपरागत धर्मशास्त्राप्रमाणे धर्म चालत आले असता अलीकडे काही दिवसात येवनी अंमल जाहल्यामुळे काही जातीतील लोकांस बलात्कारे धरून भ्रष्ट केले व कित्येक जागीची दैवते जबरीने छीन्न-भिन्न केली. हिंदू जातीत हाहाकार जाहला. गाय ब्राह्मणसह धर्म उच्छल होण्याचा समय प्राप्त जाहला.त्याजवरून श्रीईश्वरी कृपेने आमचेहोत श्री शिवाजीने यवन वगैरे दृष्टास शासन करवून पराभवाते नेले व राहिले ते शत्रू पादाक्रांत होतील.


परंतु लिहिण्याचे कारण की या सरकारात राज्याभिषेक समयी क्षेत्रक्षेत्रादि क्षेत्रस्थ ब्राह्मण बहुत ग्रंथ अनादी सर्व जमा करून धर्म स्थापना जाहली. त्यास श्रीकाशी क्षेत्ररथ ब्राह्मणात काही तट पडून हाली ग्रंथ पाहता भटजीकडून तफावत झाली आहे असे ठरले. त्याजवरून हल्ली पुन्हा शास्त्रीपंडित व मुत्सद्दी व कारकून यास आज्ञा होऊन ज्ञाति विवेक व स्कंद पुराणांतर्गत श्याद्रीग्रंथ ((सह्याद्रीग्रंथ?) आदी महानग्रंथी निर्णय सर्व झातीविशी जाहले आहेत ते वगैरे सर्व ग्रंथानुमते व जसे ज्याचे धर्म अनादी चालत आले त्याप्रमाणे निरवेध चालावे आगर ज्या ज्या ज्ञातीस वेदकर्मास अधिकार असून येवनी जाहल्यामुळे अथवा ब्राह्मणांनी काही द्वेषबुद्धीने शास्त्रानुरूप काही कर्मे न चालविता मलीन झाली असतील ती त्या ज्ञातीच्या मंडळींनी पुरी पाहून ज्याची त्याची नीट वहिवाट आचाराने. ज्या ज्ञातीत जशी परंपरा चालत आली ती त्याप्रमाणे चालविणे. जो कोणी द्रवे लोभास्तव ब्राह्मण शास्त्रविरहित नवीन तंटे करून खलेल करील येविसो त्याज्ञाती यानिवाले सरकारात अर्ज करावा म्हणजे शास्त्राचे समते व रूढीपरंपरा व ग्रंथ पाहून  निरंतर निरमत्छ्रपणे धर्मस्थापना कोणाचा उजूर न धरिता पर्निष्ट जेंव्हाचे तेंव्हाच त्वरित बंदोबस्त होईल.


हल्ली यवन उत्तर देशीहून येत आहे. तरी सर्व ज्ञातिने एकदिल राहून कस्त मेहनत करून सेवा करून शत्रू पराभावाते न्यावा. यात कल्याण तुमचे सरकारचे ईश्वर करील. जाणेजे.

*******************************************************************************


सध्या महाराष्ट्रात जाणीवपूर्वक सुरू असलेल्या घाणेरड्या आणि जातीविषयक इतिहास बदलाचा मी निषेध करत आहे. जे लोक हे करत आहेत त्यांना समजत नाही आहे की प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ते थेट शिवरायांचा अपमान करीत आहेत...


"जे जे होईल ते ते पाहावे.. हे कैसे ऐसे आयुष्य जाहले..."

5 Nov 2010

शिवछत्रपतींचे व्यक्तिमत्व ... भाग २

ज्या दुर्मिळ पुस्तकातून मी पत्रे संकलित करून लिहितो आहे त्या पुस्तकाबद्दल आपण गेल्या भागात पहिले. काही पत्रांच्या संदर्भाने राजांबद्दल अधिक जाणून सुद्धा घेतले. ह्या भागात आपण राजांनी लिहिलेली राजकारण विषयक पत्रे बघूया...

येत्या १० नोव्हेंबर रोजी आहे ३५१ वा शिवप्रताप दिवस. शिवप्रतापदिवस म्हणजे ज्यादिवशी राजांनी प्रतापगडाच्या साक्षीने अफझलखानाला ठार मारले तो दिवस. जी जावळी घेण्यासाठी खान आला होता त्या जावळीकडे आणि तिथल्या चंद्रराव मोरेकडे राजांचे लक्ष १६५१ पासूनच होते. चंद्रराव मोरे याने जेंव्हा बीरवाडीच्या माल आणि बाजी पाटील यांची वतने बळकावली तेंव्हा त्यांनी येऊन शिवरायांपुढे गाऱ्हाणे मांडले. त्यांच्या अधिकारपणाला मान्यता देताना राजे म्हणतात,"तुम्ही अधिकारपण खाउनु अधिकारपणाची चाकरी करणे"  जेंव्हा खानाचे आक्रमण झाले तेंव्हा राजांनी त्याला पाठवलेल्या पत्राचा स्वैर मराठी अनुवाद तुम्हाला येथे वाचता येईल. पत्रात राजांनी खानाच्या सैन्याला जावळीच्या खोऱ्यात जगातल्या सर्व सुखसोयी उपभोगता येतील असे म्हटले होते. अर्थात त्यांना कश्या सुखसोई पोचवल्या गेल्या हे सर्वश्रुत आहेच!!! खानस्वारी पाठोपाठ मुघलांनी शास्ताखानाला (शाहिस्तेखानाला) दख्खन मोहिमेवर धाडले. औरंगाबादवरून निघालेल्या शाही फौजा थेट पुण्यात शिरल्या आणि सर्वत्र नासधूस करू लागल्या. ह्यात मावळामधल्या लोकांची जीवित व वित्तहानी खुप होत असे. आपल्या प्रजेबद्दल सदैव जागरुक असणाऱ्या राजांनी रोहिडखोरे मधील कारी येथील देशमूख सर्जेराव जेधे यांना २३ ऑक्टोबर १६६२ रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,"जे बांद धरून नेतील त्याचे पाप तुमचा माथा बसेल" ह्या पत्रामधून राजांची आपल्या रयतेविषयी असणारी काळजी व तळमळ दिसून येते.

१६५९ च्या शेवटाला केलेला खानवध आणि नंतर कोल्हापूरपावेतो मारलेली धडक, पन्हाळा आणि जुलै १६६० मधला बाजी-फुलाजी प्रभूंचा भीम पराक्रम, वेढ्यातून सुटून आल्यावर १६६३ मध्ये खुद्द शाहिस्तेखानाची राजांनी छाटलेली बोटे ह्या सर्वात दख्खन पेटून उठले होते. गेल्या ३-४ वर्षात दख्खनेत झालेली हानी भरून काढण्यासाठी राजांनी सुरत बेसुरत करून प्रचंड लुट प्राप्त केली. आत्मविश्वास कैक पटींनी वाढलेल्या राजांनी दख्खन मुघल सुभेदाराला पत्र पाठवले. मूळ पत्र फारसीमध्ये असले तरी त्याचा मराठी अनुवाद येथे देत आहे. स्वराज्य निर्मितीसोबत त्याचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी आक्रमकांशी युद्ध खेळण्यास जागृक राहणे याची पूर्ण जाणीव त्यांना होती. ह्या पत्रातून त्यांचा आत्मविश्वास आणि निर्धार दिसून येतो.ह्या पत्रात राजे म्हणतात,"आपल्या भुमीचे संरक्षण करणे हे माझे कर्त्तव्य आहे आणि मी आपले कर्तव्य बजावण्यास कधीही चुकणार नाही." हे संपूर्ण पत्र वाचावे असे आहे.

"आज तीन वर्षे बादशहाचे मोठे मोठे सल्लागार आणि योद्धे आमचा प्रदेश काबीज करण्यासाठी चालून येत आहेत, हे तुम्हा सर्वांस माहिती आहेच. बादशहा हुकुम फर्मावतात,'शिवाजीचा मुलुख आणि किल्ले काबीज करा.' आणि तुम्ही जवाब पाठविता 'आम्ही लवकरच काबीज करतो.'

आमच्या या दुर्गम प्रदेशात कल्पनेचा घोडा सुद्धा नाचविणे कठीण आहे, मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला? भलत्याच खोट्या बातम्या लिहून पाठवण्यात तुम्हाला लाज कशी वाटत नाही? (विजापूरचे) कल्याणी आणि बिदरचे किल्ले उघड्या मैदानात होते ते तुम्ही काबीज केले. आमचा प्रदेश अत्यंत डोंगराळ आहे. नदी-नाले उतरून जाण्यास वाट नाही. अत्यंत मजबूत असे साठ किल्ले माझे आज तयार आहेत. पैकी काही समुद्र किनाऱ्यावर आहेत. बिचारा अफझलखान जावळीवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्यूमुखी पडला. हा सर्व प्रकार तुम्ही बादशहास का कळवीत नाही? अमीर उल उमराव शाहिस्तेखान आमच्या या गगनचुंबित डोंगरात आणि पाताळात पोचणाऱ्या खोऱ्यांत तीन वर्षे सारखा खपत होता. 'शिवाजीचा पाडाव करून लवकरच त्याचा प्रदेश काबीज करतो' असे बादशहाकडे लिहून लिहून थकला. ह्या खोडसाळ वर्तनाचा परिणाम त्याला भोवला. तो परिणाम सूर्यासारखा सर्वांच्या समोर आहे.

आपल्या भूमीचे संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि तुम्ही बादशहाकडे कितीही खोट्या बातम्या लिहून पाठवल्या तरीही मी माझे कर्तव्य बजावण्यास कधीही चुकणार नाही."

 
१६६४ मध्ये आदिलशाही सरदार खवासखान याने शिवरायांवर स्वारी केली. राजे पुन्हा एकदा कोकणात उतरले आणि त्यांनी विजापूरचा प्रदेश अधिक जोमाने काबीज करायला सुरवात केली. खवासखान, बाजी घोरपडे आणि खेम सावंत या त्रिकुटाचा शिवरायांनी एकत्र न होऊ देता एकएकटे पाडून बिमोड केला शिवाय पोर्तुगीज मुलुख सुद्धा काबीज केला तेंव्हा त्यांना धाक बसून त्यांनी नजराणा देखील पाठवला. आपल्या आऊसाहेब जिजामाता यांस लिहीलेल्या पत्रात ते म्हणतात,"स्वामींचे पुण्यप्रतापें आज्ञेप्रमाणे घडून आलें."  राजांनी संपूर्ण कोकणावर ताबा मिळवत आता सिंधूदुर्गाचा पाया घातला आणि आपला आरमारी दरारा वाढवा म्हणून पहिली आरमारी मोहीम काढली. १६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. पुरंदरचा तह हा मराठा इतिहासामध्ये एक मैलाचा दगड ठरला. हा तह व्हायच्या आधी राजांनी जयसिंगला एक विस्तृत पत्र लिहिले होते. त्याबद्दल आपण पुढच्या भागात माहिती घेऊ...

31 Oct 2010

शिवछत्रपतींचे व्यक्तिमत्व ... भाग १

साधारणपणे २००६-७ मध्ये मी मराठा इतिहास आणि संबंधित विषयांवर ओर्कुटवर लिखाण सुरू केले होते. तेंव्हा मराठीत ब्लॉग वगैरे काही ठावूक नव्हते मला. काही दिवसांनी मला एक सचिन नामक मुलाचा फोन आला. (मी माझा फोन नंबर ओर्कुटवर तेंव्हा ठेवलेला होता.) लोअर परेलला असणाऱ्या एका जुन्या ग्रंथालयात काम करणाऱ्या सचिनने मला त्याच्याकडे असलेली काही जुनी पुस्तके बघण्यासाठी तिकडे बोलावले होते. माझ्या वाचनात उत्तम भर पडेल असे त्याचे म्हणणे होते. मी दुसऱ्या दिवशी सकाळी लगेचच तिकडे पोचलो. त्याने ७-८ पुस्तके माझ्यासमोर काढून ठेवली. मी ती सर्व पुस्तके २ महिन्यात परत करण्याच्या हमीवर घरी घेऊन आलो. त्या ग्रंथालयाचा सदस्य नसताना आणि तो मला ओळखत देखील नसताना त्याने इतकी जुने पुस्तके मला नेऊ देणे म्हणजे मला थोडे आश्चर्य वाटते. अर्थात मी माझा पता आणि संपर्क क्रमांक त्याच्याकडे ठेवलेला होताच. घरी आलो आणि पुढचे काही दिवस सुट्टी असल्याने अधाशासारखे ती पुस्तके वाचून काढू लागलो. त्यातल्या एका पुस्तकाचे नाव होते 'छत्रपती शिवाजी महाराज - पत्ररूप व्यक्तीदर्शन' लेखक होते डॉक्टर रामदास.

ह्या पुस्तकात राजांनी लिहिलेल्या काही पत्रांचा अभ्यास करून राजांचे व्यक्तिमत्व मांडण्याचा पर्यंत केलेला होता. सदर पुस्तक १९४२ सालचे होते. माटुंगा येथून प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकाची किंमत अवघे २ रुपये लिहिलेली होती. हे दुर्मिळ पुस्तक आता बाजारात उपलब्ध नाही हे मला ठावूक होते तेंव्हा मी त्या पुस्तकाची सर्व पाने स्कॅन करून घेतली. पुस्तकात शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रांची अनुवादित पत्रे होती. अशी एकूण ५० पत्रे छापलेली होती. गेल्या वर्षी मी हा ब्लॉग सुरू केला तेंव्हा त्यातली बहुतेक पत्रे या ब्लॉगवर दिली होती. सदर लिखाण त्याच पत्रांवर आधारीत असून त्यातला भाग १ आपल्यासमोर सादर करतोय... सध्यातरी लिखाण २ भागात संपवायचा विचार आहे पण बघुया जस-जसे लिखाण होईल त्यावर ठरेल किती भाग होतील ते. अपेक्षा हे आपल्याला आवडेल.....





