28 Feb 2009

भाग २ - दुर्गबांधणीचे शास्त्र ... !

शिवरायांच्या काळात प्रत्येक दुर्ग मध्यवर्ती सत्तेच्या पूर्णपणे नियंत्रणात असे. कुठल्याही देशमुख - देशपांडे, सरदार - सेनापतीला गढी बांधायला सक्त मनाई होती. प्रत्येक ग़डावर सरकारी सैन्य असे. त्यावर प्रमुख ३ अधिकारी असत. सबनिस ब्राह्मण जातीचा असे. त्याच्याकड़े आयव्ययाची व उपस्थितीची नोंद असे. कारखानीस हा कायस्थप्रभू असे व त्याच्याकड़े रसदीचा विभाग असे. तर किल्लेदार मराठा असे व त्याच्याकड़े सेना विषयक अधिकार असत. ग़डाच्या पायथ्याला महार, मांग, रामोशी, कोळी, भिल्ल यांच्या मेटा आणि घेरे असत. ह्या सर्व अधिकारी - कर्मचारी यांची दर ३-५ वर्षांनी बदली होत असे. बदली आणि नियुक्तीमध्ये वंशपरंपरा चालत नसे.






शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांची काही वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवतात. रायगड़, प्रतापगड़, राजगड़ यांचे महादरवाजे किल्ल्यांच्या एकुण उंचीच्या २/३ उंचीवर आहेत. दरवाजा पडला तरी पुढच्या चढाईवर किल्ला लढवायला पुरेशी जागा उपलब्ध होई. सिंहगड़, पन्हाळा या त्या आधीच्या किल्ल्यांमध्ये तशी रचना नाही. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराशी येणारी वाट. ती नेहमी डोंगर उजवीकड़े ठेवून वर चढ़ते. कारण द्वाराशी होणारी हातघाईची लढाई ढाल-तलवार व फारतर धनुष्य-बाण याने होत असे; त्यात जास्त प्रमाणात उजवे असलेल्या लोकांच्या डाव्या हातात ढाल असे व उजव्या हातात फ़क्त तलवार घेउन उजव्या बाजूने होणारा मारा टाळण्यासाठी अधिक प्रयास करावा लागे. म्हणजेच वाट नियोजनपूर्व आखली तर शत्रूला अधिक त्रासदायक ठरू शकते.





किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा कधीही दर्शनी नसे. त्यात गोमुखी बांधणीची दुर्गरचना असे. उदा. रायगड, सुधागड़, लोहगड हे किल्ले. दोन बुरुजांच्या कवेने चिंचोळ्या वाटेने आत गेले की दरवाजा समोर येत असे. ह्या ठिकाणी लढाईला फार जागा नसे व शत्रुवर वरुन चारही बाजूने तूटून पड़ता येत असे. जरी कोणी यातूनही आत शिरलाच, तरी पुढचा मार्ग सुकर नसे कारण महादरवाज्यातून आत शिरले की वाट ९० ते १८० अंशात डावीकड़े वळत असते. तिथून वाचून पुढे जाणे अगदीच अशक्य. शिवाय किल्ल्याचे १/३ चढण चढणे बाकी असते ते वेगळेच.






सागरी दुर्गबांधणीतही काही किल्ल्यांचे उल्लेख महत्त्वाचे आहेत. जंजिरेकर सिद्दीच्या उरावर शिवरायांनी पद्मदुर्ग उर्फ़ कांसा किल्ला बांधला. ह्याच्या तटबंदीच्या दगडाचे चिरे लाटा आदळून आदळून झिजले आहेत. पण त्यातला चुना मात्र अजून तसाच शाबूत आहे. सिंधूदुर्गाची कहाणी काय वर्णावी. सुरतेची १ कोट लुट वापरून सिंधूदुर्गाचा पाया मजबूत केला गेला. ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर, ३००० मजूर अहोरात्र काम करायचे. ५ खंडी उकळते शिसे ओतून त्याचा पाया घडवला गेला. तर खांदेरीचा किल्ला सिद्दी आणि इंग्रज ह्यांच्या बरोबर मध्ये उभारला गेला. ह्या किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर ओबड-धोबड़ दगडांच्या राशी आढळतात. भरतीच्या लाटा सोडाच पण साध होडक सुद्धा तटबंदीशी लगट करू शकत नाही. शिवाय त्या धारधार दगडांवर कोणी पाय ठेवायची हिम्मत सुद्धा करणार नाही.





