Showing posts with label बिंब. Show all posts
Showing posts with label बिंब. Show all posts

17 May 2011

महिकावतीची बखर - भाग ५ : नागरशा आणि बिंबदेव यादवाचे आगमन ...

शके ११५९ (इ.स. १२३७) मध्ये सर्व देसायांच्या संमतीने जनार्दन प्रधान गादीवर आला. मात्र तो फार काळ सत्ता उपभोगू शकला नाही. अवघ्या ४ वर्षात घणदिवीचा राजा नागरशा ठाण्यावर चालून आला. ह्यावेळेस मात्र जनार्दन प्रधान युद्ध जिंकू शकला नाही. नागरशाने युद्ध जिंकले आणि जनार्दनासच आपला मुख्य प्रधान बनवले. अशा तर्हेने बिंब राजघराण्याची सत्ता संपुष्टात आली. नागरशाने सर्व देसायांना एकत्र जमवून देशाचे कागद तपासले आणि ज्यांच्याकडे केशवदेवाचा शिक्का असलेला कागद होता त्यांच्या वृत्या तशाच पुढे चालू ठेवल्या.

केशवदेव बिंबाचा शिक्का असा होता - 

बकदालभ्य यदा गोत्र प्रभावती कुलदेवता
ठाणे स्थाने कृतं राज्य मम मुद्रा विराजते

ह्याच दरम्यान नागरशाला पुत्र प्राप्ती झाली. त्याचे नाव त्रिपुरकुमर ठेवले. नागरशाने पुढील ३० वर्षे विनासायास राज्य केले. शके ११९३ मध्ये (इ.स. १२७१) पुन्हा एकदा उत्तर कोकण ढवळून निघाले. झाले असे की नागरशाचे ३ मेव्हणे नानोजी, विकोजी, बाळकोजी हे नागरशाकडे ठाणे, मालाड आणि मरोळ ही गावे बक्षिस मागत होते. त्रिपुरकुमर वयात येतोय हे पाहून त्यांना त्यांची स्वतंत्र व्यवस्था लावावीशी वाटली असेल. अर्थात ही मागणी  नागरशाने नाकारली. ह्यावरून नाखूष होऊन ते ३ मेव्हणे देवगिरीला रामदेवराय यादव याच्याकडे आश्रयाला गेले. रामदेवराय नुकताच सम्राट पदावर आरूढ झालेला होता. त्याने तिघांचे म्हणणे ऐकून घेतले आणि नागरशाला जेरबंद करतो असे सांगितले. रामदेवरायाने आपला प्रधान हेमाडपंडित याला तिघांबरोबर सैन्य देऊन रवाना केले. हे सैन्य कळवा येथे पोचले असता ठाणे-चेंदणी येथील पाटलाने पिटाळून लावले. त्रिपुरकुमर ह्या सैन्याचा पाठलाग करू लागला. हे सैन्य माहुली किल्ल्याच्या आश्रयास गेले असताना तिथे त्यांच्याबरोबर युद्ध करून त्रिपुरकुमर विजयी झाला.

नागरशाने विजयानंतर विशेष हालचाल केली नाही म्हणून रामदेवरायदेखील शांत होता. रामदेवराय कोकणासाठी एक योजना मात्र निश्चितपणे आखत होता. त्याचे ४ पुत्र होते.
शंकरदेव, केशवदेव, बिंबदेव आणि प्रतापशा. त्याने शंकरदेव यास स्वतःजवळ पैठण येथे ठेवून घेतले. केशवदेवास देवगिरी दिली, बिंबदेवास उदगीर प्रांत दिला तर प्रतापशाला अलंदापूरपाटण दिले. केशवदेव काही काळात वारला आणि त्याचा पुत्र रामदेवराय (दुसरा) हा देवगिरीच्या गादीवर आला. हाच तो रामदेवराय ज्याच्या काळात फक्त कोकणच नव्हे तर संपूर्ण दक्षिणपट हादरवणारी एक घटना घडली. ती म्हणजे नर्मदा ओलांडून अल्लाउद्दिन खिलजी देवगिरीवर चाल करून आला. साल होते शके १२१६ (इ.स.१२९४)

