30 May 2011

महिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...

बखरीमध्ये जो ऐतिहासिक कालखंड दर्शवलेला आहे त्यावर आपण गेल्या १० भागांमध्ये नजर टाकली. वि.का.राजवाडे यांनी बखरीला दिलेल्या प्रस्तावनेमध्ये आद्य महाराष्ट्रीक नेमके कोण होते ह्याबद्दल काही विश्लेषण केलेले आहे. आता ते जरा बघुया.

पुरातन काळी महाराष्ट्राच्या उत्तर कोकण भागात गुहाशय, कातकरी (कातवडी), नाग, कोळी (कोल), ठाकर, दुबळे, घेडे, वारली, मांगेले (मांगेळे), तांडेले हे लोक वस्ती करून राहत होते. नागवंशीय लोक समूहाने कोकणात वस्त्या करत होते. आर्यादी भाषा बोलणारे जे लोक उत्तरेकडून आले त्यांचा नागांशी झालेल्या शरीर संबंधातून आजचे जे 'मराठे' ते उदयास आले.

महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर दुबळे आणि घेडे या जाती आहेत. ह्या दोन्ही जाती गुजराती बोलतात आणि शेती करून जगतात. भाषेवरून ते उत्तरेकडून आल्याची सहज अनुमान काढता येते. मुख्य व्यवसाय शेती असल्याने ह्या जाती समुद्राकडे कधी सरकल्या नाहीत आणि वर रानात देखील चढल्या नाहीत. ह्याच समकाळात वारली हा सह्याद्रीच्या जंगलात आपले स्थान राखून होता. वारली हे उत्तम मराठी बोलतात आणि ते सूर्य उपासक आहेत. इतर जातींच्या मनाने वारली हा बराच प्रगत होता असे दिसते. पण तो नेमका कुठून आला हे निश्चित सांगता येत नाही. तो बहुदा उत्तरेकडून म्हणजे सध्याच्या विंध्योत्तर भागातून आला असावा असा कयास राजवाडे यांनी मांडलेला आहे. समुद्रापासून साधारण १५ मैल अंतरावर असलेल्या रानात त्याचे वास्तव्य होते.

समकाळात मांगेले हे मुळचे आंध्रप्रदेशातून आलेले लोक समुद्र किनारी वसले. गोदावरीच्या सुपीक खोऱ्यातून त्यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे वाटचाल केली आणि येताना ते स्वतःचा मासेमारीचा धंदा येथे घेऊन आले. समुद्राशी निगडीत उपजीविका असल्याने त्यांनी समुद्र किनाऱ्यापासून अर्धामैल पर्यंतच्या टापूत वस्ती केली आणि आजही ते तेवढाच टापू बाळगून आहेत. समुद्र सोडून ते कधी डोंगराकडे सरकले नाहीत. आजही उत्तर कोकणातील समुद्र किनाऱ्यावर मांगेले मासेमारीचा धंदा करतात.

वारली जेंव्हा सह्याद्रीच्या डोंगररांगात वस्त्या करून राहू लागला तेंव्हा तेथे खूप आधीपासून कातकरी (कातवडी), ठाकर आणि डोंगरकोळी लोकांच्या वस्त्या होत्या. कातकरी हा सर्वात जुना. कातकरी हा शब्द कृतीपट्टीन ह्या शब्दावरून आला असावा असे अनुमान राजवाडे मांडतात. कृती म्हणजे कातडे आणि पट्ट म्हणजे वस्त्र. हे लोक मुळचे रानटी असून त्यावेळी प्राण्यांचे कातडे पांघरून राहायचे म्हणून त्यांना हे नाव पडले असावे. कातकरी जेंव्हा जंगलात राहत होते तेंव्हा त्याहीपेक्षा निबिड अशा डोंगर कपाऱ्यात गुहाशय राहत होते. कातकरी किमान कात तरी पांघरी मात्र गुहाशयाला ती कला देखील अवगत नव्हती. ह्या दोघांत कातकरी टिकला. गुहाशयामागून रानात नाग, ठाकर, कोळी आणि मग वारली आले.

ठाकर हे वारल्यांच्या आधीपासून सह्याद्रीची राने राखून होते आणि त्यांचे अस्तित्व फक्त उत्तर भागात नाही तर सर्वत्र पसरलेले होते. ठाकर लोकांच्या थोडे खालच्या रानात कोळी लोकांची वस्ती होती. ह्यांच्या मधलेच समुद्र कोळी हे मासेमारी वर जगत आणि समुद्र किनारयाने राहत. कोळी जातीचे मूळ वंशज कोल हे होते.
कातकरी लोकांच्या मूळ अनार्य भाषेचे रूप कसे असेल ह्याबद्दल आता पत्ता लागण्याचा जरा सुद्धा संभाव राहिलेला नाही. मांगेल्यांचे आणि वारली लोकांचे तेच. राजवाडे यांनी ह्याबद्दल बराच खेद व्यक केला आहे. परंतु त्यांनी बरीच मेहनत घेऊन अंदाजे स्थळ-काल दर्शवणारा एक तक्ता तयार केला आहे. तो असा...

अतिप्राचीन लोक - गुहाशय, कातकरी (कातवडी), नाग : शकपूर्व २००० च्या पूर्वी (अंदाजे शकपूर्व ५०००)

मध्यप्राचीन लोक- ठाकर, कोळी, वारली : शक पूर्व २००० ते १०००

प्राचीन लोक -
दामनीय, महाराष्ट्रिक : शकपूर्व ९०० ते ३००

पाणिनिकालीन लोक -
मांगेले, सातवाहन, नल, मौर्य : शकपूर्व ३०० ते शकोत्तर २००

जुने मराठे -
चौलुक्य, शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकुट : शकोत्तर ३०० ते ११०० 

जुने मराठे - बिंब, यादव : शकोत्तर ११०० ते १२७०

मुसलमानी राज्य - मलिक, अमदाबादचे सुलतान : शकोत्तर १२७० ते १४६०

युरोपियन - पोर्तुगीझ :शकोत्तर १४२२ ते १६६०

अर्वाचीन मराठे - भोसले : १६६० ते १७२५

युरोपियन - इंग्रज : शकोत्तर १७२५ ते १८६९

ह्या नोंदी घेताना त्यांनी 'इसवी सन'चा वापर न करता 'शक' वापरला आहे.

अपेक्षा आहे की येथे मांडल्या गेलेल्या अल्प माहितीमुळे आपल्या ज्ञानात काहीतरी भर निश्चित पडली असेल... पुन्हा भेटू एक नवीन ऐतिहासिक विषय घेऊन...
........................................ समाप्त .......................................

28 May 2011

महिकावतीची बखर - भाग १० : देवगिरीच्या लढाईचे सत्य ...

फारसी कागदपत्रे आणि काही मराठी संदर्भ यावरून शके १२१६ मध्ये (इ.स.१२९४) अल्लाउद्दिन खिलजी याने देवगिरीवर स्वारी केली आणि दख्खनेत मुसलमानी वरवंटा फिरवला असे वाचलेले बहुतेकांना ठावूक असते. पण अनेक ठिकाणी 'चार घटकेत रामदेवाचे राज्य अल्लाउद्दिनने घेतले' हा उल्लेख येतो तो चुकीचा आहे हे ह्या बखरीच्या संदर्भाने सांगावेसे वाटते. अल्लाउद्दिनने हल्ला करण्याआधी रामदेवरायाची स्थिती काही विशेष चांगली नव्हती. ठाणे-कोकणातील नागरशा सारख्या छोट्या राजाने देखील त्याचा पराभव केलेला होता हे आपण मागे पाहिले आहेच पण तरीही त्याने अल्लाउद्दिन विरुद्ध प्रखर लढा दिला होता. मुसलमानी आक्रमणाला तोंड देण्याची तयारी त्याने केली होती असेही दिसते.

रामदेवाने
भुरदासप्रभू वानठेकर याच्याकडे सैन्याचे सर्व अधिकार दिले होते. तर भुरदासप्रभूचा पुत्र चित्रप्रभू याच्याकडे दुय्यम सेनाधिकार होता. सुमध नावाचा रामदेवाचा प्रधान होता. इतर अनेक मराठा संस्थानिक आणि ब्राह्मण मात्र रामदेवापासून फुटून फुटून निघाले होते. ह्याचे कारण त्यांच्यामधील वितुष्ट होते. ह्याच संधीचा फायदा घेऊन अल्लाउद्दिनने हे आक्रमण केले असावे का?

अल्लाउद्दिन खुद्द स्वतःच्या हसन आणि हुसेन २ मुलांसह देवगिरीवर वेढा घालून हल्ला चढवला असे बखर म्हणते. जेंव्हा खुद्द लढाई जुंपली तेंव्हा सुमधने तुंबळ युद्धात हसन यास यमसदनी धाडले. आपल्या भावाचा वध झालेला पाहताच हुसेन यादव सैन्यावर चाल करून आला. ह्यावेळी त्याला चित्रप्रभू सामोरा गेला. ह्या हल्यात चित्रप्रभूने हुसेन यास ठार केले. असे एका मागोमाग अल्लाउद्दिनचे दोन्ही पुत्र ठार झाले. तुर्की सैन्यात एकच बोंबाबोंब झाली. आता खुद्द अल्लाउद्दिन त्वेषाने चालून आला आणि पुन्हा एकदा खडाजंगी सुरू झाली. ह्यावेळी लढाईत भुरदासप्रभू धारातीर्थी पावन झाला. मुलांच्या मृत्यूने त्वेषात येऊन अल्लाउद्दिन जितक्या त्वेषाने चालून आला त्याहीपेक्षा अधिक त्वेषाने चित्रप्रभू आपल्या वडिलांच्या मृत्यूने अल्लाउद्दिन वर चालून गेला. पुन्हा एकदा यादव सेनेने म्लेच्छांच्या सैन्याला पराभूत करून पिटाळून लावले.