अलिबागच्या किल्ल्यात तर तटबंदीच्या दोन दगडांमधला दर्जा चुन्याशिवाय आहे. लाट आली की तिच पाणी दर्जा मध्ये घुसत आणि जोर उणावतो. किल्ले विजयदुर्ग तसा ८०० वर्षापुर्वीचा. पण काही वर्षापुर्वी नौदलाच्या पाणबुड्यांना एक आश्चर्य सापडले. एक पाण्याखाली बनवलेली भिंत. चांगली २ मी. रुंद आणि २५ मी. लांब. ती शिवकालीन असल्याच तज्ञांचे मत आहे. खोल समुद्रातून येणाऱ्या परदेशी जहाजांना अडथळा म्हणून बांधली गेली असावी.










सर्वोच्च दुर्गरचनाकार अस शिवरायांना म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अर्थात मोरोपंत पिंगळे, हीरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव, यांच श्रेयही तितकच. साऱ्यानीच त्यांच कौशल्य पणाला लावले. त्यांनी स्थापत्यशास्त्राचे, दुर्गरचनेचे शिक्षण कोठून मिळवले, आराखडे कसे बनवले व इतक्या दुर्गम भागात बांधकाम केले तरी कसे? कोणास ठाउक.. पण एवढ मात्र नक्की की दुर्गबांधणीमध्ये त्यांनी निरनिराळे प्रयोग यशस्वी केले व त्यासाठी बारीक़-सारीक गोष्टींवर तपशीलवार विचार ही केले होते. एक दुर्गविज्ञान त्यांनी आपल्या समोर मांडून ठेवले आहे.




मन मातीत मिसळली की गवतांनाही भाले फुटतात, हे या मातीने आपल्याला शिकवले आहे. या बुलंद, बेलाग आणि बळकट किल्ल्यांवरती अशाच काही घटना घडल्यात. तेथे जायचे ते अश्याच सुवर्णक्षणांच्या आठवणीसाठी. पण सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातून काहीतरी शिकवे आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करता आला तर पहावा...



(संदर्भ - अथातो दुर्गजिज्ञासा - प्र. के. घाणेकर.)

25 Feb 2009

भाग १ - दुर्गबांधणीचे शास्त्र ... !



इतिहास हा खर तर सर्वात जास्त उपेक्षित विषय पण आपला इतिहास हा सह्याद्रीच्या भुगोलाशी निगडित आहे. इथल्या दुर्गम दुर्गांशी आणि प्राचीन संस्कृतीशी आहे. इथे गड़ - किल्ले - दुर्ग, प्राचीन मंदिरे, शिलालेख, लेणी आणि ह्या सर्वांची रचना इतकी वैविध्यपूर्ण आहे.


"किती कोट किल्ले उभारुनि छाती..
कथा सांगताती अजुनी जुनी.. "

महाराष्ट्रातल्या बहुसंख्य किल्ल्यांचा संबंध छत्रपति शिवाजी महाराजांशी जोडला जातो. शिवकाळात 'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग' हा विचार प्रकर्षाने जाणवतो. सातवाहन, राष्टकूट, शिलाहार, बहमनी, मोगल आणि प्रोतुगिज़ यांचा दुर्गबांधणी मधला सहभाग दुर्लक्ष करण्याजोगा नाही. पण शिवकाळ हा किल्ल्यांची उभारणी व त्यांचा उपयोग यांचा सुवर्णकाळ होता. दुर्गबांधणीतल्या तंत्राचा परमोच्च अविष्कार शिवदुर्गरचनेत आढळतो. त्यांनी काही जलदुर्ग उभारले तर काही गिरिदुर्ग, काही वनदुर्ग तर काही अश्मदुर्ग.


शिवछत्रपति महाराजांनी राजाभिषेकानंतर रघुनाथपंतांकडून 'राज्यव्यवहारकोश' तयार करवून घेतला. त्यात ७ वे प्रकरण किल्ल्यांवर आहे. तर रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात ८ व्या प्रकरणात किल्ल्यांचे महत्त्व, त्यांची रचना व व्यवस्था यावर उहापोह केला आहे. त्यात म्हटले आहे की "गड़कोट हेच राज्य, गड़कोट म्हणजे राज्याचे मुळ, गड़कोट म्हणजे खजिना, गड़कोट म्हणजे सैन्याचे बळ, गड़कोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गड़कोट म्हणजे आपली वसतिस्थळे, गड़कोट म्हणजे सुखनिद्रागार किंवा गड़कोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण."