ह्यावेळी बिंबदेव यादव हा उदगीरहून गुजरातेकडे सरकला. बहुदा माळव्याच्या बाजूने अल्लाउद्दिनला पायबंद करायचा त्याचा डाव असावा पण तो फसला कारण जितक्या वेगाने अल्लाउद्दिन देवगिरीवर आदळला तितक्याच वेगाने तो परत गेला. देवगिरीला जाण्याऐवजी बिंबदेवाने ठाणे-कोकणच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. ह्या संपूर्ण प्रदेशावर त्याकाळी नागरशाची सत्ता होती. बिंबदेवाकडे नागरशाच्या तिप्पट-चौपट सैन्य होते. त्या जोरावर पुढच्या काही काळात बिंबदेव यादव याने नागरशाला हरवून त्याच्याकडून केळवे-माहीम, साष्टी, मुंबई हिसकावून घेतले आणि त्याला पेन - पनवेल - चेउल प्रांतात पिटाळून लावले. त्याने माहीम बेटात प्रमुख १२ सरदारांची नेमणूक केली. या शिवाय ४२ सूर्यवंशी, १२ सोमवंशी असे ५४ सरदार त्याने नेमले. हे सर्व ५४ सरदार म्हणजे कोकणात आलेले
पातेणे उर्फ पाठारे प्रभू होय. प्रांताचे त्याने १५ मुख्य भाग केले आणि त्यावर फौज नेमून दिली. अशा प्रकारे देशाची व्यवस्था लावून तो महिकावती उर्फ माहीम येथे राहू लागला.

प्रतापबिंब - महीबिंब हे बिंब घराण्याचे राजे आणि बिंबदेव यादव हा यादव घराण्याचा राजा यातील फरक वाचकांच्या लक्ष्यात आला असेलच. नाव साधर्म्यामुळे गोंधळ होवू नये म्हणून इथे तसे स्पष्ट करीत आहे. शके १०६० साली प्रताप - मही बिंबाबरोबर ६६ सूर्य-सोम-शेषवंशी कुळे उत्तर कोकणात आली होती. त्यानंतर १५६ वर्षांनी शके १२१६ मध्ये बिंबदेव यादव याच्याबरोबर अजून ५४ सूर्य-सोमवंशी कुळे उत्तर कोकणात येऊन वसली.


क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग ६ : नागरशाचा प्रतिहल्ला ...

16 May 2011

महिकावतीची बखर - भाग ४ : बिंब घराण्याची ठाणे - कोकणची राजवट ...

शके १०६२ (इ.स. ११४०) मध्ये प्रताप आणि मही बिंब वाळुकेश्वर येथे असताना अपरादित्य शिलाहाराने वसई खाडीच्या उत्तरेकडील भागावर पुन्हा स्वारी केली आणि प्रताप बिंबाने जिंकून घेतलेला भाग पुन्हा स्वतःकडे घेतला. बिंबाचे खुद्द राजधानीचे गाव केळवे-माहीम आणि सोपारा वगैरे प्रदेश शिलाहाराने जिंकून प्रताप बिंबला ठाणे-साष्टी बेटात कोंडून टाकले. केळवे-माहीम हातचे गेल्यामुळे प्रताप बिंबाने वांदरयाच्या दक्षिणेस एक नवे माहीम निर्माण केले आणि त्याला आपली राजधानी नेमले. हेच ते मुंबईचे माहीम जंक्शन. ह्या स्थानाचे नाव मुळच्या केळवे-माहीम मधील माहीम वरून पडले हे देखील ह्या बखरीत स्पष्ट होते. प्रताप बिंबाचा पुत्र मही बिंब शांत बसणाऱ्या पैकी नव्हता. त्याने ठाण्या पलीकडे जाऊन शिलाहारांच्या कल्याण प्रांतावर हल्ला चढवला आणि ते हस्तगत केले. अशाप्रकारे साष्टी बेटांमाधून शिलाहारांची इ.स. ११४१ च्या आसपास हकालपट्टी झाली मात्र शूर्पारक उर्फ नालासोपाराच्या उत्तरेकडे पुढची सव्वाशे वर्षे त्यांनी राज्य उपभोगिले.