आता हे सर्व काही एका दिवसात झाले की काही दिवसात ते बखर स्पष्ट करत नाही. पण ह्यावरून यादव सेनेने पहिला विजय संपादन केला होता हे नक्कीच स्पष्ट होते. 


आपल्या मुलांच्या मृत्यूने आणि पराभवाने क्रोधील अल्लाउद्दिन पुन्हा एकदा देवगिरीवर उलटून आला. ह्यावेळी त्याला रोखणे कोणालाच शक्य झाले नाही. चित्रप्रभू मारला गेला आणि अखेरीस म्लेच्छांचा जय झाला. महाराष्ट्रावर पाहिले मुसलमानी राज्य लादले गेले होते.


राजवाडे म्हणतात की, ह्या लढाईच्या वेळी रामदेवाबरोबर त्याचे संस्थानिक, मुत्सद्दी, सरदार आणि सामान्य लोक देखील सोबत नव्हते म्हणून तो हा पराभव थांबवू शकला नाही.

21 May 2011

महिकावतीची बखर - भाग ९ : कोकणातील फिरंगाण ...

शके १४२२ (इ.स. १५००) मध्ये पोर्तुगीझांनी कोची बंदर ताब्यात घेतले आणि वखार घालून व्यवसाय करू लागले. जागा बळकट करू लागले. अवघ्या १२ वर्षात तिथून गोवा आणि मग थेट वसई - दमण प्रांतात आले आणि तिथेही व्यापार करू लागले. वसईच्या दांडाळे तळे ह्याठिकाणी तटबंदी उभी करून त्यांनी वस्ती केली. अर्थात हे सर्व प्रांताचा मुसलमान सुभेदार याच्याकडून परवानगी घेऊन अधिकृतरित्या चाले. आवश्यक तेंव्हा पोर्तुगीझाचा वकील दिल्ली दरबारी हजेरी लावी. नंतर नंतर डच, ब्रिटीश, फ्रेंच जसजसे भारतात येऊ लागले तसे पोर्तुगीझाचे वकील हे कायम स्वरूपी दिल्ली-आग्रा येथे राहू लागले. सुरवातीला त्यांच्या हजेरीत आणि वजनामुळे इतर युरोपीय सत्तांना दिल्लीवरून सवलती मिळवून घेणे कठीण पडत होते.

पुढे तर गोव्यावरून आरमार आणून
कप्तान आलमेद याने लष्करीदृष्ट्या वसई ते दमण हा भाग ताब्यात घेतला. थोडक्यात महिकावती प्रांतावर पोर्तुगीझ या नव्या राज्यकर्त्यांचे आगमन झाले होते. प्रांतातील देसायांना त्याने काही विशेष फरक सुरवातीला पडण्याचे कारण नव्हते. कारण मुसलमान राजे तसेच फिरंगी. धर्म-कर्म आणि व्यापार उदीम याला पोर्तुगीझांनी सुरवातीला कसलेच बंधन घातले नाही. जवळ-जवळ २५ वर्षे इथे बस्तान पक्के बसवल्यानंतर पोर्तुगीझांनी धर्मछ्ळ सुरू केला. अनेकांना बाटवले आणि जे तयार झाले नाहीत  त्यांना कैद करून गोव्याला पाठवले. आजही वसई प्रांतात मोठ्या प्रमाणावर धर्मांतरित झालेले हिंदू आहेत. त्यांची आडनावे हिंदू असली तरी ते ख्रिस्त धर्माचे पालन करतात. ह्यात बहुसंख्य लोकांचे पूर्वज हे शेष, सूर्य आणि सोमवंशीय क्षत्रिय आहेत जे बिंब, यादव आणि नागरशाच्या काळात सुखाने नांदत होते. अजून एक म्हणजे वसई आणि आसपासच्या भागात जसे ख्रिस्त मोठ्या प्रमाणावर आढळतात तसे ते वैतरणा नदीच्या पलीकडे म्हणजे सफाळे, केळवे - माहीम उर्फ महिकावती आणि पुढे डहाणू - बोर्डी येथे आढळत नाहीत. ह्याचे कारण काय असावे?

बिंबदेव यादव याचा पुत्र प्रतापशां यादव महिकावती भागावर राज्य करत होता हे आपण मागे पाहिले आहेच. प्रतापशांची एक स्त्री होती जिच्या
देवशा नावाच्या पुत्राला प्रतापशांने काही गावांचे हक्क दिलेले होते. ह्या देवशाचा पुत्र रामशा याने शके १२९४ (इ.स. १५७२) मध्ये वाडा-जव्हार आणि आसपासच्या भागातील १५७ गावे जिंकून राम नगर स्थापिले होते. आज ठाणे जिल्ह्यातील जे रामनगर आपण ऐकतो ते हेच. त्या प्रांतावर रामशा उर्फ यादवांचे वंशज राज्य करीत होते. ह्या प्रांतावर पोर्तुगीझांची नजर गेली आणि त्यांनी रामनगर ताब्यात घेण्याचे ठरवले. त्यावेळी तेथे कोणी कोळी उमराव होता त्याची मदत पोर्तुगीझांनी घेतली आणि त्याला चौथाई देऊन रामनगर सोबत तह केला. पोर्तुगीझांच्या जोरावर कोळी माजला आणि त्याने स्वतंत्र कारभार सुरू केला.

महिकावतीची बखर मधील प्रकरणे १ आणि ४ (जी खरेतर सर्वात शेवटी लिहिले गेली - पाहा भाग १) ही ह्याच काळात लिहिली गेली. भगवान दत्त नामक लेखकाने पूर्वीची टिपणे वापरून बखरीत नव्याने माहिती जोडली आणि ती भावी पिढ्यांसाठी उपलब्ध करून दिली.


पुढे पोर्तुगीझांनी
वसई ते डहाणू अशी २७ सागरी किल्ल्यांची साखळी उभी केली. हे किल्ले लहान असले, काही तर नुसते बुरुज सदृश्य असले तरी टेहाळणीच्या दृष्टीने मोक्याचे होते. दुसरीकडे अशेरी-अडसूळ, तांदूळवाडी, कोहोज, टकमकगड, काळदुर्ग हे डोंगरी किल्ले मजबूत करून पोर्तुगीझ वसई प्रांतात कायमचे बसले तें बसले. अखेर शके १६६१ (इ.स. १७३९) मध्ये चिमाजी आप्पा यांच्या वसई मोहिमेने तें तिथून हुसकावले गेले.

२०० वर्ष पोर्तुगीझांनी दमण ते वसई आणि चौल - रेवदंडा भागात निर्विवाद राज्य केले. आजही त्यांचे अस्तित्व तेथे स्पष्टपणे जाणवते आणि खुपसे खुपते...

इथे बखरीचा ऐहासिक घटनाक्रम संपतोय मात्र पुढील भागापासून बखरीच्या अनुषंगाने इतर काही ऐतिहासिक समकालीन बाबींवर उजेड पाडण्याचा प्रयत्न करुया.

क्रमश: ...

20 May 2011

महिकावतीची बखर - भाग ८ : ठाणे - कोकणचे मुसलमानी राज्य ...

नागरशा राज्यभ्रष्ट झालेला पाहून भागडचुरी अर्थात आनंदला होता.  प्रांताचा संपूर्ण कारभार मलिक भागडचुरीवर सोपवून होता त्यामुळे भागडचुरी आता अधिकच उद्दाम झाला होता. त्याने पुन्हा सोम देसायाशी असलेले जुने वैर उकरून काढले आणि जिच्यावर भागडचुरीची वाईट नजर होती त्या स्त्रीच्या माहेरच्या लोकांवर म्हणजे भाईदरच्या पाटलावर आरोप केले. सरकारच्या ३२ हजार सजगणी (सजगणी हा नाण्याचा प्रकार असून त्याचे मूल्य २ पैसे असे) पाटलाने खाल्याचा खोटा आरोप भागडचुरीने पाटलावर केला आणि त्यास कैद करून टाकले. शेवटी सोम देसला याने ते पैसे सरकारात जमा करून पाटलास सोडवून आणले. आता भागडचुरीने मलिकांचे काम भरले की हा सोम देसला लुच्चा असून त्यास दस्त करावयास हवे. मलिकने निष्कारण सोम देसला याला १६ हजार दाम दंड भरावयास सांगितले. ह्यावर सोम देसलाने नाराजी व्यक्त करून तो भरायला नकार दिला.

बास.. इतके कारण पुरे होऊन मालिकाने त्याची देसाई काढून भागडचुरीला देऊ केली. पण भागडचुरीला देसायाला संपवायचेच होते. त्याने
सोम देसला किंवा त्याचा भाऊ पायरुत याला जीवे मारल्याखेरीज देसाय पद घेणार नाही असे मलिकला कळवून टाकले. झाले.. ह्यावरून मालिकाने सोम देसला आणि त्याचा भाऊ पायरुत ह्यांना दिल्ली येथे नेऊन बादशहाकरवी त्यांचे जीव घेतले. बखर म्हणते की, बादशहाने पायरुताची चामडी सोलून त्यास ठार केले तर सोम देसल्याचे पोट चिरून, त्याच्या आतड्याची वात वळून आणि चरबीचे तेल जाळून, त्याचा दिवा लाविला. ही असली क्रूर आणि भयानक शिक्षा सोम देसल्याला आणि त्याच्या भावाला मिळाल्याने संपूर्ण भागात भागडचुरीची दहशत बसली. पण पायरुतचा मुलगा दादरुत ह्याला मात्र भागडचुरीचा बदला घ्यायचा होताच. त्याने पुन्हा विश्वासातील लोक जमवून भागडचुरी आणि कमळचुरी यांवर हल्ला चढवला. कमळचुरी जागीच ठार झाला पण भागडचुरी पुन्हा पळू लागला. ह्यावेळी मात्र तो फार पळू शकला नाही. कोणा गोम तांडेलाने कोयती हाणून त्याचा वध केला आणि दादरुतची वाहवा मिळवली.