शके १५५७ म्हणजेच इ. स. १६४५ च्या एप्रिल महिन्यात वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली. रोहिड खोरे आणि वेळवंड खोरे येथील देशपांडे - कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे राजांसोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर आदिलशहाच्या शिरवळ येथल्या सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले. या पत्रामुळे दादाजी चिंतेत असल्याचे कळताच राजांनी त्यांना पत्र पाठवले. 'हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे' या आशयाचे पत्र पाठवले. आपण सुरु केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनूसार आहे, ही धारणा त्यांनी ह्या पत्रामधून व्यक्त करून त्यांचे मनोबल वाढवले आहे. आपल्या सहकाऱ्यांना आवश्यक असे मानसिक बळ ते वेळोवेळी देत असत.



स्त्रियांशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांविरुद्ध शिवरायांचे धोरण अतिशय कडक होते. ह्या बाबतीत ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. 'बदअमलाबद्दल कड़क शासन' ते करत असत. जानेवारी १६४६ मध्ये त्यांनी रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ़ भिकाजी गुजर याला एका स्त्री सोबत गैरवर्तनासाठी चौरंग करण्याची शिक्षा दिली होती. (चौरंग करण्याची शिक्षा म्हणजे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडणे, पण त्यानंतर माणूस रक्तस्त्राव होउन दगावू नये ह्यासाठी जखमा गरम तुपात बूडवल्या जात.) पुढे त्याचाच कुळातील सोनजी गुजर याने राजांना 'पाटीलकी परत करावी, आम्ही स्वराज्यासाठी निष्ठा अर्पण करतो' असे पत्र पाठवले तेंव्हा राजांनी २८ जानेवारी १६४६ च्या पत्रानुसार त्याची पाटिलकी मान्य केली आहे. योग्य माणसे ओळखून त्यांच्याकडून निष्ठेने काम करून घेण्याची ही कला अतुलनीय आहे.


शिवरायांनी वतनदारी संस्था बंद करवली असे नेहमी म्हटले जाते, ऐकिवात येते, ते पूर्णपणे खरे नाही. खरेतर त्यांनी वतनदारी संस्थेत अमुलाग्र बदल करून तिचा उपयोग स्वराज्यासाठी केला. ते अधिक मजबूत केले. पुरंदरचे किल्लेदार सरनाईक महादजी यांचे निधन झाल्यावर त्यांचे पुत्र निळकंठराव यांना पाठवलेल्या पत्रात राजे म्हणतात,"जोपर्यंत तुम्ही आम्हासी इमाने वर्ताल, तोपर्यंत आम्हीहि तुम्हासी इमाने वर्तोन. तुम्हापासून इमानांत अंतर पडिलियां आमचा हि इमान नाही." कुठले वतन वंश परंपरेने सुरू ठेवायचे आणि कुठले नाही याबाबत ते माणूस ओळखूनच निर्णय घेत असणार. याच आशयाची अजून काही पत्रे उपलब्ध आहेत. 'मी शत्रूंना दगे दिले, मित्रांना दगे दिल्याचे दाखवा' असे आवाहन त्यांनी केले होते. त्याला आजपर्यंत उत्तर आले नाही. स्वराज्य उभे करताना एक-एक माणूस जोडताना त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती हे जीवाला-जीव देणारी, लाख मोलाची माणसे पाहिली की सहज कळून येते.

शिवरायांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात काही इनामे दिली होती. शिवराय १६७४ मध्ये छत्रपति होण्याआधी विजयनगरचे साम्राज्य हे दक्षिण भारतातले शेवटचे हिन्दू साम्राज्य होते. ते १५ व्या शतकात लयास गेल्यानंतर दक्षिणेमध्ये आदिलशाही, कुतुबशाही यांचे राज्य होते. विजयनगरच्या हिंदू साम्राज्याचा वंशज तिरुमलराय यांना शिवरायांनी १५ एप्रिल १६५७ च्या रोप्यपटाद्वारे काही जमीन निर्वाहासाठी इनाम  म्हणून दिली होती. याशिवाय आंबेजोगाईच्या दासोपंतांना, आळंदीच्या 'ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या व्यवस्थेसाठी दर सालाना दानाची व्यवस्था केली होती. आग्र्याहून सुखरूप सुटून राजगडी परत येताना राजांनी ९ वर्षाच्या शंभूराजांना कृष्णाजी विश्वासराव आणि काशी त्रिमल यांच्याकड़े ठेवले होते. ते शंभूराजांना राजगडी परत घेउन आल्यावर राजांनी त्यांना १ लाख रुपये इनाम दिले. १६६० पासून प्रतापगडाच्या तुळजा
भवानी देवीच्या नैवेद्याची संपूर्ण व्यवस्था, १६७५ पासून पाटगाव मौनीबाबांच्या मठाला सालीना १००० माणसांचा शिधा ही सर्व पत्र उपलब्ध आहेत. छत्रपती शिवरायांनी १६७८ मध्ये समर्थ रामदास स्वामींच्या चाफळ येथील मठास सनद दिली आहे. त्यात ३३ गावे, ४१९ बिघे जमीन, १ कुरण आणि १२१ खंडी धन्य ह्याचा तपशील दिसून येतो.


छत्रपती शिवरायांचे शेती विषयक धोरण आणि व्यापार विषयक धोरण हा खरतर अभ्यासाचा एक मोठा विषय. पण त्या संदर्भात आपण काही पत्रे बघुया. पुणे परगण्यामधले देखमुख बापाजी शितोळे आणि देशमुख विठोजी शितोळे यांनी 'मुघलांच्या धामधूमीमुळे आमचे इतके नुकसान झाले आहे की आम्ही कर भरू शकत नाही' असे राजांना कळवले होते. त्यांचा हा अर्ज राजांनी मान्य करून त्यांचा कर रद्द केला आहे. प्रजा नियमासाठी नव्हे तर नियम प्रजेसाठी आहेत हे त्यांना सर्वथा ठावूक होते. आवश्यक तेंव्हा नियमात बदल करून धोरणे राबवता येतात हे ह्याचे उत्तम उदाहरण. कोकणात जम बसल्यावर राजांनी कोकणातील व्यापार वाढविला होता. दाभोळ येथे नारळांची विक्री अतिशय कमी किमतीत होऊ लागल्याने त्याचा परिणाम आजूबाजूच्या व्यापारावर होऊ लागला. तेंव्हा राजांनी आपल्या सुभेदाराला पत्र लिहिले. राजे म्हणतात,'दाभोळास नारळ कमनिर्खे विकते हा अंमल कैसा आहे?' पोर्तुगीझांच्या ताब्यातील व्यापारी मीठ कमी किमतीत विकत असल्याने स्वराज्यातील मीठ व्यापारयांना कोणी भाव देईना. आपल्या व्यापारयांना उत्तेजन मिळावे म्हणून राजांनी कुडाळ येथील आपला सुभेदार नरहरी आनंदराव यास पत्र लिहिले. ते म्हणतात,'बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे' ह्यावरून दिसून येते की व्यापारावर त्यांचे किती बारीक लक्ष्य होते.


प्रभानवलीचा सुभेदार रामजी अनंत यास राजांनी पाठवलेले पत्र अतिशय वेधक आहे. ५ सप्टेंबर १६७६ रोजी लिहिलेल्या ह्या पत्रात राजे म्हणतात,'येक भाजीच्या देठासहि मन नको' शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर अन्याय तर होऊ नयेच, तर त्यास योग्य त्या सवलती मिळाव्यात आणि राज्याचे उत्पन्न वाढावे असे विचार ह्या पत्रात व्यक्त करण्यात आले आहेत. याशिवाय जमिन महसूलीची पद्धत, तगाई देणे, कर्जमुक्त करणे याबाबत सविस्तर विवेचन सदर पत्रामध्ये राजांनी केले आहे. (गेल्या काहीवर्षांपासून शेतकर्‍याच्या झालेल्या अवस्थेबद्दल बोलताना, हे पत्र प्रत्येक मामलेदार कचेरीमध्ये लावले पाहिले अशी सूचन बाबासाहेब पुरंदरे यांनी मध्ये एका कार्यक्रमात केली होती.)

 
शिवछत्रपतींचे युद्ध आणि सैन्यविषयक धोरण हा अजून एक अभ्यासाचा प्रचंड विषय. सैन्याची छावणी ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी कोणती काळजी घ्यायला हवी ह्याबद्दल सविस्तर विवेचन करणारे पत्र राजांनी ९ मे १६७४ रोजी आपल्या कोकणातील अधिकाऱ्यांना धाडले. राज्याभिषेक अवघ्या महिन्यावर आलेला असतानाही राजांचे प्रजाहीताकडे संपूर्ण लक्ष होते. सैन्याकडून प्रजेला यत्किंचितही उपसर्ग पोहोचू नये यासाठी ते किती सतर्क असत हे ह्या पत्रावरून दिसून येते. आपल्या ३०० सैनिकांकडून एका गावाला उपसर्ग झाल्याचे कळताच त्यांचे हात तोडणारा हा राजा निराळाच. तलवार घेऊन लढाई करणाऱ्या हातांपेक्षा स्वराज्यामागे असलेले जनतेचे हात त्यांना जास्त महत्वाचे वाटले असणार. स्वराज्याचा मूळ गाभा हा किल्ले आणि त्यांची बांधणी यावर होता आणि त्यावर होणारा खर्च देखील प्रचंड होता. असाच एक किल्ला राजांनी बाजीप्रभू देशपांडे यांना वसवायला सांगितला होता. १६५९ मध्ये 'मोहनगड किल्ला वसवावा.' असे पत्र राजांनी बाजीप्रभूंना पाठवले आहे. तटबंदीचे काम करणे आणि गडावर वसाहत बसवणे असे सांगून बांधकाम एका पावसाळ्यात मोडकळीस यायला नको ते मजबूत असावे असे त्यांनी म्हटले आहे. शिवरायांना दुर्गबांधणी या विषयात प्रचंड दूरदृष्टी होती. १६७७ मध्ये दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान चेन्नई येथील जिंजी किल्ल्याचे बांधकाम राजांनी करवून घेतले. ते बघून फ्रेंच मार्टिन त्याच्या डायरीत म्हणतो,"त्यांनी केलेले बांधकाम हे अभूतपूर्व आहे. युरोपातल्या कुठल्याही बांधकाम तज्ञाला असे बांधकाम करण्याचा विचार देखील सुचणार नाही."

या भागात आपण शिवरायांसंदर्भात काही पत्रे पाहिली. पुढच्या भागात आपण अफझलखान, शाहिस्तेखान, मिर्झाराजा, व्यंकोजी भोसले, दक्षिण दिग्विजय मोहीम अशी राजकारणाचा विस्तृत पट मांडणारी पत्रे बघू...

20 Sept 2010

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार : भाग २

गेल्या भागात आपण मराठा आरमाराचा जन्म कसा झाला आणि मराठ्यांनी आरमाराच्या साथीने काय-काय पराक्रम केले ते अगदी थोडक्यात पहिले. अर्थात विस्तृतपणे ते पुढे येईलच. आज आपण बघणार आहोत मराठा आरमाराकडे कुठल्या-कुठल्या बोटी होत्या, शिवरायांची आरमारी धोरणे काय होती.

मराठ्यांनी स्वतःची जशी जमिनीवरची युद्धपद्धती ठरवली होती तशी आता समुद्रावरची युद्धपद्धती ते ठरवत होते. सुरवातीची पद्धत अतिशय सोपी होती. खोल समुद्रात संचार न करता जलदुर्गांच्या संरक्षणाखाली राहून, किनाऱ्या-किनाऱ्याने शत्रूला हुलकावणी देऊ शकतील अश्या बोटी बनवण्याच्या मागे ते लागले होते. तेंव्हा 'वाऱ्यावीण प्रयोजन नाही' अश्या 'फरगात' (फ्रीगेट्स) न बनवता 'गुराबे' आणि 'गलबते' बनवायची तयारी जोमाने सुरु झाली होती. ह्यासोबत तरांडे, तारू, शिबाड, मचवा, पगार, वाघोर, तिरकटी आणि पाल असे नौकांचे प्रकार आज्ञापत्रात आढळतात. गुराब हे १५० ते ३०० टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होणारे असे जहाज असते. ह्यावर २-३ डोलकाठ्या असतात. एकावेळी १५०-२०० सैनिक आणि खलाशी ह्यातून प्रवास करू शकतात. तर गलबत हे आकाराने अजून लहान असते. ७०-८० टन क्षमता असलेले हे जहाज फारतर १०० सैनिक वाहून नेत असे. मात्र जलद हालचालीच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त असे जहाज होते.