शके १०६९ (इ.स. ११४७) मध्ये प्रताप बिंब माहीम (मुंबई) येथे वारला. त्याच्या मागून त्याचा पुत्र
मही बिंब गादीवर आला. त्याने शके १०६९ ते ११३४ (म्हणजे इ.स. ११४७ ते १२१२) अशी तब्बल ६५ वर्षे सुखाने राज्यकारभार केला. ह्या दरम्यान शके १११० (इ.स. ११८८) मध्ये चेउल येथील भोज राजा दक्षिणेवरून ठाण्यावर चालून आला. उरण - पनवेल काबीज करत तो खाडी पलीकडे कळव्याला येऊन पोचला. मही बिंबला ह्याची खबर लागली होतीच. त्याने सेनापती केशवराव आणि हंबीरराव यांना ८ हजार फौज देऊन ठाण्याला रवाना केले होते. कळव्याला ह्या २ फौजेमध्ये तुंबळ युद्ध झाले. ह्यात खुद्द भोज राजा प्राणास मुकला. कच न खाता भोजाच्या मुख्य प्रधानाने दुसरा हल्ला चढवला मात्र त्याला सेनापती केशवरावाने यमसदनी धाडले. तरी सुद्धा न डगमगता भोजाचा एक पाळक पुत्र तिसरा हल्ला करावयास सज्ज झाला. त्यास हंबीररावाणे ठार मारले. आता मात्र भोजाचे उरले सुरले सैन्य पळत सुटले. मही बिंबाच्या फौजेचा मोठा विजय झाला. बिंबाने खुश होऊन अनेक वृत्या आणि पदव्या यांचे दान केले. सेनापती केशवरावाला त्याने गळ्यातील पदक देऊन चौधरीपणा अर्पण केला. देवनारच्या एका पाईकाला (शिपायाला) ठाकूर पद दिले. उत्तनच्या १२ शिपायांना राउत पद मिळाले.

ह्यानंतरच्या काही काळात मही बिंबाने शिलाहारांच्या ताब्यात असलेला सोपारा ते केळवे-माहीम आणि पुढे संजाण - नवसारी (महाराष्ट्र उत्तर सीमा) असा प्रदेश पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. मात्र तो नेमका कधी घेतला हे बखर स्पष्ट करीत नाही. आता मुंबई, ठाणे - साष्टी - कल्याण आणि सोपारा ते नवसारी अश्या विस्तृत प्रदेशावर त्याचे राज्य पसरलेले होते.


मही बिंबला अनेक बायका होत्या पण त्याला बहुदा एकही पुत्र नव्हता. त्याच्या उतार वयात त्याने
कामाई नावाच्या स्त्री बरोबर लग्न केले आणि अखेर तिच्याकडून त्याला पुत्र झाला. त्याचे नाव केशवदेव ठेवले. शके ११३४ (इ.स. १२१२) मध्ये जेंव्हा मही बिंब वारला तेंव्हा हा केशवदेव अवघ्या ५ वर्षांचा होता. तेंव्हा अर्थातच राज्याचा कारभार कामाई देवीवर येऊन पडला. वयाने तरुण आणि रूपाने सुंदर असणाऱ्या कामाईवर राज्याच्या प्रधानाची वाकडी नाराज एव्हाना वळली होती. हे समजून आल्यावर राणी कामाईने तिच्या विश्वासातला माहिमचा एक सरदार हरदोपूर यास ह्यासंबंधी कळविले. हरदोपूराने विश्वासाचे राउत एकत्र केले आणि रात्रीच प्रधानाच्या महालात घुसून त्याचा शिरच्छेद केला. त्यानंतर काही काळाने हरदोपूरने केशवदेव बिंबाचा राज्यारोहण समारंभ घडवून आणला. अशा तर्हेने बिंब घराण्याचा तिसरा राजा राज्य करू लागला. केशवदेव बिंबाने राजा झाल्यावर अनेकांना इनामे दिली आणि ऐश्वर्याने राज्य केले असे बखर म्हणते. याचाच अर्थ त्याचा आजा प्रताप बिंब याने घेतलेल्या मेहनतीचे फळच तो चाखत होता असे म्हणावयास हरकत नाही. देशोधडीला लागलेला प्रांत गेल्या ८० वर्षात शेती, व्यापार-उदीम यांची भरभराट होऊन पुन्हा एकदा स्थिरस्थावर झाला होता.