भागडचुरीचा असा अंत झाल्याचे पाहून मलिक देखील सावध झाला. लोकांच्या कलेने घेतल्याखेरीज निभाव लागणार नाही हे त्याला ठावूक होते. त्याने नागरशा दुसरा याचा पुत्र
लाहुरशा याला पुन्हा माहीमच्या गादीवर बसवले आणि कारभार हाकावयास सांगितले. हे सर्व अवघ्या वर्षभराच्या कालावधीत झाले. लाहूरशा याने ९ वर्ष माहीम वरून राज्यकारभार पाहिला. पुढे शके १२७९ (इ.स. १३५७) मध्ये मलिकने राज्य नायते राजांच्या हाती दिले. नायते हे शक १११६ पासून सामान्य देसाई होते. पुढे ते मुसलमान झाले आणि मलिकच्या दरबारात बहुदा त्यांनी वजन प्राप्त केले असेल. त्यांच्या कारकिर्दीत इतर देसाई आपापली कामे पाहून होते. कोणीही कुठलाही उठाव करण्याचा प्रयत्न केला नाही. लाहूरशा नंतर त्याच्या घराण्याचा कोणीही इतका बलशाली झाला नाही की तो पुन्हा उठाव करून राज्य हस्तगत करू शकेल. नायते याने मलिकच्या आणि पर्यायाने दिल्लीच्या पातशहाच्या आशीर्वादाने तब्बल ४० वर्षे राज्य केले. पुढे कोणी भोंगळे म्हणून राजे आले त्यांनी २० वर्षे राज्य केले.  जव्हार येथे असणारा वाडा बहुदा ह्यांनीच बांधला. (मला खात्री नाही पण खूप वर्ष आधी गेलो होतो तेंव्हा पाहिल्याचे स्मरते) पुन्हा शके १३५१ मध्ये राज्य अमदाबादचा सुलतान (ह्यांचा नायते राजांशी जवळचा संबंध होता.) ह्याने घेतले. राज्य कोणाचेही असो, सर्वोच्च सत्ता दिल्लीची होती. पुढे अनेक वर्ष (अंदाजे ८०) अमदाबादचा सुलतान ठाणे -साष्टी आणि महिकावती भागावर राज्य करून होते.

नर्मदा ओलांडून अल्लाउद्दिन खिलजी दख्खनेत येणे ही जशी धक्कादायक घटना होती तशीच अजून एक घटना शके १४२२ मध्ये घडली. ती महिकावती प्रांतात घडली नसली तरी पुढच्या २०० वर्षात ह्या घटनेचा संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मोठाच परिणाम झाला. ती घटना म्हणजे २ तरावे घेऊन पोर्तुगीझ कोची बंदरात उतरले. आपण सर्वांनी वास्को-द-गामा हा भारतात आलेला पहिला पोर्तुगीझ दर्यावर्दी असल्याचे शाळेत वाचले आहे. पण बखरीत त्याचा उल्लेख येत नाही. कप्तान लोरेस लुईस देत्राव ह्याच्या नेतृत्वाखाली सिनोर देस्कोर आणि बोजीजुझ अशी २ जहाजे कोची बंदरात दाखल झाली होती. वास्को-द-गामा हा बहुदा यात असावा आणि त्याने फक्त नोंदी करून ठेवल्या असाव्यात.



क्रमश: ...

19 May 2011

महिकावतीची बखर - भाग ७ : कोकणात निका मलिकचे आगमन ...

शके १२५४ (इ.स.१३३२) मध्ये साष्टी - मुंबई भागात पुनःश्च सत्ता प्रस्थापित झाल्यावर नागरशा दुसरा याने आपल्या सरदारांना अनेक इनामे दिली. ह्यात एक जैतचुरी नावाचा त्याच्या विश्वासातील एक सरदार होता. त्याला नागरशा दुसरा याने त्याला साष्टी येथील बंदरकीचा मामला सुपूर्त केलेला होता. ह्या जैतचुरीस भागडचुरी आणि कमळचुरी असे २ पुत्र होते. त्यातील भागडचुरीच्या हातात बंदरकीच्या आसपासच्या जमिनीचा मामला सुपूर्त होता. ह्या भागडचुरीने नव्याने जानिमीची मोजणी केली. ७ हातांची एक काठी आणि १२ काठ्यांचा बिघा आणि १२८ बिघ्याचा एक चावर अशी नवीन पद्धत अमलात आणली. थोडक्यात त्याने एका चावर मधील बिघ्याची संख्या वाढवून नागरशा याला सरकारी उत्पन्न वाढवून दिले. ह्यामुळे नागरशा खुश असला तरी जमिनीचा सारा वाढल्याने सामान्य रयत मात्र नाराज होती.

३-४ वर्षात त्याची बुद्धी इतकी फिरली की त्याने मालाडच्या सोम देसायाच्या वहिनीला जबरदस्तीने पळवून नेण्याची भाषा सुरू केली. त्याने सोम देसाई, त्या बाईचा नवरा आणि घरातील इतर पुरुषांना बंदी केले. नशिबाने कोण्या एका आप्तेष्टाने त्या स्त्रीस रातोरात कुर्हार येथे नेऊन पोचवले. तिथून ती तिच्या माहेरी भाईंदर येथे गेली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तेंव्हा ती ४ महिन्याची गरोदर होती.  इथे ती सुरक्षित नाही असे कळून आल्याने तिच्या माहेरच्यांनी तिला भिवंडी येथे तिच्या भावाकडे पाठवले. भागडचुरीला ती नेमकी कुठे गेली या गोष्टीचा पत्ता लागला नाही म्हणून त्याने तिच्या नवऱ्यास ठार केले. त्या स्त्रीस भिवंडी येथे पुत्र जन्मास आला. तो १२ वर्षाचा झाल्यावर त्याला स्वतःच्या आईकडून आपल्या वडिलांच्या हत्येची सर्व माहिती कळली. तेंव्हा त्याचा राग अनावर झाला आणि त्याने नागरशाला 'मी भागडचुरीला ठार मारणार म्हणून कळवले.'


ह्या १२ वर्षात भागडचुरीचा उच्छाद इतका वाढला होता की नागरशाला देखील तेच हवे होते. त्याने स्वतःची संमती त्या मुलास कळवली. एके दिवशी वेळ साधून त्या मुलाने सोबतीला काही लोक घेऊन भागडचुरीला देवीच्या जत्रेत गाठले आणि हल्ला केला. झटापटीत चुरी पाला आणि खाडीत उद्या टाकून पळायला लागला. तेंव्हा त्या मुलाने जवळच असलेल्या होडीच्या तांडेलाला सांगितले की तू भागडचुरी मारशील तर तुला हवे ते देईन. ह्या आमिषाने तांडेलाने 'मला आपल्या जातीत घ्याल तर मारतो' असे वाचन मागितले. मुलानेही त्याची अट कबूल केली. त्यावरून तांडेलाने भागडचुरीला ठार केले. प्रसन्न होवून मुलाने प्रितीभोजन घातले आणि तांडेलाला सोबत भोजनास बसवून जातीत सरता देखील केले. हे ऐकून नागरशा संतापला आणि तांडेलाला जातीत घेणारया लोकांची अधिकारपदे त्याने काढून टाकली.


पण गम्मत म्हणजे तांडेलाने भागडचुरीला ठार मारलेच नव्हते. भागडचुरी त्यानंतर अनेक दिवस लपून बसला होता. त्याने देसायाच्या मुलाचा बदला घ्यायचे ठरवले होते. दुसरीकडे त्याने नागरशा विरुद्ध नगरच्या निका मलिक बरोबर संधान बांधले. हा निका मलिक म्हणजे महंमद तुघलक याचा दक्षिणेतील हस्तक होता. भागडचुरीने त्याचा नाथराव नावाचा एक भाट नागरशाकडे पाठवला आणि निका मलिकच्या नावाने त्यावर दबाव आणायचा प्रयत्न सुरू केला. पण नागरशा काही घाबरणारयांपैकी नव्हता. त्याने नाथरावाचे नाक कापून त्याला भागडचुरीकडे पाठवून दिले. भागडचुरीने ह्याचा फायदा घेत त्या भाटास निका मलिककडे पाठवून दिले. हे सर्व ऐकून-पाहून निका मलिक फौज घेऊन साष्टीवर चालून आला. त्याच्या फौजेने ठाण्यावर हल्ला करत नागरशाच्या फौजेला मागे रेटले. शिव आणि कान्हेरी अश्या दोन्ही ठिकाणी देखील नागरशाची फौज अपयशी ठरली. तो स्वतः वाळूकेश्वरी होता. तो मलिकवर चालून आला. भायखळ्याला झालेल्या तुंबळ युद्धात नागरशा ठार झाला. अशा तर्हेने शके १२७० (इ.स. १३४८) मध्ये ठाणे - कोकणात मुसलमानी राज्य आले. मलिकने नागरशाचा पुत्र लाहूरशा याला मंडलिक बनवून घेतले.


बखर म्हणते की, 'कलियुगात असे होणार अशी भाक लक्ष्मी-नारायणाने कलीस दिली होती. ती भाक शक १२७० मध्ये पूर्ण खरी ठरली. हरिहर गुप्त झाले. ऋषी बद्रीकाश्रमास गेले. वसिष्ठ राजगुरूंनीही पाठ फिरविली. त्यामुळे सोमवंशी व सूर्यवंशी यांची शस्त्रविद्या लुप्त होऊन म्लेच्छांचा जय झाला.'


म्लेच्छांचे राज्य आल्यावर मात्र सर्व सूर्यवंशी - सोमवंशी देसाई - पाटील सामान्य रयत होऊन बसले. मलिक संपूर्ण प्रदेशाचा कारभार भागडचुरीच्या सल्ल्याने पाहू लागला.