पुढे किल्ल्यांच्या रचनेवर लिहिल आहे, "दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून, पुढे बुरुज देउन. येतिजाती मार्ग बुरुजांचे आहारी पडोन दरवाजे बांधावे. किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे. याकरता गड़ पाहून एक, दोन, तीन दरवाजे तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून, वरकड दरवाजे आणि दिंडया चिणून टाकाव्यात."



ग़डावर येणारे मार्ग सुद्धा तितकेच महत्त्वाचे असायचे. त्याबदल लिहिले आहे, "ग़डावर यावयाचे मार्ग असतील ते सुगम नसावेत. सुगम असले तर ते मार्ग मोडून त्यावर झाडी वाढवून आणखीकड़े परके फ़ौजेस येता कठिण असे मार्ग घालावे. ग़डाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी (डोंगर उतारावरची झाडी) प्रयत्ने वाढवावी. त्यामध्ये एक काठीही तोड़ो न द्यावी. बलकुबलीस (अडचणीच्या वेळी) झाडीमध्ये हशम बंदूके घालावी, या कारणेजोगे असो द्यावे."

ग़डाच्या स्वच्छतेबद्दल अत्यंत काटेकोरपणा पाळला जायचा, "ग़डावरी मार्गामार्गावरी बाजारात, तटोतट केर-करपट किमपिं पडो न द्यावे. ताकिद करून झाला केर ग़डाखाली न टाकता जागोजागी जाळून ती राखही परसात टाकून घरोघर होइल ते भाजीपाले करावे." त्याशिवाय झाडे कशी राखावी याबाबतीतही विस्त्रुत वर्णन आहे. वनखाते आजही वृक्षसंवर्धनासाठी शिवरायांचे आज्ञापत्र वापरते हे त्याचे वैशिष्ट्य.


प्रत्येक किल्ला व त्यासभोवतालचा प्रदेश हा शिवरायांच्या राज्यमालिकेतला एक घटकावयव होता. त्यांनी बहुतेक अचाट कृत्ये ह्या किल्ल्यांच्या सहाय्याने तडिस नेली. मिळवलेला बहुसंख्य पैसा नविन किल्ल्यांची बांधणी व पुर्नरचना यावर खर्च झाला. स्वतः शिवरायांनी किल्ल्यांचे महत्त्व खालील शब्दात वर्णन केले आहे. "जैसे कुळबी शेतास माळा घालून शेत राखितो, तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत. तारवांस खीळे मारून बळकट करितात तशी राज्यास बळकटी किल्यांची आहे. किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्याची उमर गुजरून जाईल. आपणास धर्मस्थापना व राज्यसंपादन करणे होय. सर्वांस अन्न लावून, शत्रुप्रवेश न होय ते किल्ल्यांमुळे होते. सर्वांचा निर्वाह आणि दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे-जुने तीनशेसाठ किल्ले हजरतीस आहेत. एक-एक किल्ला वर्ष-वर्ष लढला, तरी तीनशेसाठ वर्षे पाहिजेत." आणि पुढच्या पन्नास वर्षात सह्याद्रीने तेच अनुभवले.


१८ व्या शतकात मराठ्यांचा इतिहासावर पहिला शोध ग्रंथ लिहिणारा ग्रँट डफ म्हणतो, "किल्ल्यातून आत बाहेर कोणी केंव्हा जाणे, गस्ती फिरणे, चौक्या सांभाळणे व त्यावर देखरेख करणे, पाणी, धान्यसामुग्री व युध्दसामुग्री इत्यादी तयार ठेवणे यागोष्टीं वरती अगदी सक्तीचे सुक्ष्मनियम शिवाजीने केलेले असून प्रमुख शाखेवरील मुख्य अधिकाऱ्याची बारीक कामेसुद्धा ठरवलेली होती आणि ते नियम मोडण्यास तीळभर सुद्धा जागा नव्हती. इतके असून त्याचा ह्या बाबींचा खर्च फारच काटकसरीने बांधलेला होता."