मराठ्यांची नवी जहाजे खाडीमधून आता खुल्या समुद्रात संचार करू लागली होती. गनीम समोर आल्यावर काय करावे कसे वागावे ह्याबाबत स्पष्ट निर्देश आरमाराला दिले गेले होते. भर समुद्रात गनीम समोर आला तर एकत्र येऊन कस्त करून त्याच्याशी झुंजायचे, मात्र वाऱ्याची दिशा आपल्या विरुद्ध दिशेने असल्यास, गलबत योग्य चालवता येत नसल्यास गानिमाशी गाठ न घालिता जवळच्या जलदुर्गाच्या आश्रयाला यावे. राजे म्हणतात,"तरांडीयास आणि लोकांस सर्वथा दगा होऊ देऊ नये. आपण राखून गनीम घ्यावा." बरेचदा चकवा म्हणून शत्रू तहाचे निशाण दाखवतो आणि हरलो असे दाखवतो तेंव्हा लगेचच उडी घालून त्याच्या नजीक जाऊ नये, किंवा गनिमाला सुद्धा जवळ बोलावू नये, असे प्रशिक्षण आरमारास दिलेले होते. काही दगाफटका व्हायची शक्यता दिसल्यास कसलीही तमा न बाळगता तोफांच्या माराखाली तरांडे फोडून टाकावे आणि सालाबत पदवी असे स्पष्ट आदेश सरखेलांना होते.


वर्षाचे ८ महिने आरमार खुल्या समुद्रात असले तरी पावसाळ्याचे ४ महिने मात्र ते योग्य ठिकाणी छावणी करून सुरक्षित करून ठेवावे लागे. याबाबत आज्ञापत्र सांगते की, समुद्राला उधाण येण्याच्या १०-१५ दिवस आधीच आरमाराची छावणी योग्य ठिकाणी करणे आवश्यक असते. खुल्या उथळ समुद्रात किंवा कुठल्याही जलदुर्गाच्या खाली ते उघड्यावर नांगरून ठेवता येत नाही. छावणी सुद्धा दरवर्षी वेगवेगळ्याकिल्ल्यांच्या सानिध्यात बंदरात करावी म्हणजे दरवर्षी त्याच बंदराच्या आसपासच्या गावांना तोशीस पडत नाही. जिथे गनीम सहज सहजी पोचू शकत नाही अश्या ठिकाणी छावणी असावी असे आज्ञापत्र सांगते. आरमाराच्या सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट ताकीद होती की खाडी किनारी दिवस-रात्र गस्त घालून आरमार सुरक्षित राहील याची चाकरी करावी. खुद्द त्या भागाच्या सुभेदारांना २ महिन्याकरता संपूर्ण कुटुंब-कबिला घेऊन आरमाराची व्यवस्था बघण्याकरता आसपास जाऊन राहावे लागे इतके चोख आणि कडक नियम या बाबतीत राजांनी बनवले होते.


जस-जसे आरमार सजू लागले तशी त्याची व्यापारी धोरणे सुद्धा निश्चित केली गेली होती. सागरी व्यापारातून मिळणारे सर्व उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा केले जाई. आरमारात काम करणाऱ्या प्रत्येकाला महिना पगार मिळायचा. कोणालाही सागरी उत्पन्नातून हिस्सा घेण्याची मुभा नव्हती. सर्व सुभ्यांना स्पष्ट ताकीद होती की विविध बंदरामध्ये येणाऱ्या जहाजांना कुठलीही तोशीश लावता कामा नये. त्यांना योग्य ती सुरक्षा देणे हे आरमाराचे काम होते. जर बंदरेच नाही राहिली तर व्यापार कुठून होणार आणि कुठून मिळणार जकात हे साधे तत्व होते. मिळणाऱ्या जकातीवर आणि अधिक व्यापारावर आरमार सजवीत जावे असे राजांचे धोरण होते. फक्त बंदरातच नाही तर दर्यामध्ये देखील उगाच कोणा व्यापारावर उपद्रव करू नये अशी स्पष्ट ताकीद सर्वांना होती. जर चुकून शत्रू पक्षाकडील व्यापाराचे जहाज कुठल्याही बंदरात आले तरी ते लुटू नये, सुभेदारांनी जाऊन त्याची परीक्षा करावी आणि योग्य ते समाधान करावे, त्यांना अधिकाधिक आपल्या कडील जिन्नस विकावे आणि योग्य जकात वसूल करावी असे कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.


शून्यातून राज्याचे एक नये अंग सजू लागले होते. आत्ता पायांत फक्त पायदळ आणि घौडदळ असलेल्या मराठा फौजेकडे आता आरमार सुद्धा तयार झाले होते. त्याच्या जोरावर ते आता टोपीकरांना आणि सिद्दीला आव्हान देण्यास सज्ज झाले होते. मराठा आरमाराने कुठ-कुठल्या लढाया लढल्या, दैदिप्यमान यश कसे संपादित केले ते पाहूया पुढच्या भागात...

12 Aug 2010

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार : भाग १

"आरमार म्हणजे स्वतंत्र येक राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे... तसेच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र... याकरीता आरमार अवश्यमेव करावे." अशी भूमिका मांडणाऱ्या व त्यावर वाटचाल करणाऱ्या श्री शिवछत्रपति महाराजांची दूरदृष्टि थक्क करून सोडते. इंग्रजी इतिहासकारांनी लिहून ठेवल आहे 'बरे झाले हा शिवाजी डोंगरी मूलखात जन्मला.. जर हा सागरकिनारी जन्मता तर आमच काही खरे नव्हते.'

मध्ययुगात आरमार आणि सागरी व्यापार यांची खंडीत झालेली परंपरा सुरु केली ती शिवरायांनी. १६५७च्या आसपास कल्याणमधील दुर्गाडी येथे पहिला जहाज बांधणीचा प्रयत्न त्यांनी केला तेंव्हा कोकणच्या संपूर्ण किनारपट्टीवर इंग्रज, पोर्तुगीझ, सिद्दी, काही प्रमाणात मुघल आणि आदिलशाहाचे वर्चस्व होते. परकीयांचा कावा शिवरायांनी त्वरीत ओळखला होता. एका पत्रात ते म्हणतात,"सावकारांमध्ये फिरंगी (पोर्तुगीझ), इंग्रज, फरांसीस (फ्रेंच), डिंगमारांदी (डच?) टोपीकर हेहि सावकारी करितात. ते वरकड सावकारांसारखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्यक प्रत्यक राज्याच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होतात्से हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाहीं यैसें काय घडो पाहाते?" हिच दूरदृष्टी इतर सत्तांनी दाखवली असती तर इतिहास आज वेगळा असता.. खुद्द मराठ्यांच्या उत्तराधिकाऱ्यान्ना हे कितपत उमगले माहीत नाही. नाहीतर त्यांनीच मराठ्यांचे आरमार उध्वस्त केले नसते.


कोकणात शिरून स्थावर व्हायची संधी राजे शोधत होते. ती संधी त्यांना १६५६ च्या जानेवारीमध्ये मिळाली. औरंगजेब बादशहा व्हायला दिल्लीला रवाना होत होता. तिकडे विजापुरला अली आदिलशाह मरण पावला होता. योग्य संधीचे सोने करत राजांनी जावळी मारली. मोरेचा पाठलाग करत थेट कोकणात उतरून रायरी काबीज केली. राजांसाठी कोकणद्वार खुले झाले. उत्तरकोकणचा आदिलशाही भूभाग विजापुरपासून जावळीमुळे विभागला गेला. आता राजे १६५७ मध्ये उत्तर कोकणात उतरले आणि त्यांनी कल्याण, भिवंडी आणि माहुली परिसर जिंकून घेतला. याशिवाय सुधागड़, सरसगड़, तळागड़, सुरगड़ हे किल्ले सुद्धा मराठ्यान्नी सहज जिंकून घेतले. या भागाची जमीनीकड्ची बाजू आधीपासूनच मराठ्यांच्या ताब्यात होती. आता गरज होती ती तिची पश्चिम म्हणजे सागरीबाजू संभाळण्याची. सिद्दीवर अंमल आणायचा असेल तर त्याच्या इतकेच बलवान आरमार हवे हे ओळखायला राजांना वेळ लागला नाही. तशी तयारी १६५७ पासून दुर्गाड़ी येथे सुरू झाली.  विविध प्रकारच्या युद्धनौका बांधायला निष्णात तंत्रज्ञ आणि तसेच कुशल कारागीर लागणार म्हणून राजांनी पोर्तुगीझांकडे मदत मागितली. ते आधी तयार झाले मात्र नंतर हेच आरमार आपल्या अंगावर शेकेल ह्या भीतीने त्यांनी मदत करायला नकार दिला. पण म्हणून राजे थोडीच स्वस्थ बसणार होते. त्यांनी जहाज बांधणीचा उद्योग सुरूच ठेवला. राज्याचे एक नवे अंग सजू लागले.


१६५९ पासून आरमाराचे काम अजून जोरात सुरु झाले. कोकण किनाऱ्यावर असलेले किल्ले ताब्यात घेणे आणि ते दुरुस्त करणे, नव्याने काही किल्ले बांधणे असे उपक्रम त्यांनी सुरु केले होते. जस-जशी मराठ्यांची आरमारी ताकद वाढू लागली तसे त्यांचे शत्रू अधिक हालचाली करू लागले. मराठ्यांना सिद्दीला पाण्यात मात देणे सोपे नव्हते कारण त्याच्यापाशी प्रबळ आरमार होते शिवाय तो म्हणेल तेंव्हा मुघल किंवा विजापूर त्याला मदत करील असत. अगदीच जीवावर आले तर तो मुंबईला माझगाव येथे इंग्रजांच्या आश्रयाला जाई. विशेष करून पावसाळ्यात त्याचे संपूर्ण आरमार मुंबई येथे सुरक्षितरित्या नांगरलेले असे.


१६६० ते १६६४ या काळात सुवर्णदुर्ग , विजयदुर्ग, रत्नदुर्ग आणि सर्वात मात्तबर असा 'शिवलंका सिंधुदुर्ग' असे जलदुर्ग बांधले गेले किंवा त्यांची पुर्नबांधणी केली गेली. (सिंधू नदी जिथे सागराला मिळते त्याला 'सिंधू सागर' असे नाव होते. म्हणून राजांनी ह्या जलदुर्गाला 'सिंधुदुर्ग' असे नाव ठेविले. आज मात्र त्याचे नाव अरबी समुद्र असे झालेले आहे. आपल्याला ह्याचे काहीच सोयर-सुतक नाही!!!) कुलाबा आणि खांदेरी हे जलदुर्ग राजांनी १६७८-७९ नंतर बांधले. मराठा आरमार ह्या जलदुर्गांच्या ताकदीवर समुद्रात फिरे. शत्रूस जेरीस आणे आणि गरज पडल्यास माघार घेत जलदुर्गांच्या आश्रयाला येई. पश्चिम किनारपट्टीच्या सुरक्षेबरोबर राजांनी सागरी व्यापार सुरु केला. त्यासाठी मीठ वाहून नेणारी जहाजे बांधली. मुघलांशी राजकारण करून थेट मस्कतपर्यंत व्यापार सुरु केला. आता आरमार आणि व्यापार एकमेकांच्या जोडीने वाढू लागले. सुरक्षा असेल तर व्यापार वाढतो आणि व्यापारातून झालेल्या फायद्यामधून अधिक प्रबळ आरमार उभे करता येते. आधी कोकणच्या किनारपट्टीवर फेऱ्या मारणारे हे आरमार १६६५ मध्ये मालवण बंदरातून निघून बसनूर (सध्या कर्नाटक) येथे पोचले. पोर्तुगीझांशी झालेल्या तहामुळे आरमार गोव्याहून जाताना त्यांनी काहीच आडकाठी केली नाही. ही मोहीम भलतीच यशस्वी झाली. आदिलशहाची प्रचंड लुट मराठ्यांनी मारलीच त्याशिवाय आरमाराचा दबदबा सर्वत्र बसवण्यात त्यांना यश आले होते. खुद्द शिवरायांनी या सागरी मोहिमेचे नेतृत्व केले होते. १६६५ पर्यंत संपूर्ण कोकण मराठ्यांच्या ताब्यात आलेले होते. आदिलशहाची सत्ता उखडली गेली होती. नाही म्हणायला जंजिर्याच्या जोरावर दंडा-राजापुरी सिद्दी धरून होता. मुंबईमध्ये इंग्रज (इस्ट इंडिया कंपनी) अजून स्वतःचे बस्तान बसवत होते आणि गोव्याला पोर्तुगीझ आपली राजधानी राखून होते. शिवाय ठाणे - वसई भाग त्यांच्या ताब्यात होताच.



१६६६ नंतर राजे मोठ्या प्रमाणात मुघलांशी लढण्यात व्यस्त होते. त्यांनी सिद्दीला जंजिरापुरते सीमित केले होते. सिद्दी मात्र कधी इंग्रज तर कधी पोर्तुगीझ यांची मदत घेऊन मराठ्यांना हानी पोचवायच्या मागे होता. त्याला सर्वात जास्त मदत करण्यात इंग्रजांना आनंद होत असे. अखेर राजांनी जंजिरेकर सिद्दी आणि मुंबईमधले इंग्रज यांच्या बरोबरमध्ये असणाऱ्या खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचे काम सुरु केले. खुद्द शिवराय या बेटाची पाहणी करण्याकरता २००० फौज घेऊन इकडे आले होते. अर्थात सिद्दी आणि इंग्रज असे दोघांचेही धाबे दणाणले आणि त्यांनी ह्याला विरोध करत खांदेरीवर हल्ला चढवला. अर्थात तो परतवला गेला आणि मराठ्यांनी किल्ला बांधून पुर्ण केला. खांदेरीची संपूर्ण कहाणीच मोठी रोमांचकारी आहे.. त्यावर वेगळ्या सविस्तर पोस्ट लिहेन. कुलाबा किल्ला बांधण्याचा आदेश तर शिवाजी महाराजांनी मृत्युच्या अवघे १२ दिवस आधी दिलेला आहे. हे दोन्ही किल्ले पुढे मराठा आरमाराच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे ठरले.

