26 Apr 2009

भाग १६ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४१) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७१ मध्ये कूड़ाळचा सुभेदार नरहरी आनंदराव यांना लिहिलेले पत्र ...

पोर्तुगीजांच्या ताब्यातील बारदेश प्रदेशात व्यापारी मीठ स्वस्त विकत असल्या कारणाने स्वराज्यामध्ये मीठ व्यापार मंदावला होता. येथील मीठ व्यापाराला उत्तेजन मिळावे म्हणुन राजांनी कूड़ाळ येथील सुभेदार नरहरी आनंदराव यांना पत्र लिहिले. पत्रामध्ये राजे म्हणतात," बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे."

मिठाचा व्यापार स्वराज्यामध्ये महत्वाचा व्यापार होता आणि त्यावर राजांचे बारीक लक्ष असे.

*****************************************************************************************************************************************************************

15 Apr 2009

भाग १५ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४०) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७६ मध्ये प्रभावळीचा सुभेदार रामाजी अनंत यांस लिहिलेले पत्र ...

शिवरायांचे शेती विषयक धोरण हा अभ्यासाचा मोठा विषय आहे. शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर अन्याय तर होऊ नयेच, तर त्यास योग्य त्या सवलती मिळाव्यात आणि राज्याचे उत्पन्न वाढावे असे विचार ह्या पत्रात व्यक्त करण्यात आले आहेत.

याशिवाय जमिन महसूलीची पद्धत, तगाई देणे, कर्जमुक्त करणे याबाबत सविस्तर विवेचन सदर पत्रामध्ये राजांनी केले आहे. ५ सप्टेम्बर १६७६ रोजी लिहिलेल्या ह्या पत्रामध्ये राजे म्हणतात,"येक भाजीच्या देठासहि मन नको."

(गेल्या काहीवर्षांपासून शेतकर्‍याच्या झालेल्या अवस्थेबद्दल बोलताना, हे पत्र प्रत्येक मामलेदार कचेरीमध्ये लावले पाहिले अशी सूचन बाबासाहेब पुरंदरे यांनी मध्ये एका कार्यक्रमात केली होती.)

*****************************************************************************************************************************************************************

13 Apr 2009

भाग १४ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

३९) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये प्रभावळीच्या सुभेदारास लिहिलेले पत्र ...

दाभोळ येथे नारळ अतिशय स्वस्त विकत असल्या कारणाने, त्याचा परिणाम आजूबाजुच्या कोकण परिसरात नारळाच्या व्यापारावर होऊ लागला, तेंव्हा राजांनी प्रभावळीच्या सुभेदारास पत्र लिहिले.

पत्रात राजे म्हणतात,"दाभोळास नारळ कमनिर्खे विकते हा अंमल कैसा आहे" पुढे राजे म्हणतात,"आम्ही ठरवून दिलेल्या दरातच नारळाची विक्री व्हावी." स्वराज्यामधल्या बारीक़ व्यापारावर सुद्धा राजांचे किती बारकाईने लक्ष्य होते हे या पत्रावरुन लक्ष्यात येते.

*****************************************************************************************************************************************************************

11 Apr 2009

भाग १३ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

३८) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७७ मध्ये सामान्य जनतेला उद्देशून लिहिलेले पत्र ...

छत्रपति शिवरायांनी २८ जानेवारी १६७७ रोजी सामान्य रयतेस उद्देशून पत्र लिहिले. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या आचारधर्माचे पालन करावे, सर्वांनी एकदिल होउन शत्रुचा पराभव करावा असे आवाहन त्यांनी ह्या पत्रात केले आहे. राजे म्हणतात,"सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा."

*****************************************************************************************************************************************************************

6 Apr 2009

भाग १२ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

३७) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६६४ मध्ये मातोश्री जिजाऊसाहेब यांस लिहिलेले पत्र ...