तर डग्लस म्हणतो, "शिवाजीचे वास्तव्य डोंगरी मुलुखातच होते व त्याचे सामर्थ्य डोंगरी प्रदेशाच्या भरवश्यावरच होते. तो ख़राखुरा दुर्गस्वामी होता. त्याचा जन्म दुर्गात झाला. त्याला जे वैभव प्राप्त झाले ते दुर्गांच्यामुळे आणि त्याच्या दुर्गान्ना जे सामर्थ्य प्राप्त झाले तेही त्याच्याच प्रयत्नाने झाले. त्याचे दुर्ग म्हणजे भारतातील त्याच्या शत्रूंना धाक होता. त्याच्या राष्ट्राची ती संवर्धनभूमी होती. त्याच्या विजयाचा तो पाया होता. त्याच्या वाढत्या महत्वाकांक्षेचा तो जिना होता. दुर्ग हेच त्याचे निवासस्थान व तेच त्याच्या आनंदाचे निधान होते. कित्येक दुर्ग त्याने स्वतः बांधले आणि जे आधी बांधलेले होते, त्यासर्वांना त्याने बळकटी आणली."


क्रमशः ...


(संदर्भ - अथातो दुर्गजिज्ञासा - प्र. के. घाणेकर.)

22 Feb 2009

महाराष्ट्रातील किल्ले ... गतवैभवाचे मानकरी ... आजचे भग्नावशेष ... !

(संदर्भ ग्रंथ - 'सह्याद्री' - स. आ. जोगळेकर.)


"वस्तूतः दिल्ली व आग्रा येथील किल्ले हे राजवाडे आहेत. छावणीतल्या जनानखान्या भोवती रेशमी कनाती लावतात तशी ह्यांच्या भोवती देखणी तटबंदी आहे म्हणून त्यांना किल्ले म्हणायचे. त्यांची तटबंदी सूंदर लालसर दगडाची आहे. त्यांच्या कंगोऱ्याला किंवा महाद्वारावरील नक्षीलाही धक्का लागलेला नाही. कसा लागणार? त्या राजांची धर्मातीत व दुबळी स्वामीनिष्ठ प्रजा त्याभोवती छातीचा कोट करून उभी होती. ह्या किल्ल्यांच्या अंतर्भागात संगमरवरी महालांच्या रांगा आहेत. त्यांचे सौंदर्य अद्वितीय आहे. 'पृथ्वीवरील स्वर्ग तो हाच' असे त्यांचे वर्णन करण्यात आलेले आहे आणि असे काही ऐकले की उत्तर हिंदूस्तानातील लोक नि:श्वास सोडतात, तल्लीनतेने डोळे किलकिले करतात. त्यांच्या लक्ष्यातही येत नाही की हा स्वर्ग आपल्याच पुर्वजांच्या मुडद्यावर उभा आहे, या किल्ल्यांच्या अद्वितीय वैभवाचे अस्तित्व हे आपल्या नामुष्कीचे प्रतिक आहे. या महालांत पाउल टाकले की भासतात अत्तरांच्या फवाऱ्याचे सुगंध, मद्याच्या प्रवाहाचे दर्प आणि नर्तकींच्या नुपूरांचे झंकार. अधूनमधून कारस्थानाची कुबट घाणही प्रत्ययास येते. या किल्ल्यांनी प्रत्यक्षपणे मर्दुमकी कधी पाहिलेली नाही. येथे शस्त्राची चमक दिसली ति फ़क्त खुनी खंजीरांची, मसलती घडल्या त्या फ़क्त हिंदूंच्या नि:पाताच्या. या शाहीवैभवाला मोगलांच्या मर्दुमकीची प्रतिके मानता येणार नाही. शोभीवंत पण निरुपयोगी सोन्यारूप्याच्या तोफांप्रमाणेच यांचे ही फ़क्त कौतुक करायचे.




आग्र्याच्या किल्ल्यात कोणाची मर्दुमकी प्रकट झाली असेल तर ती श्री शिवछत्रपति महाराजांची. धन्य त्यांची की मोगल साम्राज्य वैभवाच्या कळसावर व सामर्थ्याच्या शिखरावर असताना आणि स्वतः एकाकी असताना त्यांनी शहेनशहाचा जाहीर निषेध केला. धन्य त्यांची की हे वैभव पाहून स्वदेशी परत आल्यावर त्यांनी मोगलांचे अनुकरण करून रंगमहल उठवले नाहीत, तर त्यांच्या प्रतिकारासाठी, त्यांच्याच मूलखातून गोळा केलेल्या लूटी मधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम दुर्ग उभारले."