मराठा आरमाराकडे कुठल्या-कुठल्या बोटी होत्या, शिवरायांची आरमारी धोरणे काय होती, सागरी व्यापारी धोरणे काय होती, आरमारा संदर्भात झालेले काही पत्र व्यवहार आपण पुढच्या भागात पाहणार आहोत...

30 Apr 2010

छत्रपति शिवराय ... 'अरिमित्र विचक्षणा' ... भाग २.

मागील भागावरुन पुढे सुरू

आदिलशाही - स्वराज्य हे आदिलशाही मुलुख जिंकून वाढीस लागले असल्याने ते साहजिकच सुरुवातीपासूनच ते 'सहज शत्रू' राष्ट्र होते. मात्र राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. छत्रपति शिवराय दक्षिण दिग्विजय येथे गेले असताना मुघल-आदिलशाही एकत्र येउन मराठ्यांविरोधात उभी राहिली. मात्र पराभव झाल्यानंतर मुघलांनी थेट विजापुरलाच वेढा घातला. मराठ्यांकडून अनेक लढायांमध्ये पराभव मिळाल्यानंतर देखील मुघलांकडून येणाऱ्या दबावामुळे त्यांनी मराठ्यांशी १६७७ मध्ये मैत्रीचा तह केला. मुघलांना परास्त करत खुद्द शिवरायांनी विजापुरचा वेढा उठवला. अरिमित्र संबंध हे असे बदलत असतात.

कुतुबशाही - स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात विशेष महत्त्व नसलेल्या कुतुबशाहीला मात्र राजाभिषेकोत्तर काळात महत्त्व प्राप्त झाले. दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये कुतुबशाही सोबत सख्य करून आदिलशाही आणि मुघल यांना परास्त करायचे हेच मराठ्यांचे धोरण होते. शिवराय खुद्द १६७७ मध्ये कुतुबशहा यास भेटावयास गेले आणि उभय पक्षांमध्ये तह घडला. यात मोहिमेचा खर्च कुतुबशहाने करायचा तर मराठ्यांनी लढाया करायच्या आणि मुलुख जिंकायचा असे ठरले.


तहाचे प्रकार ३. ज्येष्ट, सम आणि हीन. तर तहाचे षाड़गुण्य अशा प्रकारे असतात.


१. संधि - काही अटींवर शत्रुशी तह करणे.

२. विग्रह - शत्रुस युद्धस उद्युक्त करणे.

३. यान - शत्रूची उपेक्षा करणे.

४. आसन - अनाक्रमणाचा करार.

५. संश्रय - आत्म समर्पणाच्या भावनेने झुंज देणे.

६. द्वैधीभाव - संधि आणि विग्रह या दोघांचा वापर करून कार्यभाग साधणे.
 
 
 
 
 
या प्रकारेच शिवरायांनी मुघल, कुतुबशहा आणि आदिलशहा यांच्याबरोबर तह केले. याशिवाय इंग्रज आणि पोर्तुगीझ या पश्चिम किनाऱ्यावर बस्तान बसवलेल्या ह्या परकीय सत्तांबरोबर शिवरायांनी अतिशय धूर्तपणे राजकारण केले.

इंग्रज - इंग्रज राज्याचे कायम सहज शत्रू राहिले. त्यांच्या सोबत मैत्रीचा कधीही प्रयत्न झाला नाही. सूरत आणि राजापुर येथील त्यांच्या वखारी मराठ्यांकडून लुटल्या गेल्या. पन्हाळा मोहिमेदरम्यान सिद्दीला मदत केली म्हणून राजांनी ४ इंग्रज अधिकाऱ्यान्ना कैदेत घातले होते. पुढे ४ वर्षांनी त्यांची सुटका झाली. जलदुर्ग खांदेरी बांधताना मराठ्यांना त्रास देणाऱ्या सिद्दीला मदत करतात म्हणून मराठ्यांनी मुंबईवर हल्ला करण्याचे योजून इंग्रजांच्या तोंडाचे पाणीच पळवले होते.
 
पोर्तुगीझ - या सत्तेला मराठ्यांनी नेहमी स्नेह आणि दंड या दोन्ही पात्यात पकडून ठेवत यशस्वी राजकारण केले. दुर्गाडी येथे जहाज बांधणीचा उद्योग सुरू करताना राजांनी पोर्तुगिझांची मदत मागितली होती. पुढे १६६० मध्ये मुघल आणि आदिलशाही स्वराज्यावर हल्ले करत असताना आणि इंग्रज सिद्दीला साथ देत असताना मात्र पोर्तुगीझ तटस्थ राहिले. मराठ्यांची पहिली आरमारी मोहिम बारदेश येथे गेली ती पोर्तुगीझ राज्याच्या सिमेमधून. तेंव्हा सुद्धा ते निष्क्रिय राहिले. मोघलांनी मराठ्यांविरोधात मदत मागितली असताना त्यांने ती साफ़ नाकारली. अगदी संभाजी राजांच्या काळात देखील पोर्तुगीझ मराठ्यांच्या बाजूनेच तटस्थ राहिले. १६९१ मध्ये पोर्तुगीझ गव्हर्नर आपल्या राजाला लिहितो,'रामराजा आणि बाद्शाहाचे अधिकारी या दोघांचा विश्वास आम्ही संपादन केला आहे. मात्र आमच्या राज्याला मुसलमानांपेक्षा हिंदू बरे. मुसलमानांवर कधीही विश्वास ठेवू नये.' पोर्तुगीझ - मराठे संबंध हा अभ्यासाचा एक मोठा विषय आहे.

आरमाराचे बळ अधिक असलेल्या या सागरी सत्ता ताब्यात-धाकात ठेवायच्या तर आपले देखील आरमार हवे हे राजांनी खूप आधी ओळखले होते. यातून जलदुर्ग आणि आरमार यांची निकड निर्माण झाली. स्वराज्याचे ते एक वेगळे अंग बनले. त्याबद्दल आपण पुढील भागात जाणून घेऊ...
.
.

छत्रपति शिवराय ... 'अरिमित्र विचक्षणा' ... !

कूटनितीच्या प्राचीन युद्धतंत्राचे पालन करत छत्रपति शिवरायांनी विजयाची एक मोहोर दख्खनेवर उमटवली. एका नव्या साम्राज्याचा पाया निर्माण केला. पण ह्या सर्वांसोबत चोख लष्करी व्यवस्था, दुर्गमदुर्ग बांधणी आणि कोशबल यांची योग्य सांगड घातली. शिवरायांचे राज्यकारभार विषयक नेमके धोरण काय होते??? याबाबत काही जाबते आपण आधीच्या भागात पाहिले आहेतच. आता आपण बघूया त्यांचे परराष्ट्रीय धोरण काय होते? त्यांनी 'अरिमित्र विचक्षणा' कशी केली होती. स्वराज्य सुरवातीपासूनच चहुकडून शत्रुपक्षाने घेरलेले होते आणि राज्याला अंतर्गत शत्रू देखील खूप होते. ह्या दृष्टीने राजांनी परराष्ट्रीय धोरण कसे ठरवले आणि कसे राबवले हे समजून घेणे महत्वाचे आहे. त्या आधी अरिमित्र म्हणजे काय ते आपण समजून घेऊ.


अरि म्हणजे शत्रू किंवा जवळ ज्याचे राज्य तो. तर मित्र म्हणजे अर्थात सुहृदय. कौटिल्य अरिमित्राचे ६ प्रकार सांगतो.

१. सहज शत्रू - राजाचे नातलग आणि सिमेलगतचे राष्ट्र.

२. कृत्रिम शत्रू - आपल्या विरोधात जाउन इतर राज्यांना सुद्धा विरोध करण्यास भाग पाडणारा.

३. सहज मित्र - सिमेलगतचे राष्ट्र सोडून अन्य राज्यांचा राजा.

४. कृत्रिम मित्र - लाभ संपादन करण्याच्या दृष्टीने मैत्री ठेवणारा.

५. मध्यम - संधीविग्रहात अनुकूल असलेला.

६. उदासीन - बलवान असून मैत्री ठेवणारा.


स्वराज्य हे आदिलशाही मुलुख जिंकून वाढीस लागले असल्याने ते साहजिकच सहज शत्रू राष्ट्र होते. शिवाय मुघल सुद्धा स्वराज्याचे सहज शत्रू होतेच. पण आत्ता शत्रू असणारे राज्य नंतरच्या काळात कृत्रिम मित्रराष्ट्र सुद्धा बनू शकते. मुघलांशी १६६५ मध्ये तर आदिलशाही बरोबर १६७७-७८ मध्ये राजांनी ही भूमिका घेतली होती. मुघल, आदिलशाही, क़ुतुबशाही, इंग्रज आणि पोर्तुगीझ या ५ राज्यांबरोबर शिवरायांनी कसे राजकारण केले ते आपण आता बघू.

मुघल - स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात मुघलांनी मराठ्यांकडे कृत्रिम मित्र म्हणुन पाहिले होते. आदिलशाही पोखरली जाते आहे ह्याचा त्यांना फायदाच होत होता. पण १६५७ मध्ये मराठ्यांनी जुन्नर आणि नगर येथे हल्ले करून मुघलांचे शत्रुत्व ओढावून घेतले आणि मग ते बनले सहज शत्रू. उत्तरेला स्वराज्याची सीमा आता थेट मुघलांशी भिडली होतीच. कल्याण-भिवंडी या उत्तर कोकणावरील आक्रमण आणि अफझलखान वधानंतर तर मुघल थेट चाल करून आले. १६६०-१६६३ ही ४ वर्षे खुद्द शास्ताखान पुण्यात तळ ठोकून होता. सर्व व्यर्थ आहे हे कळल्यानंतर अधिक मोठी मोहिम मिर्झाराजा घेउन आला आणि पुरंदरचा तह घडला. या तहाने मुघल मराठ्यांचे कृत्रिम मित्र बनले. अर्थात त्यांचा सहज शत्रू असलेल्या आदिलशाहीचा पाडाव करायला. पुढे मात्र १६७० मध्ये जिझिया कर, उत्तर हिंदूस्थानमधील मंदिरांवरील आक्रमणे या व अनेक बाबींमुळे हा तह मोडला आणि मराठे-मुघल पुन्हा एकदा समोरा समोर आले... पुन्हा कधीही तह न करण्यासाठी... मुघलांशी मराठ्यांचे असलेले संबंध असे बदलत गेले. पुरंदरच्या तहाचा एक परिणाम म्हणजे आदिलशाहीला सुद्धा आपण मुघलांविरोधात मराठ्यांशी मैत्री का करू नये ही जाणीव झाली. ह्यातून पुढे १६७७ मध्ये मराठे - आदिलशाही तह घडला.
.
.
क्रमश: ...
.
.

29 Mar 2010

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ५. युद्धतंत्र (भाग २) ... !

मागील भागावरुन पुढे सुरू ...

आधीच्या भागात आपण 'कावा' या शब्दाचा खरा अर्थ पहिला. आता आपण बघुया हे काव्याचे तंत्र किती योग्य होते. प्राचीन भारतीय राजनीतीमध्ये युद्धाचे ३ प्रकार नमूद केलेले आहेत. १. प्रकाशयुद्ध, २. कूटयुद्ध आणि ३.तूष्णीयुद्ध. यामध्ये तूष्णीयुद्ध हे निषिद्ध मानलेले आहे. तर प्रकाशयुद्ध म्हणजे उभय पक्ष काळ-वेळ ठरवून जेंव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात ते. प्रकाशयुद्ध हे 'धर्मिष्ट' असल्याचे स्पष्ट असले तरी कूटयुद्ध सुद्धा 'अधर्मिष्ट' नसते.