१६६४ मध्ये आदिलशाही सरदार खवासखान याने शिवरायांवर स्वारी केली. सावंतवाडीचे सावंत आणि मुधोळचे बाजी घोरपडे त्यास सामील झाले होते. मात्र शिवरायांनी ह्या त्रिवर्गास एकत्र न होऊ देता एकएकटे पाडून त्यांचा बिमोड केला.शिवाय पोर्तुगीज मुलुख सुद्धा काबीज केला तेंव्हा त्यांना धाक बसून त्यांनी नजराणा पाठवला.

आपल्या आऊसाहेब जिजामाता यांस लिहीलेल्या पत्रात ते म्हणतात,"स्वामींचे पुण्यप्रतापें आज्ञेप्रमाणे घडून आलें."

*****************************************************************************************************************************************************************

2 Apr 2009

भाग ११ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

३६) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७६ मध्ये बेळगाव मधील मुरगुड येथील रुद्राप्पा देसाई यांस लिहिलेले पत्र ...

राजाभिषेकानंतर छत्रपति शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखली. बेळगाव मधील मुरगुड येथील 'रुद्राप्पा देसाई' यांस राजांनी भुजबळगड जिंकण्याची जबाबदारी दिली होती. मात्र त्याची माणसे तेथे पोचण्यापूर्वीच मारली गेली.

शिवराजांनी ११ डिसेंबर १६७६ रोजी रुद्राप्पा देसाई यांस पत्र लिहुन आपलेसे करण्याचा आणि त्यास उत्तेजन देण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या पत्रात राजे म्हणतात,"कामगिरींत आलेल्या अपयशाबद्दल खंत न बाळगता अन्य कामात यश मिळवून स्वामीकृपा संपादावी."

*****************************************************************************************************************************************************************

भाग १० - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

३५) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६६३ मध्ये दख्खनेमधल्या मोघल सुभेदाराला लिहिलेले पत्र ...

अफझलखानाचा वध, पन्हाळ्याहून सुटका, शाहिस्तेखानावर लालमहालात हल्ला आणि अखेर सूरत बेसूरत करून शिवरायांनी १६६३ मध्ये दख्खनेमधल्या मोघल सुभेदाराला पत्र पाठवले. मुळ पत्र हे फारसीमध्ये असून खालील पत्र अनुवादित आहे. ह्या पत्रात राजे म्हणतात,"आपल्या भुमीचे संरक्षण करणे हे माझे कर्त्तव्य आहे आणि मी आपले कर्तव्य बजावण्यास कधीही चुकणार नाही."

स्वराज्य निर्मितीसोबत त्याचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी आक्रमकांशी युद्ध खेळण्यास जागृक राहणे याची पूर्ण जाणीव त्यांना होती. ह्या पत्रातून त्यांचा आत्मविश्वास आणि निर्धार दिसून येतो.

*****************************************************************************************************************************************************************

1 Apr 2009

भाग ९ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

३४) छत्रपति शिवाजी महाराजांनी २३ जुलै १६४९ रोजी कान्होजी जेधेंना लिहिलेले पत्र ...

शिवाजीराजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात विजापूर आदिलशहाने अफझलखानाकरवी शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. शहाजीराजांसोबत असणाऱ्या नाईक कान्होजी जेधे आणि दादाजी लोहोकरे ह्यांना सुद्धा अटक झाली होती. पुढे सगळ्यांची सुटका झाल्यावर १६४९ मध्ये शहाजीराजांनी कान्होजी जेधे यांना शिवाजीराजांकडे मावळात परत पाठवले होते. ह्याचवेळेस अफझलखानाने जावळीवर स्वारी करण्याचे ठरवले आणि कान्होजी जेधे यांना आपल्या सोबत येण्यास फर्मावले.

शिवाजीराजांना हे कळताच त्यांनी २३ जुलै १६४९ रोजी कान्होजी जेधेंना पत्र लिहून कळवले की,"दगा होये ऐसे न करणे. पूर्ण सावधगिरी बाळगुन जावे."

*****************************************************************************************************************************************************************