31 Oct 2010

शिवछत्रपतींचे व्यक्तिमत्व ... भाग १

साधारणपणे २००६-७ मध्ये मी मराठा इतिहास आणि संबंधित विषयांवर ओर्कुटवर लिखाण सुरू केले होते. तेंव्हा मराठीत ब्लॉग वगैरे काही ठावूक नव्हते मला. काही दिवसांनी मला एक सचिन नामक मुलाचा फोन आला. (मी माझा फोन नंबर ओर्कुटवर तेंव्हा ठेवलेला होता.) लोअर परेलला असणाऱ्या एका जुन्या ग्रंथालयात काम करणाऱ्या सचिनने मला त्याच्याकडे असलेली काही जुनी पुस्तके बघण्यासाठी तिकडे बोलावले होते. माझ्या वाचनात उत्तम भर पडेल असे त्याचे म्हणणे होते. मी दुसऱ्या दिवशी सकाळी लगेचच तिकडे पोचलो. त्याने ७-८ पुस्तके माझ्यासमोर काढून ठेवली. मी ती सर्व पुस्तके २ महिन्यात परत करण्याच्या हमीवर घरी घेऊन आलो. त्या ग्रंथालयाचा सदस्य नसताना आणि तो मला ओळखत देखील नसताना त्याने इतकी जुने पुस्तके मला नेऊ देणे म्हणजे मला थोडे आश्चर्य वाटते. अर्थात मी माझा पता आणि संपर्क क्रमांक त्याच्याकडे ठेवलेला होताच. घरी आलो आणि पुढचे काही दिवस सुट्टी असल्याने अधाशासारखे ती पुस्तके वाचून काढू लागलो. त्यातल्या एका पुस्तकाचे नाव होते 'छत्रपती शिवाजी महाराज - पत्ररूप व्यक्तीदर्शन' लेखक होते डॉक्टर रामदास.

ह्या पुस्तकात राजांनी लिहिलेल्या काही पत्रांचा अभ्यास करून राजांचे व्यक्तिमत्व मांडण्याचा पर्यंत केलेला होता. सदर पुस्तक १९४२ सालचे होते. माटुंगा येथून प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकाची किंमत अवघे २ रुपये लिहिलेली होती. हे दुर्मिळ पुस्तक आता बाजारात उपलब्ध नाही हे मला ठावूक होते तेंव्हा मी त्या पुस्तकाची सर्व पाने स्कॅन करून घेतली. पुस्तकात शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रांची अनुवादित पत्रे होती. अशी एकूण ५० पत्रे छापलेली होती. गेल्या वर्षी मी हा ब्लॉग सुरू केला तेंव्हा त्यातली बहुतेक पत्रे या ब्लॉगवर दिली होती. सदर लिखाण त्याच पत्रांवर आधारीत असून त्यातला भाग १ आपल्यासमोर सादर करतोय... सध्यातरी लिखाण २ भागात संपवायचा विचार आहे पण बघुया जस-जसे लिखाण होईल त्यावर ठरेल किती भाग होतील ते. अपेक्षा हे आपल्याला आवडेल.....





शके १५५७ म्हणजेच इ. स. १६४५ च्या एप्रिल महिन्यात वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली. रोहिड खोरे आणि वेळवंड खोरे येथील देशपांडे - कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे राजांसोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर आदिलशहाच्या शिरवळ येथल्या सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले. या पत्रामुळे दादाजी चिंतेत असल्याचे कळताच राजांनी त्यांना पत्र पाठवले. 'हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे' या आशयाचे पत्र पाठवले. आपण सुरु केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनूसार आहे, ही धारणा त्यांनी ह्या पत्रामधून व्यक्त करून त्यांचे मनोबल वाढवले आहे. आपल्या सहकाऱ्यांना आवश्यक असे मानसिक बळ ते वेळोवेळी देत असत.



स्त्रियांशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांविरुद्ध शिवरायांचे धोरण अतिशय कडक होते. ह्या बाबतीत ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. 'बदअमलाबद्दल कड़क शासन' ते करत असत. जानेवारी १६४६ मध्ये त्यांनी रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ़ भिकाजी गुजर याला एका स्त्री सोबत गैरवर्तनासाठी चौरंग करण्याची शिक्षा दिली होती. (चौरंग करण्याची शिक्षा म्हणजे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडणे, पण त्यानंतर माणूस रक्तस्त्राव होउन दगावू नये ह्यासाठी जखमा गरम तुपात बूडवल्या जात.) पुढे त्याचाच कुळातील सोनजी गुजर याने राजांना 'पाटीलकी परत करावी, आम्ही स्वराज्यासाठी निष्ठा अर्पण करतो' असे पत्र पाठवले तेंव्हा राजांनी २८ जानेवारी १६४६ च्या पत्रानुसार त्याची पाटिलकी मान्य केली आहे. योग्य माणसे ओळखून त्यांच्याकडून निष्ठेने काम करून घेण्याची ही कला अतुलनीय आहे.