जेंव्हा कुठल्याही एका पक्षास प्रकाशयुद्ध करणे शक्य नसते तेंव्हा कूटयुद्ध करावे असे कौटील्य सांगतो. जसे... शत्रूचे सैन्य आपल्यापेक्षा संखेने वरिष्ठ असेल पण युद्धक्षेत्र आपल्याला अनुकूल असेल तर कूटयुद्ध करावे. शत्रु सैन्य नदी पार करत किंवा डोंगर उतरत-चढत असेल तरी त्यावर हल्ला करावा. कौटील्य सांगतो की, 'गिरीदुर्ग, वनदुर्ग, कंटककिर्ण अरण्य, पाणथळ जागा, गिरीशिखरे, उंचसखल भूभाग हे प्रकाशयुद्धाने हाती लागत नाहीत. ह्यासाठी कूटयुद्ध करावे. पुढे तो म्हणतो,'वादळी वारा सुटला असताना, वातावरण धुक्याने भरलेल असताना शत्रू स्थळावर आक्रमण करावे, रात्रीच्या वेळी देखील हल्ले करावेत.' छत्रपति शिवरायांनी याच कूटयुद्धनीतीचा पुरेपुर वापर करत शत्रूला पराजीत केले. आपण त्याला आज 'गनिमी कावा' म्हणतो इतकेच. संख्येने सदैव कमी असलेल्या मराठा सैन्याला विजय प्राप्त व्हावे म्हणुन त्यांनी लढाईची रणक्षेत्रे अनुकूल निवडली. शत्रु जर आपल्या प्रतिकूल रणक्षेत्रामध्ये असेल तर स्वतः शत्रूला अनुकूल न होता शत्रूला आपल्या अनुकूल रणक्षेत्रामध्ये खेचून आणणे यात त्यांचे कौशल्य होते. (उदा. अफझलखान प्रकरण. वाई येथे बसलेल्या खानास राजांनी हरप्रयत्ने जावळीच्या जंगलात खेचून आणलेच.) अनुकूल रणक्षेत्र निवडताना शिवरायांनी एक पथ्य नियमितपणे पाळले ते म्हणजे लढाई स्वराज्याच्या भूमीत शक्यतो होऊ द्यायची नाही. (अपवाद - पुरंदरचे युद्ध.) कारण उभय पक्षात लढाई झाली की विजय कोणाचाही होवो नुकसान हे सामान्य जनतेचे होते. पिके जाळली जाणे, घरे लुटणे असले प्रकार सर्रास होत असत. कधीही भरून येणार नाही अशी हानी होत असे.

कूटयुद्धामध्ये वापरले जाणारे अजून एक प्रभावी तंत्र म्हणजे 'बेरीरगिरी' - म्हणजे फिरती लढाई. लढाई करता-करता एका जागी न थांबता रणक्षेत्र थोड्या अंतराने बदलणे आणि शत्रूला पांगवणे. त्यानंतर चहुबाजूने हल्ले करून हैराण करणे. (उदा. जालना, खानदेश येथील हल्ले १६७९) दुसरे अजून एक तंत्र म्हणजे रात्री चालकरून शत्रू जवळ पोचणे आणि भल्या पहाटे शत्रुवर हल्लाबोल करणे. हे तंत्र तर मराठ्यांनी कैक वेळा वापरले. तानाजी मालुसरे यांनी घेतलेला सिंहगड(१६७०), कोंडाजी फर्जंद यांनी घेतलेला पन्हाळा(१६७३), प्रतापराव - आनंदराव यांचे बहलोलखानाबरोबरचे उमराणीचे युद्ध, मोरोपंत - प्रतापराव यांचे मुघलांविरूद्धचे साल्हेरचे युद्ध अशी अनेक उदाहरणे आहेत. गनिमी काव्यामध्ये सर्वात महत्वाचे असतात त्या 'लष्कराच्या गतिमान हालचाली' आणि 'शत्रुवर अनपेक्षित आक्रमण.' शिवरायांनी लालमहालामध्ये शाहिस्तेखानावर केलेल्या हल्याने संपूर्ण भारत अचंभीत झाला. विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,'पापणी लवण्यास जेवढा अवधी लागत नाही, खालचा श्वास वर येण्यास जितके क्षण लागतात तेवढ्या कालावधीत एखाद्या भुजंगाने झडप घालावी तदवत शिवाजीने शास्ताखानावर हल्ला केला.'

कूटनितीच्या प्राचीन युद्धतंत्राचे पालन करत छत्रपति शिवरायांनी विजयाची एक मोहोर दख्खनेवर उमटवली. एका नव्या साम्राज्याचा पाया निर्माण केला. पण ह्या सर्वांसोबत चोख लष्करी व्यवस्था, दुर्गमदुर्ग बांधणी आणि कोशबल यांची योग्य सांगड घातली. शिवरायांचे राज्यकारभार विषयक नेमके धोरण काय होते??? ते आपण येत्या भागात जाणून घेऊ...
.
.
संदर्भ - शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)

28 Mar 2010

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ४. युद्धतंत्र ... !

मागील भागावरुन पुढे सुरू ...



मराठ्यांचे युद्धतंत्राचे ब्रीद होते - 'मति कुंठित करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळाई.' याला दिले गेलेले नाव म्हणजे 'गनिमी कावा'. पण गनिमी कावा म्हणजे नेमके काय??? हे नाव कोणी ठेवले? कसे पडले? म्लेच्छांसाठी गनिम म्हणजे मराठे. तर कावा म्हणजे कपटाने केलेला हल्ला. थोडक्यात शत्रुने आपल्या लढाईच्या पद्धतीला दिलेले हे नाव इतकी ढोबळ माहिती आपल्या सर्वांना असते. पण मराठ्यांचे युद्ध तंत्र इतकेच होते का??? ह्याच तंत्रावर त्यांनी साल्हेरी पराक्रम गाजवला??? दक्षिण दिग्विजय फत्ते केला? पुढे दिल्लीवर कब्जा मिळवला??? उत्तर अर्थात 'नाही' हेच आहे. मराठ्यांचे स्वतःचे असे एक विकसीत तंत्र होते. त्याबद्दल आपण थोड़ी माहिती घेउया पण त्याआधी 'गनिमी कावा' या शब्दाबद्दल थोड़े अधिक जाणून घेउया.

कावा म्हणजे कपट, हुलकावणी असे त्याचे सरळ अर्थ असले तरी त्याचा अजून एक अर्थ आहे तो म्हणजे 'घोड्याची रग जिरवण्यासाठी त्यास वेगाने घ्यावयास लावलेले फेरे'. अधिक स्पष्टपणे सांगायचे तर घोड़ा वेगाने वाटेल तसा वळवणे, फिरवणे आणि मंडल, फेर किंवा घिरटी घेत वेगाने पुढे नेणे. आता ह्या मधून काव्याबद्दल अधिक योग्य माहिती हातात येते. मराठ्यांचे घोड़े हे अश्या प्रकारच्या तंत्रात तरबेज केलेले होते. वेग कमी करून घोड़ा हवा त्या दिशेला वळवणे कोणालाही जमेल पण वेग कमी न करता घोड़ा हव्या त्या दिशेला वळवणे हे कठीण काम असते. कारण वेग मंदावून मोहरा बदलल्यास शत्रूला आपली पुढची चाल सहज समजू शकते तेंव्हा घोडेस्वार कोणत्या दिशेला वळणार आहे ह्याचा अंदाज शत्रूला बांधू न देता मोहरा बदलणे अतिशय महत्वाचे असते. अश्या प्रकारची अनपेक्षित वळणे वेग मंद न करता घेत काव्याच्या ह्या तंत्रात तरबेज असलेले मराठे घोड़े आणि घोडेस्वार शत्रूला बरोबर चुकवीत असत. आणि काव्याच्या लढाईमध्ये शत्रूची दिशाभूल हे प्रमुख उद्दिष्ट मराठा सैनिक साध्य करत असत. सर्वच बाबतीत वरचढ असलेल्या शत्रुपक्षाला पराजीत करण्यासाठी मराठ्यांनी हे युद्ध तंत्र वापरात आणले होते. अश्या वेगवान हल्यांमुळे शत्रुपक्षात मुसंडी मारत मराठा फ़ौज घुसे आणि शत्रु फळीमध्ये खिंडार पाडून लगेच परत फिरत असे. गोंधळलेल्या शत्रूच्या पिछाडीवर दुसरी तुकडी हल्ला करत असे आणि शत्रुला मागे फिरून मोहरा बदलवण्यास भाग पाडत असे. आता शत्रुच्या डाव्या-उजव्या बाजूवर हल्ले केले जात आणि शत्रूची पूर्ण फळी विस्कळीत केली जाई. याला 'Pincer Movement' असे म्हणतात.

मराठा पायदळ सुद्धा अश्याच तंत्राचा वापर करून शत्रूला हैराण करून सोडे आणि गुढगे टेकण्यास भाग पाडे. शत्रू बेसावध असताना अचानक हल्ला करणे आणि आपली सैन्यसंख्या कमी असून देखील ती जास्त आहे असे भासवणे असे विशिष्ट तंत्र वापरून शिवरायांनी सुरवातीच्या काळात शत्रुवर विजय प्राप्त केले. ह्या सर्वात 'वेग' हा मूलभूत महामंत्र आणि सोबत असते अखंड सावधानता.

पण गनिमी काव्याचे हे युद्ध खरच किती योग्य आहे??? प्राचीन भारतीय राजनीतीमध्ये कुठ-कुठली युद्धतंत्रे सांगितली गेली आहेत??? छत्रपति शिवरायांनी हे तंत्र वापरताना काय-काय विचार केला असेल??? ह्या सर्वांबद्दल आपण पुढच्या भागत थोड़ी माहिती घेऊ...
.
.
संदर्भ - शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)

5 Feb 2010

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ३. लष्करी व्यवस्था ... !

गेल्या २ भागात आपण पाहिले की छत्रपति शिवरायांनी मंत्रशक्ती आणि उत्साहशक्ती वापरून तिसरे बलस्थान जे 'प्रभुशक्ती' (कोश आणि सैन्य) ते क्रमाक्रमाने कसे वाढवले. सैन्य आणि कोश हे एकमेकांस पूरक आहेत हे सुद्धा आपण ह्याआधी पाहिले आहेच. 'थोरले महाराज यांनी हे राज्य गडावरुन निर्माण केले' या आज्ञापत्रातील ओळीवरुन हे स्पष्ट होते की गड-कोट, किल्ले-दुर्ग ही ठाणी जिंकण्यासाठी आणि टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्य आवश्यक होते. थोडक्यात 'राजतंत्र' हे सर्वस्वी सैन्यावर अवलंबून असते. नवीन शत्रुप्रदेश जिंकणे, जिंकलेल्या भागाचे संरक्षण करणे, संरक्षित भागाचे संवर्धन करणे आणि अखेर त्याचे न्यायाने परीचालन करणे ह्या सर्व बाबींसाठी सैन्याची आवशक्यता असतेच. स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात सैन्याची जमवा-जमव हा एक जटील प्रश्न होता. रोहिडेश्वर येथे स्वराज्य शपथ घेणाऱ्या शिवरायांनी पुढच्या काही काळात १ हजार सैन्य उभे केले होते. समोर असलेल्या परिस्थितिमधून मार्ग काढताना, नविन राज्यपद्धती रुद्ध करताना त्यानी एक नविन युद्धतंत्र प्रवर्तित केले. गरज वाढली तसे सैन्येचे संख्याबळ आणि त्यांना लागणाऱ्या साधनसामुग्री उभी केली. लढ़ण्याचा ध्येयवाद त्यांच्यामध्ये निर्माण केला. सेतु माधवराव पगड़ी म्हणतात की,
"The Marathas fought for saving their homelands. It was cause worth Fighting & Dying for. They were led by a Man of No ordinary Skills & Calibre."

स्वराज्याच्या पहिल्या तपात माणसे जोड़णे, त्यांच्यात ध्येय निर्माण करून लष्करी आणि मुलकी व्यवस्था लावणे हे काम शिवरायांनी तडीस लावले. आवशक्यता असेल तेंव्हा स्वतः मोहिमेचे नेतृत्व करून सैन्यात उमेद आणि उत्साह निर्माण केला. लाखभर फौजा उभ्या करून सुद्धा त्यांनी कुठल्याही लढाईमध्ये निम्यापेक्षा अधिक सैन्य कधीच गुंतवले नाही. कौटिल्यच्या अर्थशास्त्रानुसार राजाने आपले सैन्याचा चौथा भाग युद्धात गुंतवू नये असा नियम लिहिला आहे. शिवरायांनी हेच धोरण अंगीकारले आहे असे दिसते. या शिवाय 'माणूस ख़राब होवू नये' याची ते नेहमीच दक्षता घेत. ह्याचमधून निर्माण झाले मराठ्यांचे एक विलक्षण युद्धतंत्र. अफझलखान मोहिम असो नाहीतर पुरंदरची लढाई प्रकर्षाने हेच पुढे येते. माणूस ख़राब होवू नये म्हणजे सैन्य जाया होवू नये म्हणुन त्यांनी पुरंदरची लढाई थांबवून तह स्वीकारला. फ्रेंचमन मार्टीन आपल्या डायरीमध्ये म्हणतो,

"Shivaji was an outstanding General of his age. He was aware of his limited resources & cousious about huge resources of his enemies. So tool full advantage of every single weakness of enemy. He watched their movements & managed to corner them into difficult positions. Time & again he broke the combinations of enemies by driving a wedge between them. His campaigns in Baglana in 1670-1672 were a masterpiece of war strategy."

राजांनी सैन्यात एक शिस्त निर्माण केली. सैन्यासंबंधी निरनिराळ्या तजविजींवर शिवरायांचे बारकाईने लक्ष्य असे, त्याचप्रमाणे आपल्या सैन्याकडून रयतेला यत्किंचितहि उपसर्ग होऊ नये म्हणून ते प्रचंड दक्ष असत. राजाभिषेकाच्या थोड़े आधी म्हणजे १६७४ मध्ये त्यांनी चिपळूण येथील अधिकार्‍यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात,"मोघल मुलकात आले त्याहूनहि अधिक तुम्ही. रयतेस काडीचाहि आजार द्यावयाची गरज नाही." पत्रामध्ये लष्करी छावणीमध्ये शिस्त कशी हवी हे सुद्धा राजे लिहितात. पूर्ण पत्र 'येथे' वाचा. चोख शिस्त असलेल्या सैन्याला प्रशिक्षण देखील तितकेच महत्वाचे असते. त्यासाठी आवश्यक आयुधे, शस्त्रे आणि इतर सामुग्री वेळेवर उपलब्ध करणे सुद्धा महत्वाचे असते. या बाबतीत सुद्धा राजांनी एक धोरण अंगीकारले होते. वेळप्रसंगी परकीय सत्तांकडून दारूगोळा आणि शस्त्रे ते घेत असत.