महिकावतीची बखर - भाग ८ : ठाणे - कोकणचे मुसलमानी राज्य ...

18 May 2011

महिकावतीची बखर - भाग ६ : नागरशाचा प्रतिहल्ला ...

बिंबदेव यादव महिकावती, साष्टीआणि मुंबई भागात शके १२१६ ते १२२५ (इ.स. १२९४ ते १३०३) या दरम्यान राहत होता. यादवांचे मुळचे देवगिरी - पैठणचे राज्य कधीच खिलजीच्या हाती गेले होते. बिंबदेव आपल्या २ राण्यांबरोबर महिकावती येथे राज्य करू लागला. मोठ्या राणीचे नाव नगरसिद्धी होते आणि तिला प्रतापशा नावाचा पुत्र होता. धाकट्या राणीचे नाव गिरीजा होते आणि तिला पूरशा नावाचा पुत्र होता. शके १२२५ मध्ये बिंबदेव वारला आणि त्याचा ज्येष्ठ पुत्र प्रतापशा गादीवर आला. ह्या ९ वर्षात चेउल येथे नागरशा वृद्ध झालेला होता. त्याला त्रिपुरकुमर शिवाय केशवदेव नावाचा दुसरा पुत्र आणि एक मुलगी देखील होती. ह्या मुलीचे लग्न त्याने प्रतापशा यादव बरोबर लावले होते.

पुढे शके १२३२ मध्ये मात्र प्रतापशा यादव याला देवगिरी वरून मदत मिळायची फार अपेक्षा नसल्याने त्रिपुरकुमर याने नवी कुरापत काढली.
मेढालगड नावाचा एक डोंगरी किल्ला त्याने आपला मेव्हणा प्रतापशा यासकडे मागितला. अर्थात त्याला प्रतापशाने नकार दिला. इतके कारण पुरे धरून त्रिपुरकुमरने आपला भाऊ केशवदेव यास सोबत घेऊन लढाईची तयारी केली. प्रतापशाने देवगिरीकडे मदतीचे हात पसरीले. देवगिरीवरून रामदेवरायने काही फौज रवाना केली पण त्रिपुरकुमरने त्यांना शहापूर - माहुली येथेच गाठून धुळीस मिळवले. दुसरीकडे प्रतापशाने स्वतः लढाईची काही तयारी केली होती पण जेंव्हा त्याला ही बातमी पोचली तेंव्हा तो निराश होऊन आपल्या फौजेसह डहाणू - सायवन येथील गगनमहाल येथे आश्रयास निघून गेला.

त्रिपुरकुमरने यादव फौजेचा माहुलीला पराभव केला म्हणजे त्याआधी साष्टी - कल्याण त्याच्या हातात आले होते हे स्पष्ट होते. आपल्या हातचा बराच भाग त्रिपुरकुमरने जिंकला आणि येणाऱ्या फौजेचा सुद्धा पराभव केला हे ऐकून, कच खाऊन प्रतापशा बहुदा थोडा मागे डहाणूला गेला असेल. इथे त्रिपुरकुमर फौज घेऊन महिकावतीच्या दिशेने वेगाने येत होता. दरम्यान रामदेवरायाने देवगिरीहून नवी फौज लढाई करता रवाना केली होती. ह्या दोन फौजा वैतरणा नदीच्या काठी असलेल्या
तांदूळवाडी येथे समोरा समोर आल्या. पण आता त्रिपुरकुमर पराभूत होणार नव्हता. तुंबळ युद्धात त्याने पुन्हा एकदा यादव सेनेचा धुव्वा उडवला आणि प्रतापशाच्या महिकावतीवर पुन्हा एकदा कब्जा केला. पुढच्या काही काळात त्याने प्रतापशाच्या प्रमुख ५४ प्रभू सरदारांना आपल्याकडे वळवून घेतले आणि त्याना योग्य असे अधिकार देऊन टाकले. अशा तर्हेने नागरशाने आपले गेलेले राज्य पुन्हा मिळवून घेतले. मृत्युपूर्वी त्याला ते एक समाधान नक्कीच मिळाले असेल. नागरशा मागोमाग पुढच्या २० एक वर्षात त्रिपुरकुमर आणि केशवदेव हे त्याचे दोन्ही पुत्र मरण पावले. त्रिपुरकुमर मागून त्याचा पुत्र नागरशा दुसरा गादीवर आला.

तिथे २०-२५ वर्ष प्रतापशा मोजक्या डहाणू भागावर नियंत्रण ठेवून कसाबसा जगत होता. त्याचे सर्व सरदार अधिकारी नागरशाचे झालेले होते. उरलेल्या देसाई पाटलांना नागरशा दुसरा याने शके १२५४ (इ.स. १३३२) मध्ये फितवून प्रतापशा याचा सर्वनाश करून टाकला. अश्या तर्हेने
नागरशाने यादव राजघराण्याचे नाव अवघ्या ३८ वर्षात कोकणातून पुसून टाकले. उत्तर भारत आणि महाराष्ट्रात मुसलमानांचे राज्य आलेले होते. फक्त उत्तर कोकणात नागरशा हा एकमेव स्वतंत्र हिंदू राजा उरला होता.

क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग ७ : कोकणात निका मलिकचे आगमन ...

17 May 2011

महिकावतीची बखर - भाग ५ : नागरशा आणि बिंबदेव यादवाचे आगमन ...

शके ११५९ (इ.स. १२३७) मध्ये सर्व देसायांच्या संमतीने जनार्दन प्रधान गादीवर आला. मात्र तो फार काळ सत्ता उपभोगू शकला नाही. अवघ्या ४ वर्षात घणदिवीचा राजा नागरशा ठाण्यावर चालून आला. ह्यावेळेस मात्र जनार्दन प्रधान युद्ध जिंकू शकला नाही. नागरशाने युद्ध जिंकले आणि जनार्दनासच आपला मुख्य प्रधान बनवले. अशा तर्हेने बिंब राजघराण्याची सत्ता संपुष्टात आली. नागरशाने सर्व देसायांना एकत्र जमवून देशाचे कागद तपासले आणि ज्यांच्याकडे केशवदेवाचा शिक्का असलेला कागद होता त्यांच्या वृत्या तशाच पुढे चालू ठेवल्या.

केशवदेव बिंबाचा शिक्का असा होता - 

बकदालभ्य यदा गोत्र प्रभावती कुलदेवता
ठाणे स्थाने कृतं राज्य मम मुद्रा विराजते

ह्याच दरम्यान नागरशाला पुत्र प्राप्ती झाली. त्याचे नाव त्रिपुरकुमर ठेवले. नागरशाने पुढील ३० वर्षे विनासायास राज्य केले. शके ११९३ मध्ये (इ.स. १२७१) पुन्हा एकदा उत्तर कोकण ढवळून निघाले. झाले असे की नागरशाचे ३ मेव्हणे नानोजी, विकोजी, बाळकोजी हे नागरशाकडे ठाणे, मालाड आणि मरोळ ही गावे बक्षिस मागत होते. त्रिपुरकुमर वयात येतोय हे पाहून त्यांना त्यांची स्वतंत्र व्यवस्था लावावीशी वाटली असेल. अर्थात ही मागणी  नागरशाने नाकारली. ह्यावरून नाखूष होऊन ते ३ मेव्हणे देवगिरीला रामदेवराय यादव याच्याकडे आश्रयाला गेले. रामदेवराय नुकताच सम्राट पदावर आरूढ झालेला होता. त्याने तिघांचे म्हणणे ऐकून घेतले आणि नागरशाला जेरबंद करतो असे सांगितले. रामदेवरायाने आपला प्रधान हेमाडपंडित याला तिघांबरोबर सैन्य देऊन रवाना केले. हे सैन्य कळवा येथे पोचले असता ठाणे-चेंदणी येथील पाटलाने पिटाळून लावले. त्रिपुरकुमर ह्या सैन्याचा पाठलाग करू लागला. हे सैन्य माहुली किल्ल्याच्या आश्रयास गेले असताना तिथे त्यांच्याबरोबर युद्ध करून त्रिपुरकुमर विजयी झाला.

नागरशाने विजयानंतर विशेष हालचाल केली नाही म्हणून रामदेवरायदेखील शांत होता. रामदेवराय कोकणासाठी एक योजना मात्र निश्चितपणे आखत होता. त्याचे ४ पुत्र होते.
शंकरदेव, केशवदेव, बिंबदेव आणि प्रतापशा. त्याने शंकरदेव यास स्वतःजवळ पैठण येथे ठेवून घेतले. केशवदेवास देवगिरी दिली, बिंबदेवास उदगीर प्रांत दिला तर प्रतापशाला अलंदापूरपाटण दिले. केशवदेव काही काळात वारला आणि त्याचा पुत्र रामदेवराय (दुसरा) हा देवगिरीच्या गादीवर आला. हाच तो रामदेवराय ज्याच्या काळात फक्त कोकणच नव्हे तर संपूर्ण दक्षिणपट हादरवणारी एक घटना घडली. ती म्हणजे नर्मदा ओलांडून अल्लाउद्दिन खिलजी देवगिरीवर चाल करून आला. साल होते शके १२१६ (इ.स.१२९४)

ह्यावेळी बिंबदेव यादव हा उदगीरहून गुजरातेकडे सरकला. बहुदा माळव्याच्या बाजूने अल्लाउद्दिनला पायबंद करायचा त्याचा डाव असावा पण तो फसला कारण जितक्या वेगाने अल्लाउद्दिन देवगिरीवर आदळला तितक्याच वेगाने तो परत गेला. देवगिरीला जाण्याऐवजी बिंबदेवाने ठाणे-कोकणच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. ह्या संपूर्ण प्रदेशावर त्याकाळी नागरशाची सत्ता होती. बिंबदेवाकडे नागरशाच्या तिप्पट-चौपट सैन्य होते. त्या जोरावर पुढच्या काही काळात बिंबदेव यादव याने नागरशाला हरवून त्याच्याकडून केळवे-माहीम, साष्टी, मुंबई हिसकावून घेतले आणि त्याला पेन - पनवेल - चेउल प्रांतात पिटाळून लावले. त्याने माहीम बेटात प्रमुख १२ सरदारांची नेमणूक केली. या शिवाय ४२ सूर्यवंशी, १२ सोमवंशी असे ५४ सरदार त्याने नेमले. हे सर्व ५४ सरदार म्हणजे कोकणात आलेले
पातेणे उर्फ पाठारे प्रभू होय. प्रांताचे त्याने १५ मुख्य भाग केले आणि त्यावर फौज नेमून दिली. अशा प्रकारे देशाची व्यवस्था लावून तो महिकावती उर्फ माहीम येथे राहू लागला.