वयात आलेल्या केशवदेवाने
राजपितामह अशी पदवी धारण केली आणि त्याच्या बडेजावीचे पोवाडे त्याचा भाट संस्थानिकांच्या आणि मांडलिकांच्या राजधान्यासमोरून गाऊ लागला. चेउल येथील भोज घराण्याचा बिंब घराण्यावर राग होता. ३० वर्षांपूर्वी  झालेला पराभव अजूनही भोजांच्या जिव्हारी लागलेला होताच. त्यांनी पुन्हा एकदा युद्धाचा पवित्रा घेतला आणि ठाण्यावर चालून आले. केशवदेवास ही बातमी कळतच त्याने सर्व देसाई एकत्र केले. बिंबाचे सैन्य पुन्हा एकदा खाडी उतरून कळव्याला भोजाचा मुकाबला करायला सज्ज झाले.

बखर म्हणते,
'परदळ देखता केशवदेवाने देसायांना हांकारा दिला. देसाय देसाय देश मिळाला. सिंद्याचा जमाव थोर झाला. नगाऱ्या घाव घातला. कर्णे, बांके, शिंगे, दफ, काहाळा, विराणी वाजली. पाईकापाईक झाली. कळव्या युद्धा थोर झाले.'

युद्धामध्ये देवनार येथील
विनायक म्हातरे (म्हात्रे) याने बाण मारून राजा भोजाच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला. तुंबळ युद्धात भोज पुन्हा एकदा अपयशी झाला. इतक्यात म्हसगडचा संस्थानिक जसवंतराव भोजाच्या मदतीला धावून आला. पुन्हा एकदा लढाई माजली. ह्यावेळी बिंबाच्या फौजेमधल्या सिंद्यानी पराक्रम दाखवला आणि जसवंतरावास जिवंत पकडला. युद्धानंतर झालेल्या तहात केशवदेवाने जसवंतरावास जीवदान देऊन सोडून दिले आणि भोजासमोर मैत्रीचा हात पुढे केला. ही घटना शके ११४६ (इ.स. १२३४)च्या आसपास घडली. तेंव्हा केशवदेव अवघ्या १७ वर्षांचा होता.

उत्तरकोकणात हे सर्व सुरू असताना घाटावर मात्र चालुक्यांचे राज्य संपुष्टात येऊन देवगिरीच्या यादवांचे राज्य आलेले होते. बिंब, भोज यासारखे राजे स्वतंत्र होते की ते ह्या सम्राटांचे मांडलिक होते हे बखरीत कुठेच नीटसे स्पष्ट होत नाही. बिंब मुळचे जिथले होते तिथे ते चौलुक्यांचे उर्फ सोळंकी राजांचे मांडलिक होते पण कोकणात ते स्वतंत्र होते का ते समजत नाही. चौलुक्य आणि चालुक्य हे सुद्धा एकमेकांचे शत्रू होते. आता चालुक्यांच्या जागी यादव येऊन बसले होते. बिंब चौलुक्यांच्या बाजूला तर जसवंतराव आता यादवांच्या बाजूला जाऊन बसला होता. अशातच एक छोटीशी घटना घडली ज्याने कोकणात पुन्हा युद्धाचे वातावरण तापू लागले.