मराठ्यांच्या युद्धतंत्रात महत्वाचे स्थान होते ते घोडदळाला. त्या मागोमाग पायदळ. तोफखाना विभाग होता पण तो पायदळ अंतर्गत आणि तो गड़-किल्ल्यांवर स्थिर असे. फौजेसोबत फिरता नसे. मराठा घोडदळाने दिवंगत किर्ती प्राप्त केली होती. इतकेच नव्हे तर शत्रूने त्यांची प्रचंड भिती घेतली होती. विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,"मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते. एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता. मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच. ती चंद्राची सखी असते. मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो, तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत होते. मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू तो वाऱ्याशी गुजगोष्टी करीत असतो. अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते; धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते." पुढे तो म्हणतो,"वाऱ्याचाही शिरकाव होणार नाही अश्याही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात. किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो. या लष्कराने आणि शिवाजीने आकाशाशी स्पर्धा करणारे उंच-उंच गड़ चढून काबीज केले. जहाजत बसूनही मराठे लढले आणि त्यांनी फिरंग्यान्ना धाक बसवला. त्यांच्या वर्दळीमुळे समुद्रावर नेहमीच तूफ़ान येत राहिले."

दक्षिणदिग्विजय मोहिमेदरम्यान फ्रेंचमन मार्टीन आपल्या डायरीमध्ये अशी नोंद घेतो -

'Quick Cavalry movements & excellent, well-paid intelligent services were the main cause of Shivaji’s success. He also mentioned about simplicity of Shivaji’s camp, absence of women, and lack of heavy baggage. He also observed that horsemen in cavalry were paid regularly & that they did not own horses. The horses were property of state. What a contrast to the slow moving, Mansabdari – ridden Mughal armies.'



“He also frequently surprised his enemies who thought him to be far off when he fell upon them. The families of these cavalries who belong to these parts were stationed in the lands of the west coast of India. This is what attached them to his service. This chief also paid his spies liberally who have given him considerable facilities for his conquest by the sure information they have supplied him.”

थोडक्यात मराठ्यांचे युद्धतंत्राचे ब्रीद होते - 'मति कुंठित करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळाई.' याला दिले गेलेले नाव म्हणजे 'गनिमी कावा'. पण गनिमी कावा म्हणजे नेमके काय?
.
.
क्रमश: ...

संदर्भ - शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)
.
.

24 Jan 2010

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... २. दुर्गम-दुर्ग ... !


गेल्या भागात पाहिल्याप्रमाणे जसे कुठल्याही राजाकडे मंत्रशक्ती, उत्साहशक्ती आणि प्रभुशक्ती हे बलाचे ३ प्रकार असणे आवश्यक असते तसेच कुठल्याही राजा आणि राज्याची ४ बलास्थाने असतात. कोश(खजिना), सैन्य(लश्कर), दुर्ग आणि सुह्रदय(अरिमित्र). ह्यातील प्रभुशक्ती मधल्या एका म्हणजेच 'कोश' या बलस्थानाबद्दल आपण गेल्या भागात थोड़ी माहिती घेतली. प्रभुशक्ती मधल्या 'सैन्य' या दुसऱ्या बलस्थानाचा वापर करून राजांनी कोश-संचय कसा केला हे सुद्धा पाहिले. छत्रपति शिवरायांनी शत्रुच्या मूलखातून गोळा केलेल्या धनामधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम-दुर्ग उभारले. जे बनले 'संपूर्ण राज्याचे सार'. आज आपण छत्रपति शिवरायांच्या 'दुर्गम-दुर्ग' या बलस्थानाबद्दल जाणून घेऊ. राजांनी स्वराज्याचे संपूर्ण S.W.A.T. Analysis (Strengths, Weaknesses, Opportunities, and Threats) केलेले होते असेच म्हणावे लागेल. शिवकाळात 'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग' हा विचार प्रकर्षाने जाणवतो. परकियांच्या आक्रमणापासून जर राष्ट्ररक्षण करायचे असेल तर गड-कोट, किल्ले-दुर्ग ही ठाणी अधिक मजबूत करावी लागतील हे त्यांच्या लक्ष्यात आले होते. 'सह्याद्री' हे आपले प्रमुख बलस्थान असल्याचे शिवरायांना ठावूक होतेच. स्वराज्याची स्थापनाच मुळात गड-किल्ल्यांवरुन झाली. विविध प्रकारचे दुर्ग राजांनी जिंकले, ओस पडलेले ताब्यात घेतले. अनेक नव्याने बांधले. यात अनेक गिरिदुर्ग होते, वनदुर्ग देखील होते. जलदुर्ग होते तसे भूदुर्ग देखील होते. एक गोष्ट इकडे प्रकर्षाने मांडावीशी वाटते ते म्हणजे शिवरायांनी गड आणि किल्ला यात योग्य फरक केला. 'राजव्यवहारकोश'प्रमाणे गिरिदुर्ग म्हणजे 'गड' तर भूदुर्ग म्हणजे 'किल्ला'. जो-जो दुर्ग शिवरायांच्या अधिपत्याखाली आला त्याला त्यांनी 'गड' हे नाम पुढे जोडले. उदा. पन्हाळा - पन्हाळगड, विशाळा - विशाळगड,  कोंढाणा - सिंहगड, रायरी - रायगड, तोरणा - प्रचंडगड. अशी किती तरी उदा. देता येतील.

स्वतः शिवरायांनी किल्ल्यांचे महत्त्व खालील शब्दात वर्णन केले आहे. "जैसे कुळबी शेतास माळा घालून शेत राखितो, तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत. तारवांस खीळे मारून बळकट करितात तशी राज्यास बळकटी किल्यांची आहे. किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्याची उमर गुजरून जाईल. आपणास धर्मस्थापना व राज्यसंपादन करणे होय. सर्वांस अन्न लावून, शत्रुप्रवेश न होय ते किल्ल्यांमुळे होते. सर्वांचा निर्वाह आणि दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे-जुने तीनशेसाठ किल्ले हजरतीस आहेत. एक-एक किल्ला वर्ष-वर्ष लढला, तरी तीनशेसाठ वर्षे पाहिजेत." आणि पुढच्या पन्नास वर्षात सह्याद्रीने तेच अनुभवले. असेच नाही बनले शिवराय 'जाणता राजा' ... !!! 'थोरले महाराज यांनी हे राज्य गडावरुन निर्माण केले' आणि 'गड होते म्हणुन राज्य मात्र अवरिष्ट राहिले' या आज्ञापत्रातील २ वाक्यांवरुन शिवकाळातील गडांची महती स्पष्ट होते. रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात ८ व्या प्रकरणात किल्ल्यांचे महत्त्व, त्यांची रचना व व्यवस्था यावर उहापोह केला आहे. त्यात म्हटले आहे की "गड़कोट हेच राज्य, गड़कोट म्हणजे राज्याचे मुळ, गड़कोट म्हणजे खजिना, गड़कोट म्हणजे सैन्याचे बळ, गड़कोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गड़कोट म्हणजे आपली वसतिस्थळे, गड़कोट म्हणजे सुखनिद्रागार किंवा गड़कोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण." प्रत्येक किल्ला व त्यासभोवतालचा प्रदेश हा शिवरायांच्या राज्यमालिकेतला एक घटकावयव होता. त्यांनी बहुतेक अचाट कृत्ये ह्या किल्ल्यांच्या सहाय्याने तडिस नेली. मिळवलेला बहुसंख्य कोश-संचय नविन किल्ल्यांची बांधणी व पुर्नरचना यावर खर्च झाला. अश्या दुर्गम दुर्गांचे शासन सुद्धा परम उग्र होते. राजाभिषेकानंतर श्री शिवछत्रपति महाराजांनी प्रधानमंडळ कानून जाबता यामध्ये कलम १२ गडांबद्दल लिहिले होते. ते अशाप्रकारे,"किले-कोट, ठाणे जंजिरे येथील कायदे करून दिल्हे त्याप्रमाणे हवालदार, सुभेदार, कारखानीस, सरनौबत, सबनीस, तटसरनौबत लोक यांचे जाबते करून दिल्हे त्याप्रमाणे चालऊन सावधानतेनें स्थळे रक्षावी. तगिरी-वहाली हुजुरु न व्हावी, बजमी नेमणूक तालूकादार यांजकडे दरवाजा, किल्या, हवालदार,याचा हुकुम सिके त्याचे नावाचे. कारखानीसी जाबता अलाहिदा करणें."


१८ व्या शतकात मराठ्यांचा इतिहासावर पहिला शोध ग्रंथ लिहिणारा ग्रँट डफ म्हणतो, "किल्ल्यातून आत बाहेर कोणी केंव्हा जाणे, गस्ती फिरणे, चौक्या सांभाळणे व त्यावर देखरेख करणे, पाणी, धान्यसामुग्री व युध्दसामुग्री इत्यादी तयार ठेवणे यागोष्टीं वरती अगदी सक्तीचे सुक्ष्मनियम शिवाजीने केलेले असून प्रमुख शाखेवरील मुख्य अधिकाऱ्याची बारीक कामेसुद्धा ठरवलेली होती आणि ते नियम मोडण्यास तीळभर सुद्धा जागा नव्हती. इतके असून त्याचा ह्या बाबींचा खर्च फारच काटकसरीने बांधलेला होता." तर डग्लस म्हणतो, "शिवाजीचे वास्तव्य डोंगरी मुलुखातच होते व त्याचे सामर्थ्य डोंगरी प्रदेशाच्या भरवश्यावरच होते. तो ख़राखुरा दुर्गस्वामी होता. त्याचा जन्म दुर्गात झाला. त्याला जे वैभव प्राप्त झाले ते दुर्गांच्यामुळे आणि त्याच्या दुर्गान्ना जे सामर्थ्य प्राप्त झाले तेही त्याच्याच प्रयत्नाने झाले. त्याचे दुर्ग म्हणजे भारतातील त्याच्या शत्रूंना धाक होता. त्याच्या राष्ट्राची ती संवर्धनभूमी होती. त्याच्या विजयाचा तो पाया होता. त्याच्या वाढत्या महत्वाकांक्षेचा तो जिना होता. दुर्ग हेच त्याचे निवासस्थान व तेच त्याच्या आनंदाचे निधान होते. कित्येक दुर्ग त्याने स्वतः बांधले आणि जे आधी बांधलेले होते, त्यासर्वांना त्याने बळकटी आणली." छत्रपति शिवरायांनी कोश-संचय करून दुर्ग आणि सैन्य वाढवले. तर सैन्य आणि दुर्गांवरुन राज्य निर्माण केले. 'सह्याद्री'च्या भुगोलाचा वापर करून एक विशिष्ट युद्धपद्धती, विशिष्ट युद्धतंत्र विकसित केले. मराठ्यांची युद्धपद्धती नेमकी काय होती? त्यांची लष्करी व्यवस्था कशी होती? या संबंधाने 'सैन्य या तिसऱ्या बलस्थानाबद्दल आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत ...
.
.
संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य), शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी) आणि अथातो दुर्गजिज्ञासा (लेखक- प्र. के. घाणेकर).
.
.

22 Jan 2010

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... 1. कोशबल ... !

प्राचीन राजनीतीपर ग्रंथांमध्ये बलाचे ३ प्रकार सांगितले आहेत.
मंत्रशक्ती, उत्साहशक्ती आणि प्रभुशक्ती.