प्रतापबिंब - महीबिंब हे बिंब घराण्याचे राजे आणि बिंबदेव यादव हा यादव घराण्याचा राजा यातील फरक वाचकांच्या लक्ष्यात आला असेलच. नाव साधर्म्यामुळे गोंधळ होवू नये म्हणून इथे तसे स्पष्ट करीत आहे. शके १०६० साली प्रताप - मही बिंबाबरोबर ६६ सूर्य-सोम-शेषवंशी कुळे उत्तर कोकणात आली होती. त्यानंतर १५६ वर्षांनी शके १२१६ मध्ये बिंबदेव यादव याच्याबरोबर अजून ५४ सूर्य-सोमवंशी कुळे उत्तर कोकणात येऊन वसली.


क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग ६ : नागरशाचा प्रतिहल्ला ...

16 May 2011

महिकावतीची बखर - भाग ४ : बिंब घराण्याची ठाणे - कोकणची राजवट ...

शके १०६२ (इ.स. ११४०) मध्ये प्रताप आणि मही बिंब वाळुकेश्वर येथे असताना अपरादित्य शिलाहाराने वसई खाडीच्या उत्तरेकडील भागावर पुन्हा स्वारी केली आणि प्रताप बिंबाने जिंकून घेतलेला भाग पुन्हा स्वतःकडे घेतला. बिंबाचे खुद्द राजधानीचे गाव केळवे-माहीम आणि सोपारा वगैरे प्रदेश शिलाहाराने जिंकून प्रताप बिंबला ठाणे-साष्टी बेटात कोंडून टाकले. केळवे-माहीम हातचे गेल्यामुळे प्रताप बिंबाने वांदरयाच्या दक्षिणेस एक नवे माहीम निर्माण केले आणि त्याला आपली राजधानी नेमले. हेच ते मुंबईचे माहीम जंक्शन. ह्या स्थानाचे नाव मुळच्या केळवे-माहीम मधील माहीम वरून पडले हे देखील ह्या बखरीत स्पष्ट होते. प्रताप बिंबाचा पुत्र मही बिंब शांत बसणाऱ्या पैकी नव्हता. त्याने ठाण्या पलीकडे जाऊन शिलाहारांच्या कल्याण प्रांतावर हल्ला चढवला आणि ते हस्तगत केले. अशाप्रकारे साष्टी बेटांमाधून शिलाहारांची इ.स. ११४१ च्या आसपास हकालपट्टी झाली मात्र शूर्पारक उर्फ नालासोपाराच्या उत्तरेकडे पुढची सव्वाशे वर्षे त्यांनी राज्य उपभोगिले.

शके १०६९ (इ.स. ११४७) मध्ये प्रताप बिंब माहीम (मुंबई) येथे वारला. त्याच्या मागून त्याचा पुत्र
मही बिंब गादीवर आला. त्याने शके १०६९ ते ११३४ (म्हणजे इ.स. ११४७ ते १२१२) अशी तब्बल ६५ वर्षे सुखाने राज्यकारभार केला. ह्या दरम्यान शके १११० (इ.स. ११८८) मध्ये चेउल येथील भोज राजा दक्षिणेवरून ठाण्यावर चालून आला. उरण - पनवेल काबीज करत तो खाडी पलीकडे कळव्याला येऊन पोचला. मही बिंबला ह्याची खबर लागली होतीच. त्याने सेनापती केशवराव आणि हंबीरराव यांना ८ हजार फौज देऊन ठाण्याला रवाना केले होते. कळव्याला ह्या २ फौजेमध्ये तुंबळ युद्ध झाले. ह्यात खुद्द भोज राजा प्राणास मुकला. कच न खाता भोजाच्या मुख्य प्रधानाने दुसरा हल्ला चढवला मात्र त्याला सेनापती केशवरावाने यमसदनी धाडले. तरी सुद्धा न डगमगता भोजाचा एक पाळक पुत्र तिसरा हल्ला करावयास सज्ज झाला. त्यास हंबीररावाणे ठार मारले. आता मात्र भोजाचे उरले सुरले सैन्य पळत सुटले. मही बिंबाच्या फौजेचा मोठा विजय झाला. बिंबाने खुश होऊन अनेक वृत्या आणि पदव्या यांचे दान केले. सेनापती केशवरावाला त्याने गळ्यातील पदक देऊन चौधरीपणा अर्पण केला. देवनारच्या एका पाईकाला (शिपायाला) ठाकूर पद दिले. उत्तनच्या १२ शिपायांना राउत पद मिळाले.

ह्यानंतरच्या काही काळात मही बिंबाने शिलाहारांच्या ताब्यात असलेला सोपारा ते केळवे-माहीम आणि पुढे संजाण - नवसारी (महाराष्ट्र उत्तर सीमा) असा प्रदेश पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. मात्र तो नेमका कधी घेतला हे बखर स्पष्ट करीत नाही. आता मुंबई, ठाणे - साष्टी - कल्याण आणि सोपारा ते नवसारी अश्या विस्तृत प्रदेशावर त्याचे राज्य पसरलेले होते.


मही बिंबला अनेक बायका होत्या पण त्याला बहुदा एकही पुत्र नव्हता. त्याच्या उतार वयात त्याने
कामाई नावाच्या स्त्री बरोबर लग्न केले आणि अखेर तिच्याकडून त्याला पुत्र झाला. त्याचे नाव केशवदेव ठेवले. शके ११३४ (इ.स. १२१२) मध्ये जेंव्हा मही बिंब वारला तेंव्हा हा केशवदेव अवघ्या ५ वर्षांचा होता. तेंव्हा अर्थातच राज्याचा कारभार कामाई देवीवर येऊन पडला. वयाने तरुण आणि रूपाने सुंदर असणाऱ्या कामाईवर राज्याच्या प्रधानाची वाकडी नाराज एव्हाना वळली होती. हे समजून आल्यावर राणी कामाईने तिच्या विश्वासातला माहिमचा एक सरदार हरदोपूर यास ह्यासंबंधी कळविले. हरदोपूराने विश्वासाचे राउत एकत्र केले आणि रात्रीच प्रधानाच्या महालात घुसून त्याचा शिरच्छेद केला. त्यानंतर काही काळाने हरदोपूरने केशवदेव बिंबाचा राज्यारोहण समारंभ घडवून आणला. अशा तर्हेने बिंब घराण्याचा तिसरा राजा राज्य करू लागला. केशवदेव बिंबाने राजा झाल्यावर अनेकांना इनामे दिली आणि ऐश्वर्याने राज्य केले असे बखर म्हणते. याचाच अर्थ त्याचा आजा प्रताप बिंब याने घेतलेल्या मेहनतीचे फळच तो चाखत होता असे म्हणावयास हरकत नाही. देशोधडीला लागलेला प्रांत गेल्या ८० वर्षात शेती, व्यापार-उदीम यांची भरभराट होऊन पुन्हा एकदा स्थिरस्थावर झाला होता.

वयात आलेल्या केशवदेवाने
राजपितामह अशी पदवी धारण केली आणि त्याच्या बडेजावीचे पोवाडे त्याचा भाट संस्थानिकांच्या आणि मांडलिकांच्या राजधान्यासमोरून गाऊ लागला. चेउल येथील भोज घराण्याचा बिंब घराण्यावर राग होता. ३० वर्षांपूर्वी  झालेला पराभव अजूनही भोजांच्या जिव्हारी लागलेला होताच. त्यांनी पुन्हा एकदा युद्धाचा पवित्रा घेतला आणि ठाण्यावर चालून आले. केशवदेवास ही बातमी कळतच त्याने सर्व देसाई एकत्र केले. बिंबाचे सैन्य पुन्हा एकदा खाडी उतरून कळव्याला भोजाचा मुकाबला करायला सज्ज झाले.

बखर म्हणते,
'परदळ देखता केशवदेवाने देसायांना हांकारा दिला. देसाय देसाय देश मिळाला. सिंद्याचा जमाव थोर झाला. नगाऱ्या घाव घातला. कर्णे, बांके, शिंगे, दफ, काहाळा, विराणी वाजली. पाईकापाईक झाली. कळव्या युद्धा थोर झाले.'

युद्धामध्ये देवनार येथील
विनायक म्हातरे (म्हात्रे) याने बाण मारून राजा भोजाच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला. तुंबळ युद्धात भोज पुन्हा एकदा अपयशी झाला. इतक्यात म्हसगडचा संस्थानिक जसवंतराव भोजाच्या मदतीला धावून आला. पुन्हा एकदा लढाई माजली. ह्यावेळी बिंबाच्या फौजेमधल्या सिंद्यानी पराक्रम दाखवला आणि जसवंतरावास जिवंत पकडला. युद्धानंतर झालेल्या तहात केशवदेवाने जसवंतरावास जीवदान देऊन सोडून दिले आणि भोजासमोर मैत्रीचा हात पुढे केला. ही घटना शके ११४६ (इ.स. १२३४)च्या आसपास घडली. तेंव्हा केशवदेव अवघ्या १७ वर्षांचा होता.