झाले असे की, भोजराजाने कोकणातून केशवदेव बिंबासाठी एक आंब्याची फर्मास पाठवली होती ती ह्या जसवंतरावाने मधल्यामध्ये हडप केली. केशवदेवाने जसवंतरावाकडे निरोप पाठवला की,
'तुमच्या सारख्या भल्या लोकांनी चोऱ्या कराव्या हे युक्त नव्हे.' ह्यावर जसवंतरावाने उलट निरोप धाडला. 'मगदूर असेल तर आमच्या गडाला येऊन, किल्ल्याकुलुपे फोडून आंबे परत घेऊन जावे.' हे ऐकून केशवदेव बिंब पुन्हा एकदा युद्धास उद्युक्त झाला. गेल्यावेळी ह्या जसवंतरावला जिवंत सोडावयास नको होते असे त्याला नक्कीच वाटून गेले असेल. केशवदेवाने पुन्हा एकदा सूर्यवंशी, सोमवंशी आणि शेषवंशी देसायांना एकत्र केले आणि तो भैसेदुर्गवर चालून गेला. हा वेढा तब्बल १२ वर्षे सुरू होता. बखरकार म्हणतो,'चिंचाचे चिंचवणी खाऊन त्याच्या चिंचोऱ्या ज्या पडल्या, त्या रुजून, त्यांचे वृक्ष होऊन, त्यांच्या चिंचा केशवदेवाच्या सैनिकांनी खादल्या.' शेवटी आन्धेरीचा (अंधेरी) कोणी म्हातरा (म्हात्रे) तिथे कामाला होता त्याने भेद केला आणि किल्ला एकदाचा केशवदेवाच्या हाती आला. पुन्हा एकदा जसवंतराव केशवदेवाच्या हाती सापडला. केशवदेवाने त्यास ठार केले की नाही हे बखरीत स्पष्ट नाही पण जिवंत सोडले असेल असे प्रसंगावरून वाटत नाही. कारण बखरीत पुढे कुठेच ह्या जसवंतरावचा उल्लेख येत नाही. लढाई जिंकली म्हणून केशवदेवाने सर्व सरदारांना यथायोग्य इनामे दिली. ही लढाई अंदाजे शके ११५४ (इ.स. १२३२) मध्ये झाली. ह्यानंतर अवघ्या ५ वर्षात केशवदेव अचानक वारला. मरतेवेळी तो अवघ्या ३० वर्षाचा होता आणि त्यास कोणीच पुत्र-संतान नव्हते. अखेर सर्व देसायांनी मिळून मुख्यप्रधान जनार्दन यास गादीवर बसवायचा निर्णय घेतला.

क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग ५ : नागरशा आणि बिंबदेव यादवाचे आगमन ...

15 May 2011

महिकावतीची बखर - भाग ३ : प्रताप बिंबाची कोकणावर स्वारी ...

शके १०६० (इ.स. ११३८)ची गोष्ट. सरस्वतीनदीच्या काठी असलेल्या पालणपुर देशात अणहिलवाडपाटणवर चौलुक्य उर्फ सोळंकी नावाचे राजे राज्य करीत होते. त्यांच्या चंपानी उर्फ चांपानेर नावाच्या संस्थानावर बिंब ह्या आडनावाचे एक सूर्यवंशी क्षत्रिय कुल त्यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. ह्या बिंबांचा पैठण येथे राज्य करणाऱ्या भौम या क्षत्रिय राजघराण्याबरोबर घनिष्ट संबंध होता. भौम राजघराणे जसे महाराष्ट्रिक होते तसे चौलुक्य आणि बिंब देखील महाराष्ट्रिकच होते.

शके १०६० साली गोवर्धन बिंब हा बिंब घराण्याचा राजा होता. त्याचा लहान भाऊ प्रताप बिंब याने उत्तर कोकणावर स्वारी करण्याची योजना शके १०६० मध्ये आखली. त्यावेळी उत्तर कोकणावर शिलाहारांचे राज्य होते. दक्षिण कोकणातील शिलाहारांचे राज्य कदंबांनी हिसकावून घेतलेले होते. गेली ५० वर्षे शिलाहार आणि कदंब यांच्या लढायांमध्ये कोकणात गोंधळ माजलेला होता आणि शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली होती. अशातच उत्तरेकडून चढाई करण्याचा मनोदय प्रताप बिंब याने नक्की केला. सोबत ८ प्रमुख अधिकारी आणि १० हजार फौज घेऊन तो मोहिमेस निघाला.

प्रताप बिंब चांपानेरवरून निघाला तो थेट नर्मदा उतरून, पैठण येथे भौम राजाकडे गेला. तिथे तो संपूर्ण फौजेसह तब्बल २ वर्ष राहिला. प्रताप बिंबला मोहिमेवर निघताना बहुदा पैशाची बरीच अडचण होती असे दिसते नाहीतर तो २ वर्षे काहीही न करता पैठण येथे बसून राहिला नसता. भौम राजाने सुद्धा त्याला जवळ ठेवून घेतले आणि त्याच्या १० हजार फौजेचा खर्च पाहिला याचा अर्थ त्यांच्याच निश्चित जवळचे संबंध होते. अखेर २ वर्षांनी त्याने पैशाची व्यवस्था लावली आणि तो मुंबई-ठाणे भागावर चाल करून आला. यायचा मार्ग मात्र त्याने थोडा उत्तरेवरून घेतला होता. पैठणवरून जुन्नरकडे आल्यावर तो घाट उतरून खाली यायच्या ऐवजी वर गेला आणि दमण म्हणजे सध्याच्या महाराष्ट्र-गुजरात उत्तर सीमाभागाकडून खाली चाल करून आला. कदाचित थेट हल्ला करण्याऐवजी उत्तरेकडून भगदाड पाडत खाली येणे त्याला जास्त सोपे वाटले असावे. ह्या वाटचालीत त्याला हरबाजी देशमुख हा शूर लढवय्या सामील झाला. भौमराजाने सुद्धा निघताना प्रतापबिंबला स्वतःकडची २ हजाराची फौज दिली. त्या फौजेचे नेतृत्व करायला त्याने सोबत दिला होता बाळाजी शिंदे. हा बाळाजी युद्धात प्रखर म्हणून प्रचंड नावाजलेला होता.