मंत्रशक्ती म्हणजे राजा आणि त्याचे प्रधानमंडळ यांचे राजनैतिक नैपुण्य आणि परिस्थिति - काळानुरूप निर्णय घेण्याची शक्ती. उत्साहशक्ती म्हणजे राजा, प्रधानमंडळ आणि त्यांचे सैन्य हे किती पराक्रमी आहेत, त्यांच्या अंगीभूत शौर्य किती आहे, ह्यावर अवलंबून असलेली शक्ती. तर प्रभुशक्ती म्हणजे राजाची आणि राज्याची कोश (खजिना) आणि सैन्य (लश्कर) यांची ताकद. 'सैन्य पोटावर चालतात' हे जसे खरे तसेच सैन्य असल्याशिवाय कोशाची वाढ कशी होणार? तेंव्हा कोश आणि सैन्य एकमेकास पूरक असतील तरच राजाचे सामर्थ्य शाबूत राहते. महाभारतात म्हटले आहे की,"कोशबल अनुकूल असेल तरच राजाला सैन्य बाळगता येते. सैन्य पदरी असेल तरच राजा धर्माचे रक्षण करू शकतो. आणि धर्मरक्षण झाले तरच प्रजेचे संरक्षण होते." (येथील धर्माची व्याख्या जाणकार वाचकांच्या लक्ष्यात आली असेलच. आज काल 'धर्म'व्याख्या बरीच बदलली आहे याकारणे लिहिले आहे)

छत्रपति शिवरायांकडे यापैकी मंत्रशक्ती आणि उत्साहशक्ती उपलब्ध होती हे सांगणे न लगे. तिसरे बलस्थान जे प्रभुशक्ती (कोश आणि सैन्य) ते राजांनी क्रमाक्रमाने मंत्रशक्ती आणि उत्साहशक्ती वापरून वाढवले. S.W.A.T. अनालिसीस (Strengths, Weaknesses, Opportunities, and Threats) वर आपण जो अभ्यास आत्ता करतोय ना; तो ह्या जाणत्या राजाने ३५० वर्षांपूर्वीच आपल्या समोर मांडलाय की... कधी विचार केलाय ह्या दृष्टीने शिवचरित्राचा??? Strengths म्हणजे त्यांची बलस्थाने अगदीच मोजके होती. सोबत होती ती मंत्रशक्ती आणि थोड़ीफार उत्साहशक्ती, मोठ्या प्रमाणावर जवळ होते ते म्हणजे Weaknesses. थोडक्यात कमी सैन्य, रीता असलेला खजिना. आसपास Opportunities खुप होत्या मात्र. त्यावर तर त्यांनी स्वतःचे Strengths वापरले आणि स्वराज्य उभे केले. त्यांच्या भोवती सर्वत्र Threats होतेच की. उजवीकडे किंवा वर सरकले की मुघल. खाली सरकले की आदिलशाही. पश्चिमेला सिद्दी अणि थोडं खाली पोर्तुगीझ. शिवरायांच्या वेळच्या मर्यादा लक्षात घेता कोश-संचय ही एक प्रचंड कठीण बाब होती. उत्पन्नाची साधने सर्व बाजूंनी मर्यादित असताना स्वराष्ट्र रक्षण आणि प्रजारक्षण करणे हे किती कर्मकठीण काम आहे हे लगेच समजुन येतेच. पण येथे त्यांने मंत्रशक्ती वापरून 'आर्थिक व्यवस्थापन' केले आहे. एक महत्वाची बाब या ठिकाणी लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे प्रजेला अंतर्गत आणि बाह्य शत्रुंपासून कुठलेही नुकसान होऊ नये म्हणुन राजांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी मोठ्याप्रमाणावर आवश्यक असलेले कोशबल सुद्धा न्यायमार्गाने उभे केले. राजांनी संपूर्ण कोश-संचय हा न्यायमार्गाने केलेला आहे. आता आपण बघुया त्यावेळी त्यांच्याकडे उत्पन्नाची कुठली-कुठली साधने उपलब्ध होती...


हिंदवी स्वराज्याच्या कोश-संचयाचे प्रमुख साधन होते ते शेतकऱ्याकडून वसूल करण्यात येणारा जमीन महसूल उर्फ़ शेतसारा. शिवरायांचे 'शेती विषयक धोरण' हा अभ्यासाचा मोठा विषय आहे. शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर अन्याय तर होऊ नयेच, तर त्यास योग्य त्या सवलती मिळाव्यात आणि राज्याचे उत्पन्न वाढावे असे विचार त्यांनी एका पत्रातून व्यक्त केले आहेत. जमिन महसूलीची पद्धत, तगाई देणे, कर्जमुक्त करणे याबाबत सविस्तर विवेचन सदर पत्रामध्ये राजांनी केले आहे. सदर पत्र येथे वाचू शकता. पत्रामध्ये राजे म्हणतात,"येक भाजीच्या देठासहि मन नको." संपूर्ण न्याय मार्गाने शेतसारा वसूलीची चोख पद्धत राबवून जहागीरदार, मिरासदार आणि वतनदारांवर पूर्ण लगाम ठेवत संपूर्ण उत्पन्न सरकारी खजिन्यात जमा केले जायचे. शेतकरी प्रजा आणि शासन यांमध्ये कोणीही मध्यस्त असणार नाहीत याची त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली होती. बरीच वतन त्यांनी अनामत केली आणि जी उरली त्यांना 'देशाधिकाऱ्याच्या आज्ञेत वागावें' असे स्पष्ट बंद होते. देशाधिकाऱ्याला 'कानून जाबता' लागू होताच. शिवरायांच्या वेळी सुद्धा सारा काही कमी नव्हता. उत्पन्नाच्या २/५ तक्षिमा इतका होता. तक्षिमा म्हणजे विभाग. २/५ म्हणजे ४० टक्के इतका सारा भरावा लागायचा. तरी सुद्धा ही मांडणी लोकांनी खुशीने मान्य केली होती. ह्याचे कारण होते पक्षपातरहित निर्दोष अंमलबजावणी. ह्या साऱ्याने स्वराज्याचा खजिना मोठ्या प्रमाणावर समृद्ध होत होता. त्यांनी प्रजेवर जादाकर कधीच लादले नाहीत. राजाभिषेकप्रसंगी झालेला खर्च सुद्धा त्यांनी वतनदारांवर 'सिंहासन पट्टी' बसवून वसूल केला. त्यासाठी त्यांनी जनतेला वेठीस धरले नाही.


शेतसाऱ्या बरोबरच व्यापार-उदीम हे उत्पन्नाचे अजून एक महत्वाचे माध्यम होते. शिवरायांनी आपला राज्यात व्यापार वाढीसाठी अनेक उपाय योजना केल्या होत्या. व्यापार वाढीसाठी राज्यात शांतता - सुव्यवस्था महत्वाची असते. तसेच सुरवातीला कमी कर घेउन व्यापाराला प्रोत्साहन देणे सुद्धा गरजेचे असते. छत्रपति शिवरायांचे 'व्यापार विषयक धोरण' हा सुद्धा अभ्यासाचा मोठा विषय आहे. कोकण भागावर पूर्ण नियंत्रण मिळवल्यावर राजांनी मिठाचा मोठा व्यापार सुरू केला होता. या संदर्भात छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७१ मध्ये कूड़ाळचा सुभेदार नरहरी आनंदराव यांना लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. त्यात राजे म्हणतात,"बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे." पोर्तुगीजांच्या ताब्यातील बारदेश प्रदेशात व्यापारी मीठ स्वस्त विकत असल्याकारणाने स्वराज्यामध्ये मीठ व्यापार मंदावला होता. येथील मीठ व्यापाराला उत्तेजन मिळावे म्हणुन राजांनी नरहरी आनंदराव यांना सदर पत्र लिहिले. या वरुन लक्षात येते की राजांचे व्यापारावर किती बारीक लक्ष असे. मिठाने भरलेली मराठा जहाजे व्यापारासाठी मस्कतपर्यंत जात असत. छत्रपति शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये प्रभावळीच्या सुभेदारास लिहिलेले अजून एक पत्र उपलब्ध आहे. पत्रात राजे म्हणतात,"दाभोळास नारळ कमनिर्खे विकते हा अंमल कैसा आहे" पुढे राजे म्हणतात,"आम्ही ठरवून दिलेल्या दरातच नारळाची विक्री व्हावी." दाभोळ येथे नारळ अतिशय स्वस्त विकत असल्या कारणाने, त्याचा परिणाम आजूबाजुच्या कोकण परिसरात नारळाच्या व्यापारावर होऊ लागला, तेंव्हा राजांनी प्रभावळीच्या सुभेदारास सदर पत्र लिहिले होते. स्वराज्यामधल्या बारीक़ व्यापारावर सुद्धा राजांचे किती बारकाईने लक्ष्य होते हे या पत्रावरुन लक्ष्यात येते. ज्याप्रमाणे स्वतःच्या राज्याच्या व्यापाराला प्रोत्साहन देणे आवश्यक असते तसेच इतर राज्यातील व्यापाराला देखील उत्तेजन देऊन आपल्या राज्यात आणावे लागते. शत्रुपक्षाकडील व्यापारयाच्या नावेस व मालास 'तसनस' न करता ते बंदरात न्यावे आणि वरिष्ट अधिकारी यांनी त्यासंबंधी न्याय-निवाडा करावा असे स्पष्ट आदेश तेथील अधिकाऱ्याला होते.  कोश-संचयाच्या दृष्टीने त्यांनी कोकण किनाऱ्यावरील व्यापार आणि बाहेरील मालावरील आयात कर यावर विशेष भर दिला होता.

याशिवाय काही अनियमित उत्पन्न सुद्धा होते. जसे इतर राजांकडून, त्यांच्या वकीलांकडून येणारे भेटवस्तू, नजराणे आणि पेशकश. शेती आणि व्यापार ही कोश-संचयाची प्रमुख साधने होतीच पण त्या शिवाय अजून एक महत्वाचे साधन होते ते म्हणजे 'विक्रमार्जीत धन'. शत्रुकडून वसूल केलेली खंडणी आणि युद्धखर्चाची रक्कम म्हणजे विक्रमार्जीत धन. स्वराज्याच्या चहुबाजुस पसरलेल्या शत्रुंवर राजांनी वेळोवेळी मोहिमा काढून अश्याप्रकारे धन प्राप्त केले होते. या मोहिमेचे उद्दिष्ट हे शत्रुचा प्रदेश जिंकणे नसून फ़क्त रिता झालेला खजिना भरून काढणे इतकेच होते. खजिना लुटून शत्रुस दुर्बल करणे आणि स्वतः बलवान होणे यासाठी अश्या मोहिमा शिवरायांनी वेळोवेळी यशस्वी केल्या. यांमध्ये १६५६ ला उघडलेली कल्याण-भिवंडीची मोहीम, १६६० मधील आदिलशाही वरील स्वारया, १६६४, १६७० मधील सूरत येथील स्वारी, मुघलांच्या बूर्ह़ाणपुर - खानदेश या भागात उघडलेल्या १६७५, १६७७ आणि १६७९ मधील स्वाऱ्या, करंज्यामधली (१६७२), अथणी (१६७५), श्रीरंगपट्टण (१६७७), हुबळी (१६७७) आणि जालना (१६७९) या व अश्या अनेक यशस्वी स्वाऱ्या शामील आहेत. या सर्व मोहिमा कोशवृद्धिचे एक महत्वाचे साधन होते. मात्र या सर्व मोहिमेत शत्रुपक्षाच्या राज्यातील सामान्य जनतेसही तोशीस लावू नये असे स्पष्ट आदेश मराठा सैन्यास होते. प्रभुशक्तिची म्हणजेच कोश (खजिना) आणि सैन्य (लष्कर) यांची ताकद शिवरायांनी क्रमाक्रमाने नियोजन रित्या वाढवली. शत्रुच्या मूलखातून गोळा केलेल्या धनामधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम-दुर्ग उभारले. जे बनले 'संपूर्ण राज्याचे सार'. त्याबद्दल आपण पुढील भागात जाणून घेऊ...
.
.
संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य) आणि शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)
.
.

21 Jan 2010

छत्रपति शिवरायांचे जाहीरनामे - 'कानून जाबता' ... !

ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी, शके १५९६ या दिवशी 'महाराजांनी शिरी छत्र धरले. राजे चक्रवर्ती सम्राट झाले. मराठा राजा छत्रपती जाहला ही गोष्ट सामान्य नाही जाहली.' राजाभिषेकानंतर ३ दिवसात म्हणजे 'ज्येष्ठ वद्य प्रतिपदेस' श्री शिवछत्रपति महाराजांनी ३ जाहीरनामे प्रसिद्द केले. तर चौथा जाहिरनामा राजाभिषेकानंतर १५ दिवसात म्हणजे 'ज्येष्ठ वद्य त्रयोदशीस' घोषीत झाला. हे सर्व जाहीरनामे 'कानून जाबता' म्हणुन ओळखले जातात. थोडक्यात राजाभिषेकानंतर २ आठवडयामध्ये राज्यव्यवहार पद्धती कशी असेल ते छत्रपति शिवरायांनी पूर्णपणे स्पष्ट केले होते. अर्थात आधी सुद्धा हीच राज्यव्यवहार पद्धत अमलात असली पाहिजे; राजाभिषेक हे जाहीर करायला एक निमित्त ठरले असावे.

  •  जाहीर झालेले ४ कानून जाबते खालीलप्रमाणे -
१) जाबता चिटणीसी लिहीण्याचा - एकूण कलमे १२
२) जाबता लष्कर सरनौबत - एकूण कलमे ८
३) जाबता कारखानीशी आणि सबनीशी लिहीण्याचा - एकूण कलमे २२ (कारखानीशी १४ आणि सबनीशी ८ कलमे)
४) प्रधानमंडळ - एकूण कलमे २०

आपण 'प्रधानमंडळ' ह्या जाबत्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. छत्रपति शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांची कार्ये व जबाबदाऱ्या थोडक्यात खालीलप्रमाणे होते -
१) मोरोपंत पिंगळे (पंतप्रधान / पेशवा) : सर्व राजकार्य, राजपत्रावर शिक्का, ताब्यात असलेल्या प्रदेशचे रक्षण व व्यवस्था, युद्ध.
२) रामचंद्र निळकंठ (अमात्य / मुजुमदार) : जमाखर्च, दप्तरदार व फडणीस यांवर देखरेख, खात्याशी संबंधित असलेल्या कागदांवर शिक्का, युद्ध.
३) अण्णाजी दत्तो (सचिव / सुरनीस) : राजकार्यविषयक सर्व जबाबदारी, युद्ध.
४) रामचंद्र त्रिंबक (सुमंत / डबीर) : परराज्यविषयक कार्याचा विचार, युद्ध.
५) हंबीरराव मोहिते (सेनापती / सरनौबत) : सैन्यविषयक जबाबदारी, युद्ध.
६) दत्ताजी त्रिंबक (मंत्री / वाकनीस) : अंतर्गत राजकारणाचा विचार, हेर खाते, युद्ध.
७) रघुनाथराव (पंडितराव) : धर्मा-धर्म विचार.
८) रावजी निराजी (न्यायाधीश) : तंटे, न्याय-निवाडा.
 