उत्तरकोकणात हे सर्व सुरू असताना घाटावर मात्र चालुक्यांचे राज्य संपुष्टात येऊन देवगिरीच्या यादवांचे राज्य आलेले होते. बिंब, भोज यासारखे राजे स्वतंत्र होते की ते ह्या सम्राटांचे मांडलिक होते हे बखरीत कुठेच नीटसे स्पष्ट होत नाही. बिंब मुळचे जिथले होते तिथे ते चौलुक्यांचे उर्फ सोळंकी राजांचे मांडलिक होते पण कोकणात ते स्वतंत्र होते का ते समजत नाही. चौलुक्य आणि चालुक्य हे सुद्धा एकमेकांचे शत्रू होते. आता चालुक्यांच्या जागी यादव येऊन बसले होते. बिंब चौलुक्यांच्या बाजूला तर जसवंतराव आता यादवांच्या बाजूला जाऊन बसला होता. अशातच एक छोटीशी घटना घडली ज्याने कोकणात पुन्हा युद्धाचे वातावरण तापू लागले.


झाले असे की, भोजराजाने कोकणातून केशवदेव बिंबासाठी एक आंब्याची फर्मास पाठवली होती ती ह्या जसवंतरावाने मधल्यामध्ये हडप केली. केशवदेवाने जसवंतरावाकडे निरोप पाठवला की,
'तुमच्या सारख्या भल्या लोकांनी चोऱ्या कराव्या हे युक्त नव्हे.' ह्यावर जसवंतरावाने उलट निरोप धाडला. 'मगदूर असेल तर आमच्या गडाला येऊन, किल्ल्याकुलुपे फोडून आंबे परत घेऊन जावे.' हे ऐकून केशवदेव बिंब पुन्हा एकदा युद्धास उद्युक्त झाला. गेल्यावेळी ह्या जसवंतरावला जिवंत सोडावयास नको होते असे त्याला नक्कीच वाटून गेले असेल. केशवदेवाने पुन्हा एकदा सूर्यवंशी, सोमवंशी आणि शेषवंशी देसायांना एकत्र केले आणि तो भैसेदुर्गवर चालून गेला. हा वेढा तब्बल १२ वर्षे सुरू होता. बखरकार म्हणतो,'चिंचाचे चिंचवणी खाऊन त्याच्या चिंचोऱ्या ज्या पडल्या, त्या रुजून, त्यांचे वृक्ष होऊन, त्यांच्या चिंचा केशवदेवाच्या सैनिकांनी खादल्या.' शेवटी आन्धेरीचा (अंधेरी) कोणी म्हातरा (म्हात्रे) तिथे कामाला होता त्याने भेद केला आणि किल्ला एकदाचा केशवदेवाच्या हाती आला. पुन्हा एकदा जसवंतराव केशवदेवाच्या हाती सापडला. केशवदेवाने त्यास ठार केले की नाही हे बखरीत स्पष्ट नाही पण जिवंत सोडले असेल असे प्रसंगावरून वाटत नाही. कारण बखरीत पुढे कुठेच ह्या जसवंतरावचा उल्लेख येत नाही. लढाई जिंकली म्हणून केशवदेवाने सर्व सरदारांना यथायोग्य इनामे दिली. ही लढाई अंदाजे शके ११५४ (इ.स. १२३२) मध्ये झाली. ह्यानंतर अवघ्या ५ वर्षात केशवदेव अचानक वारला. मरतेवेळी तो अवघ्या ३० वर्षाचा होता आणि त्यास कोणीच पुत्र-संतान नव्हते. अखेर सर्व देसायांनी मिळून मुख्यप्रधान जनार्दन यास गादीवर बसवायचा निर्णय घेतला.

क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग ५ : नागरशा आणि बिंबदेव यादवाचे आगमन ...

15 May 2011

महिकावतीची बखर - भाग ३ : प्रताप बिंबाची कोकणावर स्वारी ...

शके १०६० (इ.स. ११३८)ची गोष्ट. सरस्वतीनदीच्या काठी असलेल्या पालणपुर देशात अणहिलवाडपाटणवर चौलुक्य उर्फ सोळंकी नावाचे राजे राज्य करीत होते. त्यांच्या चंपानी उर्फ चांपानेर नावाच्या संस्थानावर बिंब ह्या आडनावाचे एक सूर्यवंशी क्षत्रिय कुल त्यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. ह्या बिंबांचा पैठण येथे राज्य करणाऱ्या भौम या क्षत्रिय राजघराण्याबरोबर घनिष्ट संबंध होता. भौम राजघराणे जसे महाराष्ट्रिक होते तसे चौलुक्य आणि बिंब देखील महाराष्ट्रिकच होते.

शके १०६० साली गोवर्धन बिंब हा बिंब घराण्याचा राजा होता. त्याचा लहान भाऊ प्रताप बिंब याने उत्तर कोकणावर स्वारी करण्याची योजना शके १०६० मध्ये आखली. त्यावेळी उत्तर कोकणावर शिलाहारांचे राज्य होते. दक्षिण कोकणातील शिलाहारांचे राज्य कदंबांनी हिसकावून घेतलेले होते. गेली ५० वर्षे शिलाहार आणि कदंब यांच्या लढायांमध्ये कोकणात गोंधळ माजलेला होता आणि शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली होती. अशातच उत्तरेकडून चढाई करण्याचा मनोदय प्रताप बिंब याने नक्की केला. सोबत ८ प्रमुख अधिकारी आणि १० हजार फौज घेऊन तो मोहिमेस निघाला.

प्रताप बिंब चांपानेरवरून निघाला तो थेट नर्मदा उतरून, पैठण येथे भौम राजाकडे गेला. तिथे तो संपूर्ण फौजेसह तब्बल २ वर्ष राहिला. प्रताप बिंबला मोहिमेवर निघताना बहुदा पैशाची बरीच अडचण होती असे दिसते नाहीतर तो २ वर्षे काहीही न करता पैठण येथे बसून राहिला नसता. भौम राजाने सुद्धा त्याला जवळ ठेवून घेतले आणि त्याच्या १० हजार फौजेचा खर्च पाहिला याचा अर्थ त्यांच्याच निश्चित जवळचे संबंध होते. अखेर २ वर्षांनी त्याने पैशाची व्यवस्था लावली आणि तो मुंबई-ठाणे भागावर चाल करून आला. यायचा मार्ग मात्र त्याने थोडा उत्तरेवरून घेतला होता. पैठणवरून जुन्नरकडे आल्यावर तो घाट उतरून खाली यायच्या ऐवजी वर गेला आणि दमण म्हणजे सध्याच्या महाराष्ट्र-गुजरात उत्तर सीमाभागाकडून खाली चाल करून आला. कदाचित थेट हल्ला करण्याऐवजी उत्तरेकडून भगदाड पाडत खाली येणे त्याला जास्त सोपे वाटले असावे. ह्या वाटचालीत त्याला हरबाजी देशमुख हा शूर लढवय्या सामील झाला. भौमराजाने सुद्धा निघताना प्रतापबिंबला स्वतःकडची २ हजाराची फौज दिली. त्या फौजेचे नेतृत्व करायला त्याने सोबत दिला होता बाळाजी शिंदे. हा बाळाजी युद्धात प्रखर म्हणून प्रचंड नावाजलेला होता.

प्रताप बिंबाच्या फौजेने सर्वप्रथम  दमण प्रांतावर हल्ला चढवला. तिथे राज्य करीत असलेला काळोजी सिरण्या नामक राजा प्रताप बिंबास लगेचच शरण आला. कालोजीच्या हाताखाली असलेला दमण ते चिखली हा भाग बिंबाने ताब्यात घेतला. प्रताप बिंबाने तेथील व्यवस्था पाहण्यासाठी हरबाजी कुळकरणी (कुलकर्णी) नावाचा अधिकारी नेमला आणि तो पुढे निघाला. उंबरगाव - डहाणू - तारापूर करत तो महिकावतीस उर्फ माहीम येथे येऊन पोचला. तेथे विनाजी घोडेल म्हणून कोणी राजा राज्य करीत होता. त्यास बिंबाने दूर सारले आणि देशाची स्थिती अवलोकन केली. त्यास असे आढळले की, शिलाहारांसारख्या सुसंस्कृत मराठ्यांच्या हातून अश्या शुल्लक लोकांच्या हाती इथली सत्ता गेल्यामुळे सुपीकता ओसरून, प्रदेश देशोधडीला लागला होता. नयनरम्य असे समुद्रतीर वैराण आणि उद्वस्त झालेले होते. हे सर्व पाहून प्रतापबिंब खूप दु:ख्खी झाला. त्याने पैठण आणि चांपानेरवरून ब्राह्मण आणि मराठे लोक आणून इथली वसाहत पुन्हा स्थिरस्थावर करावयाचा निर्णय घेतला. तसे पत्र त्याने आपला मोठा भाऊ गोवर्धन बिंब आणि पैठणला भौमाकडे रवाना केले. आपला पुत्र मही बिंब यास देखील इथे धाडून द्यावे असे त्याने आपल्या मोठ्या भावाला कळविले.

दुसरीकडे प्रताप बिंबाने आपला मुख्य प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी याला ठाणे - साष्टी आणि मुंबईचा मुलुख काबीज करण्यासाठी पाठविले. त्याच्यासोबत किती फौज दिली हे मात्र बखर स्पष्ट करीत नाही. बाळकृष्णराव सोमवंशी याने पहिल्याच फटक्यात ठाण्यावर हल्ला चढवत यशवंतराव शिलाहार (शेलार) याला ठार केले आणि शिलाहारांची उरली सुरली सत्ता ठाण्यातून उपटून टाकली. बाळकृष्णराव सोमवंशी पुढे खाडी ओलांडून कळवा येथे पोचला. तेथे कोकाट्या नावाच्या कोण्या मराठ्याचा अंमल होता. तो बाळकृष्णरावास शरण आला. बाळकृष्णराव तिथून मुंबईच्या दिशेने निघाला आणि मढ येथे पोचला. तिथून तो जुहू मार्गे वाळूकेश्वरी पोचला. तिथे असलेले बाणगंगा तीर्थ आणि हनुमानाच्या प्रतिमा पाहून तो निश्चित आनंदाला असेल. त्याने फौजेसकट तिथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आणि 'येथील सर्व देश रान होऊन गेला आहे. आपण स्वतः: एकदा येऊन पहावा' अश्या आशयाचे पात्र प्रताप बिंबास पाठविले. प्रताप बिंबाने माहीम प्रांताप्रमाणे वाळूकेश्वरी देखील वसाहत बसविण्याचा निर्णय केला.