शिवरायांनी वतनदारी संस्था बंद करवली असे नेहमी म्हटले जाते, ऐकिवात येते, ते पूर्णपणे खरे नाही. खरेतर त्यांनी वतनदारी संस्थेत अमुलाग्र बदल करून तिचा उपयोग स्वराज्यासाठी केला. ते अधिक मजबूत केले. पुरंदरचे किल्लेदार सरनाईक महादजी यांचे निधन झाल्यावर त्यांचे पुत्र निळकंठराव यांना पाठवलेल्या पत्रात राजे म्हणतात,"जोपर्यंत तुम्ही आम्हासी इमाने वर्ताल, तोपर्यंत आम्हीहि तुम्हासी इमाने वर्तोन. तुम्हापासून इमानांत अंतर पडिलियां आमचा हि इमान नाही." कुठले वतन वंश परंपरेने सुरू ठेवायचे आणि कुठले नाही याबाबत ते माणूस ओळखूनच निर्णय घेत असणार. याच आशयाची अजून काही पत्रे उपलब्ध आहेत. 'मी शत्रूंना दगे दिले, मित्रांना दगे दिल्याचे दाखवा' असे आवाहन त्यांनी केले होते. त्याला आजपर्यंत उत्तर आले नाही. स्वराज्य उभे करताना एक-एक माणूस जोडताना त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती हे जीवाला-जीव देणारी, लाख मोलाची माणसे पाहिली की सहज कळून येते.

शिवरायांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात काही इनामे दिली होती. शिवराय १६७४ मध्ये छत्रपति होण्याआधी विजयनगरचे साम्राज्य हे दक्षिण भारतातले शेवटचे हिन्दू साम्राज्य होते. ते १५ व्या शतकात लयास गेल्यानंतर दक्षिणेमध्ये आदिलशाही, कुतुबशाही यांचे राज्य होते. विजयनगरच्या हिंदू साम्राज्याचा वंशज तिरुमलराय यांना शिवरायांनी १५ एप्रिल १६५७ च्या रोप्यपटाद्वारे काही जमीन निर्वाहासाठी इनाम  म्हणून दिली होती. याशिवाय आंबेजोगाईच्या दासोपंतांना, आळंदीच्या 'ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या व्यवस्थेसाठी दर सालाना दानाची व्यवस्था केली होती. आग्र्याहून सुखरूप सुटून राजगडी परत येताना राजांनी ९ वर्षाच्या शंभूराजांना कृष्णाजी विश्वासराव आणि काशी त्रिमल यांच्याकड़े ठेवले होते. ते शंभूराजांना राजगडी परत घेउन आल्यावर राजांनी त्यांना १ लाख रुपये इनाम दिले. १६६० पासून प्रतापगडाच्या तुळजा
भवानी देवीच्या नैवेद्याची संपूर्ण व्यवस्था, १६७५ पासून पाटगाव मौनीबाबांच्या मठाला सालीना १००० माणसांचा शिधा ही सर्व पत्र उपलब्ध आहेत. छत्रपती शिवरायांनी १६७८ मध्ये समर्थ रामदास स्वामींच्या चाफळ येथील मठास सनद दिली आहे. त्यात ३३ गावे, ४१९ बिघे जमीन, १ कुरण आणि १२१ खंडी धन्य ह्याचा तपशील दिसून येतो.


छत्रपती शिवरायांचे शेती विषयक धोरण आणि व्यापार विषयक धोरण हा खरतर अभ्यासाचा एक मोठा विषय. पण त्या संदर्भात आपण काही पत्रे बघुया. पुणे परगण्यामधले देखमुख बापाजी शितोळे आणि देशमुख विठोजी शितोळे यांनी 'मुघलांच्या धामधूमीमुळे आमचे इतके नुकसान झाले आहे की आम्ही कर भरू शकत नाही' असे राजांना कळवले होते. त्यांचा हा अर्ज राजांनी मान्य करून त्यांचा कर रद्द केला आहे. प्रजा नियमासाठी नव्हे तर नियम प्रजेसाठी आहेत हे त्यांना सर्वथा ठावूक होते. आवश्यक तेंव्हा नियमात बदल करून धोरणे राबवता येतात हे ह्याचे उत्तम उदाहरण. कोकणात जम बसल्यावर राजांनी कोकणातील व्यापार वाढविला होता. दाभोळ येथे नारळांची विक्री अतिशय कमी किमतीत होऊ लागल्याने त्याचा परिणाम आजूबाजूच्या व्यापारावर होऊ लागला. तेंव्हा राजांनी आपल्या सुभेदाराला पत्र लिहिले. राजे म्हणतात,'दाभोळास नारळ कमनिर्खे विकते हा अंमल कैसा आहे?' पोर्तुगीझांच्या ताब्यातील व्यापारी मीठ कमी किमतीत विकत असल्याने स्वराज्यातील मीठ व्यापारयांना कोणी भाव देईना. आपल्या व्यापारयांना उत्तेजन मिळावे म्हणून राजांनी कुडाळ येथील आपला सुभेदार नरहरी आनंदराव यास पत्र लिहिले. ते म्हणतात,'बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे' ह्यावरून दिसून येते की व्यापारावर त्यांचे किती बारीक लक्ष्य होते.