 
कानून जाबता : प्रधान मंडळ

क्षत्रिय कुलावतंस राजा शिवछत्रपति
राजाभिषेक शके १, आनंदनाम संवत्सरे,
ज्येष्ठ वद्य त्रयोदशी, भोमवासर-

१. मुख्य प्रधान यांणी सर्व राजकार्य करावे; राजपत्रावरी शिक्का करावा; सेना घेउन युद्धप्रसंग स्वारी करावी, तालुका ताबिनात स्वाधीन होइल त्यास रक्षून बंदोबस्त करून आज्ञेत वर्तावें व सर्व सरदार, सेना यांजबरोबर जावें आणि सर्वसंमत चालावें.
येणेप्रमाणे कलम १.

२. अमात्य यांणी सर्व राज्यांतील जमाखर्च चौकशी करून दप्तरदार, फडणीस यांचे स्वाधीन असावें; लिहिनें चौकशीनें आकारावें; फडणीशी, चिटणीशी पत्रांवर चिन्ह संमत करावे; युद्धप्रसंग करावें. तालुका जतन करून आज्ञेतं चालावें.
येणेप्रमाणे कलम १.

३. सचिव यांणी राजपत्र शोध करून अधिक-उणे मजकूर शुद्ध करावी. युद्धप्रसंग करून तालुका स्वाधीन होइल तो रक्षून आज्ञेतं वर्तावें. राजपत्रावर चिन्ह संमत करावें.
येणेप्रमाणे कलम १.

४. मंत्री यांणी सर्व मंत्रविचार राजकारण यांतील सावधतेनें आमंत्रण, निमंत्रण, वाकनिशी यांचे स्वाधीन. तालुका जतन करून युद्धादि प्रसंग करावें. राजपत्रावर संमत चिन्ह करावें.
येणेप्रमाणे कलम १.

५. सेनापती यांणी सैन्य रक्षण करून युद्धप्रसंग स्वारी करावी. तालुका स्वाधीन होइल तो रक्षून हिशोब रुजू करून आज्ञेतं वर्तावें व फौजेचे लोकांचे बोलणे बोलावें. सर्व फौजेचे सरदार यांणी त्याजबरोबर चालावें.
येणेप्रमाणे कलम १.

६. पंडितराव यांणी सर्व धर्माधिकार, धर्म, अधर्म पाहून विचिक्षा करावीं. शिश्टांचे सत्कार करावे. आचार, व्यवहार, प्रायश्चितपत्र होतील त्यावर संमत चिन्ह करावें. दान-प्रसंग, शांती अनुष्ठान तत्काळी करावें.
येणेप्रमाणे कलम १.

७. न्यायाधीश यांणी सर्व राज्यातील न्याय-अन्याय मनास आणून बहुत धर्में करून न्याय करावें. न्यायाची निवडपत्रे यांजवर संमत चिन्ह करावें.
येणेप्रमाणे कलम १.

८. सुमंत यांणी परराज्यातील विचार करावा. ज्यांचे वकील येतील त्यांचे सत्कार करावें. राजपत्रावर संमत चिन्ह करावें.
येणेप्रमाणे कलम १.

९. चिटणीस यांणी सर्व राज्यातील राजपत्रे ल्याहावीं. राजकारण-पत्रें, उत्तरें ल्याहावीं. सनदी , दान पत्रें वगैरे महालीं, हुकुमी यांचा जाबता, फडणीशी, चिटणीशी अलाहिदा त्याप्रमाणें ल्याहावें. हातरोखा, नाजुक पत्रें, यांजवर मोर्तब अथवा ख़ास दस्तक. मात्र वरकड़चा दाखला, चिन्ह नाहीं, चिटणीसांनीच करावें.

येणेप्रमाणे कलम १.

१०. फौजेचे सबनीस, बक्शी यांणी सर्व फौजेची हाजरी चौकसी करावी. यादी करून समजावावें. रोज्मरा वाटणें, सत्कार करावा. युद्धादि प्रसंग करावा.
येणेप्रमाणे कलम १.

११. सेनाधुरंधर यांणी बिनी करावी. आघाडीस जावें, उतरावें. फडफर्मास जमा करावीं. लुट करणें मना करणें. चोकसी-ताकीद यांजकडे, पुढे असोन सेना रक्षण करावी.
येणेप्रमाणे कलम १.

१२. किले-कोट, ठाणे जंजिरे येथील कायदे करून दिल्हे त्याप्रमाणे हवालदार, सुभेदार, कारखानीस, सरनौबत, सबनीस, तटसरनौबत लोक यांचे जाबते करून दिल्हे त्याप्रमाणे चालऊन सावधानतेनें स्थळे रक्षावी. तगिरी-वहाली हुजुरु न व्हावी, बजमी नेमणूक तालूकादार यांजकडे दरवाजा, किल्या, हवालदार,याचा हुकुम सिके त्याचे नावाचे. कारखानीसी जाबता अलाहिदा करणें.
येणेप्रमाणे कलम १.
१३. अष्टप्रधान यांजकडे देहे तालुके व स्वारीस जाणें त्यास मुतालिक करून दिलें. त्यांणी सेवा व्यापार चालवावा. हुजुर रहावें.
येणेप्रमाणे कलम १.


१४. सुभे, मामले, तालुकादार यांस ज्याच्याकडे जें नेमलें त्यांणी जाबतेप्रमाणें चालवावे. हुजुरचे दरखदार, चिटणीस, फडणीस, मुजुमदार यांचे इतल्याने चालून हिशोब गुजरावें.
येणेप्रमाणे कलम १.

१५. बारा महालांचे अधिकारी यांणी आपलाले काम दुरुस्त राखुनु हिसेब आकारून दप्तरांत गुजरावें.
येणेप्रमाणे कलम १.

१६. दरुणी महालांचे काम दिवाण नेमून दिल्हे यांणी सर्व पाहून करावें. चिटणीस, फडणीस यांणी आपलाले दरखाचे कागदपत्र ल्याहावें. त्यावर निशान, चिन्ह दिवाणानी करून वाडयास समजाउन मोर्तब साक्ष करावें.
येणेप्रमाणे कलम १.


१७. पोतनीस यांणी पोत जमाखर्च लिहिणे करावें. नजर पेश कशी जमा करावी. पोतदार यांनी पारख करावी.

येणेप्रमाणे कलम १.

१८. अष्टप्रधान यांजकडे देहे तालुके व स्वारीस जावयास दखरदार सर्व हुजुरचे जावे. त्याचे दाखल्यानी व्यवहार करावा. स्वारीस जाणें त्यास मुतालिक करून दिल्हे त्यांणी सेवा-व्यापार चालवावा. हुजुर रहावें.
येणेप्रमाणे कलम १.

१९. आबदारखाना चिटणीस याजकडे सराफखानासुधा अधिकार सांगितला. मजालसी, अत्तर-गुलाब, व हार-तुरे व फळफळावळ खुशवाई खरी जमाखर्च यांणी करून हिशेब दप्तरी गुजरावा.

येणेप्रमाणे कलम १.

२०. पागा जुमलेदार यांणी कैद करून दिल्ही त्याप्रमाणें चालून सेनापती व प्रधान यांच्या समागमें कामकाजें करावीं.
येणेप्रमाणे कलम १.
 येकूण कलमें वीस मोर्तब.


आपण बघू शकतो की पहिली ८ कलमे अष्टप्रधान यांच्या कामाबद्दल निगडित आहेत. ८ पैकी ६ प्रधानांना युद्ध - युद्धादि प्रसंगाला गरजेनुसार जाणे हे त्याच्या पदाच्या जबाबदारीमध्ये समाविष्ट होते. त्यातून फ़क्त पंडितराव आणि न्यायाधीश यांना वगळण्यात आले होते. ९ वे कलम पूर्णपणे 'चिटणीशी'बद्दल आहे. चिटणीस म्हणजे आजचा 'कैबिनेट सेक्रेटरी'. हे महत्वाचे पद राजाभिषेकानंतर 'बाळाजी आवजी' यांच्याकडे सोपवले गेले होते. फौजेचे इतर अधिकारी आणि बारा  महालाचे अधिकारी यांनी करावयाची कामे सुद्धा पूर्णपणे स्पष्ट केली गेली होती हे सुद्धा इतर कलमांवरुन समजते.

यात १२ वे कलम सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. 'हुजुरात' म्हणजे खुद्द छत्रपति शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत येणारया खात्याचे उल्लेख ह्यात केले गेले आहेत. किले-कोट, ठाणे आणि जंजिरे याबद्दल अगदी सक्तीचे सुक्ष्मनियम त्यांनी बनवले होते. ते नियम मोडण्यास तीळभर सुद्धा जागा नव्हती. इतके असून त्याचा ह्या बाबींचा खर्च फारच काटकसरीने बांधलेला होता.

त्यांची राज्यपद्धती अशी होती की संपूर्ण राज्यकारभार अष्टप्रधान मंडळावर सोपवून तो चोख चालेल याची पूर्ण काळजी घेतली गेली होती. राज्यकारभारात प्रत्यक्ष ढवळा-ढवळ न करता राज्यकारभाराविषयी दैनंदिन माहिती मिळत जावी यासाठी त्यांनी आपल्या विश्वासातील माणसे जागोजागी स्वतंत्रपणे नेमली होती. जेणेकरून प्रत्येक खात्यावर त्या खात्याच्या प्रमुखाबरोबरच त्यांचे सुद्धा अप्रत्यक्ष आणि पूर्ण नियंत्रण राहील.

पुढच्या काही भागांमध्ये आपण छत्रपति शिवरायांच्या इतर पैलूंवर नजर टाकणार आहोत. त्यांनी कोष उर्फ़ खजिना, दुर्ग-किल्ले, सैन्यछावण्या यांबद्दल कशी व्यवस्था लवली होती ते बघणार आहोत. रिसोर्स मॅनेजमेंट काय असते हे त्यांनीच ३५० वर्षांपूर्वी दाखवून दिले आहे. शिवचरित्र वाचावे... अनुभवावे... शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातून काहीतरी शिकावे आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करता आला तर पहावा ...
.
.
संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य) आणि शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)
.
.

20 Jan 2010

शिवराज्यातले 'बारा महाल' आणि 'अठरा कारखाने' ... !

छत्रपति शिवरायांच्या काळात राज्य शासनाच्या महत्वाच्या कामासाठी विविध विभाग पाडण्यात आले होते. यात 'कारखाने' आणि 'महाल' असे २ प्रमुख भाग होते. कारखाने म्हणजे 'कार्यस्थाने' तर महाल म्हणजे 'विविध भांडारे'. सभासद बखरीत एकुण बारा महाल आणि अठरा कारखाने यांचे उल्लेख आले आहेत. ह्यात बरीच खाती समाविष्ट नाहीत. अर्थात जी अधिक महत्वाची ती स्वतंत्रपणे नोंदली गेली असतील.

बारा महाल आणि अठरा कारखाने खालीलप्रमाणे ... (कंसातील नावे 'राजव्यवहारकोश' यामधून घेतली आहेत)

  • बारा महाल
१) पोते (कोशागार)

२) थट्टी (गोशाळा)

३) शेरी (आरामशाळा)

४) वहिली (रथशाळा)

५) कोठी (धान्यागार)

६) सौदागीर

७) टकसाल (मुद्राशाळा)

८) दरुनी (अंत:पुर)

९) पागा (अश्वशाळा)

१०) ईमारत (शिल्पशाळा)

११) पालखी (शिबिका)

१२) छबिना (रात्रिरक्षणं)

  • अठरा कारखाने
१) खजिना (कोशागारं खजाना स्यात)

२) जव्हाहिरखाना (रत्नशाळा)

३) अंबरखाना (धान्यशाळा)

४) आबदारखाना (जलस्थानम)

५) नगारखाना (आनकस्तु नगारास्यात)

६) तालीमखाना (बलशिक्षा तु तालीमं)

७) जामदारखाना (वनसागर)

८) जिरातेखाना (शस्त्रागार)

९) मुदबखखाना (पाकालयम)

१०) शरबतखाना (पानकादिस्थानम)

११) शिकारखाना (पक्षिशाळा)

१२) दारूखाना (अग्न्यस्त्र संग्रह)

१३) शहतखाना (आरोग्यगृह)

१४) पीलखाना (हत्तीगृह)

१५) फरासखाना (अस्तरणागार)

१६) उश्टरखाना (उंटशाळा)

१७) तोपखाना (यंत्रशाळा)

१८) दप्तरखाना (लेखनशाळा)
 
बारा महाल आणि अठरा कारखाने यांच्या मधल्या प्रत्येकावर एक अधिकारी नेमलेला होता आणि त्याने 'खाजगीच्या इतल्यात' म्हणजे 'Under Information' राहावे असे स्पष्ट नियम होते. महत्वाचे म्हणजे जर आपण कंसातील म्हणजे राज्यव्यवहारकोशामधील नावे नीट वाचली तर आपल्या लक्ष्यात येइल की ती संस्कृत व मराठी मध्ये आहेत. थोडक्यात शिवरायांनी फारसी नावे असलेल्या ह्या सर्व खात्यांना राजाभिषेका नंतर संस्कृत व मराठी नावे दिली होती.
.
.
संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य) आणि शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)
.
.