आपल्या रक्षणासाठी झगडलेल्या या किल्ल्यांची आजची अवस्था ढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, नामशेष इमारती, ओहोरलेली टाकी अशी असली तरी ती स्वदेश - स्वधर्म - स्वराज्य यांच्या रक्षणातून निर्माण झालेली आहे. दुर्ग - गड़ - किल्ले यांचा उपयोग मुख्यत: लढण्यासाठी असतो हेच विसरुन गेलेल्या सुंदर किल्ल्यांपेक्षा मला माझ्या महाराष्ट्रामधले ढासळलेले उध्वस्त गड्किल्ले भारुन टाकतात. त्यांचाच मला अभिमान वाटतो.

21 Feb 2009

भाग २ - वसई ते डहाणूचा इतिहास ... !




समकालीन राज्यकर्त्यांनी सागरी सामर्थ्य वाढवण्याकड़े आधीच लक्ष्य दिले असते तर हे न घडते. असा दृष्टिकोन बाळगणारे पहिले युगपुरुष म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज. हा धोका वेळीच ओळखून त्यांनी १६५६ मध्ये कल्याण खाडीत दुर्गाडी किल्याच्या साक्षीने आरमाराची उभारणी सुरु केली. "जैसे ज्यास अश्वबल त्यांची पृथ्वी प्रजा आहे... तसेच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र... या करीता आरमार अवश्यमेव करावे." अशी भूमिका मांडणाऱ्या व त्यावर वाटचाल करणाऱ्या श्री शिवछत्रपति महाराजांची दूरदृष्टि थक्क करून सोडते. इंग्रजी इतिहासकारांनी लिहून ठेवल आहे 'बरे झाले हा शिवाजी डोंगरी मूलखात जन्मला.. जर हा सागरकिनारी जन्मता तर आमच काही खरे नव्हते' पुढच्या १२५ वर्षात ह्या मराठा आरमाराने उत्तुंग भरारी घेतली आणि परकिय सत्तांना दाखवुन दिले की हा सागर, ही जमीन आमची आहे. या ठिकाणी सत्ता करणे दूर; पण व्यापारासाठी सुद्धा आमची परवानगी घ्यावी लागेल आणि जबर कर ही द्यावे लागतील. सरखेल कान्होजी आंग्र्यांच्या काळात तर इथल्या लाटासुद्धा दस्तका खेरीज किनार्‍यावर आपटताना विचार करू लागल्या. छत्रपती शिवरायांच्या आरमाराने बरेच क्षेत्र कवेत घेतले होते. त्यांच्या पश्चात छत्रपती श्री संभाजी महाराजांनी पोर्तुगीज़ विरोधी धोरण पुढे रेटत गोवा आणि वसई या दोन्ही ठिकाणी हल्ले चढवले. यात १६८३ साली तारापूर आणि आसपासचा परिसर यांचा उल्लेख येतो. तसेच डहाणू आणि सायवन या गावांवर देखील हल्ले केल्याचा उल्लेख आढळतो.



पण उत्तर कोकणातून फिरंगणाचा समूळ नाश व्हायला १७३९ साल उजाडावे लागले. इतिहास प्रसिद्ध वसई मोहिमेने ते पार पाडले. श्री शिवछत्रपतिंच्या स्वराज्य कल्पनेच्या विस्ताराचे श्रेय थोरले बाजीराव पेशवे आणि नरवीर चिमाजी आप्पा यांना जाते. थोरले बाजीराव पेशवे यांनी प्रथमच नर्मदेपल्याड जाउन दिल्लीला पहिला तडाखा दिला. तर चिमाजी आप्पा यांनी फिरंगणाच उच्चाटन केल. या मोहिमेमध्ये मराठे उत्तरेकडून गंभीरगड़, डहाणू, तारापुर, शिरगांव, केळवे-माहिम, अर्नाळा जिंकत आले तर दक्षिणेहून चौल, रेवदंडा, बेलापूर, पारसिक, ठाणे, घोड़बंदर जिंकत वसई किल्ल्यावर निकराचा हल्ला चढवला गेला. त्याच जोडीला अशेरीगड़, कोहोज, तांदूळवाडी, टकमकगड़, काळदुर्ग हे सारे किल्ले सुद्धा आपण जिंकुन घेतले होते. ४ वर्षे सुरु असलेल्या मोहिमेचा शेवट वसई जिंकून साजरा केला गेला.