प्रताप बिंबाच्या फौजेने सर्वप्रथम  दमण प्रांतावर हल्ला चढवला. तिथे राज्य करीत असलेला काळोजी सिरण्या नामक राजा प्रताप बिंबास लगेचच शरण आला. कालोजीच्या हाताखाली असलेला दमण ते चिखली हा भाग बिंबाने ताब्यात घेतला. प्रताप बिंबाने तेथील व्यवस्था पाहण्यासाठी हरबाजी कुळकरणी (कुलकर्णी) नावाचा अधिकारी नेमला आणि तो पुढे निघाला. उंबरगाव - डहाणू - तारापूर करत तो महिकावतीस उर्फ माहीम येथे येऊन पोचला. तेथे विनाजी घोडेल म्हणून कोणी राजा राज्य करीत होता. त्यास बिंबाने दूर सारले आणि देशाची स्थिती अवलोकन केली. त्यास असे आढळले की, शिलाहारांसारख्या सुसंस्कृत मराठ्यांच्या हातून अश्या शुल्लक लोकांच्या हाती इथली सत्ता गेल्यामुळे सुपीकता ओसरून, प्रदेश देशोधडीला लागला होता. नयनरम्य असे समुद्रतीर वैराण आणि उद्वस्त झालेले होते. हे सर्व पाहून प्रतापबिंब खूप दु:ख्खी झाला. त्याने पैठण आणि चांपानेरवरून ब्राह्मण आणि मराठे लोक आणून इथली वसाहत पुन्हा स्थिरस्थावर करावयाचा निर्णय घेतला. तसे पत्र त्याने आपला मोठा भाऊ गोवर्धन बिंब आणि पैठणला भौमाकडे रवाना केले. आपला पुत्र मही बिंब यास देखील इथे धाडून द्यावे असे त्याने आपल्या मोठ्या भावाला कळविले.

दुसरीकडे प्रताप बिंबाने आपला मुख्य प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी याला ठाणे - साष्टी आणि मुंबईचा मुलुख काबीज करण्यासाठी पाठविले. त्याच्यासोबत किती फौज दिली हे मात्र बखर स्पष्ट करीत नाही. बाळकृष्णराव सोमवंशी याने पहिल्याच फटक्यात ठाण्यावर हल्ला चढवत यशवंतराव शिलाहार (शेलार) याला ठार केले आणि शिलाहारांची उरली सुरली सत्ता ठाण्यातून उपटून टाकली. बाळकृष्णराव सोमवंशी पुढे खाडी ओलांडून कळवा येथे पोचला. तेथे कोकाट्या नावाच्या कोण्या मराठ्याचा अंमल होता. तो बाळकृष्णरावास शरण आला. बाळकृष्णराव तिथून मुंबईच्या दिशेने निघाला आणि मढ येथे पोचला. तिथून तो जुहू मार्गे वाळूकेश्वरी पोचला. तिथे असलेले बाणगंगा तीर्थ आणि हनुमानाच्या प्रतिमा पाहून तो निश्चित आनंदाला असेल. त्याने फौजेसकट तिथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आणि 'येथील सर्व देश रान होऊन गेला आहे. आपण स्वतः: एकदा येऊन पहावा' अश्या आशयाचे पात्र प्रताप बिंबास पाठविले. प्रताप बिंबाने माहीम प्रांताप्रमाणे वाळूकेश्वरी देखील वसाहत बसविण्याचा निर्णय केला.