प्रभानवलीचा सुभेदार रामजी अनंत यास राजांनी पाठवलेले पत्र अतिशय वेधक आहे. ५ सप्टेंबर १६७६ रोजी लिहिलेल्या ह्या पत्रात राजे म्हणतात,'येक भाजीच्या देठासहि मन नको' शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर अन्याय तर होऊ नयेच, तर त्यास योग्य त्या सवलती मिळाव्यात आणि राज्याचे उत्पन्न वाढावे असे विचार ह्या पत्रात व्यक्त करण्यात आले आहेत. याशिवाय जमिन महसूलीची पद्धत, तगाई देणे, कर्जमुक्त करणे याबाबत सविस्तर विवेचन सदर पत्रामध्ये राजांनी केले आहे. (गेल्या काहीवर्षांपासून शेतकर्‍याच्या झालेल्या अवस्थेबद्दल बोलताना, हे पत्र प्रत्येक मामलेदार कचेरीमध्ये लावले पाहिले अशी सूचन बाबासाहेब पुरंदरे यांनी मध्ये एका कार्यक्रमात केली होती.)

 
शिवछत्रपतींचे युद्ध आणि सैन्यविषयक धोरण हा अजून एक अभ्यासाचा प्रचंड विषय. सैन्याची छावणी ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी कोणती काळजी घ्यायला हवी ह्याबद्दल सविस्तर विवेचन करणारे पत्र राजांनी ९ मे १६७४ रोजी आपल्या कोकणातील अधिकाऱ्यांना धाडले. राज्याभिषेक अवघ्या महिन्यावर आलेला असतानाही राजांचे प्रजाहीताकडे संपूर्ण लक्ष होते. सैन्याकडून प्रजेला यत्किंचितही उपसर्ग पोहोचू नये यासाठी ते किती सतर्क असत हे ह्या पत्रावरून दिसून येते. आपल्या ३०० सैनिकांकडून एका गावाला उपसर्ग झाल्याचे कळताच त्यांचे हात तोडणारा हा राजा निराळाच. तलवार घेऊन लढाई करणाऱ्या हातांपेक्षा स्वराज्यामागे असलेले जनतेचे हात त्यांना जास्त महत्वाचे वाटले असणार. स्वराज्याचा मूळ गाभा हा किल्ले आणि त्यांची बांधणी यावर होता आणि त्यावर होणारा खर्च देखील प्रचंड होता. असाच एक किल्ला राजांनी बाजीप्रभू देशपांडे यांना वसवायला सांगितला होता. १६५९ मध्ये 'मोहनगड किल्ला वसवावा.' असे पत्र राजांनी बाजीप्रभूंना पाठवले आहे. तटबंदीचे काम करणे आणि गडावर वसाहत बसवणे असे सांगून बांधकाम एका पावसाळ्यात मोडकळीस यायला नको ते मजबूत असावे असे त्यांनी म्हटले आहे. शिवरायांना दुर्गबांधणी या विषयात प्रचंड दूरदृष्टी होती. १६७७ मध्ये दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान चेन्नई येथील जिंजी किल्ल्याचे बांधकाम राजांनी करवून घेतले. ते बघून फ्रेंच मार्टिन त्याच्या डायरीत म्हणतो,"त्यांनी केलेले बांधकाम हे अभूतपूर्व आहे. युरोपातल्या कुठल्याही बांधकाम तज्ञाला असे बांधकाम करण्याचा विचार देखील सुचणार नाही."

या भागात आपण शिवरायांसंदर्भात काही पत्रे पाहिली. पुढच्या भागात आपण अफझलखान, शाहिस्तेखान, मिर्झाराजा, व्यंकोजी भोसले, दक्षिण दिग्विजय मोहीम अशी राजकारणाचा विस्तृत पट मांडणारी पत्रे बघू...