पण आज या सर्व किल्ल्यांची अवस्था बिकट आहे. आजही ऊनपाउस वारावादळाशी लढण्यास ते कटिबद्ध आहेत. आज येथे त्यांची यशोगाथा सांगणारे कोणी नाही. त्यांची हिच जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा आपल्याला घ्यायला हवी. तिथल्या निरव शांततेत त्यांना आपण विचारल तर ...



डोंगरांनो का उभे? सांगाल का काही मला?
तीनशे वर्षांचिया जो मागला तो मामला... !
कुणी फिरस्ता हिंडता वनी...
वदला ऐसी आर्तवाणी... !
ऐकून त्याची आर्तयाचना...
आली येथल्या जडा चेतना... !
मला विचारा मीच सांगतो... !
आधी या माझ्या कड़े... !
सरसावत एकेक पुढे...
हात उभारुनी घुमू लागले... !
डोंगर किल्ले बुरुज कड़े...
डोंगर किल्ले बुरुज कड़े... !


(संदर्भ - जलदुर्गांच्या सहवासात - प्र. के. घाणेकर.)

20 Feb 2009

भाग १ - वसई ते डहाणूचा इतिहास ... !

महाराष्ट्र हा दुर्ग व लेणी यांचा देश आहे. या देशी आहेत तितके विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण दुर्ग कोठेही नाहीत. सिंधूसागर आणि सह्याद्री ही या देशीची दोन आभुषणे. प्राचीन काळापासून सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार, यादव यांच्यासारख्या समृद्ध आणि संपन्न राजघराण्यानी या प्रदेशात राज्य केले. अनेक दुर्गम दुर्ग त्यांनी उभारले. काही सागरी तर काही डोंगरी, काही भुईकोट तर काही घाटमाथ्यावर. या किल्ल्यांनी येथील राज्याच्या, प्रजेच्या आणि व्यापाराच्या समृद्धी मध्ये फार मोठे योगदान दिले आहे. वसई ते डहाणू ह्या भागात १३व्या शतकात नाथाराव सिंदा भोंगळे याचे राज्य होते. वसई किल्ल्याच्या जागी सर्वात आधी यानेच चार बुरुजांचा किल्ला बांधला. पुढे गुजरातच्या सुलतानाशी झालेल्या लढाईमध्ये हार पत्करुन त्याने वसई - तारापुर ते डहाणू हा भाग सुलतानाला सोपवला. बराच काळ मुस्लिम अधिपत्याखाली राहून सुद्धा ह्याभागात बहु संख्या प्रजा हिंदूच होती. बिंबराजा सोबत येउन येथेच स्थायिक झालेले सोमवंशी क्षत्रिय हे येथले मुख्य रहिवाशी.