प्रताप बिंबास दमण ते महिकावती आणि बाळकृष्णराव यास महिकावती ते वाळुकेश्वर हे अंतर पार करायला फार तर २ महिने लागले असावेत. गेल्या ५० वर्षातील लढाया - जाळपोळ यांनी प्रदेश इतका वैरण होऊन गेला होता की हा संपूर्ण प्रदेश हातात घ्यायला बिंबास फार प्रयास पडले नाहीत. पण खरे प्रयास पुढे होते. बाहेरून लोक आणून देश पुन्हा बसविणे हे काम नक्कीच सोपे नव्हते. १६४२-४४ मध्ये दादोजी कोंडदेव आणि मासाहेब जिजामाता यांना पुणे वसवताना जे कष्ट करावे लागले तेवढेच किंवा त्यापेखा जास्त कष्ट प्रताप बिंबास पडले असावेत. शेती, ग्रामसंस्था, व्यापार-उदीम हे पुन्हा सुरू व्हावे यासाठी त्याने काही निश्चित धोरणे आखली असतील. इ.स. ११४० मध्ये स्वतःच्या राजधानीचे गाव म्हणून त्याने केळवे-माहीम निश्चित केले. त्याचे कारण बखरकार असे सांगतो की, दमण ते वाळुकेश्वर हे अंतर २८ कोस असून (आजच्या भाषेत ८४ मैल किंवा १३४ किमी.) केळवे-माहीम हा त्याचा मध्य बिंदू आहे. राजधानीचे ठिकाण बनवूनही त्याने तिथे काही विशेष बांधकाम केले असावे असे वाटत नाही. कारण आज कुठल्याच प्रकारचे अवशेष संपूर्ण केळवे-माहीम प्रांतात आढळत नाहीत. पैशाची टंचाई आणि देश वसाहत बसवायच्या जबाबदारी मुळे त्याने बहुदा ते टाळले असावे.

काही महिन्यात प्रताप बिंबाचा मुलगा मही बिंब चांपानेर वरून महिकावतीस पोचला. त्याने देश वसाहत वसवण्यासाठी सोबत अनेक लोक आणले होते. त्यात ६६ मुख्य कुळे होती. बखरकार लिहितो की त्यात २७ सोमवंशी, १२ सूर्यवंशी आणि ९ शेषवंशी कुळे होती. या शिवाय वाणी, उदमी, गुजर, वैश्य, लाड, दैवज्ञ अशी काही कुळे होती. भौमाने जी कुळे पैठणवरून पाठवली त्यात मुख्य ब्राह्मण कुळे होती. शास्त्री, वैदक, पंडित, आचार्य, उपाध्ये, ज्योतिषी, पुरोहित ही यादी बखरकार देतो. ह्यातील प्रमुख कुळे घेऊन प्रताप बिंब वाळुकेश्वर येथे गेला. बाळकृष्णराव फौजेसकट जिथे मुक्काम करून होता तिथे त्याने स्वतःचा राज्यारोहणसमारंभ करून घेतला. ह्या समारंभानिमित्ताने त्याने शेषवंशीयांचे कुलगुरु असणाऱ्या गंगाधर नाईक सावखेडकर यांस पसपवली गाव तर राजपुरोहित असणाऱ्या विश्वनाथपंत कांबळे यांस पाहाड गाव इनाम दिला. प्रताप बिंब स्वतः काही काल वाहिनळे - राजणफर येथे राहिला आणि मग कान्हेरी येथील गुहेमध्ये देखील त्याने काही काळ मुक्काम ठोकला. मरोळ येथील महाळजापूर (एकूण २२ गावे), मालाड येथील नरसापूर (एकूण २२ गावे), उत्तन (२२ गावे) आणि घोडबंदर (एकूण ३३ गावे) अश्या विविध ठिकाणी त्याने नवीन वसाहत बसविली. ३ वर्षाकरिता व्यापारी जकात नाही असा बंदोबस्त देखील केला.

आज मुंबईमध्ये पसपवली, पाहाड, वाहिनळे - राजणफर ही गावे कोठे आहेत? ह्याबद्दल कोणी अधिक माहिती देऊ शकेल का?

क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग ४ : मही बिंबाची ठाणे - कोकणची राजवट ...

14 May 2011

महिकावतीची बखर - भाग २ : बखरीतील जुनी नावे ...

महिकावतीची बखर ही १४ व्या ते १६ व्या शतकात लिहिली गेली असल्याने ह्यात जुन्या मराठी शब्दांचा प्रचंड समावेश आहे. कै. राजवाडे यांनी बखरीमधल्या एकूण शब्दांची संख्या मोजली ती सुमारे १२ हजार इतकी भरली. ह्यात १०३ यावनी उर्फ फारशी शब्द आलेले आहेत असे त्यानी प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. १२ हजारात फक्त १०३ शब्द म्हणजे मुसलमानी सत्ता येऊनही रोजच्या व्यवहारात डोईजड होईल इतकी ती कोकणात तरी फैलावली नव्हती असेच म्हणावे लागेल. संपूर्ण बखरीमध्ये उत्तर कोकण म्हणजे मुंबई - ठाणे आणि आसपास परिसरातील गावांची, किल्ल्यांची आणि प्रांतांची एकूण ३९६ नावे आलेली आहेत. त्यातील महत्वाची आणि मोजकी ६० नावे पुढे देत आहे. त्यांच्या जुन्या नावांपुढे सध्याची नावे कंसात दिलेली आहेत...

१. आगाशी (आगाशी- विरार जवळ)
२. उतन (उत्तन - भाईंदर जवळ)
३. कळवे (कळवा - ठाणे शहर)
४. कान्हेरी  (बोरीवली)
५. कोंडीवटे (कोंदिवडे - कर्जत - राजमाची पायथा)
६. आन्धेरी (अंधेरी)
७. कानझुरे (कांझूर - कांझूरमार्ग)
८. कालिणे (कालिना - सांताक्रूझ)
९. कोपरी (कोपरी - ठाणे पूर्व)
१०. कोलसेत (कोलशेत - ठाणे - घोडबंदर)
११. उरण (उरण)
१२. आसनपे (आसनगाव?)
१३. कल्याण (कल्याण)
१४. कांधवळी (कांदिवली)
१५. खरडी (खर्डी - कसारा जवळ)
१६. घोडबंदर (घोडबंदर ठाणे)
१७. चेउल (चौल - अलिबाग)
१८. डिडोशी (दिंडोशी) 
१९. तांदूळवाडी पैलदेची (तांदूळवाडी - पालघर जवळ)
२०. ताराघर (तारापूर - पालघरजवळ)
२१. तुरफे (तुर्भे)
२२. गोराई (गोराई)
२३. चरई (चरई - ठाणे पश्चिम)
२४. चेने (चेना - ठाणे घोडबंदर)
२५. चेंभूर (चेंबूर)
२६. जवार (जव्हार)
२७. डोंगरी (डोंगरी - मुंबई)
२८. दहीसापूर (दहिसर?)
२९. गोरगाव (गोरेगाव)
३०. चेंदणी (चेंदणी - ठाणे खाडीकडील भाग)
३१. जुहू (जुहू)
३२. तळोजे महाल (तळोजा - पनवेलजवळ)
३३. दांडाळे (दांडाळेतळे वसई)
३४. नागावे (नायगाव)
३५. बोरवली (बोरीवली) 
३६. भाईखळे (भायखळा)
३७. महिकावती (माहीम - पालघर)
३८. बिंबस्थान (केळवे - पालघर)
३९. देवनरे (देवनार)
४०. नाउर (नाहूर - मुंबई)
४१. मणोर (मनोरी - मुंबई)
४२. मागाठण (मागाठणे - मुंबई)
४३. वरोळी (वरळी)
४४. वासी (वाशी)
४५. वाळुकेश्वर (वाळकेश्वर)
४६. वेउर (येऊर - ठाणे)
४७. वोवळे (ओवळे - ओवळा - ठाणे घोडबंदर)
४८. वरसावे (वर्सोवा)
४९. वांदरे (बांद्रा - मुंबई)
५०. विह्रार (विरार)
५१. माझिवडे (माजिवडा - ठाणे घोडबंदर)
५२. काशीमिरे (काशीमिरे - मीरारोड मधील)
५३. सीरगाव (शिरगाव - पालघर)
५४. मुंबई (मुंबई)
५५. मुळूद (मुलुंड) 
५६. सानपे (सानपाडा?)
५७. साहार (सहार - मुंबई विमानतळ भाग)
५८. सीव (शिव - सायन)
५९. साष्टी (ठाणे परिसर)
६०. सोपारे (नालासोपारा)


क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग ३ : प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी ...

13 May 2011

महिकावतीची बखर - भाग १ : प्रस्तावना ...