प्रताप बिंबास दमण ते महिकावती आणि बाळकृष्णराव यास महिकावती ते वाळुकेश्वर हे अंतर पार करायला फार तर २ महिने लागले असावेत. गेल्या ५० वर्षातील लढाया - जाळपोळ यांनी प्रदेश इतका वैरण होऊन गेला होता की हा संपूर्ण प्रदेश हातात घ्यायला बिंबास फार प्रयास पडले नाहीत. पण खरे प्रयास पुढे होते. बाहेरून लोक आणून देश पुन्हा बसविणे हे काम नक्कीच सोपे नव्हते. १६४२-४४ मध्ये दादोजी कोंडदेव आणि मासाहेब जिजामाता यांना पुणे वसवताना जे कष्ट करावे लागले तेवढेच किंवा त्यापेखा जास्त कष्ट प्रताप बिंबास पडले असावेत. शेती, ग्रामसंस्था, व्यापार-उदीम हे पुन्हा सुरू व्हावे यासाठी त्याने काही निश्चित धोरणे आखली असतील. इ.स. ११४० मध्ये स्वतःच्या राजधानीचे गाव म्हणून त्याने केळवे-माहीम निश्चित केले. त्याचे कारण बखरकार असे सांगतो की, दमण ते वाळुकेश्वर हे अंतर २८ कोस असून (आजच्या भाषेत ८४ मैल किंवा १३४ किमी.) केळवे-माहीम हा त्याचा मध्य बिंदू आहे. राजधानीचे ठिकाण बनवूनही त्याने तिथे काही विशेष बांधकाम केले असावे असे वाटत नाही. कारण आज कुठल्याच प्रकारचे अवशेष संपूर्ण केळवे-माहीम प्रांतात आढळत नाहीत. पैशाची टंचाई आणि देश वसाहत बसवायच्या जबाबदारी मुळे त्याने बहुदा ते टाळले असावे.

काही महिन्यात प्रताप बिंबाचा मुलगा मही बिंब चांपानेर वरून महिकावतीस पोचला. त्याने देश वसाहत वसवण्यासाठी सोबत अनेक लोक आणले होते. त्यात ६६ मुख्य कुळे होती. बखरकार लिहितो की त्यात २७ सोमवंशी, १२ सूर्यवंशी आणि ९ शेषवंशी कुळे होती. या शिवाय वाणी, उदमी, गुजर, वैश्य, लाड, दैवज्ञ अशी काही कुळे होती. भौमाने जी कुळे पैठणवरून पाठवली त्यात मुख्य ब्राह्मण कुळे होती. शास्त्री, वैदक, पंडित, आचार्य, उपाध्ये, ज्योतिषी, पुरोहित ही यादी बखरकार देतो. ह्यातील प्रमुख कुळे घेऊन प्रताप बिंब वाळुकेश्वर येथे गेला. बाळकृष्णराव फौजेसकट जिथे मुक्काम करून होता तिथे त्याने स्वतःचा राज्यारोहणसमारंभ करून घेतला. ह्या समारंभानिमित्ताने त्याने शेषवंशीयांचे कुलगुरु असणाऱ्या गंगाधर नाईक सावखेडकर यांस पसपवली गाव तर राजपुरोहित असणाऱ्या विश्वनाथपंत कांबळे यांस पाहाड गाव इनाम दिला. प्रताप बिंब स्वतः काही काल वाहिनळे - राजणफर येथे राहिला आणि मग कान्हेरी येथील गुहेमध्ये देखील त्याने काही काळ मुक्काम ठोकला. मरोळ येथील महाळजापूर (एकूण २२ गावे), मालाड येथील नरसापूर (एकूण २२ गावे), उत्तन (२२ गावे) आणि घोडबंदर (एकूण ३३ गावे) अश्या विविध ठिकाणी त्याने नवीन वसाहत बसविली. ३ वर्षाकरिता व्यापारी जकात नाही असा बंदोबस्त देखील केला.

आज मुंबईमध्ये पसपवली, पाहाड, वाहिनळे - राजणफर ही गावे कोठे आहेत? ह्याबद्दल कोणी अधिक माहिती देऊ शकेल का?

क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग ४ : मही बिंबाची ठाणे - कोकणची राजवट ...