पुढे १६व्या शतकात धर्म प्रसाराच्या उद्देशाने आलेल्या पोर्तुगिझांनी ह्या भागावर ताबा मिळवला. वसई ते डहाणू भागात त्यांनी अनेक किल्ले उभे केले. समकाळात दख्खनेवर मुस्लिम सत्तांची आक्रमणे सुरूच होती. १३व्या शतकात खिलजीने यादवांचे देवगिरीयेथील राज्य बुडवले. तर १४व्या शतकात विजयनगर साम्राज्य नष्ट झाले. नंतरच्या बहमनी, मुघल आणि इतर पातशहांनी महाराष्ट्रातील प्रजेवर अनेक जुलुम अत्याचार केले. युरोपातून आलेल्या इंग्रज, पोर्तुगिझ, फ्रेंच आणि अफ्रिकेमधल्या हबशी सिद्दी यांनी महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर आपले हातपाय पसरले होते. यात सर्वात पुढे होते ते पोर्तुगिझ. त्यांनी बांधलेल्या सागरी किल्ल्यांचे अवशेष आज सुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये पाहता येतात. वसई ते डहाणू आणि पुढे ठाणे-घोड़बंदर ते बेलापुर अशी ३०हून अधिक जलदुर्गांची मालिका त्यांनी तयार केली होती. त्यात वसईचा किल्ला सर्वश्रेष्ठ. ऐन खाडीच्या मुखावर बांधलेला, ११० एकर पसरलेला आणि १० भक्कम बुरुज असणारा असा हा किल्ला. तर केळवे-माहिम भागातल्या १७ किल्ल्यांच्या बांधकामाची साखळी ही आगळी-वेगळी गोष्ट पहायला मिळते. आज मध्यवर्ती जेल म्हणुन वापरात असलेला ठाण्याच्या किल्ला पोर्तुगिझांनी मराठ्यांच्या हालचाली पाहून १७३०-१७३४ मध्ये ४ वर्षात २२ एकर जागेवर बांधून पूर्ण केला. वसई किल्ल्या खालोखाल ठाणे आणि अर्नाळा किल्ल्यान्ना महत्त्व होते. या शिवाय ठाणे, वसई, भाईंदर, वैतरणा या खाड़यावर त्यांचेच वर्चस्व होते. आसपास असणाऱ्या अशेरीगड़, कोहोज, तांदूळवाडी, टकमकगड़, काळदुर्ग, गंभीरगड़ या किल्ल्यांवर सुद्धा त्यांनी ठाणी बसवली होती. या जोरावर त्यांनी धर्मप्रसार केला. हिंदूंची देवळे फोडली. धर्म बाटवले. सातासमुद्रापारहून आलेले हे धर्मांध राक्षस २०० वर्षे स्थानिकांचा मनमुराद छळ करत होते. वसई किल्ला पाहताना त्यांच्या विलासीपणाचे, भव्यतेचे, कलाप्रियतेचे दर्शन घडते खरे. तरी सुद्धा त्यामागची हिंसकता, अमानुषता दडत नाही. ह्या साऱ्या वास्तू गरिब, निष्पाप, निरपराध हिंदूंच्या रक्तामासाच्या चीखलात बसवलेले चीरे आहेत हे स्पष्ट जाणवते.

दैवी संपत्तिचे पतनसुद्धा उर्ज्वस्वल असते हे रायगडावरील अवशेष सांगतात... तर आसुरी संपत्तिचे पतन घृणास्पद हे वसई किल्ल्याचे अवशेष सांगतात... !


क्रमशः ...

(संदर्भ - जलदुर्गांच्या सहवासात - प्र. के. घाणेकर.)

18 Feb 2009

इतिहासाच्या साक्षीने ... !

नमस्कार ... मी रोहन चौधरी ... ब्लॉंगर वर तसा नविनच आहे, दिड वर्षापासून असलो तरी आत्ता कुठे सुरूवात करतोय लिहायला ... तसा मी नियमीत वाचक आहे 'मराठी ब्लॉग विश्व' वरील काही ब्लॉग्सचा. पण काही ना काही कारणाने इकडे लिखाण काही होत नव्हते. बाकी लिखाण तसे सुरू असते थोडेफार पण ते कागदावर, आता इकडे पण सुरू करतोय ... आता काय आपली भेट होतच राहणार आहे वेगवेगळ्या ब्लॉग्समधून ... तेव्हा सविस्तर नंतर बोलुच ... इकडे काही विशिष्ट उद्देशाने लिहीत आहे, लिहावे असे वाटले इकडे ... स्वतःचे विचार मांडायचे हक्काचे व्यासपीठ ... !

'श्री शिवछत्रपती महाराज' म्हणजे माझ दैवत ... मराठा इतिहास हा माझा अभ्यासाचा विषय, त्यामुळे इकडे सुद्धा माझे विचार म्हणजे शिवचरित्राने भारावलेले असणार ह्यात काही शंका नाही ... उद्या आहे त्यांची जयंती तेव्हा लिहायला सुरूवात करूया अस नक्की केल ... गेले २-४ वर्ष मी "इतिहासाच्या साक्षीने" ह्या नावाने लिखाण करतोय. खर सांगायच तर लिखाण नाही. सगळेच जण सन्दर्भ ग्रंथ वाचतात असे नाही ना म्हणून मी त्यातून निवडक वेचून मुद्देसुत मांडायचा प्रयत्न केला आहे, जेणे करून ते जास्तीत जास्त लोकापर्यन्त पोचेल ... अपेक्षा आहे की आपल्याला सुद्धा आवडेल ... लवकरच येतोय पहिला अध्याय घेऊन ... वन्दे मातरम् वन्दे शिवराय ... !!!