महिकावतीची बखर हे इतिहासआचार्य कै. वि. का. राजवाडे यांनी लिहिलेले आणि वरदा प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले पुस्तक ३-४ वर्षापूर्वी अचानक माझ्या वाचनात आले. त्यानंतर हे पुस्तक मी अनेकदा वाचून काढले. पुस्तकाची पहिली आवृत्ती १९२४ साली तर दुसरी आवृत्ती १९९१ साली प्रकाशित झाली होती. मला मिळालेले पुस्तक २० वर्षे जुने असून ते अद्याप सुस्थितीत आहे. राजवाडे यांना ही बखर कल्याणच्या सदाशिव महादेव दिवेकर नामक व्यक्तीने वसईच्या हिरा हरी भंडारी यांच्याकडून मिळवून दिली होती. सध्या ही बखर बहुदा राजवाडे यांच्या धुळे येथील संस्थेत असावी असे वाटते. राजवाडे यांनी बखरीचा अभ्यास करून एकूण ४९ मुद्यांवर ११० पानी जी प्रस्तावना तयार केली ती खूपच महत्वाची आहे.

महिकावती म्हणजे माहीम. हे माहीम म्हणजे मुंबईचे माहीम नसून पालघर येथील केळवे-माहीम मधील माहीम आहे. उत्तर कोकणचा इतिहास सांगणारी ही बखर साधारणपणे १४व्या शतकात लिहिली गेली असून ह्या बखरीमधला इतिहास काळ शके १०६० म्हणजे ई.स. ११३८ पर्यंत मागे जातो. आत्तापर्यंत सापडलेल्या सर्व बखरींमध्ये ही अत्यंत जुनाट अशी बखर आहे.

ह्या बखरीचे एकूण ६ प्रकरणे असून त्यात विविध प्रकारची माहिती दिली आहे. ती कोणती ते आपण बघू...
१. पूर्वपरंपरा - वर्णउत्पत्ती - वर्णावर्ण - व्याख्या : हे प्रकरण शके १५०० (इ.स. १५७८) च्या आसपास भगवान दत्त नामक व्यक्तीने लिहिले.
२. राजवंशावळी : हे प्रकरण शके १३७० (इ.स. १४४८) च्या फाल्गुन महिन्यात केशवाचार्य या व्यक्तीने लिहिले.
३. निवाडे व हकीकती : हे प्रकरण शके १३७० (इ.स. १४४८) नंतर केशवाचार्य या व्यक्तीने लगेचच लिहिले आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणाचा काळ हा पहिल्या प्रकरणाच्या आधीचा आहे हे वाचकांच्या लक्ष्यात आले असेलच. असे का तो प्रश्न पुढे दूर होईल. शिवाय शके आणि इसवी सन यातील ७८ वर्षांचा फरकही लक्ष्यात आला असेलच. आता पुढचे प्रकरण बघुया..

४. श्रीचिंतामणीकौस्तुभपुराण : हे प्रकरण शके १५०० (इ.स. १५७८) च्या आसपास भगवान दत्त नामक व्यक्तीने लिहिले.
५. पाठाराज्ञातीवंशावळी :  हे प्रकरण शके १४६० (इ.स. १५३८) मध्ये लिहिले गेले.. कर्ता मात्र अनामक आहे.
६. वंशावळी : हे प्रकरण शके १४०० (इ.स.१४७८) मध्ये लिहिले गेले आहे असे ह्या प्रकरणाचा अनामक कर्ता सांगतो.

पहिल्या ३ प्रकरणाप्रमाणे येथेही सहाव्या प्रकरणाचा काळ हा पाचव्या आणि पाचव्याचा काळ चौथ्या प्रकरणाआधीचा आहे. असे का हे आपण आता बघुया.

वरील लिखाण नीट वाचल्यास हे स्पष्ट होते की प्रकरण २ व ३ ही सर्वात आधी लिहिली गेली. ती केशवाचार्याने लिहिली. ह्यात माहिम प्रांतामधील सर्व कुळांची वंशपद्धती आली आहे. प्रकरण २ व ३ नंतर थेट ६ वे प्रकरण लिहिले गेले. ह्यात फक्त प्रकरण २ आणि ३ मध्ये राहून गेलेल्या कोळंबा-शिळंबा कुळांची वंशपद्धती आली आहे. त्यानंतर प्रकरण ५ वे लिहिले गेले. ह्यात महिकावती प्रांतात पाठारे प्रभू कसे आले त्याची हकीकत आहे. प्रकरण ५ व ६ यांचा कर्ता मात्र अनामक आहे. ह्यानंतर सुमारे ५० वर्षांनी भगवान दत्त नामक व्यक्तीच्या हाती ही ४ प्रकरणे गेली. त्याने  प्रकरण २ व ३ वरती प्रकरण १ आणि ५ व ६ वरती प्रकरण ४ अशी स्वतंत्र प्रकरणे चढवली. अश्याप्रकारे प्रकरण १-२-३ आणि प्रकरण ४-५-६ अश्या दोन स्वतंत्र बखरी तयार झाल्या. पुढे अजून कोणा एका दुसऱ्या अनामिकाच्या हाती ही सर्व प्रकरणे इ.स. १६०० च्या आसपास पडली त्याने ती एकत्र करून सबंध ग्रंथ तयार केला. थोडक्यात इ.स. १४४८ ते इ.स. १६०० अशी १५० वर्षे ह्या बखरीत लिखाणाची भर पडत गेली.

मुळात केशवाचार्याने हे लिखाण का केले आणि कोणाच्या सांगण्यावरून केले ते आपण आता बघुया...

शके १३७० (इ.स. १४४८) मध्ये मालाड (मुंबई) येथील देसला उर्फ देसाई नायकोराव याने केशवाचार्याला वंशपद्धतीचे कर्म करावयास सांगितले. बखरीतील पान ५३ वर केशवाचार्य लिखाणाचे कारण सांगतो.

"सर्व कोंकणप्रांत म्लेच्छानी आक्रमण करून, येथून तेथून चोहीकडे सर्वत्र म्लेच्छावर्णा खाली पृथ्वी बुडून गेली. वर्णावर्ण वोळख नाहीशी झाली स्वकुळाची वास्तपुस्त कोणाच्या गावी हि राहिली नाही. क्षत्रियांनी राज्याभिमान सांडिला, शस्त्रे सोडिली व केवळ कृषिधर्म स्वीकारुन कित्येक निव्वळ कुणबी बनले, कित्येकांनी कारकूनवृत्ती आदरिली, कांहिक सेवावृत्ति अंगीकारून निभ्रांत शुद्र ठरले, शाणी कित्येक नष्ट होऊन नामशेष हि राहिले नाहीत. बहुत आचारहीन झाले. गोत्र, प्रवर, कुळस्वामी, कुळगुरु ह्यांची बहुतेकांस आठवण हि राहिली नाही. अशी ह्या तीन शें वर्षात भ्रष्टता माजली व महाराष्ट्रधर्म अज्जी बुडाला. अश्या संकटसमयी श्रीदेवी कुळस्वामिणी, मालाडचा देसला जो नायकोराव त्याच्या स्वप्नात येऊन, सांगती झाली की, नायकोरावा, उठ, महाराष्ट्रधर्म रक्षिण्याकरीता अठरा पगड जातीचा मेळावा कर आणि केळव्यापासून मुंबईपर्यंतच्या सर्व गावचे, सर्व जातींचे व सर्व गोत्रांचे खलक जमवून, त्यांस केशवाचार्याच्या मुखे महाराष्ट्रधर्म सांगीव"

'ह्यानंतर मालाडच्या नायकोरावाने केशवचार्याच्या संमतीने मालाड उर्फ म्हालजापूर येथील जोगेश्वरीच्या देवळापुढे विस्त्रीर्ण मंडप रचून, तीन हजार साहा शें पंचावन्न लोक (३६५५) जमा केले. त्यात नायक (नाईक), देसाई, पुरोहित, कुळगुरु, आचार्य, उपाध्ये, जोशी व इतर मुख्य मुख्य वृतीवंत पाच शें एकवीस (५२१) होते. ब्राह्मणांनी लक्ष्मीसूतांनी भगवती दुर्गादेवीचे स्तवन केले व श्रीदेवी आद्यशक्ति जगदंबिका महाराष्ट्रधर्म रक्षिका जी जगन्माता दुर्गादेवी ती तुम्हा सर्वांवर सुप्रसन्न असो असा आशीर्वाद दिला. नंतर केशवचार्याने सर्व शिष्टांची संमती घेऊन जमलेल्या सर्व लोकांस प्रस्तुत लिहिली जाणारी वंशपद्धती राजा बिंबापासून (इ.स. ११३८) अद्ययावत कथन केली व महाराष्ट्धर्माचे निरुपण केले. त्या वंशपद्धतीच्या व महाराष्ट्रधर्मकथनाच्या सासष्ट (६६) नकला करून, साक्ष-शिक्यानिशी त्या नकला त्या-त्या कुळास, वंशास व जातीस प्रमाणपूर्वक दिल्या. कुळांनी, वंशांनी व जातींनी त्या शिरी वंदन करून ठेविल्या.'

ज्या महाराष्ट्रधर्माचा उच्चार १७व्या शतकात समर्थ रामदासस्वामींनी आणि १९ व्या शतकात महादेव गोविंद रानडे यांनी केला तो मुळात प्रथम १५व्या शतकात केशवचार्याने केला होता.

त्या ६६ नकलांपैकी आज एकही बखरप्रत उपलब्ध नाही. राजवाडे यांना मिळालेली प्रत ही देखील मूळ बखरीची नक्कल आहे. नक्कल करताना १५० वर्षे भर पडत राहिलेल्या ह्या बखरीमध्ये काही त्रुटी निर्माण झालेल्या आहेत. पण म्हणून ह्या बखरीचे महत्व कमी होत नाही. अजून काही नक्कल केलेल्या प्रती किंवा मूळ प्रती सापडल्या तर सध्या उपलब्ध असलेल्या प्रतीमधल्या त्रुटी सुद्धा कदाचीत भरून निघतील आणि उत्तर कोकणचा आणि महाराष्ट्रधर्माचा जुना वैभवशाली इतिहास नव्याने आपल्यासमोर मांडला जाईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग २ - बखरीतील जुनी नावे ...